• बालविश्व समृद्ध करणाऱ्या कविता
• बालविश्व समृद्ध करणाऱ्या कविता
• अशोक लोटणकर
'माझे गाणे आनंदाचे' हा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांचा बाल कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. डॉ. कैलास दौंड यांनी आजवर कादंबरी, कथा, कविता, ललितलेख असे प्रौढ वाङमय विपुल प्रमाणात लिहिले आहे. मात्र छोट्या दोस्तांसाठी लिहिलेला हा त्यांचा पहिलाच बाल कविता संग्रह आहे. या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य हे की डॉ. दौंड यांनी सर्वप्रथम या कविता काही बालकुमार वाचकांना वाचायला देऊन, त्यांना वाचून दाखवून त्यांच्या पसंतीस उतरलेल्या कवितांची निवड या संग्रहासाठी केली आहे. असा प्रयोग क्वचितच कोणा बाल साहित्यिकाने केला असावा.
लहान मुलांसाठी कोणताही साहित्यप्रकार लिहिणं... मग कविता असो, कथा किंवा कादंबरी असो ही बाब वाटते तितकी सोपी नसते. लेखक अथवा कवीला स्वतःचे लौकिक वय पुसून बालमनात प्रवेश करावा लागतो. इवलाल्या डोळ्यांनी पुन्हा निसर्ग न्याहळावा लागतो. बाल मनातली जिज्ञासा, अद्भुततेची आवड आणि उत्कटता नव्यानं अनुभवायला हवी. डॉ. कैलास दौंड यांच्या कवितांमधून हा साक्षात्कार दिसून येतो. या संग्रहात एकूण ३७ कविता आहेत. बाल मनाला ओढ लावणाऱ्या झाडां माडांवर, निसर्गातील विविध छटांवर, पाने, फुले, आभाळ, पाऊस, पशू, पक्षी, शाळा, मैत्री इत्यादींना स्पर्श करणाऱ्या आणि बालविश्व समृद्ध करणाऱ्या कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. डॉ. दौंड हे स्वतः विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. सतत मुलांमध्ये वावर असल्याने त्यांचा बालमनाचा चांगला अभ्यास आणि निरीक्षणं आहेत.
निसर्ग वर्णनाच्या अनेक कविता या संग्रहात आहेत. 'पाऊस' या कवितेत - ' वारा ढगांच्या काढीतो .. मस्त पावसाळी खोड्या ।साचलेल्या पाण्यामध्ये..सोडू कागदाच्या होड्या । '
किंवा 'ऋतूंना आली हिरवी फुलं । आभाळ गाणं झालंया खुलं । '
पहाटेचे वर्णन करताना - 'पहाट होता उतरल्या चांदण्या ।दवाचं लेणं पानावर गोंदण्या । वाऱ्याने झुलं परसातला मोगरा ।जास्वंद फुल नेसली घागरा । '
या अशा प्रतिमा बालमनात आनंद आणि कुतूहल निर्माण करतात. यासाठी 'माळरानी' , 'आनंद उगवतो' , 'आकाश निरीक्षण' , 'इवले इवले फुल' , 'पक्षी' , 'पाणवेडी' , 'उगवला दिन' , 'उन्हाची चाहूल' , 'पाचू पिसारे फुलले' , 'आभाळ आणि फूल' या कविता मुळातूनच वाचायला हव्यात.
अद्भुत गोष्टीचं आणि परीच्या राज्याचे छोट्या बालकांना विशेष आकर्षण असतं. 'परीच्या पंखांची गादी' या कवितेत -
'परीच्या पंखांची जर हवी गादी
ढगांची ओलांडून जावी लागेल लादी.
ढगांच्या लादीवर हत्ती चार
सोंडे वरती उंच मिनार '
या अशा कवितांमुळे बालकांच्या कल्पनाशक्ती योग्य वाढ होतेच. शिवाय काही प्रतिमा त्यांना आनंद देऊन जातात. अशाच स्वरूपाच्या 'शाळा' , 'स्वप्नातील शाळा' , 'शिवाशिवीचा खेळ' , 'सहभोजन' या कविता आनंद देतात. विचार करायला लावतात.
शाळा म्हटलं की मुलांचा गोंधळ, दंगामस्ती आणि मित्र-मैत्रिणीँशी निरागस भांडण आलीच. गट्टी फू आलीच. ही भांडणे देखील मजेशीर असतात. क्षणिक असतात क्षणात विसरली ही जातात. असंच दोन जिवलग मैत्रिणींनी ' गट्टी फू ' केल्यानंतर एकीचे मनोगत काय आहे हे डॉ. दौंड यांनी आतल्या जिव्हाळ्याने व्यक्त केले आहे.
'मनामध्ये मांडून झाले
हजार डाव खेळाचे
गळ्या शप्पथ सांगू तुला
आता आपण बोलायचे
झाल्या गोष्टी जाऊ दे
तुझे म्हणणे राहू दे
मैत्रीमधल्या गंगेचे
पाणी निर्मळ वाहू दे '
निखळ आणि निरागस भांडणातील 'गट्टी फू ' अशी सुटून जाते . नातेसंबंधाची उकल करणाऱ्या आणि नाते समृद्ध करणाऱ्या कविता देखील या संग्रहात आहेत. 'आजीचे बोल' , 'बाबांची सुट्टी' , 'खिडकी' , 'काय व्हायचे' इत्यादी कविता आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत. 'बाबांची सुट्टी' ही कविता तर वाचता वाचता अंतर्मुख करणारी आहे. बाबांचे बालपण किती समृद्ध होतं. निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त हिंडणे, सूरपारंब्या , हुतूतू खेळणे,नदीतवर मनसोक्त डुंबणे, झाडावर चढणे , रानावनात भटकणे अशा नैसर्गिक वातावरणात त्यांचं बालपण गेलं. कोणतंही खेळणं अथवा करमणुकीची करमणुकीसाठी आधुनिक साधन नसताना सुद्धा
' कोणतेच खेळणे
नव्हते त्यांच्या घरी
खेळायला वेळच
पुरत नव्हता तरी '
असं समृद्ध बालपण मुलांनी अनुभवाव अशी इच्छा कवीची आहे. 'माझे गाव' , ' उन्हाळा ' , ' आपणही ', 'स्वच्छता' , 'एकदा' इ. इ. कविता तितकाच आनंद देणाऱ्या आणि बालमनाला चालना देणाऱ्या आहेत. या संग्रहातल्या अनेक कवितांना एक आंतरिक लय, नाद , ताल आणि गोडवा आहे. जो मुलांची उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणारा आहे. इतकच काय या संग्रहातील कविता शिशू गट, बाल गट आणि कुमार गटातल्या मुलांनी वाचाव्यात, ऐकाव्यात अशाच आहेत. तमाम छोट्या दोस्तांना आणि पालकांना या कविता निश्चितच आवडतील. हा बालकवितासंग्रह घरोघरी संग्रही ठेवण्याजोगा आहे. कारण अनिल जोशी यांची प्रत्येक कविता बोलकी करणारी सुंदर आणि समर्पक चित्रे काव्यसंग्रहाची नजाकत वाढवतात.
माझे गाणे आनंदाचे : बालकविता संग्रह.
ISBN: 9788184180869
कवी : डाॅ. कैलास दौंड
प्रकाशक : मिलिंद काटे, अनुराधा प्रकाशन , पैठण -औरंगाबाद.
प्रथमावृत्ती: १४नोव्हेंबर २०२०
पृष्ठे :४४. मूल्य: ५०रू.
मुखपृष्ठ: धर्मराज आव्हाड, आतील चित्रे : अनिल जोशी.
~~~~
अशोक लोटणकर
मुंबई
भ्रमणध्वनी 92243 70124
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा