मुलांचे मनोरंजन करणारी कविता : ' माझे गाणे आनंदाचे

 

  ● मुलांचे मनोरंजन करणारी कविता : ' माझे गाणे आनंदाचे


'

                                       - उमेश मोहिते .
             ________________________

       बाल मित्रांनो,खास करून मोठया प्रौढ वाचकांसाठी लिहिणारे लेखक म्हणून सुपरिचित श्री.कैलास दौंड हे लहान मुलां- मुलींसाठीही छान- छान बोधपर कथा,कविता आणि नाटूकले लिहिणारे कवी,लेखक आहेत.त्यांची केवळ मुलांसाठी लिहिलेली काही पुस्तकेही प्रकाशित झाली असून नुकतेच ' माझे गाणे आनंदाचे ' हे त्यांचे केवळ तुमच्यासाठी लिहिलेले कवितांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.या पुस्तकात एकूण ३७ कविता असून या सर्वच कविता तुमच्या परिचयाच्या शाळा,गाव,उन्हाळा,पक्षी,आजी अशा विषयांवरील आहेत.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कविता साध्या,सोप्या अशा तुमच्या सर्वांच्या परिचयाच्या भाषेत आहेत आणि त्या तुमच्या अगदी आवडत्या विषयांवर सहज सुंदररित्याही लिहिलेल्या आहेत, बरं .....उदा.आजी तुम्हा सर्वांना खूप आवडते ना ? तर त्या आजीच्या मायाळू प्रेमाचा गोडवा सांगताना 'आजीचे बोल ' या कवितेत कवी म्हणतो :
               आजीचे बोल
               फारच गोड
               त्याची लागते
               मनाला ओढ
.. मुलांनो,तुमच्या मनात रानी - वनी फिरण्याचीही भारी हौस असते,हेच अगदी नेमकेपणे सांगताना कवी ' थोडं फिरायला जाऊ ' या सुंदर कवितेत म्हणतो :
              चला मुलांनो सारे
              आपण फिरायला जाऊ
              निळे,हिरवे डोंगर
              आणि जलधाराही पाहू
        बालमित्रांनो,तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली की,या सुट्टीमधे मामाच्या गावी जाऊन नदीकाठी आणि मामाच्या आमराईत निवांत हुंदडायलाही आवडते.या तुमच्या सर्वांच्या अतिशय आवडत्या विषयावरही ' उन्हाळा ' ही सुंदर कविता कवीने लिहिली आहे.या कवितेत कवी म्हणतो :
                नदीच्या काठी
                आंब्याची दाटी
                धरुया ना हट्ट
                मामाच्या पाठी
      बालमित्रांनो,पण याचा अर्थ असा नाही की,या संग्रहात केवळ आणि केवळ तुमच्या पसंतीच्या विषयांवरीलच कविता आहेत ; तर तुम्हाला छानशी शिकवण देणाऱ्याही काही कविता या संग्रहात आहेत.उदा.' माझे गाणे आनंदाचे ' या कवितेमधून तुम्ही सर्वांनी माणसां- माणसांत भेदभाव न करता सर्वांशी प्रेमाने वागावे,गरजूंना मदत करावी,फुलं-झाडे नि पशु -पक्ष्यांवर माया करावी आणि अनाथ,शोषित,दीन-दुबळ्यांची सेवा करावी व आनंदाचे गाणे गावे,असा मानवतेचा संदेश दिला आहे.कवी म्हणतो :
                देणाऱ्याच्या दातृत्त्वाचे
                अनाथाच्या मातृत्त्वाचे
                निखळ,निरागस हास्याचे
                माझे गाणे समतासत्याचे
                माझे गाणे आनंदाचे ....
       तर बालमित्रांनो,यातील ' झाली सकाळ ', ' माळरानी ', ' सहभोजन ', ' आभाळ आणि फुल ', ' वाढ बाई वाढ ' आणि ' माझे गाव ' या कवितांसहित इतर सर्वच कविता अगदी वाचताक्षणीच तुम्हाला आवडतील अशा नितांतसुंदर असून त्या तुमचे मनोरंजन तर करतीलच ; पण त्यासोबतच तुम्हाला आनंदही देतील.शिवाय कवितेसोबतची देखणी नि सुबक चित्रंही तुमचे मन आकर्षून घेणारी झाली आहेत.या पुस्तकाविषयी तुमचे आवडते प्रसिद्ध लेखक श्री.एकनाथ आव्हाड म्हणतात त्याप्रमाणे या कविता नक्कीच ' तुमच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत.त्यामुळे या सर्व कविता तुम्हा मुलांच्या पसंतीस उतरतील आणि तुम्हाला नक्कीच गुणगुणाव्याशा वाटतील,अशा आहेत.त्यामुळे कवीचे हे आनंदगाणे साऱ्या मुलांचे आनंदगाणे होणार आहे ', असा ठाम विश्वास वाटतो.म्हणूनच कवी श्री.कैलास दौंड यांचे हार्दिक अभिनंदन !

बालकविता   =  माझे गाणे आनंदाचे
कवी            =  श्री कैलास दौंड
प्रकाशक.     =  अनुराधा प्रकाशन,
                       पैठण जि.औरंगाबाद
                      ( मो.९४२३४५५२७२ )
पृष्ठे              =  ४४
मूल्य.           =  ५०

----------------------------------------------------------

उमेश मोहिते,
चलभाष : ७६६६१८६९२८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर