सुंदर व मनविभोर ' : माझे गाणे आनंदाचे' बालकाव्यसंग्रह.

 


○ सुंदर व मनविभोर ' : माझे गाणे आनंदाचे. 

   प्रा. देवबा शिवाजी पाटील 

        
डाॅ. कैलास दौंड हे  सर्वाना एक सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत.  त्यांचे काव्यसंग्रह, कथासंग्रह, ललित लेख संग्रह, बालकाव्यसंग्रह, बालकुमार कथासंग्रह असे बरेच लिखाण प्रकाशित झालेले आहे. नुकताच त्यांचा 'माझे गाणे आनंदाचे' हा सुंदरसा बालकाव्यसंग्रह पैठणच्या अनुराधा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. बालसाहित्य मग ते  बालकविता असो, बालकथा असो, बालकादंबरी असो, वा बालनाटिका असो वा इतर कोणत्याही प्रकारचे बालसाहित्य असो, ते  लिहिण्यासाठी साहित्यिकाला तो वयाने मोठा असल्यास आधी बालक व्हावे लागते. जो वयाने मोठा साहित्यिक बालक होऊ शकतो तोच उत्कृष्ट बालसाहित्य लिहू शकतो. ह्या  बालकाव्यसंग्रहात कवी असेच बालक झाल्याचे पानोपानी  दिसून येते.
         'माळरानी' या पहिल्याच कवितेत  बालक-बालिकांच्या खेळणे, फिरणे , नाचणे, बागडणे, खाणे, पिणे, गाणी गाणे अशा निसर्गदत्त बालभावना कवीने छानपणे रंगविल्या आहेत. 'झाली सकाळी ' कवितेतून  निसर्गाच्या रमणीयतेसोबत मुलांच्या मनावर अलगदपणे श्रमाचे मूल्य रूजविले आहे. 'स्वप्नातील शाळा' कवितेत ' मनी वसे ते स्वप्नी दिसे' या उक्तीनुसार शिक्षकांना शिकविण्याची मुलांच्या मनातील सुप्त उर्मी  उघड केली आहे. 'पहाट' या कवितेत पहाटेचे रम्य वर्णन आहे तर 'थोडं फिरायला जाऊ ' या कवितेत जंगलाची   रमणीयता वर्णिली  आहे. 'सहभोजन' कवितेत मुलामुलींच्या मनावर बालपणापासून एकमेकांना सहकार्य करण्याची परस्परांना सांभाळून देण्याची शिकवण रुजवली आहे. नातवंडांना आजी आजोबांची  किती प्रबळ ओढ असते ते 'आजीचे बोल ' हा कवितेमधून दाखवित  आईवडिलांकडे दुर्लक्ष करणा-या पालकांनासुद्धा या कवितेद्वारा धडा  दिला आहे.
           "इवले इवले फूल। बाई, इवले इवले फुल। या वेलीच्या मांडीवरती। जसे खेळते  मूल।।" ही जसे आईच्या माडीवर मूल खेळते तसे वेलीच्या मांडीवर फूल खेळते ही 'इवले इवले फूल' कवितेमधील कल्पना या छान आहे.
'खिडकी'  कवितेमधून खिडकीची उपयोगिता कथन करीत कवीने  "शाळा आपुली असते। जीवनाची खिडकी।।" असे शाळेचे जीवनोपयोगी महत्व मुलांच्या मनावर बिंबवले  आहे. ' आपणही ' ही अभंगसदृश्य  सुंदरशी  निसर्ग कविता व 'पाणवेडी' ही नदीवरची कविता या दोन्ही कविता दातृत्वाचा गुण अंगी बाणवण्याचे  शिक्षण देणाऱ्या आहेत.' वाढ बाई वाढ ' कवितेद्वारा वृक्षांचे महत्व प्रतिपादित वृक्षारोपणाचा मोलाचा संदेश मुलांना मिळतो. 'आता गट्टी फू सुटू दे' ही कविता दोन मैत्रिणींची गट्टी फू झाल्यानंतर त्यांच्या मनातील  भावभावनांचे सुरेख चित्रण करते. कवीने  जरी ते एकीचे  मनोगत आहे असे म्हटले आहे तरी वास्तवतः त्या दोघींच्याही  मनातील समान भावना आहेत हे निर्विवाद सत्य आहे कारण बालमन हे निरागस असते. त्यांची क्षणातच कट्टी होते व  क्षरणातच गट्टीही होते.
       'उगवला दिन' कवितेत सकाळच्या निसर्गासोबत गावातल्या गडबड, धांदलीचे  छान रेखाटन आहे. ' उन्हाळ्याची चाहूल' कवितेतसुध्दा झाडांचे , त्यांच्या सावलीचे महत्त्व  व त्यांच्या सौंदर्याचे सुंदर वर्णन आले आहे. 'काय व्हायचंय?' कवितेमधून परोपकाराची व  देशकर्तव्याची  भावना मुलांच्या मनावर कवीने ठसवली आहे. 'या विश्वातील माणसांना' ही कविता या बालकाव्यसंग्रहाचा कळस आहे. प्रेमाची, बंधुत्वाची, मानवतेची विश्वव्यापी शिकवण या कवितेतून सहजगत्या मुलांना मिळते. युद्धाला सारेच कंटाळतात. त्याला मुलेच  कसे  अपवाद असणार?  शस्त्रास्त्रे, युद्ध सारे काही  गाडून टाकण्याचे ही मुले या कवितेद्वारा सांगत आहेत.  'स्वातंत्र्य' कवितेमध्ये "पंखात माझ्या बळ येताच। मला उंच उडायचय ।।" अशी ध्येय गाठण्याची शिकवण बालपणापासून कवीने मुलांना दिली आहे.
  'स्वच्छता' कवितेत स्वच्छतेचे, निरोगी राहण्याचे, चांगल्या अन्नाचे, शुद्ध हवा-पाण्याचे महत्त्व प्रतिपादित धूर, सोडून प्रदुषणाचा जीवाला घोर लावू नका असा  सावधगिरीचा इशारा दिला आहे. 'माझे गाणे आनंदाचे ' ही  शीर्षकीय कविता माणुसकीचे गुणगान गाणारी  एक सुंदरशी कविता आहे. 'सूर्यादय' कवितेत सूर्योदयाचे वेळी अंगी उत्साह असावा व झोपेतली स्वप्ने विसरून खऱ्या स्वप्नपूर्तीसाठी आता कर्तृत्वाच्या आकाशात जोमाने भरारी घ्यावी असे मोलाचे प्रबोधन करीत पाणी जपून वापरण्याचा मोलाचा संदेशही दिला आहे.
          मोठा ठळक फॉन्ट व प्रत्येक कवितेला अनुरूप असे सुंदर, रेखीव व आकर्षक चित्र असलेल्या या सर्वच बालकविता खरोखरच एकाहून एक सरस अशा आहेत. या कवितांमधून मुलांचे मनोरंजनासोबत कवीने छानपैकी प्रबाधनही कले आहे. कवितांना एक विशिष्टसा ठेकाही आहे. 'माझे गाणे आनंदाचे' बालकाव्यसंग्रह वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे जरी  कवीने ही सारी गाणी 'माझी गाणी' असे म्हटले आहे तरी ती इतकी गोड आहे की मुलामुलींनी  वाचल्यानंतर त्या साऱ्यांना नक्कीच ती  आवडणार व ही सारी गाणी  त्या मुलामुलींची होणार ह्यात तीळमात्रही  शंका नाही.  कवी डॉ. कैलास दौंड यांचे असा सुरेख बालकाव्यसंग्रह सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या भावी  वाङमयीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

•माझे गाणे आनंदाचे (बालकाव्यसंग्रह)
• कवी : डॉ. कैलास दौंड
•प्रकाशक :- अनुराधा प्रकाशन, पैठण
•पृष्ठे :- ४४ किंमत : ५०₹
~~~
प्रा. देववा शिवाजी पाटील,
गोविंदनगर (नांदुरा रोड), खामगाव
जि. बुलडाणा,४४४३०३.
मो.९४२०७९५३०.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर