○ उंदरीन सुंदरीन : वैविध्य जपणारा बालकविता संग्रह.

 

○  उंदरीन सुंदरीन : वैविध्य जपणारा बालकविता संग्रह.


          डाॅ. कैलास दौंड

'उंदरीन सुंदरीन' हा विठ्ठल जाधव या कवीचा बालकविता संग्रह नुकताच नांदेडच्या  इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. 'पांढरा कावळा' या बालकुमार कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाल्यानंतरच्या विठ्ठल जाधव यांच्या या बालकविता संग्रहाकडे वाचकाचे लक्ष वेधले गेले आहे. या बालकविता संग्रहात सदतीस बालकविता असून त्या बाल ते किशोर वयोगटातील मुलांच्या भावविश्वातील व अनुभव जगतातील विषय ते जबाबदारीने घेऊन आलेले दिसतात.
     आई हा बालकाचा पहिला मित्र, शिक्षक, काळजीवाहक, आधार आणि सर्वस्वच असते.    'उंदरीन सुंदरीन'  बालकविता संग्रहात 'आई' संबंधी 'आईचा वाढदिवस' , 'मातृॠण' , 'माझी आई' , 'आई तुझी हाक' या कविता येतात. आपल्या बाळाच्या भावनांशी ती जणू एकरूप होते. मुलांना देखील हे दिसते. 'आईचा वाढदिवस' या कवितेतील बाळ म्हणते   -
              'मी खुदकन हसलो
               तू गालात हसतेस
               मी रडरड रडलो
               तू छातीशी धरतेस.'
तर या 'आई तुझी हाक' कवितेतील मुलगी आईला समजावतांना दिसते ती अशी,
         'स्वप्नी येते माझ्या, आई तुझी हाक
          करीन स्वयंपाक, धुणी भांडी.'
कवी विठ्ठल जाधव यांच्या बालकवितेत त्यांच्या भोवतालाचे नेमके प्रतिबिंब पडलेले दिसते. त्यातूनच 'दुष्काळी राज्यात' सारखी बालकविता येते. या कवितेत मुलांसाठी ते लिहीतात :
            'दुष्काळी राज्यात
            आहे एक शाळा
             शाळेत पाखरं
             होतात गोळा.'
या शिवाय 'रक्षाबंधन' या कवितेतील मुले 'झाडाला राखी बांधतात' व झाडाच्या रक्षणाची बांधिलकी जपतात. 'अमुण्या कामुण्या' ,' मुलं मुली हुशार' , ' चिऊताई' ,' उंदरीन सुंदरीन '. ' नदी' ,'जंगलचे नेटवर्क' या अशाच निसर्गाचा परिचय घडवणार्‍या कविता येतात.
              माणूस हा सामाजिक प्राणी आहे. या सामाजिकरणाची सुरवात  लहानपणापासूनच होत असते. 'शिकवणी' ही अशीच एक कविता आहे. या कवितेत कवीने लिहीले आहे. 
             'माणसाने आता माणुसकीची
              शिकवणी लावली पाहिजे.'
आणखी 'बाप रगत ओकतो' , ' शाळा माझी' , ' सखू गं सखू' ,'मातृभाषा' , 'लगीन',' जन्माचा इतिहास' या आणखी  भोवताल समजणार्‍या, सामाजिककडे घेऊन जाणार्‍या कविता.
          निसर्ग हा माणसाचा खराखुरा सोबती, साथी! त्यातील कितीतरी घटक बाल कुमाराचे जिव्हाळ्याचे विषय. मुलांच्या जडणघडणीत निसर्गाचा  मोठाच सहभाग असतो. याचे अचुक भान कवीने सांभाळलेले आहे. 'एक वानर', 'भरदुपारी' , ' निसर्गशाळा' ,'पाऊस माझा' ,'पिल्लू' , '
बोबडे बोल' , 'सुटी' , 'मनीचा सेल, या यासंबंधातील महत्त्वाच्या बालकविता. मनीचा सेल कवितेतील शब्दकळा पहा : 
              'कढईत चमचा
               चमच्याला तेल
               मनीने लावला
               बाजारात सेल '
अशा ओळी मुलांना भुरळ घालतील अशाच आहेत. 'सायकल' या कवितेतून 'वाहनांचा परिचय' घडतो. 'माझा दोस्त' कवितेतील संगणक मुलांचा दोस्त बनतो. 'कंगवा' ,' दगड' , अशा कविता  निसर्गाचा परिचय आणि जवळीक वाढवणाऱ्या आहेत. या सर्वच कविता नऊ ते सोळा वयोगटातील मुलांना आवडतील अशा आहेत. मात्र कवीने भाषिक सुलभीकरण अधिक केले असते तर बालकवितेतील रंजकता आणि विलोभनीयता काकणभर वाढली असती. कवितेतून काही तरी शिकवण्याबरोबरच रंजकता सांभाळण्याचा चांगला प्रयत्न कवीने या कवितासंग्रहात केलेला आहे.
                     दिवंगत चित्रकार प्रमोद दिवेकर यांनी केलेली आकर्षक मुखपृष्ठ आणि प्रत्येक कवितेला साजेशी सुंदर रेखाटणे या बालकविता संग्रहाच्या सुंदरतेत मोठीच भर घालतात. प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी पाठराखण करतांना ' दुष्काळग्रस्त भागातील मुलांचा भोवताल हे या संग्रहाचे वेगळेपण आहे, ...या बालकवितांच्या केंद्रस्थानी असणारी कृषीसंस्कृती हे या संग्रहाचे सामर्थ्य आहे.' असे नोंदवलेले निरीक्षण समर्पक आणि नेमके आहे.
बालकवितेच्या विश्वात चांगले स्वागत होईल.
~~~
~~~

उंदरीन सुंदरीन : बालकविता संग्रह
कवी : विठ्ठल जाधव
प्रकाशन : इसाप प्रकाशन, नांदेड
प्रथमावृत्ती : १४ नोव्हेंबर २०१९
पृष्ठे : ४८   मूल्य : ऐंशी रूपये.

~~~
~~~

डाॅ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
Mo 9850608611

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर