● 'आईचा हात' अ.म. पठाण यांच्या निसर्गसंपन्न बाल- कुमार कविता.
● 'आईचा हात' अ.म. पठाण यांच्या निसर्गसंपन्न बाल- कुमार कविता.
डाॅ. कैलास दौंड
'आईचा हात' हा कवी अ. म. पठाण यांचा नवाकोरा
बाल कवितासंग्रह. तो औरंगाबाद येथील गाव पब्लिकेशन्स ने १५ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित केला आहे. कवी अय्युब पठाण लोहगावकर तथा अ. म. पठाण हे बाल साहित्यिक म्हणून महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहेत. 'आईचा हात' बालकविता संग्रहात सत्तेचाळीस कवितांचा समावेश आहे. 'आई' हा बाल विश्वातील अत्यंत आत्मीयतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. आई म्हणजे जणू सर्वस्वच. आईची शिकवण, आईची साथ-संगत आणि आईची माया आयुष्यभर माणसाच्या सोबतीला असते. 'आईचा हात' ही या पुस्तकातील पहिलीच कविता. तिच्यात कवी आईची महती सांगताना लिहितो:
' आईचा हात
राबे दिनरात
अंधाराला दूर करी
समईची वात.'
खेड्यातील शेती संबंधित कामाचे वर्णन करणाऱ्या लोभसवाण्या बालकविता आईचा हात या संग्रहात आवर्जून भेटतात. त्यात सोनेरी सकाळ, रानावनात, पोशिंदा, पेरणी, रानातली दिवाळी, रानमेवा, मामाच्या मळ्यात, फिरस्ता, सुगी या कविता सहजच रानावनाची सफर घडवून आणतात. तिथल्या निसर्गाला भिडवून आणतात आणि बालकुमार वयाच्या वाचकांमध्ये कळत-नकळतपणे एक अनोखा ताजातवाना निसर्ग संस्कार पेरून जातात. या निसर्गाची विविध रूपे हवीहवीशी वाटतात. 'पर्वतदादा' ही अशीच एक गुणगुणायला लावणारी कविता. या कवितेत पठाण पर्वताला अनेक प्रश्न विचारतात. हे प्रश्न बालसुलभ आहेत.
'पर्वतदादा पर्वतदादा
असतात तुमच्या रांगा
अंगावर झाडे किती
आम्हाला सांगा.'
अर्थातच अशा कवितेतून निसर्गाला हसत खेळत समजून घेता येते.निसर्ग हा सर्व वयोगटातील माणसाला हवाहवासा वाटणारा सृष्टीचा घटक. त्याचे हिरवेपण मनाला मोहून टाकते. असे मोहून टाकणारे अनेक प्रसंग 'आईचा हात' या संग्रहात कवी टिपतो. माझे सोबती, हिरवामळा, पाऊस, अमराई, रानपाखरे, आला हिवाळा, मामाच्या गावाला, रानफुला, संगीत गाणे, रानभरारी, झाड, नदी माऊली, रानमळा, मिरगाचा पाऊस, श्रावण या सर्व कवितांमधून ओल्या हिरव्या समृद्ध निसर्गाचे दर्शन वाचकांना घडते. बालसुलभ मन त्यातून फिरून येते. 'घाटबाबा' या कवितेत कवी या निसर्गाशी बोलतो. घाटबाबाला तो म्हणतो:
'घाटबाबा घाटबाबा
किती तुम्ही जुने
आहात अजून ताठ उभे
मोठ्या आनंदाने.'
'पाऊस प्राणी' या कवितेतून कवी पठाण विविध प्राण्यांचा त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यासह व लकबीसह परीचय घडवतात. एकंदर आजच्या ग्रामीण निसर्गाचे जिवंत आणि जातिवंत वर्णन या कवितांमधून दिसते. ही कविता गाण्यासारखी हळुवारपणे येते आणि गुणगुणायला भाग पाडते. या कवितांमधून कळत-नकळतपणे काही शिकवणही भेटते. जशी पाणपोई असते, तिथे हे तहानलेल्या माणसांना पाणी मिळते. तशी ज्ञानपोई ही आगळी वेगळी कल्पना कवीने समोर मांडली असून त्यातून गुरुजना विषयी आदर प्रकट होतो. आनंदी जीवन, स्त्री जन्म, सैनिक हो, तहान ,जलक्रांती, गुरुजी, जीवन गाणे, आई, कुणबी बाप, आरोग्य संपदा, माझ्या भीमा या कविता काहीना काही शिकवण देणाऱ्या आहेत. तर नागपंचमी ही कविता सणांचा परिचय करून देणारी आहे. 'माय मराठी' ही कविता फार महत्त्वाची आहे; कारण कवी पठाण हे मराठी भाषिक नसूनही त्यांनी मराठी मध्ये मोठे लेखन केलेले आहे. हे लेखन वाचकांच्या पसंतीसही उतरलेले आहे. कवीची माय मराठी प्रति भावना अत्यंत स्वागतशील आणि सहज सुंदर आहे. 'माय मराठी' या कवितेत कवी लिहितो-
'मराठी ही राजभाषा
घालू तिला राजटोप
संजीवनी देण्यासाठी
मराठीचा करूया जप.'
एकूणच 'आईचा हात' या बाल कुमार कवितासंग्रहातील बालकुमार कविता त्या वयोगटातील वाचकांना आवडतील. आपल्या वाटतील. गुणगुणाव्या वाटतील अशाच आहेत. या कवितांबद्दल मलपृष्ठावर कवी उत्तम कोळगावकर यांनी '... रानावनात, पाऊस, पर्वतदादा, रानमेवा, आमराई, कळ्या फुले, रानफुला, भरारी, आजोळाची वाट, झाड, रानमळा, सुगी, घाटबाबा, श्रावण या कवितांमधून कवी हिरव्यागार निसर्गाची सफर घडवतो.' हे महत्त्वपूर्ण विधान केलेले आहे ते सार्थच आहे. कवीने 'आपले जगणे' या कवितेत लिहिले आहे की,
'इतके जगून झाले
पण जगायलाच वेळ नाही
जगतो आहे कशासाठी
काहीच कसला मेळ नाही.'
असे धावपळीच्या जगण्याचे वर्णन केलेले आहे. मात्र या संग्रहातील कविता धावपळीतही काही क्षणाचा आनंद देणाऱ्या आहेत. 'आईचा हात ' कवितासंग्रहाचे सुंदर मुखपृष्ठ सरदार जाधव यांनी केलेली असून आतील चित्रे ही बहारदार आहेत. बालकुमार वाचक या कवितासंग्रहाचे उत्साहाने स्वागत करतील यात संदेह नाही.
●कवितासंग्रह: आईचा हात
●कवी : अ. म. पठाण
●प्रकाशक: गाव प्रकाशन ,औरंगाबाद. ●प्रथमावृत्ती १५ ऑगस्ट २०२०
●पृष्ठे :८० ●मूल्य शंभर रुपये.
●मुखपृष्ठ : सरदार जाधव.
~~~~~~
~~~~~~
डाॅ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
Mo ९८५०६०८६११
वाचले. आवडले
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर!
उत्तर द्याहटवा