जगण्यामध्ये आणूया. (बालकविता)



जगण्यामध्ये आणूया. 

शाळेमध्ये शिकतो जे ते
जगण्यामध्ये आणूया
ज्ञानाचा वापर करुनी
जीवन सुंदर बनवूया. 


शाळेमध्ये शिकतो भाषा, 
भाषेमधले व्याकरण
सुयोग्य तिचा वापर करता
वादाला मग कसले कारण? 

वर्गामध्ये गणित शिकतो
आकडेमोडही करीतो फार 
जीवनामध्ये वापर करता
शिल्लक राहतील पैसे चार! 

बाहू स्फुरुनी इतिहास घोकतो
युद्ध, लढाया तोंडपाठ
गतकाळातील चुका टाळुनी
मान ठेऊया सदैव ताठ. 

नकाशातुन भूगोल शिकतो
सागर, डोंगर, जंगल, घाट
भान तयाचे राखुन चालुया
जीवनाची या पाऊलवाट. 

निष्कर्ष काढतो प्रयोग करूनी
विज्ञानाचा घेतो धडा
जगण्याला अति सोपे करण्या
ज्ञानाचा तू ओत घडा. 

शाळेमध्ये शिकतो आपण
कला, खेळ नि कार्यानुभव
वापर त्याचा सदैव करता
जगणे होते रम्य अनुभव. 

विविधतेने नटला आहे
सभोवताली समाज सारा
त्या बागेचे फूल होऊनी
सुंदर सजवू भारत प्यारा

~~~~

डॉ. कैलास दौंड

(टीप : चित्रे प्रतिकात्मक आहेत. त्यावर आमचा हक्क नाही) 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर