आगंतुकाची स्वगते' :अस्वस्थ सभोवतालचे प्रत्ययकारी चित्रण: • डॉ. दीपक सूर्यवंशी

 

  • अस्वस्थ सभोवतालचे प्रत्ययकारी चित्रण: 'आगंतुकाची स्वगते'
                                 •  डॉ. दीपक सूर्यवंशी
             मराठी साहित्यातील प्रतिथयश कादंबरीकार आणि कवी डॉ. कैलास दौंड यांचा 'आगंतुकाची स्वगते' हा पाचवा  ग्रामीण जीवनानुभवाशी एकरूप असलेला पाचवा कवितासंग्रह.  यात  अस्वस्थ सभोवतालचे दर्जेदार नि अस्सल, प्रत्ययकारी चित्रण आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहाची कवीने पहिल्या विभागात 'सल आणि ओल', दुसऱ्या 'नदीकाठ' तर तिसऱ्या विभागात 'दिस-मास’ अशा तीन भागात विभागणी केली असून त्यात अनुक्रमे आपल्या अस्वस्थ सभोवतालचे चित्र पाहून हेलावणाऱ्या मनाची अवस्था, महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणेतून प्रगत जाणिवांच्या दिशेने होणारी वाटचाल आणि याच विचारांच्या माध्यमातून सद्यकाळात उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल भविष्यात तरी करता येईल का? या विचारक्रमाने कविता समोर येतात. यात कवी महामानवांच्या वैचारिक चिरंतन सत्याच्या सामाजिक जीवनातील अस्तित्वाच्या शोधार्थ वाटचाल करताना दिसतोय.
      या कवितासंग्रहातील कविता खरंच वाचकांशी हितगुज साधतेय. हा अस्वस्थ भवताल आणि उध्वस्त जगणं यांच्यातल्या संघर्षाचा मनोमन संवाद आहे. गेल्या अनेक वर्षात बदललेल्या सामाजिक, राजकीय आणि जागतिक घडामोडींच्यामुळे समाजजीवन त्यातही ग्रामीण समाजजीवन मुळापासून उध्वस्त होऊ पाहत आहे. तंत्रज्ञानामुळे जग खेड बनलं खरं,पण माणूस माणसापासून तितकाच दुरावला गेला आहे. आज तो व्यक्त न होता स्वतःशीच बोलण्यामध्ये व्यस्त आहे. ही जीवघेणी शोकांतिका कैलास दौंड यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली आहे. आधुनिक स्पर्धेच्या जगात माणूस आगंतूकासारखा आपल्याच आसपास वावरतो आहे. माणूस स्वयंकेंद्री बनून स्वतःपुढे अनेकविध प्रश्‍न निर्माण करतो आहे आणि त्याची उत्तरे- माणूसपण शोधण्याचाही आटोकाट प्रयत्न करत आहे. थोडक्यात ही अंतर्मनाशी झालेल्या स्वगताची, घालमेलीची आणि घुसमटीची कविता आहे.
                    डॉ .कैलास दौंड यांच्या कविता वैविध्यपूर्ण असल्या तरी त्या कवितेची एक अखंड आणि प्रवाही अशी लय असून ती आत्मभानाच्या दिशेने जाणारी कविता आहे. आपल्या या कवितेमागची भूमिका पहिल्याच कवितेत व्यक्त करतांना ते नोंदवतात - आपली कृषी संस्कृतीशी जोडली गेलेली नाळ वाचवणं काळाची गरज आहे. ग्रामीण जनजीवन विस्कळीत होऊन शहरीकरणाला बळी पडत चालले आहे, त्यामुळे आज आपल्याला अस्वस्थ सभोवतालचं अनपेक्षित चित्र दिसून येत आहे. परिणामी ग्रामीण संस्कृती उध्वस्त होताना दिसत आहे, या उद्धवस्तीकरणामागे आहे ती बाजारीकरणानंतर आलेली कमालीची स्वार्थ भावना. शेतकऱ्याला सुचविणारे कित्येक भेटतात पण वाचवणारे कोणी भेटलच याची खात्री नाही.
               सगळीकडेच असणारे स्वार्थी आणि सत्ताकेंद्री तत्वहीन, मूल्यहीन राजकारण ग्रामीण समाजजीवनाच्या मुळावर येऊन बसले आहे. ग्रामीण युवक दिशाहीन होऊन व्यसनाधीनता व बेरोजगारीच्या विळख्यात अडकला आहे. सातत्याने येणारे दुष्काळ, महापूर आणि कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटे, प्रस्थापितांच्या धगधगत्या विखारामुळे शेतकरी आत्महत्यासारखा मार्ग पत्करतात. म्हणजेच अस्वस्थ समाजजीवन, बोकाळलेला भ्रष्टाचार, जातीभेद, कर्मकांड, श्रीमंत-गरीब, गट-तट आणि आपआपसांतील मतभेद दिसून येत आहेत. अगदी अंतर्गत जिव्हाळ्याच्या नातेसंबंधातही कलह निर्माण होत आहेत. माणसा-माणसांतील माणुसकी संपुष्टात येऊन हजारो वर्षापासून चालत आलेल्या बऱ्यापैकी शांततामय असणाऱ्या संस्कृतीचं अस्तित्व धोक्यात येत आहे. याची मनोमन खंत कवी आपल्या कवितेमधून अधोरेखित करताना दिसतो. कवीला आशावाद वाटतो की ही मनातील वेदना दूर व्हावी, अन पुन्हा एकदा माणसा- माणसातील प्रेम,जिव्हाळा,आत्मीयता वृद्धिंगत व्हावी अशी माफक अपेक्षा बाळगतो. हा शोध घेताना कवी आपल्या एका कवितेत कवी म्हणतो-
       ‘गोंदलेले मातीवर
       बांधांचे चौकोन
        तसतसे खुजे झाले
        माणसाचे मन’........(ओल)
            या गंभीर अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी कवी माणसांची आजची अवस्था विचारात घेण्याचा सल्ला देतो आहे. कवी उध्वस्त समाजजीवनाच्या मुलभूत दैनंदिन प्रश्नांचा शोध घेण्यामध्येही यशस्वी झाला आहे. गावाचं गावपण धोक्यात येत असून शहरीकरण, आधुनिककरणाच्या झपाट्यामुळे सर्वकाही संपणार की काय ? असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे कवीमन अस्वस्थ होत आहे कारण शहरीकरण ही सामाजिक,आर्थिक आणि मानसिकही प्रक्रिया आहे. त्याबरोबरच आजच्या वर्तमानकाळात ही अस्वस्थता सभोवतालच्या ग्रामीण संवेदनशील मनावर परिणाम करताना दिसत आहे. त्यातुन माणसाच्या मनात एकप्रकारची तुटलेपणाची भावना प्रबळ होत आहे. -
     ‘कसे दिवस येतात
     भर बाजारात हरवलेला मी
     मलाच सापडत नाही’............( ‘कसे दिवस येतात)
              वास्तविक ही अवस्था प्रत्येक माणसाची आहे आणि ती नेमकी व्यक्त करण्याचं काम या मानसिकतेच्या स्वगताने केलेले आहे. ग्रामीण भागातील माणसाला आशेच्या मृगजळाने पूर्णतः व्यापून टाकले आहे. या सर्व बाबीला बदलत्या समाजव्यवस्थेला कारणीभूत ठरतो, तो माणसाचा अतिरेकी हव्यास आणि कधीही न भागणारी स्वार्थाची बकाल भूक. ही भूक संपूर्ण समाजव्यवस्थेला ऱ्हासातळाला कुठपर्यंत घेऊन जाणार ? या दिशाहीन प्रवासाला काही अंत ? या गोंधळलेल्या स्थितीचे चित्रण करणाऱ्या कविता वाचतांना वाचकांना हलवून टाकतात. उदा:
‘वाढत चाललाय आवाजात आवाज
गर्दीत पायाजवळ जरी पडलं,
हव असलेलं आकाश
कुणालाच त्याचा पत्ता लागणार नाही ,
वाढत चाललेय द्रुत लयीत कोलाहलाचे तांडव
गर्दीत कुठंच कस माणूस दिसत नाही’..............( वाढत चाललाय कोलाहल)
          कवितासंग्रहाच्या 'नदिकाठ' या मध्यवर्ती भागात शिरताना अनेक कविता अधिकाधिक संवेदनशील आविष्कार बनल्या आहेत. सद्यस्थितीत कवी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून विदीर्ण कोरड्या पडलेल्या नदीपात्रात मानवतेचा ओलावा,मोठेपण शोधण्याचा प्रयत्न करत आहे हे विशेष आहे.आत्मभान देणाऱ्या, स्व:चा आणि अंतरात्म्याशी सुसंवाद साधणार्‍या भाषेचा सार्थ अभिमान बाळगत कवी युद्धाचे नव्हे तर बुद्धाचे समर्थन करताना दिसतो.
   ‘माय मराठी बोलता
   भरे काळजाचा घडा
   महाराष्ट्राच्या अंगणी
   पडे वैखरीचा सडा’.................( माय मराठी बोलता)
              भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा यांच्या समता, मानवतावादी मूल्यविचारांचा वारसा या बहुजन ग्रामीण समाजाला जीवघेण्या परिस्थितीतून बाहेर पडून सभोवतालचे उद्ध्वस्त वर्तमान वाचविण्यासाठी उपयोगात येईल, असे कवीला प्रांजळपणे वाटते. त्यामुळे या विचारांचे स्मरण देण्यास कवी विसरत नाही.
       ‘तू पेरले आमच्यासाठी
       रान अवघे स्वातंत्र्याचे
       धमन्या धमन्यामधून उमले
        गीत नवे हे बंधुत्वाचे’..................( महामानव)
               पुढे तिसऱ्या विभागात कवीला दिसा-मासाने जाणवणाऱ्या गट-तटाच्या, जाती-पातींच्या, धर्मा - अधर्माच्या, पिढ्यां-पिढ्यामधील अंतराच्या संघर्षाचा उद्वेग छळताना दिसतो. हरवत चाललेल्या गावच्या गावपणाचे, शेताच्या हिरवेपणाचे, रानातल्या जिवित्वाचे आणि माणसातल्या माणूसपणाचे पुनर्संघटन करण्याची तळमळ कवितेच्या शब्दा- शब्दांमधून व्यक्त होते.  हरवलेल्या गावपणाचं हे दुखणं कवीला वारंवार टोचताना, अस्वस्थ करतांना दिसते.
       ‘तू सागरापरी आईची माया
       तू नभापरी बापाची छाया
       तू उडणाऱ्या पंखातलं बळ
       तू विषमतेविरुद्धची उत्कट कळ’
               तरीही अशा या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कवीचा सर्वात मोठा विश्वास आहे, तो मातीत राबणाऱ्या पोशिंद्यावर नि त्याच्या नवनिर्मानावर. खरतर या शेतकऱ्याने लोकांच्या केवळ आशीर्वादावर अवलंबून न राहता, मातीसाठी ‘कष्ट हेच भांडवल’ हा ध्यास मनात ठेवून कर्माला प्राधान्य दिले आहे, या एकाच तत्वावर तो संपूर्ण जगाला या भयावह संकटातून बाहेर काढण्यास समर्थ ठरेल, अशी  दूरदृष्टी कवी कवितेतून व्यक्त करतो.
        यातील अनेक कवितांमध्ये आलेल्या दृष्टांत,अलंकार, प्रतिमा आणि प्रतीके ही गावातल्या विझत,धुमसत चाललेल्या चुलीच्या आतून, व्याकूळ मनाच्या अंतरातून, मातीच्या प्राक्तनातून, शोषितांच्या अंतर्मनातून आणि उध्वस्त होत चाललेल्या शेतकऱ्याच्या वेदनेच्या गर्भातून प्रसवतात. त्या वाचकाच्या काळजाला हात घालतात, म्हणूनच ही 'आगंतुकाची स्वगते' ही संवेदनशील वाचकाला अस्वस्थ करून सोडतात, जणू दर्जेदार कलाकृतीचा हाच निकष आहे’, या अर्थाने कवीची ही स्वगते अत्यंत प्रभावीपणे अभिव्यक्त होण्यात निश्चितच यशस्वी ठरली आहेत.
         कवितासंग्रहातील ही चिंतनीय स्वगते अनुभवताना त्यांचे स्वरूप जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या  'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग |अंतर्बाह्य जग आणि मन ॥' अभंगवाणीतून विशद करता येईल. माय मराठीची महती सांगणाऱ्या देश, धर्मासाठी प्राणपणाला लावणाऱ्या ध्येयवेड्या कवी डॉ.कैलास दौंड यांच्या कविता आहेत. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

•पुस्तकाचे नाव :  आगंतुकाची स्वगते (कवितासंग्रह )
•कवी   :  डॉ. कैलास दौंड मु. सोनोशी पो.कोरडगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर                        
         •मुखपृष्ठ   :   प्रमोदकुमार अणेराव
•पाठराखण : डॉ.नागनाथ कोत्तापल्ले
•प्रकाशक   :  चपराक प्रकाशन, पुणे 
•पृष्ठे : ९६ किंमत : ११० /-
  पुस्तक परिचय : डॉ. दीपक सूर्यवंशी,सहयोगी प्राध्यापक, संशोधक मार्गदर्शक
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब   भ्रमणध्वनी-: ९४२० ९५८६९९

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर