त्रैमासिक भावमाला : १९९० नंतरची ग्रामीण कादंबरी : एक दृष्टीक्षेप : प्रा. डाॅ. प्रल्हाद वावरे

    'तुडवण' ही आजची कादंबरी आहे.  [प्रा. डाॅ. प्रल्हाद वावरे ]

  " नवकादंबरीकारांमध्ये सद्ध्याचे मोठे नाव म्हणजे कैलास दौंड . हा लेखक ग्रामजीवनाचे धारदार चित्रण करतोय. आपले साहित्य म्हणजे अनुभवाचा मेळ आहे असं कैलास दौंड  नमुद करतात. नुकतीच मॅजेस्टिकने त्यांची 'तुडवण' प्रकाशित केली आहे. या कादंबरीतून लेखकाने शिकलेल्या ग्रामीण तरुणाची मनोवस्था  चित्रित केली आहे. नारायण या कादंबरीचा नायक ,तो शिक्षण घेतो पण व्यवस्थेचा तो बळी आहे. नोकरी मिळत नाही.  वडिलांच्या तुटपुंज्या  शेतीवर उदरनिर्वाह चालतो पण जीवनाची कशी दैना झाली याचं अत्यंत मर्मभेदक चित्रण लेखकाने केले आहे. नायकाचा संघर्ष जीवघेणा आहे. खरेतर विदर्भातले ख्यातनाम लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. डाॅ. सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' शी संबंध दर्शवणारी 'तुडवण' ही कादंबरी ग्रामजीवनाचे अत्यंत विदारक चित्रण आपल्या समोर उभं करते. लेखकाची शैली ही प्रवाही आहे. वाचकाला खिळवून ठेवण्याचे कसब लेखकाच्या शैलीत निश्चितच आहे.
         अख्खं कुटूंब शेतीमध्ये राबत असतांना आईवडिलांना सुद्धा आपल्या शिकल्या सवरल्या मुलाची ती दारूण व्यथा पाहवल्या जात नाही मात्र ते हतबल आहेत.
            लेखकाच्या लेखणीतून आपल्या समाजातील कोणते वैगुण्य आहेत ती दाखवली आहेत. यावर राज्यकर्त्यांनी सुद्धा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. मात्र आमचे राज्यकर्ते सामान्य माणसांचा विचार करतील तर ते राज्यकर्तेच कसे ?असा प्रश्न आपल्याला पडतो. संस्थानिक करोडो रूपये डोनेशन घेऊन आपले उखळ पांढरे करतांना दिसतात. ज्या ध्येयाने आपण ही व्यवस्था उभी केली खरच आपण याला न्याय देतो का? मात्र आज तत्व कोण बघतो. आपली पोळी शेकल्या गेली संपलं. अशा स्वार्थापर्यंत जो तो आलेला आहे. 'तुडवण' ही आजची कादंबरी आहे. मला एवढेच सांगायचे आहे. बारोमास लिहील्या गेली विसवर्षापूर्वी त्यातही असच वर्णन आलेलं होतं, काय झालं? काही बदल झाला का? उर फोडू फोडू आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यातलं दु:ख मांडतो पण काही फायदा नाही. .. कधी संपेल हे सर्व असा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. आता दौंड सरांना 'तुडवण'  लिहावी लागली. पुढची वीस वर्षे आम्हाला असेच शिकवावे लागणार फार तर एखादा साहित्य अकादमी पुरस्कार लेखकाला प्रदान करून खूश केल्या जाईल पण त्याने मांडलेल्या मानवी दुःखाचे काय? याचा कुणी विचार करणार आहे किंवा नाही? माझा हा प्रश्न व्यवस्थेला आहे. लेखकाने लिहावं, समाजासमोर मांडावं, समीक्षकांनी त्यावर समीक्षा लिहाव्यात मात्र अशा दुःखावर किंवा परिस्थितीवर ज्यांनी काम करावं ती माणसं कुठं आहेत? त्यांची काही जबाबदारी नाही का? हाच अनुत्तरीत प्रश्न आपल्या समोर ठेऊन या सर्व ग्रामजीवनावरील लेखनाला पूर्णविराम देतो. पुढील समीक्षा येई पर्यंत आपण चिंतन करा, साहित्य निर्मिती करा..."
- प्रा. डाॅ. प्रल्हाद वावरे, पुसद. भावमाला त्रैमासिक(संपा. वावरे प्र.) : जुलै ऑगस्ट सप्टेंबर२०२० या अंकातील '१९९० नंतरची ग्रामीण कादंबरी: एक दृष्टीक्षेप.' पृष्ठ २०, २१
या लेखातून साभार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर