गावातल्या साथी आणि साथ देणारे गाव. डॉ. कैलास दौंड
डॉ. कैलास दौंड
(गाव : उब आणि धग १७)
ओल्या हिरव्या सजीवंत गावाला कधी दुखण्या-भाण्याचं उन लागतं. या उन्हाचा चटका बसू नये म्हणून प्रत्येक मन घाबरतं. कधी पाच - दहा वर्षानी धडकी भरवणारे रोग येतात. माणसं जमेल तसं त्याला तोंड देतात.
मानमोडी, प्लेग, पटकी, स्वाईनफल्यू, चिकनगुनिया अशा साथींच्या अनेक आठवणी गावातील वयस्कर माणसांकडून ऐकायला मिळतात. दवाखाने, प्रवासाची साधने, आर्थिक उपलब्धता या साऱ्यांची कमतरता असल्याने होणारी जीवित हानी मोठीच असे. त्यातून गावात शिळा भात खाऊ नये, विटके अन्न खाऊ नये, घरात उंदीर- घुशी होऊ देऊ नयेत. बाहेरून आल्यावर पाय- हात धुऊनच घरात प्रवेश करावा अशी जागरूकता देखील निर्माण झालेली होती. तरी गावात कधीतरी तापाची साथ येई. लहानमुले विशेषतः आजारी पडत. गोवर किंवा कांजण्या निघत. कधीकधी मोठ्यांना देखील तापीचा फटका बसे. कधी पावसाळ्यात हगवणीची साथ येई आणि लोक पार हल्लक होत. घळाटून जात. कुठे झाडपाला खात, कुठे दंडाला काहीबाही बांधुन ठेवत तर कधी तळलेली कुर्डाई दह्यात भिजवून खायला दिली जाई. असे घरगुती इलाज संपोस्तोवर कंठाशी प्राण येत मग लोक दवाखान्यात जात.
अशातच एक दिवस अचानक कुठल्याश्या जीवघेण्या रोगाची साथ येते. कुणी त्याला कोरोना म्हणत होते तर कोणी कोविड१९ म्हणत होते. लोक म्हणत होते की, हा रोग चीनमधून आलाय.' काही कळत नव्हतं नेमका कुठून आलाय तो? लोकांना ताप येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, सर्दी खोकला होणे आणि नंतर निमोनिया होऊन त्यातच मृत्यू होणे या रोगाचे लक्षण होतं. रोगावर कुठलाही उपचार नव्हता त्यामुळे सारी यंत्रणा भयभीत झाली होती. यावर उपचार म्हणून लागणारे औषधं , उपकरणं याची निर्मिती आणि जमवाजमव यावर सारे लक्ष केंद्रित होऊ लागलं होतं. सारे जगचं भयभीत झालं होतं. कधी अनुभवली नव्हती ती एवढी मोठी रोगाची साथ आसमंतात घिरट्या घालत होती. आपापल्या वितभर पोटाला घेऊन त्याला भरवण्यासाठी दूर दूर आपापली गावे सोडून शहराचा रस्ता धरलेले हजारो- लाखो मजूर, कामगार शहरात मिळेल ती कामे करत शहराच्या उभारणीचे शिल्पकार आणि साक्षीदार झाले होते. या कामाच्या रहाटगाडग्यातुन दिवाळी आणि जत्रा- यात्राला काही लोक वर्षातून एखाद दुसरे वेळी गावी परतत असत. तिथे घरच्या माणसांना. नातेवाईकांना भेटत असतं आणि चार दिवस थांबून पुन्हा शहराचा रस्ता धरत.
या नव्या रोगाच्या भयाने सरकारने ठरवल्यानुसार माणसे कुलूपबंद झाली. रोगाने हा हा म्हणता महामारीचे रूप धारण केले होते. माणसांचे कुलूपबंद होणे एक वेळ सोपे होते पण पोटातली भूक! ती कशी कुलूपबंद होणार?तरी लॉकडाऊन हा शब्द जणू परवलीचा शब्द बणला होता. भुकेने तडफडणाऱ्या लोकांना पाहून काही माणसाच्या मनात कणव निर्माण झाली. अशा कणवेचे नंतर तांडे झाले आणि लोकांना कुणी जमेल तसे अन्न वाटू लागले पण हे किती दिवस चालणार? अखेर त्यालाही मर्यादा होत्या.
एक मात्र खरे की या रोगामुळे माणुसकी विसरलेली अनेक माणसे अचानक माणसासारखी वागायला लागली. पण देणारे हात सर्वांपर्यंत पोहोचतील एवढे लांब नक्कीच नव्हते. माणसांना देता देताच त्यांची दमछाक होत होती. पशू, प्राणी, पक्षी यांचे खायला न मिळाल्याने हाल होत होते. माणसाचे बदललेले वर्तन आणि खाण्याचे हाल यामुळे कुत्री माणसावर वेळी-अवेळी भुंकू लागली. ज्यांना घरात राहणे, एका जागी बसणे सवयीमुळे शक्य नव्हते अशा विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांचा मार मिळू लागला. लोक घरात बसून राहण्याचा प्रयत्न करू लागले. लोकांना घरात बसुन कंटाळा येऊ नये म्हणून रामायण, महाभारत अशा मालिका दूरचित्रवाणीवर प्रसारीत करण्यात येऊ लागल्या. टीव्हीवर सेलिब्रिटी लोक, नट, खेळाडू, चित्रपट कलावंत, प्रसिद्ध लोक 'घरातच रहा स्वस्थ रहा' असे सांगत.(अर्थात ते घरातच असलेलेच लोक पाहत होते.) ते कसा व्यायाम करतात, काय काळजी घेतात हे दाखवले जाऊ लागले. त्यामुळे सामान्य लोकांचे मनोरंजन होऊ लागले .गरीब लोक या काळात कसे दिवस काढतात हे दाखवले असते तर गरिबांना किमान जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली असती. मध्यमवर्गीय लोकांचे लॉकडाऊन तितकेसे भयावह नव्हते पण 'नाही रे' वर्गाचे या दिवसात रोजंदारी नसल्याने खूप हाल होत होते. सरकार त्यांनाही रेशन पुरवण्याचा प्रयत्न करत होते.
गाव खेड्याची बकाल अवस्था अशा दिसतात अधिकच केविलवाणी झाली होती. गावात आधीची संकटे नव्हती असे नाही. पूर्वीही गावात चोरांची भीती होती. गावागावातून अनेक बेरोजगार, बेकार असणाऱ्या अविवाहितांचे तांडेच्या तांडे फिरताना दिसत होते. तशातच तरुणाईत वाढलेली व्यसनाधीनता, मूल्यर्हास, विवेकहीनता, लाचारी, बेरोजगारी या सार्या समस्यांनी गावे हैरान होती. त्यात या नव्या रोगाच्या भितीची पडलेली भर गावाला कोलमडून टाकायला पुरेशी होती.
कोरोणाची साथ आली आणि मग सरकारने त्याच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन जाहीर केले. लोकांना घरात राहण्याची सवय नव्हती पण गर्दी होऊ नये यासाठी घेतली ही काळजी होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, जत्रा , यात्रा, उत्सव, संमेलने असे कार्यक्रम सुरुवातीच्या काळातच बंद करण्यात आले. परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या. त्यामुळे शिकणाऱ्या मुलांचा जीव टांगणीला लागला. त्यातही पुढे दुसऱ्या, तिसऱ्या वेळी लॉकडाऊन वाढवण्यात आले. आता परीक्षा घेता येणे शक्य नाही हे ध्यानात येऊन बहुतांश वर्गातील मुलांना सरळ सरळ पुढच्या वर्गात ढकलण्यात आले. खेड्यातली पोरं अवकाळी सुट्टी लागल्यागत मोकळी झाली. कुठं ओजाळाला जायची सोय नव्हती नाहीतर तिकडेही नक्कीच गेली असती ती. शाळा मास्तरांनी वरिष्ठांच्या फतव्यानुसार घरूनच कामाला सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी समाजमाध्यमावर समुह स्थापन केले होते. त्यावर शिक्षक नवे नवे ज्ञान देत होते. सोडवायला स्वाध्याय देत होते पण हे सगळे पाहता येईल त्याचा लाभ घेता येईल यासाठी लागणारे ॲण्ड्रॉईड मोबाईल फोन अगदीच थोड्या कुटूंबाजवळ होते.थोड्याच दिवसात आपल्याच मागे का ही अभ्यासाची भुणभुण अशी भावना या थोड्या मुलांची होत गेली.
काही मुळातच अभ्यासू असणाऱ्या मुलांनी शिक्षक पोषण आहारातील तादुळ वाटायला आल्यावर आपापल्या वर्गाची पुस्तके वाचण्यासाठी घरी नेली होती. काही कुटुंबातील मुले आईवडिलांना शेती कामात हातभार लावत होती. गावात शेती मातीची, गाई वासरांची, माणसांची उपलब्धता असल्याने दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत जशी मुले परिसर आणि निसर्गाकडून शिकतात तशी ती शिकू लागली.
दरवर्षी दिसणारी लग्न कार्ये आणि पाहुणे रावळे यांची वर्दळ आता अजिबात नव्हती. परीसरात होणारे अखंड हरिनाम सप्ताह खंडीत झाले होते. इतकेच काय गावागावातील छोट्या मोठ्या मंदिरांनाही अपरिहार्यपणे कुलूपे लावावी लागली होती. एरवी वर्षभर गावोगाव किर्तन आणि कथा करीत फिरणारे मठाधिपती, गडाचे महंत, कीर्तनकार संस्थानिक कुठेही लोकांना मदत करतांना दिसत नव्हते. संपूर्ण जगाला भयभीत करणारी महामारी गावाच्या उंबरठ्यावर असतांना. तिला तिथेच थोपवण्याचा गावचा प्रयत्न सुरू होता.
खेड्यातील लोकांना रोगांची सवयच नव्हती असे नाही तर चिकनगुनिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू ,बर्ड फ्लू अशा रोगांनी यापूर्वीच अगदी गाव खेड्यातही हजेरी लावली होती. त्यामुळे लोक त्यांची नावे ऐकून होते आणि आता हा कोरोणा गावाच्या वेशीवर धडकला होता. म्हणजे प्रत्यक्ष जरी तो गावातील कुणाला झालेला नसला तरी प्रत्येक माणसाला त्याची एक अनामिक भीती बसली होती. प्रत्येक माणूस जमेल तेव्हा आपले हात साबणाने स्वच्छ धुत होता. गावातील किराणा दुकानात सॅनिटायझयच्या बाटल्या विकायला आल्या होत्या. नाका तोंडाला रुमाल किंवा पंचा असे मिळेल ते लोक बांधत होते. विनाकारण गर्दीत जात नव्हते की कुणाला घरी बोलवत नव्हते. आणि स्वतःही कुणाच्या घरी जात नव्हती.
शहरात जेव्हा ही साथ आली आणि त्याच्या बातम्या खेड्यासह सर्वत्र पोहचु लागल्या तेव्हा खेडेगावातल्या लोकांना आपण सुरक्षित आहोत असे वाटले खरे पण प्रवासाच्या संपर्क साधनांनी गाव आणि शहरातील अंतर कधीच मिटवून टाकले आहे. शहरात जेव्हा कोणतीही साथ येते तेव्हा गावातील लोकांना सुरूवातीला हा रोग गावात येणार नाही असे वाटते. तरीही जो रोग गावात येऊ शकणार नाही असे वाटते तो रोग नकळतपणे गावाच्या वेशीतून सहजपणे गावात प्रवेश करतो. मग गावालाही अचंबित व्हायला होते. कारण रोगाच्या भीतीने शहरातील लोक गावात येऊ लागतात तेव्हा आता या लोकांबरोबर साथीचा रोग गावात येणारच ही भीती लोकांना वाटत असते. परंतु गावातील लोकांनाच गावात येणे कसे नाकारणार? कारण त्यांचे कुणी तरी गावात असतेच आणि ही पोट भरण्यासाठी बाहेर गेलेली माणसे जेव्हा गावात येतात तेव्हा त्यांना गाव आपल्याला जगवील याची खात्री असते. स्वतःला जगवण्यासाठी येताना कळत-नकळतपणे दुसऱ्यांना मारणारा विषाणू सोबत घेऊन ती येतात. मग गावातील माणसे बाहेरून येणाऱ्या गावातील माणसाकडे परग्रहावरील माणसाकडे पहावे अशा पद्धतीने पाहू लागतात. गावातील समंजस लोक आणि म्होरके अशा बाहेरून येणाऱ्या गावातीलच लोकांवर लक्ष ठेऊन असतात. त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना घरबंद केले जाते मात्र घरातच बसून राहतील ती खेड्यातील माणसे कसली? ती गावा शिवात हिंडत फिरत राहतात. क्वचितच ओळखीचे कोणी त्यांना हटकते अन्यथा नाही. मग इतर लोकच स्वतः स्वतःची काळजी घेऊ लागतात.
लोकांच्या भयभीत झालेल्या मनाला बळ देण्याचे काम करण्यासाठी, त्यांचे मनोबल टिकवण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी अनेक लोक पुढे येतात. या काळात लोकांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान महाशयांनी लोकांना एके दिवशी कोरोना युद्धात मोठी भूमिका निभावणारे डाॅक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलिस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिवसभर घरात बसून सायंकाळी पाच वाजता घराच्या दारात येऊन टाळ्या,थाळी, घंटा किंवा घरातील भांडी आदी वाजवण्याचे आवाहन केले. लोकांनी ते मोठ्या उत्साहात केले. मग नंतर तसेच १२ एप्रिल रोजी सायंकाळी नऊ वाजल्यापासून नऊ ते नऊ नऊ पर्यंत दिवा लावणे, टॉर्च चमकावणे अशी कृती करावयाचे ठरले. लोकांनी तिही कृती खूप छान प्रकारे केली.
यावेळी काही लोकांना वाटले की हे सगळे केल्याने कोरोना विषाणू जाणार आहे.( कारण त्याआधी' करोना गो. . . गो करोना' असे म्हणत सामाजिक न्याय मंत्र्याने विषाणूला खडसावले होते आणि ते प्रसार माध्यमातून लोकांनी पाहिलेले होते.) विषाणूला हुसकावण्यात आपलाही हातभार असावा या हेतुने काही लोकांनी पहिल्या वेळेस टाळ्या ,भांडी, घंटा वाजवत मिरवणूकाच काढल्या. दुसर्या वेळी लोकांनी दिवे तर लावलेच त्या सोबत फटाकेही वाजवले. संकट विसरून जणू दिवाळीच साजरी केली. तिसर्या वेळी लॉकडाऊन वाढवतांना पंतप्रधानांनी लोकांचा असा उदंड प्रतिसाद पाहुन अशी कोणतीही प्रेरक कृती करण्याचे कोणतेही आवाहन केले नाही. तर लोकांना उपयुक्त ठरतील असे स्वतःची काळजी घेण्यासाठी सात नियम सांगितले. कारण उत्साह वाढवण्यासाठी सांगितलेली कृती लोक उत्सवाच्या पातळीवर नेत होते म्हणून लोकांनी स्वतःची काळजी घेतली तरी पुरे असे यंत्रणेचे मत झाले असावे .
जागतिक महामारी बनलेली ही कोरोना रोगाची साथ कधी आटोक्यात येईल हे कोणालाही सांगता येत नव्हते. कदाचित उन्हाची तीव्रता वाढल्यावर हा विषाणू नष्ट होईल असे खेड्यातल्या लोकांना वाटत होते. पण तसे घडत नव्हते. सरकारी पातळीवर देखील काळजी घेतली जात होती आणि काळजी घेण्याचा भाग म्हणून निर्बंध कालावधी वाढवला जात होता. जनता कर्फ्यु,
एकवीस दिवसाचा कर्फ्यु , नंतर पुन्हा वाढीव कर्फ्यु,पुन्हा लॉकडाऊन, लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आणि त्यानंतरही विशेष बदलासह चौथा टप्पा देखील घोषित झाला होता. एक मात्र खरे की, खेड्यात या लॉकडाऊनची तीव्रता शहरातल्या इतकी जीवघेणी वाटत नव्हती. मात्र खेड्यात सकाळ संध्याकाळ विनाकारण चव्हाट्यात जमणारी माणसाची गर्दी बंद झाली होती. पाहुण्या राऊळ्यांना लगाम बसला होता. गावच्या जत्रा, यात्रा व उत्सव बंद झाले होते. तरीही या संकटातून देवच वाचवणार अशी गावातल्या बहुतांश लोकांची श्रद्धा होती.
देशात या साथीच्या रोगामुळे जेव्हा लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा शहरातील रस्ते सुनसान झाले, बाजारपेठा, उद्योगधंदे , शाळा, कॉलेजेस बंद झाली. तेव्हा खेड्यातील लोकांना खुल्या हवेमुळे, वृक्षांच्या छायेमुळे, शेतीमुळे, शेती कामामुळे थोडे सुसह्य वाटणे सहाजिकच होते. इथली कामे चिरंतन आणि कधीही न संपणारी होती. कुणी कुणाच्या शेतात कामाला जाणे शक्य नव्हते तरी आपापली कामे कुणी टाकली नव्हती. धान्य पिकाची काढणी, कापणी सुरूच असते. बाजार नसला तरी भाज्यांची काढणी सुरूच असते. काही घरात महिला वड्या, पापड्या देखील करत असतात. महानगरे आणि शहरातून नोकरी व्यवसायात असणारे लोक 'वर्क फ्रॉम होम' करू लागतात. खेड्यातील लोक 'वर्क फ्रॉम फार्म' करीत होते. कुणाची नांगरणीसाठी लगबग चालली होती. कुणाच्या लिबोंणीची लिंबे तोडायची होती, कुणाच्या बागेत संत्री पक्व झाली होती. कुणाच्या शेतात टोमॅटो, वांगी होती पण बाजारच भरत नव्हता. नजर चुकवून पहाटे शहरात गेले तर लोक भितीपोटी भाजीपाला, फळे देखील लवकर विकत घेत नव्हती. दूध सुद्धा विकत नव्हते. कित्येक शेतकर्याचा कापूसही विकायचा राहीला होता. घरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. कापूस विकला नाही तर यंदाच्या बी-भरणाचे काय? हा प्रश्न आ वासून उभा होता. एकुणच 'मोडून पडणे ' काय असते ते खेड्यातील शेतकरी अनुभवत होते. शहरातल्याही गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांचे देखील तेच अनुभवणे चालले होते.
शहरात माणुसकी नसते असा बराच गैरसमज गेल्या अनेक वर्षांपासून खेड्यात पसरलेला होता. त्याला आता तडे जात होते. टिव्ही वरील बातम्यात, शहरात आणि गावात तसेच रस्तोरस्ती गरीब गरजूंना अन्न पुरवणारे शेकडो लोक दिसत होते. काही हौसे असतील त्यात पण बहुसंख्य मानवतेने भारलेले होते. जणू शहरातला माणुसकी हरवलेला समाज
या संकटाच्या धक्क्याने माणूस बनू पाहत होता. त्यामुळे गरीब, मजूर, स्थलांतरीत , लॉकडाऊन झालेल्यांना अन्न उपलब्ध होत होते. सरकार आणि लोकांचे हातात हात घालून संकटाला सामोरे जाणे सुरू होते. गावागावातही गर्दी जमा होऊ नये म्हणून पोलीस फेऱ्या मारत होते. त्यामुळे लोक एकतर घरात नाहीतर शेतात थांबत होते.
अचानक लोकांना पोलिसांबद्दल सहानुभूती आणि प्रेम वाटू लागते, पोलिसही गरजूंना अन्न पुरवण्यात मदत करत होते. या काळात डॉक्टर, नर्स , सफाई कर्मचारी तर जणू देवच झाले होते.
एक- दोनने वाढणारे रोग्यांचे आकडे थोडे वेग घेऊ लागले. तशी सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. पुढे काय वाढून ठेवले आहे ते नेमके कळत नव्हते तरी त्याची भयावह छाया स्पष्ट दिसत होती. शहरातील मरणार्या लोकांचे आकडे वाढत जातांना पाहून खेड्यातील लोकही घाबरून गेले . दिवसागणिक कोरोनाची साथ वाढत राहते , क्वचित डॉक्टर, नर्सेस, पोलिस, मंत्री देखील तिच्या चपाट्यात येऊ लागतात. भितीच्या डोळ्यात पाणी तरळायला लागते. पण म्हणून रोजचं जगणं आवर्तनात सापडलं होतं खरं पण ते थांबलं नव्हतं. नेहमी प्रमाणे एखाद्याला सर्दी झाली, खोकला आला किंवा अंग कसकसुन ताप आला तर नेहमीचे डॉक्टर लोक अशा पेशंटना तपासतही नव्हते आणि जवळही येऊ देत नव्हते. सावधगिरी बाळगत सरकारी दवाखान्यात जायला भाग पाडत होते. सरकारी दवाखान्यात जागा पुरत नव्हती. काही खाजगी डॉक्टरांनी तर दवाखानेच बंद ठेवले होते. त्यामानाने खेड्यातील डॉक्टर लोक सहिष्णु असल्याचे दिसत होते. ते सर्दी, ताप, खोकला अशी कोविडची लक्षणे असलेल्या रूग्णा व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करीत होते. माझ्या वडिलांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते आणि त्यानंतर पायाला एक जखम झाली होती. त्यांना या साथ रोगाच्या काळात नेहमी शहरात घेऊन जाणे योग्य नव्हते म्हणुन गावातीलच डॉक्टरांना विनंती केली. त्यावर आधी त्यांच्याकडे उपचार घेतलेले नसूनही त्यांनी त्याबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. उलट 'तुम्ही काही काळजी करू नका. मी दिवसाआड घरी जाऊन त्यांच्या पायाला पट्टी करीत जाईन. ' म्हणाले. आणि सलग अडिच महिने ते नित्य नियमाने हे काम करीत राहीले. हे असते गावाचे गावपण. शहरातही काही लोकांचे डॉक्टरांशी स्नेहपूर्ण संबंध असतात पण दवाखानेच बंद म्हणून प्राण गमावण्याची वेळ आलेले लोक देखील सापडतात.
गावातील कितीतरी लोक अक्षरशः कुठे कुठे पांगलेले. पोटासाठीच. ऊसतोडणी साठी गेलेल्या कुटुंबाची संख्या सर्वाधिक. वेगवेगळ्या शहरात एकमेकाच्या किंवा नातेवाईकाच्या आधाराने जाऊन मोलमजुरी किंवा नोकरी करणारीही खूप कुटुंबे होती. म्हणजे हे सगळे एकाचवेळी गावात आले आणि राहिले तर गावातील यात्रेला जेवढी गर्दी असते त्यापेक्षा थोडीशी कमी इतकी माणसांची रेलचेल असेल. खरेतर इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या किमान गरजा भागवायला गावे अपुरी पडतात म्हणून जीव जगवण्यासाठी 'खेड्याकडे चला ' ऐवजी 'भाकरीकडे चला' हा मार्ग शक्यतितक्या लोकांनी निवडलेला असल्यानेच लोक आधी शहरात गेलेले होते. त्यांचा थोडाफार आधार गावात असणाऱ्या त्यांच्या आप्तेष्टांना देखील होत असतो. त्यांच्या हातात चार पैसे खुळखुळत असल्यामुळे त्यांच्या येण्यामुळेच गावातील यात्रा उत्सवाला रंग चढतो.
साथ रोगांच्या प्रतिबंधासाठी उपाय म्हणून केलेला लॉकडाऊन या लोकांसाठी नवे संकट घेऊन आला. कारखाने बंद झाले. रोजगार ठप्प झाला. जवळपासची माणसे रोगाच्या तडाख्यात सापडू लागली. हाताशी असलेल्या पैशातून जीवन जगण्याची धडपड सुरू झाली. महिना दीड महिना झाल्यावर आता आपापल्या गावी परतलेलेच बरे असे लोकांना वाटू लागले. गावी गेल्यावर किमान घरभाडे वाचणार होते. आपल्या माणसाच्या जवळ रहायला मिळणार होते. रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होती. गावातही सगळ्यांना रोजगार मिळेल अशी काही शक्यता नव्हती पण कसेतरी जगू शकतो याची भाबडी आशा नक्कीच होती. सरकार राशन देत होते. प्रशासकीय यंत्रणा सर्व कामगार मजुरांना 'आहेत तिथेच थांबा. आम्ही तुमच्या सोबत आहोत' सांगत होते. थांबणारे उपाशी मरणार नाहीत याची काळजी घेत होते. याचवेळी आपापल्या गावी जायला लोक का कुणास ठाऊक पण व्याकुळ झालेले होते. त्यातुन लोक अत्यावश्यक सेवेच्या मालगाड्या, भाज्यांची वाहणे, दुधाची टँकरे यातुन अव्वाच्या सव्वा पैसा देत चोरट्या पद्धतीने यंत्रणेचा डोळा चुकवून गावाकडे पळत होते.
आपला देश हा झुंडींचा देश आहे की काय? असे वाटावे अशी परिस्थिती दिसत होती . वाहनातील गर्दीमुळे रोगाचा संसर्ग आणि प्रसार वाढणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नव्हती. तसेही या आपत्तीचा काहीच अदमास नसल्याने जोतिष्यांनीही भविष्य सांगणे थांबवले होते.
अशा गावाकडे पळणार्या लोकांसोबत रोग देखील अन्यत्र पोहचु नये म्हणून यंत्रणा सज्ज झाली. जिल्ह्यांच्या सीमेवर तपासणी होऊ लागली. कसलीही तपासणी न करता सीमा ओलांडणाऱ्या प्रवाशांचे विलगीकरण केले जाऊ लागले. हा कालावधी चौदा दिवसाचा होता. भयभीत लोकांना ते एकुणच समाजाच्या फायद्याचे असले तरी स्वतःसाठी गैरसोयीचे वाटू लागले. ते चुकविण्यासाठी अनेक लोक आडमार्गाचा, डोंगर रस्त्याचा, आडरस्त्याचा वापर करू लागले. काहीतरी करून गावात पोहचायचेच एवढेच एकमेव ध्येय असल्यासारखे होते सगळे.
बरे गावी गेल्यावर त्यांचे कसे स्वागत होईल याचाही त्यांना अदमास नव्हता. यांनी सोबत रोग तर आणला नाही ना? या भितीने अगदी गावी असणारे आई वडीलही त्यांनी जवळ येऊन आपल्यात मिसळावे अशी इच्छा धरत नव्हते. मरणाच्या भयाने नाते पातळ झाले होते. शेवटी प्रत्येकाला आपला जीव प्यारा. काही ठिकाणी तर आई वडीलांनी निरोप देऊनही वर्षानुवर्षे साधे भेटायलाही गावी न येणारी मुले आपल्या बायका पोरांसह आता आपण आई वडीलांना भेटायला आल्याचे बोलत होते. आई वडीलांना हे कळत नव्हते असे नाही. पण चट कष्ट करतील आणि खातील असे मनात म्हणून ते प्रत्यक्ष काही बोलत नव्हते. अशा अचानक गावी परतणाऱ्यांच्या खाण्याचे काय? हा गावाकडील नातलगांना पडलेला प्रश्न अस्वस्थ करणारा होता. अशा चिंतेतुन एका गावी गरीब वडीलांनी आत्महत्या सुद्धा केली होती इतके हे भयानक होते.
मात्र लोक जमेल ती पळवाट म्हणा की चोरवाट शोधुन आपापल्या गावी धावत होते. कुणी चारशे किलोमीटरची पायपीट केली होती तर कुणी हजार बाराशे किलोमीटरच्या प्रवासाला निघाले होते. सरकार रेल्वेने, बसने त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करत होते. एरवी जी माणसे हजार गाड्यात गेली असती त्यांना आता दोन हजार गाड्या लागत होत्या. त्यामुळे प्रवासासाठी आपला नंबर येण्याची वाट कामगारांना पहावी लागत होती. ही वाट पाहण्याऐवजी अनेकजण आडमुठेपणा म्हणा किंवा कसल्या अनामिक भितीपोटी मिळेल त्या रस्त्याने गावाकडे धावत होती. लहानमुले, वृद्ध, प्रौढ सगळ्याच वयोगटाच्या माणसांनी गावाकडे जाणारे रस्ते पंढरपूरला दिंड्या निघाव्यात तसे माणसांनी भरून गेले होते. मात्र पंढरपूरला मिळणारे समाधान कुठेच दिसत नव्हते. प्रवासातील संकटाच्या, धोक्याच्या नाना तर्हा लोकांना टिव्ही मुळे समजत होत्या. लोक हळहळत होते पण काही करू शकत नव्हते. स्वातंत्र्योत्तर भारताने पहिल्यांदाच हे असे ध्येयहीन आणि प्रचंड स्थलांतर पाहिले होते. शहरात सत्तर ऐंशी वर्षात जमलेली गर्दी अशी महिना पंधरा दिवसात परत फिरली होती. ज्यांचा गाडीत किंवा रेल्वेत जाण्याचा नंबर येत होता ते भाग्यवान होते. पण जे नजर चुकवून निघाले त्यांचे काय? अशा प्रवासात अपघात होऊन देखील अनेकांचे मृत्यू झाले, रस्त्यावरून चालल्यावर पोलिस पकडतात म्हणून काही लोक रेल्वे ट्रॅकने प्रवास करत गावी निघाले होते. लॉकडाऊनमुळे ट्रेन बंद होती. रात्री दमून रूळावर विसावलेल्या मजुरांना एक मालगाडी चिरडून जाते. रूळावर पडलेल्या भाकरी आणि रक्त यांचे मिडीयातील दृष्य व्याकूळ करणारे होते. अशावेळी कुसुमाग्रज यांच्या 'आगगाडी आणि जमीन' कवितेची आठवण येत होती. बेकायदेशीरपणे जिल्ह्यांच्या सीमा भेदत मजूर गावात परतत होते. गावात पोहचले की त्यांना पुन्हा चौदा दिवस विलिनीकरणात ठेवले जात होते. भीषणता वाढतच होती पण गावाकडे जाणारी गर्दी कमी होत नव्हती. ज्यांना दम आणि संयम होता त्यांना शासन गावी पोहोचवण्याची व्यवस्था झळ सोसुन करत होते. स्वतःच्या गावात अशी कोणती उर्जा आहे की ती अशा परिस्थितीमध्ये बळ देते.
याच दरम्यान आटापिटा करून महाराष्ट्राच्या विविध भागातून ऊसतोडणी कामगारांचे तांडे गावात परतले आणि घरीच विलगीकरणात ठेवले गेले. गरीबीमुळे छोट्या छोट्या घरात अनेक माणसे राहत होती. तिथे कसले सामाजिक अंतर ठेवणार? अशात शेजारच्या एका खेड्यात एक पेशंट कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे आजूबाजूच्या गाव खेड्यातील लोकांनी घाबरून जाऊन गावात येणारे रस्ते बंद केले. पण तरीही गावातील माणसे या ना त्या रस्त्याने गावात येतातच. स्वतः गावात पोहचल्याचे समाधान मानत असतांनाच ती दुसर्याला धडकी भरवत होती .
मध्यमवर्गीय लोकांचे तुटलेपण अशा संकटात लपून थोडेच राहणार? त्यांनी हा आरोग्य आणिबाणीचा काळ सुट्टीसारखा व्यतित केला. त्यातील काही लोक कोरोनावर किंवा प्रेम व्यक्त करणारी कविता करतात. काही हौसे लोक फेसबुकवर लाईव्ह येऊन कविता वाचन करतात. काहींनी रेसिपी बनवल्या व समाजमाध्यमावर शेअर केल्या. तर काहींनी घरातील व्यक्तींचे केस घरच्याघरीच कापले. आणि ते कार्य फेसबुकवर टाकले. असं हौशी वातावरण वरच्या वर्गात होते. स्वतःला रोग होऊ नये एवढी एकच भिती सार्वत्रिक होती. तिच्यापुढे कुणी गरीब नव्हता कुणी श्रीमंत नव्हता. एक बरे होते की खेड्यात अशा उत्सवी लोकांची कमतरता होती. व्यसनाधीन लोक बेचैन झालेले होते. कुठे दारूची दुकाने फोडली गेल्याची बातमी ऐकायला मिळे तर कुणी खेड्याचा, शिवाराचा आधार घेऊन स्वतःच गावठीपद्धतीने मद्य बनवत होते. त्यांच्यावरही छापे पडत होते.
लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होतो. लोकांना या रोगाचा प्रसार कसा होतो याची माहिती झालेली असते. 'मुखनाक आच्छादन पट्टी' लोक वापरू लागतात. गर्दीत जाणे स्वतःहून टाळू लागतात. दुकाने, व्यवसाय, ऑफिसेस सुरू होतात. प्रतिबंधक लस तयार होण्याची वाट पाहत रोगासह जगण्याचा विचार पुढे येतो. मात्र तरीही गावाच्या ओढीने शहरातुन येणारे गावच्या लेकरांचे लोंढे रस्त्यावरून दिसतच असतात . अशातच आपल्या दूरच्या गावाकडे पायी चालत निघालेल्या गरीब, हतबल मजुराने आपल्या दिव्यांग लेकराला घेऊन जाणे सोपे जावे म्हणून एकाची सायकल त्याला न विचारताच नेली पण तो चोर नाही. ती सायकल घेण्यामागची त्याची भावना अस्वस्थ करणारी आहे. त्याने सायकलच्या मालकाला लिहीलेले आणि सायकलच्या जागेवर ठेवलेले पत्र समाजमाध्यमावर वाचायला मिळते आणि कधीही न संपणारी अस्वस्थता आपल्याला व्यापून उरली. ते पत्र असे :
श्री. नमस्ते जी,
मै आपकी साइकल लेकर जा रहा हू।
हो सके तो मुझे माफ करना जी ,
क्यूंकी मेरे पास साधन नही है,
एक बच्चा है उसके लिए मुझे
ऐसा करना पडा ,
क्यूंकी वो विकलांग है,
चल नही सकता ,
हमे बरेली तक जाना है ,
आपका कसुरवार, एक यात्री
मजदूर एवं मजबूर.
हे पत्र वाचल्यावर गावाची महती अधिकच वाढते. गावातील लोकांच्या प्रामाणिक भावनेने मन गहिवरते तोच समाजमाध्यमावर 'मुंबईतून खेड्यात आलेल्या व्यक्तीला गावातील जबाबदार माणसांनी गृहविलगीकरणात थांबायला सांगितले म्हणून ती व्यक्ती आणि गावातील माणसांसोबत भांडणे करते आणि त्यात गावातील त्या जबाबदार दोन माणसांचा खून होतो.' गावाला भोवळ यावी अशी ही साथ.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
डाॅ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
Mo 9850608611
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा