देवाच्या दिवट्या आणि गोंधळलेली गावे




( गाव : उब आणि धग ) 
  ○ देवाच्या दिवट्या आणि गोंधळलेली गावं.
                 डॉ. कैलास दौंड

    पूर्वी म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी सायंकाळी जेवणखाणं झालं की घरासमोर गप्पा मारत बसणं हे नित्याचच असायचं. त्याला अपवाद असायचा तो पावसाळ्यातील सर्द रात्रींचा. एरवी हिवाळा असो की उन्हाळा रात्री दहा अकरा वाजेपर्यंत गप्पाष्टक रंगायचच. शेतातील कामाच्या संबंधानं गप्पांना सुरूवात होई. मग त्या जसजसे  फाटे फुटतील तशाच पुढे जात. त्यात अनेक प्रसंग असत, अनेक गावे असत, कितीतरी किस्से असत, काही गोष्टी असत, काही घटना सत्य असत तर काही गप्पा सत्य घटनेवर आधारलेल्या असत. काही तर तद्दन खोट्या वाटतील इतक्या काल्पनिक असत. एकुणच एक अद्भुत दुनिया अशा गप्पात अनुभवायला मिळे हे मात्र नक्की . त्यामुळे सहाजिकच लहान मुलांना या गप्पांना ऐकत रहावेसे वाटे. जणू रहस्यकथांचे एखादे पुस्तकच आपल्यापुढे उलगडते आहे असे वाटे. इथे कोणीतरी राक्षसासारखे काम करणारा असे. कुणीतरी भुतासोबत बोललेला असे, कुणी चोरांना घाबरवलेले असे तर कुणी आणखी काहीतरी दिव्य केलेले असे. या गप्पांना कसलेही सेन्सॉर नसे. गोष्टी सुरू झाल्या की त्या वाटेल तशा रंगत. पोरांना शाळेत कितीतरी वेळा शिक्षकांनी 'भूतेखेते नसतात, ती केवळ कल्पना आहे' असे अनेकदा सांगितलेले असले तरी मुलांना वाटे की गप्पात जे ऐकले आहे तेच खरे!
         अशाच एकदा सायंकाळी शेकोटी पेटवून गप्पा गोष्टी सुरू होत्या. एकजण म्हातारा गोष्ट सांगत होता. त्या गोष्टीत देवाच्या दिवट्या निघाल्याचे तो सांगत होता. मग काय मूळ गोष्ट राहीली बाजूलाच प्रत्येकजण आपण सुद्धा असे काही भव्य दिव्य पाहिलेले असल्याचे सांगू लागला. कल्पनांच्या भरार्‍या चालू होत्या नुसत्या. देव, देवता रात्रीच्या वार्‍यात शिवारातून फिरायला निघतात. अशावेळी सगळ्यात समोरच्या देवाच्या हातात पेटलेली दिवटी असते, कधीकधी सगळ्यांच्याच हातात दिवट्या असतात . कधी बिरोबा, म्हसोबा किंवा खंडोबाची अशी फेरी निघते तर कधी आसरा किंवा मावलयाची देखील अशी फेरी निघते,  असे गप्पातुन लहानपणी खेड्यातल्या पोरांना हमखास ऐकायला मिळालेले असे. मग आपल्यालाही असे दृष्य नक्की बघायला मिळेल याची आशा वाटू लागे. अगदी राजपुत्राला उंबराचे फुल मिळाल्याची गोष्ट ऐकून आपल्यालाही कधी ना कधी शिवेवरल्या उंबराच्या झाडावर नक्की फूल दिसेल असे वाटायचे. कारण दिवट्या, उंबराचे फूल अशा असाधारण घटना ज्यांना दिसतात ते लोक प्रचंड भाग्यवान असल्याचे आणि त्यामुळे त्यांचा भाग्योदय झाल्याचे त्या त्या गोष्टीतच ते सांगितलेले असे.
एक दिवस गप्पा ऐकत असताना खरोखरच मला दूर अंतरावर अंधारात दिवट्या चमकताना दिसतात. मनात थोडी भीती वाटते परंतु पुन्हा कोणी लोक शेतात जात असतील किंवा चोर चोरी करण्यासाठी जात असतील असे वाटून घाबरलो. पुन्हा खात्री करण्यासाठी शेकत असलेल्या वयस्कर माणसांना त्या दिवट्या   दाखवल्या. तर तेसुद्धा साशंक झाले एरवी खूप शूरासारख्या गप्पा मारणाऱ्या माणसांना अचानक दिसणार्‍या त्या ज्योती म्हणजे देवाच्या दिवट्याच आहेत असे वाटले. मग मला कळले की ज्या गोष्टीची भीती वाटते त्यांना देवाच्या हवाली करून माणसे शांत बसतात. आणि आपल्या मनातली भीती दाबून टाकतात. त्याचाच प्रत्यय येथे आला होता. पुढे पुढे कधीकधी पावसाळ्याच्या दिवसातही घराच्या दारातून पाठीमागे पाहिले की एक नदी होती.  त्या नदीच्या अंगाला भरपूर झाडी होती. त्या झाडीत ही रात्री आठ साडेआठच्या सुमारास टॉर्च चमकल्यासारखा उजेड पडत असे. त्या उजेडाला ही माणसे  देवाच्या दिवट्या समजत असत. शेजारच्या गावच्या  डोंगरावरून जाणारा एक महामार्ग होता. त्या महामार्गाला एक वळण होते. रात्री येणारी वाहने त्या वळणामुळे अचानक दिशा बदलत म्हणून दुरून येणारा लाईट अचानक अदृश्य होतांना दिसत असे. अशा अचानक अदृश्य होणाऱ्या प्रकाशाला देवाच्या दिवट्या समजून लोक शांत बसत.  तर काही स्त्रिया मनातून घाबरून गावातल्या, नदीतल्या, डोंगरातल्या मावलयांना  हात जोडत. असे हे गावाला बिलगून असलेले देवांच्या दिवट्यांचे पुराण फक्त माझ्याच गावात होते असे नाही. आपल्याकडच्या जवळपास सगळ्याच खेडेगावात असे पुराण चालू असते . त्यामागचे तत्व आणि माणसाची विचारधारा एकच असते हे मात्र खरे!
               खरंतर हा उजेड थोडाच असतो , मिनमिनता असतो पण या उजेडाला थोडा भीतीचा स्पर्श असतो. म्हणजे जो कोणी तो उजेड घेऊन शेतात किंवा अन्य ठिकाणी जात असेल तो भीती दूर व्हावी म्हणून उजेड घेऊन जात असेल. आणि बघणाऱ्यांना मात्र तो उजेड घेऊन जाणारे कोण आहे हे न कळल्यामुळे भिती वाटत असते. तसे पाहिले तर त्या दिवट्यांचा  उजेड अगदी थोडासाच   परंतु अवतीभोवती असणाऱ्या अंधारात त्या देवतांना तो आणखी तेजस्वी बनवत असे. रात्रीच्या अंधाराचे एक गूढ वलय त्याभोवती कायम असे. आज मी त्यावेळचे ते प्रसंग आठवून विचार करत असतो की, त्याकाळी गावात वीज नव्हती; लोक प्रकाशाचे भुकेले होते .त्यांना उजेड हवा होता, तो मिळत नव्हता. त्यावेळी रात्रीच्या अंगावर येणाऱ्या काळोखात खेड्यातल्या माणसांना  दिवट्या दिसत.  शिवारातून फिरणाऱ्या दिवट्यांच्या मिरवणुका दिसत. म्हणजे माणसे ज्या काळात वागत होती त्याच काळात त्यांच्या कल्पनेतले देवही वागत होते. मात्र आता गावात वीज आहे तर देवांची सुद्धा दिवट्या ऐवजी एलईडी बल्ब किंवा ट्यूबलाईट घेऊन शिवारात फेरी निघाल्याचे काही ऐकिवात येत नाही. कारण आज माणूस बऱ्यापैकी गतिमान झाला आहे. त्याला त्याच्या कामाचा वेग सांभाळणे, त्याच्या गरजांचा वेध घेणे कठीण जात आहे. अशा काळात तो उगीचच अंधारात कशाला बघेल? आणि जर काही उजेड दिसलाच तर तो एक तर त्याला समजून घेईल नाहीतर दुर्लक्ष तरी करीन हे नक्की. एकूणच देवांच्या दिव्यांची जत्रा माणसे कुतुहलाने बघत असतील असे नाही तर त्यामागे प्रबळ असेल ती भीतीची भावना.
      देवाच्या दिवट्या आता कुठेही दिसत नाहीत. निर्मनुष्य असणारे रस्ते असतील की नाही ही देखील एक शंकाच ठरावी अशी स्थिती आहे. एक मात्र खरे की माणसांचा मूळचा स्वभाव, सवयी, भावना आणि सहजप्रवृत्ती बदलत नाहीत. देवांच्या दिवट्या पाहुन हात जोडणारा माणूस आजच्या काळातही तसाच साशंक आहे.
   आज गावातल्या तरूणांच्या हातात काम काम नाही आणि स्वतःचा  उद्योग करायचा म्हटले तरी कोणता उद्योग करावा हा प्रश्न? आणि तो चालेल की नाही हा त्या पुढील प्रश्न? कारण उद्योग टाकणारांची संख्या इतकी वाढती आहे की त्यांचे उत्पादन कोण खरेदी करणार? हे झाले तरुणांच्या बाबतीत. त्यांनी करावे तरी काय? शेती करावी तर शेतीवर किती माणसे जगू शकतील? जी जगू शकतील असे गृहित धरू ते देखील बेभरवश्याचे हवामान, पाऊसमान आणि तितक्याच बेभरवश्याची बाजार व्यवस्था, धोरण व्यवस्था यामुळे कसे जगतील हा प्रश्नच.  हॉटेल टाकावे तर लोकसंख्याप्रमाणे हॉटेल वाढलीत. म्हणजे सर्वत्र काळोखच काळोख असताना देखील कुठेही दिशाभूल करण्यापुरती का होईना दिवटी नजरेस पडत नाही. स्वतःला सिद्ध करत धडपडणारे तरुण पाहिले की वाटते या अंधारातील  तरुणाईला बाहेर कसे काढावे?  त्यांचे नैराश्य कसे दूर करावे? त्यांची संभ्रमावस्था कशी संपवावी? या अंधारातून बाहेर यायला देवांच्या दिव्यांची रांग कशी दिसत नाही? तर आता स्वतःचा प्रकाश स्वतः झाल्याशिवाय मार्ग दिसणार नाही! तथाकथित दिवट्यांच्या जत्रांनी  हा संभ्रम दूर होऊ शकणार नाही.
       गावातील वृद्ध लोक जगण्याच्या लढाईत हतबल झालेले आहेत. त्यांनासुद्धा त्यांची सेवा करण्यासाठी कुणीतरी मसीहा येईल अशी आशा आहे. अंगावर आलेले वार्धक्य आणि आणि मोठा झालेला पैसा या गदारोळात दोन हात अडकलेल्या जीवांनाही अखेरचे दिवस सहन होणारे असावेत अशी आशा आहे.
गावातील दुर्दैवाचे दशावतार कधीही संपत नाहीत. प्रत्यक्षातला आणि संकेतातला अंधार इथे कधीही संपत नाही.  देव-देवतांना येथे कमी नसते तरीदेखील स्त्रियांचे कष्ट त्यांचे हाल-अपेष्टा संपत नाहीत. उपास-तापास यांनी काहीही भले होण्याऐवजी त्यांना अशक्तता जडून काही आजार मागे लागतात. चिंता वाढतात. गावातील पशुधनाची ही पुरती वासलात लागली आहे. जनावरे कधीच संपली आहेत. एकेकाळी शेती वाहणारे बैल देखील संपले आहेत. मग आता गावाभोवती कधीकाळी फिरणार्‍या दिवट्यांचीच  देवळे बांधावीत की काय ?असा विचार कोणाच्या मनात आल्यास लोक त्यालाही दुजोरा देतील इतकी सश्रद्ध नि सोबतच अंधश्रद्धही होत आहेत.
          गावात दिव्यांचा उजेड येईल, आणखी प्रकाश पडेल यासाठी प्रयत्न झाले नाहीत असे नाही. खूप प्रयत्न झाले  गावातली उडणारी माती, चिखलाने माखलेले रस्ते हे बदलले. एकूणच गावातली धुळ काँक्रीटात  बदलली. गावातल्या जत्रा यात्रांचे स्वरूप बदलले. गावात शहरातल्या मॉल मधली जत्रा भरू लागली. शिवारातल्या ओलावा संपला. चकचकीतपणा वाढू लागला. पळापळा ची शर्यत सुरू झाली, सारेच पळू लागलेत, पळायचे कुठे कुणालाच माहीत नाही. स्पर्धा संपत नाही आणि  ध्येय गाठत नाही.  एकूणच सगळे शेकोटी शेजारी बसलेल्या म्हाताऱ्या  सारखे आणि पाठीशी बसलेल्या दिवट्यांना घाबरत असणाऱ्या लहान पोरांसारखे.
     शिक्षणाची गंगा खेड्यातील मुलांना खूप दिवसापासून खुणावत आहे. शिक्षणाची गंगा गावामध्ये अवतरली. अनेक मुले निमशहरी गावात शिकून इंजीनियरिंगला गेली. काहींनी इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. सुरूवातीच्या काळात अनेक जण नोकरी लागले. काहींना कंपनीमध्ये दहा लाखापासून अडीच तीन लाखापर्यंत पॅकेजेस मिळू लागली. मग अनेकांच्या अपेक्षा वाढल्या. जो तो इंजिनिअरिंगला जाऊ लागला... आणि मग कंपन्या तरी किती लोकांना नोकऱ्या देणार? सहाजिकच बेकार इंजिनिअर रस्त्यावर हिंडू लागले. नोकरीला लागले होते ते मिरवून घेऊ लागले. ज्यांना जॉब मिळला नाही ते बेकारीत लोळू लागले. बघता बघता अवघा गाव बेकरीत भीजला. हे झाले लेकरांचे, शेतकऱ्याचे काय? शेतकऱ्याला तर कसले पॅकेज? त्याला पॅकेज नसते, त्याला असते ते ते जागोजाग झालेले लिकेज! ते कसे बंद करावे हे त्यालाच कळत नाही? सगळ्या खर्चाच्या बाजू असतात. एकतर उत्पन्नाचे नाव नसते. झालेच तर त्याला भाव नसतो.नैसर्गिक संकटे सतराशेसाठ असतात. म्हणजे शेतकरीसुद्धा बिगर पॅकेजच्या  बेकार मुलांसारखा! मुलांची शिक्षणं,  आजारपणे,  लग्नकार्य, रोजचा खर्च, कपडालत्ता यासाठी त्याने काय करावे? ही लिकेजेस  कशी बंद करावीत? एक ना अनेक प्रश्न. एक ना अनेक संभ्रमाच्या दिवट्या! नुसती भीती आणि चिंता. त्याच्या ओझ्याखाली जगणारा माणूस. नारायण सुर्वे यांच्या शब्दात ''माणूस सस्ता झाला
बोकड महाग  झाला
जिंदगी मध्ये पोरा पुरता अंधार झाला.''
         पैसा भगवान झाला. माणसापेक्षा पैसा आजच्या काळात श्रेष्ठ झाला. कित्येक गरिबांना तर तो मिळेनासा झाला. लोक  पैशासाठी जिवापाड कष्टाची कामे करतात. खेड्यापाड्यातील कोरडवाहू शेतकरी रब्बी सीझन मध्ये  ऊस तोडणी कामगार बनतात. काही जण वीटभट्टीवर कामाला जातात. काही जण पैशासाठी वाळू तस्करीच्या कामात स्वतःला जुंपून घेतात. पोरे ,लोक चोऱ्यामाऱ्या करतात. मिळेल त्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात.  जर शेतकऱ्यांना नीटनेटके जगायचे असेल तर त्याला किमान वार्षिक सहा लाखाच्या पॅकेजची तरी गरज आहे. पण ते मिळते का? कष्टाची किंमत मिळते का? कृषी संस्कृतीतले गाव आता अंधारात ठेचकाळत आहे? ना त्याला दिवट्यांची भीती वाटत की प्रकाशाची आशा वाटत. तो फक्त आणि फक्त हताश होऊन अनुदानाची वाट पाहतो. आणि जर  पडलेच  तर हातात एखाद्या पावसाच्या शिडकाव्या सारखे अनुदान मिळते. हे वाट पाहणे नित्याचेच, मग सुबत्ता कशी येणार? गावे  प्रकाशमान कशी होणार? रोगालाच समृद्धी समजून जगताना आरोग्याचे महत्व कोणी आणि कोणाला कसे समजून सांगावे हा मोठाच प्रश्न आहे ? या प्रश्नांना भिडून उत्तरे शोधावीच लागतील.
                  तरुणाईला ग्रामविकासाच्या कामात भागीदार करून घ्यायला हवे. गावातील वृक्षारोपण आणि संवर्धन, जलसंधारण आणि पाणी पुरवठा,  शिक्षण, आरोग्य,  पिकनियोजन, पिकांची विक्रीव्यवस्था,  वाहतुक , आजारी व वृद्धांचे काळजी वाहक, प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजक , जत्रा यात्रा आणि सार्वजनिक कार्याचे आयोजक अशा कामातही गावातल्या तरूणांच्या सहभाग वाढवणे गरजेचे असुन हा सहभाग त्याला आर्थिक प्राप्ती करून देणाराही असावा. त्यासाठी लागणारा पैसा लोकसहभाग, ग्रामपंचायत आणि देणगी यातुन ऊभा केला जावा.
   ज्यांच्याकडून गावाच्या विकासाची स्वप्ने पहावीत, त्या तरुणाईतच जर संभ्रमावस्था असेल तर भवितव्याचा विचार न केलेला चांगला! या तरुणांना जर वाचवायचे असेल, गावाची- शहराची प्रगती करायची असेल तर गावागावात फिरणार्‍या तरुणांना समजावून घ्यावे लागेल आणि त्यांना  समजून घेऊन समजावण्यासाठी गावातील बुजुर्गांना पुढे यावे लागेल. त्यांना आजच्या प्रश्नांचे आणि त्या प्रश्नांना प्रामाणिकपणे  भिडण्याचे भान द्यावे लागेल. जगण्याचे प्रामाणिक आणि न्याय्य मार्ग दाखवावे लागतील.  त्या मार्गावरून चालण्याचे धाडस आणि संयम शिकवावा लागेल. मग अंधारात चाचपडणारी माणसे स्वतः उजेडाला कवेत घेतल्याशिवाय कशी राहतील.
~~~~~
~~~~~
   डाॅ. कैलास दौंड
   kailasdaund@gmail.com
   Mo 9850608611


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर