○ सुखवस्तू चिमणी




 

बाल-किशोर कथा

              ○ सुखवस्तू चिमणी

          डोंगराच्या कुशीत वसलेले एक गाव होते. आजूबाजूला झाडे होती. ओहळ आणि ओढे होते. त्यावर एक छोटे तळे होते. गावाच्या दुसर्‍या बाजूला शेती होती. थोडीफार चराऊ रानेही होती . कधीकधी काही लोक लाकुडफाटा मिळवण्यासाठी डोंगरातील झाडे तोडायला निघत. अशावेळी गावातीलच इतर माणसे त्यांना अडवत असत. उन्हाळ्यात ओहळ आणि ओढ्यातील पाणी आटून जाई तरी लोकांच्या शेतातील विहिरींना पाणी असे. त्यातून ते पिकाला दिले जाई. गावात आणि शेता शिवारात माणसांची सतत वर्दळ असे. डोंगरातील आणि शेतातील झाडाझुडपात  अनेक पाखरांची गजबज असे. त्यांच्या वेगवेगळ्या आवाजाचे सुरेल संगीत रानावर पसरे. सारे चैतन्याचे वातावरण होते. गावाला खेटूनच अनेक झाडे होती. त्यातील चिंचेचे झाड खूप मोठे होते. चिंचेच्या झाडाला चिंचा लागायला सुरुवात झाली की तिथे पक्ष्यांची खूप वर्दळ वाढे, जणू जत्राच भरे ! या झाडावर रिंकी आणि पिंकी या दोन चिमण्या राहत. त्या एकमेकीच्या जीवलग मैत्रिणी असल्याने  नेहमी सोबतच राहत.  कधी त्या शेतातील कणसांवर बसून आपल्या इवल्या चोचींनी  दाणे खात तर कधी गवतावरील किडे, आळ्या , तुडतुडे टिपत.  कधी त्या शेतातील विहिरी जवळ साचलेले पाणी पिऊन येत तर कधी एखाद्या फांदीवर बसून उगीचच मजेमजेने झोके घेत असत. एकदा रिंकी चिमणीच्या मनात शहरात फिरायला जाण्याचा विचार आला.
" चला आपण शहरात तरी फिरून येऊ, गावातील लोक कसे जातात बाजारला शहरात. आपण  देखील जायला हवं."  रिंकी चिमणी  पिंकी चिमणीला म्हणाली.

"इथे किती मोकळी हवा आहे. मस्त ताजी फळे
, धान्य खायला मिळतं. शहरात कशाला गं जायचं? " पिंकी चिमणी म्हणाली.
"अगं  पिंकी,  आपल्याला कायम थोडं थांबायचं  आहे शहरात.  नुसतं जाऊन बघून यायचं, मस्त फिरायचं, मजा करायची. खूप खूप दुकान बघायची. टॉवर बघायचे. चालत्या- फिरत्या गाडीवर बसायचं. मस्त फिरून झालं की संध्याकाळी आपण परत येऊ आपण. "  रिंकी चिमणी  पिंकी चिमणीला म्हणाली.
दोघींनी ठरवलं  फिरायला जायचं. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजताच चिंचेच्या झाडावर पाखरांचा किलबिलाट सुरू झाला.  चिवचिवाट करत  रिंकी चिमणी आणि पिंकी चिमणी देखील उठल्या. आज त्यांना शहरात जायचे होते म्हणून त्यांची घाई चालली होती. थोडेसे  उजाडताच त्या भुर्रदिशी ओढ्याच्या दिशेने गेल्या.  तेथे खडकाजवळ जरासे पाणी साचलेले होते. त्या पाण्यात शिरून आपले पंख फडफडवीत त्यांनी आंघोळी उरकल्या. काठावर येऊन पंख झटकले. जरावेळ उगवत्या सूर्याची किरणे पंखावर घेतली आणि  थोडेफार खायला मिळते का? ते  बघितले. गवताच्या तुऱ्यातील बारीक बारीक दाणे इवल्या इवल्या चोचींनी टिपत पोटपुजा केली आणि शहराच्या दिशेने निघाल्या.
           शहर तसे फार दूर नव्हते. अगदी जवळच होते. तीन चार किलोमीटर अंतर असेल जेमतेम. थोड्याच वेळात उंच उंच आणि  रंगीत  इमारती दिसू लागल्या. आणखी थोड्या वेळात वाहनांचे आवाज ऐकू येऊ लागले. एका इमारतीच्या शेजारी अशोक वृक्ष होता. त्याच्या पानांच्या सावलीत रिंकी चिमणी आणि पिंकी चिमणी थोडावेळ थांबल्या. जवळच एक कार ऊभी होती.
"पिंकी अगं ती बघ कार, चल चल आपण तिच्यावर बसू ." रिंकी चिमणी म्हणाली.
मग दोघीही त्या कारच्या टपावर उतरल्या. सकाळच्या उन्हात तो चांगलाच तापला होता. तिथून निघता निघता बाजूचा आरसा दिसला. रिंकी चिमणी एका आरशावर आणि पिंकी चिमणी दुसर्‍या आरशावर बसून आरशात पाहून आपल्याच प्रतिबिंबाला खूपवेळ चोची मारत राहील्या. आरशातली चिमणी आतुन बाहेर येतच नाही हे ध्यानात येऊन तिथून निघाल्या.  कुठं थांबावे ते कळत नव्हते. सिमेंटच्या तापलेल्या भिंतीवर उतरताही येत नव्हते.  पिण्यासाठी पाणी देखील कुठे नजरेस नव्हते.  रस्त्याने खूप वाहने होती. बाजूने दुकानेच दुकाने होती, हॉटेल होते. खूप छान छान आणि वेगवेगळे  वास येत होते पण तिथे थांबायला जागाच नव्हती.
"मला खूप तहान लागलीय, कुठं पाणी दिसतंय का ते तरी बघ रिंकी." पिंकी चिमणी म्हणाली.
रिंकी चिमणी देखील तहानलेली होती.
दोघींचेही लक्ष एका कॉलनीत दिसणार्‍या झाडाकडे गेले.
" चल तिकडे जाऊया. तिथे झाड दिसते. सावलीत बसू. पाणीही असू शकते तिथं " रिंकी चिमणी पिंकी चिमणीला म्हणाली.
"चल लवकर चल " पिंकी चिमणी म्हणाली.







   या इमारतीवरून त्या इमारतीवर उडत उडत त्या दोघी एका बंगल्याच्या आवारात उतरल्या.  तेथे कलमी आंब्याची दोन झाडे होती आणि छानदार सावलीही होती. फांद्यांवर विसावताच त्यांना हायसे वाटले. झाडाच्या एका फांदीला पाण्याचे एक पसरट भांडे टांगलेले होते. भांड्यातील पाणी दिसताच  रिंकी चिमणी आणि पिंकी चिमणी दोघीही त्या भांड्याच्या काठावर बसून पाणी पिऊ लागल्या. तहान भागली. मग त्या पाण्यातीलच थोडे थोडे पाणी त्यांनी पंखावर उडवून अंग ओले केले. जरावेळ सावलीत बसल्यावर त्यांचा सारा थकवा कुठल्याकुठे दूर पळाला. मग तिथेच त्यांनी शिवाशिवीचा खेळ सुरू केला. इतक्यात रिंकी चिमणीने बंगल्याच्या गॅलरीत एक प्लॅस्टिकच्या बाटलीसारखी वस्तु टांगलेली पाहीली. आतमध्ये भरलेले बाजरीचे धान्य बाहेरून दिसताच  तिच्या तोंडाला पाणी सुटले. 'आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे'  असचं झालं होतं जणू. ती त्या टांगलेल्या बाटलीजवळ गेली तर तिथे बसण्यापुरती ताटलीसारखी जागा होती. भरलेल्या बाटलीला जागोजाग छिद्र असल्याने चोंच सरकावून दाणे टिपता येत होते. रिंकी चिमणीने दाणे खायला सुरुवात केली आणि त्यातच तल्लीन झाली. तिला शोधत शोधत  पिंकी चिमणी देखील आली आणि तिनेही धान्य खायला सुरूवात केली. घरातून लहान मुलांचे आणि मोठ्या माणसांचे आवाज येत होते. दाणे टिपणार्‍या चिमण्यांना खिडकीतून सारे आनंदाने पाहत होते. एकजण तर मोबाईलवर फोटो सुद्धा काढत होता. पोट भरताच पिंकी चिमणीला गावी परतण्याची आठवण आली. "रिंकी, चल लवकर, निघायला हवं आपल्याला आपल्या घरट्याकडे अंधार होण्याआधी." पिंकी चिमणी म्हणाली.
"अगं एवढी काय घाई आहे? आपण इथेच राहू दोनचार दिवस. किती छान आहे इथे. झाड आहे, सावली आहे, प्यायला पाणी आहे आणि खायला भरपूर दाणे आहेत. कुठे जायला नको की शोधाशोध करायला नको. " रिंकी चिमणी निघायला तयार नव्हती.
"मला निघायला हवं. झाला तेवढा पाहुणचार पुरे झाला. आयतं खाणं बरं नाही. येतेस का निघू मी? " पिंकी चिमणीने विचारले.
"बरं तू निघ आता उशिर होईल तुला. मी किनई दोन दिवसांनी येते. मनच होत नाही इथून निघायला." रिंकी चिमणी म्हणाली.
त्यासरशी पिंकी चिमणी तेथून निघाली गावाच्या दिशेने. अंधार पडण्याच्या आधी तिला पोहोचायचे होते. चिंचेच्या झाडावरील घरट्यात तिची अंडी होती. त्यामुळे तिला त्यांची काळजी लागलेली होती.
    पिंकी चिमणीने  मैत्रिणीची दोन दिवस वाट पाहीली. ती काही परतली नाही. इतर चिमण्यांत पिंकी चिमणी मिसळुन गेली. तिचा रोजचा जीवनक्रम नियमित सुरू होता. तिच्या घरट्यातील अंड्यातून इवली इवली पिले बाहेर आली. मग तिची आणखीच धावपळ वाढली. तिला धड पिलांपासून दूर जाताही येत नव्हते आणि त्यांच्यासाठी चारा पाणी देखील आणावे लागे. गवताचे किंवा शेतातील कणसाचे दाणे ती चोचीत घेऊन येई. आई दिसताच ते इवलाले जीव त्यांच्या चोची उघडून आशेने बघत. ती आळीपाळीने सर्वांच्या चोचीत चोच घालुन घास भरवी. असे दिवस सरत होते. पिल्ले मोठी होत होती. आता ती लवकरच स्वावलंबी होतील असे तिला वाटत होते. त्यामुळे ती आनंदही होती.
   "आई, आम्हाला दूरवर फिरायला घेऊन जा ना. " पिंकी चिमणीची पिल्ले तिला म्हणाली. त्यासरशी तिला तिच्या जुन्या मैत्रिणीची रिंकी चिमणीची आठवण आली. ती तर काही आली नाही आपल्याकडे तर चला आपणच जाऊया एक दिवस तिला भेटायला. असा विचार करून पिंकी चिमणी पिल्लांना म्हणाली, "बाळांनो आपण उद्या शहरातील माझ्या मैत्रीणीला भेटायला जाऊ." पिल्लांची मागणी मान्य होताच ती आनंदाने नाचू लागली.
                    इकडे रिंकी चिमणी शहरातील बंगल्याच्या आवारातील झाडावरच बसून राही. तिला ना अन्न शोधायला बाहेर जावे लागत होते ना पाणी. सर्वच तिथे हजर होते. त्या बंगल्यातील लोक पक्षी प्रेमी होते. त्यामुळे त्यांनी पुठ्ठ्या पासून एक छानसे घर या चिमणीसाठी तयार करून गॅलरीत अडकवले होते. जणू रिंकी चिमणीला शहरात फ्लॅट मिळाला होता. सहाजिकच तिला कसली म्हणून चिंताच नव्हती. कधीकधी तिला वाटे की आपणही गावी जावे, चिंचेच्या झाडावर बसावे पण तिला एवढे अंतर उडत जायच्या कल्पनेनेच कंटाळा येई. सगळच जागेवर आणि विनासायास मिळत असल्यामुळे ती चांगलीच सशक्त दिसू लागली. दररोजची होणारी पंखांची हालचाल  कमी होत असल्यामुळे ती अधिकाधिक आळशी आणि जाडी होत होती. ऐतखाऊ वृत्ती तिच्या चांगलीच अंगवळणी पडली होती.  रिंकी चिमणी 'सुखवस्तू चिमणी' झाली होती. त्यामुळे तिने बंगल्याच्या बाहेर एक जरी फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला तरी तिला दम लागे.
                 एके दिवशी सकाळीच पिंकी चिमणी तिच्या चार पिल्लांसह शहरात पोहचली. थोडा शहराचा फेरफटका मारून ती पिल्लांना घेऊन रिंकी चिमणी ज्या ठिकाणी थांबलेली होती त्या बंगल्याच्या आवारात घेऊन आली. रिंकी चिमणी तिच्या पुठ्ठ्याच्या घरात बसलेली होती. बाहेरचा चिवचिवाट ऐकुन ती बाहेर आली. पाहते तर पिंकी चिमणी आलेली. मग काय आनंदच आनंद."   ही पिल्ले कुणाची?" रिंकी चिमणीने विचारले.
"कुणाची म्हणजे? माझीच. " पिंकी चिमणी म्हणाली.
"अगं किती जाडी झालीस रिंकी?"  पिंकी चिमणी म्हणाली.
दिवसभर पिल्लांनी  तिथल्या धान्यावर ताव मारला. पाणी प्यायले. सारखा चिवचिवाट चालला होता. तिथल्या झाडांना वेगळाच उत्साह जाणवत होता. दिवस कलू लागला तशी पिंकी चिमणी तिच्या पिल्लांना गावी निघण्याची घाई करू करू लागली.

"आई,  रिंकी मावशीला आपल्या सोबत घे ना." पिंकी चिमणीची पिल्ले म्हणाली. हो नाही करता करता रिंकी चिमणी दोन दिवसासाठी गावी यायला तयार झाली ती देखील सर्वांनी आजचा दिवस तिच्या घरीच थांबण्याच्या अटीवर. 
दुसर्‍या दिवशी लवकरच रिंकी चिमणी आणि पिंकी चिमणी व तिची पिले असा लवाजमाच डोंगराजवळील गावाकडे निघाला. शहराच्या बाहेर पडताच त्यांचा अधल्या मधल्या एखाद्या झाडावर थोडासा विसावा घेत प्रवास सुरू झाला. पुरेसा पाऊस झालेला असल्यामुळे  गवत वाढलेले होते.  गवतातील आळ्या, तुडतुडे तसेच पिकाला आलेल्या कणसातील दाणे या सर्वांना खुणावत होते. पिल्ले व चिमण्या अधुन मधुन त्याचा आस्वाद घेत होते. रिंकी चिमणी मात्र अनेक दिवसांपासून जास्त अंतर पार करण्याची सवय नसल्याने थकली होती. तिला दम लागून ती धापा टाकत होती. गवतातील तुडतुडे चोचीत पकडणे तिला जमत नव्हते. गेली अनेक दिवस तिला आयते खाण्याची सवय लागलेली होती. स्वतः अन्न मिळवणे तिला त्रासदायक वाटत होते. अर्थातच चिंचेच्या झाडावर परतायला त्यांना चांगलीच झाकड पडली होती.  
           रिंकी चिमणी चांगलीच दमली होती. त्यातच कित्येक दिवस रानच्या मोकळ्या हवेची सवय राहीली नसल्याने तिला सणसणून ताप भरला. पिंकी चिमणीने तिला घरट्यात बसवले. सकाळी पिल्लांनी तिच्यासाठी अन्न आणुन दिले. उगीच इकडे आले असे तिला वाटले. इथे तर स्वतःचे अन्न स्वतः शोधणे आणि खाणे ही कामे किती कठीण आहेत असे तिला वाटले. दोन दिवसांनी तिचा  ताप उतरला आणि तिने पुन्हा गावाचा निरोप घेऊन शहराचा रस्ता धरण्याचा बेत आखला.
" पिंकी मी आज जाते बरं माझ्या शहरातल्या घरट्यात. मला इथे रात्री थंडी देखील खूप वाजते." रिंकी चिमणी म्हणाली.
त्यासरशी पिंकी चिमणीची पिल्ले तिला "मावशी जाऊ नकोस, इथेच थांब आमच्या सोबत. आम्ही तुला मदत करू. इथे किती मोकळं वाटतं. शिवाय इथलं अन्नही आपल्याला आवडेल असं आणि पंखात बळ भरणारं आहे. " पिल्ले शहाण्यासारखी म्हणाली. अर्थातच हे त्यांनी पिंकी चिमणीकडूनच अनेकदा ऐकलं होते.
रिंकी चिमणीचे मन दुचित झाले. इथे चिंचेच्या झाडावर थांबणे कष्टप्रद होते तिच्यासाठी,  तर शहरातल्या मानवनिर्मित घरट्यात राहणे ऐतखाऊपणाचे आणि सुखावणारे होते.
"रिंकी, तुझं शरीरं आयतं खाऊन नुसतं जड झालय.  शिवाय किती दिवसापासून तू नुसतं कसलं ना कसलं धान्यच खातेस. आता सुखवस्तूपणा सोडून दे. इथचं आनंदानं रहा. मी आणि माझी ही मोठी झालेली पिल्लं आम्ही तुझ्या सोबत राहू. आज तुझ्यासाठी आपण सगळे मिळून एक घरटे बनवू. त्यात तू अंडी घालशील. त्यातुन बाहेर आलेली पिल्ले रानच्या हवेत वाढतील, चपळ होतील. नाहीतर शहरात जाऊन ती तुझ्यासारखीच जाडी आणि आळशी होतील. आजारी पडणारी होतील. " रिंकीला हे पटलं आणि तिने चिंचेच्या झाडावर तिच्या जुन्या सवंगड्यात थांबण्याचा निर्णय घेतला. त्यासरशी सर्वांनी चिवचिवाट करून आणि नाचून आनंद साजरा केला. नंतर रिंकी चिमणी आणि पिंकी चिमणी व तिची पिले  घरट्यासाठी काड्या आणायला भूर्र ऽऽ उडाली.

~~~~~~
~~~~~~
डाॅ. कैलास दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव
ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर
पिन ४१४१०२
kailasdaund@gmail.com





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर