तुडवण कादंबरी प्रतिक्रिया

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस ने FBवर प्रसिद्ध केलेली वाचकाची  प्रतिक्रिया. 

#वर्तमानातील_ग्रामीण_जगण्याचा_वेध_–#तुडवण
 
मराठी साहित्याच्या प्रवाहाला वेगळं वळण लावण्यात,वेगळा रंग देण्यात आणि वेगळं परिमाण देण्यात ग्रामीण पार्श्वभूमीवरील,अ-नागर जीवनावरील साहित्याचा वाटा मोठा आहे. र.वा दिघे, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, शंकर पाटील, वामन होवाळ,सदानंद देशमुख अशा अनेकांनी ग्रामीण भागातील जगण्याचे – सोसण्याचे कवडसे आपल्या लेखनातून मांडले आहेत. 
        गेल्या दशकभरामध्ये एकूणच जीवनशैली झपाटयाने बदलली आहे , तांत्रिक प्रगतीपासून ते आर्थिक स्तरापर्यंत अनेक घडामोडींनी शहरातील जीवन जसे व्यापले आहे,तसेच ग्रामीण जगणेही ग्रासले आहे. या बदललेल्या चित्राचा वेध एका कुटुंबच्या माध्यमातून घेणारी कादंबरी म्हणजे कैलास दौंड यांची ‘तुडवण ’.
ही गोष्ट जशी डि. एड. होऊनही नोकरी न मिळाल्याने क्लिनरचं काम करणाऱ्या नारायणची आहे,तशीच ती पावसानं ओढ दिल्यावर ओढगस्तीला येणाऱ्या गावगाड्याची आहे,जावयाचा मानपान करण्य़ासाठी लेकीसारखी सांभाळलेली गाय विकणाऱ्या शेतकऱ्याची आणि नियतिच्या फटकाऱ्यांनी हरुन न जाता जिद्दीने लढ्णाऱ्या राधाक्काची ही गोष्ट आहे. डिजिटल होऊ पाहाणाऱ्या खॆडेगावातील जगणं मात्र अधांतरी होऊन बसलंय आणि आयुष्याला ग्रासणाऱ्या प्रश्नांच्या झळीने करपणाऱ्या मनांची तलखी शमवणारं उत्तर कोणाकडॆच नाही या चरचरीत वास्तवाकडॆ ‘तुडवण’ ही कादंबरी लक्ष वेधते.
        बोलीभाषेचा प्रभावी वापर , सहज संवाद,वेधक प्रसंग चित्रण यामुळॆ कैलास दौंड यांची ‘तुडवण’ ही कादंबरी वाचकांच्या मनाची पकड घेते. अहमदनगर जिल्ह्यातील गावांमध्ये आणि बीड जिल्ह्यातील गावांमध्ये बोलली जाणारी नगरी बोली या कादंबरीत वाचायला मिळते, त्यातील अनेक शब्दांचे अर्थ शेवटी दिले असल्याने कादंबरीचा आस्वाद घॆणे सोपे जाते. सतीश भावसारांचे मुखपृष्ठ बोलके आहे.
https://www.majesticreaders.com/book/12910/tudvan-kailas-daund-majestic-publishing-house-buy-marathi-books-online-at-majesticreaders-9789387453401

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर