मातीच्या नात्याची कविता : पाय मातीला बांधले डॉ. कैलास दौंड.
• मातीच्या नात्याची कविता : पाय मातीला बांधले
डॉ. कैलास दौंड.
' पाय मातीला बांधले' हा कवी जीवन आनंदगांवकर यांचा नवा कवितासंग्रह २६ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. हा त्यांचा प्रकाशित होणारा तेवीसावा कवितासंग्रह आहे. विपुल कवितालेखन करणाऱ्या या कवीच्या या संग्रहातील कविता देखील अत्यंत उत्कट आहेत.
जीवन आनंदगांवकर यांचे आजवर प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह : एका कवीच्या बरगड्यावर , गाभेमर आणि इतर कविता , कविता विनाशाच्या हंगामात ,परतीचा गाव , आत्मभान ,ऋतु आंधळे ,ओंजळभर पाण्यासाठी ,आरंभ हाच अंत आहे , मातीच्या गंधातलं गाणं ,निर्मितीपूर्वीची उत्कट शांतता ,निरभ्र आकाशाची ओढ ,मनाचा मरणाविरुद्धचा एल्गार ,सर्वव्यापी मौनाच्या प्रतिक्षेत , मनाच्या अभयारण्यात ,कोर्टाच्या कविता ,तुझ्या जाण्यामुळे , बखाडीची अनिवार झडप ,पानगळीच्या दुःखाचे ओझे ,अदालत: एक अहसास (हिंदी), २१व्या शतकाची अभंगवाणी ,ज्ञात अज्ञाताच्या शोधात , ढगांचे संचित . कवी जीवन आनंदगावकर यांची कविता त्यांच्या जगण्याला बिलगून आलेली कविता आहे. तरीही गावखेड्याचे आणि मातीचे तिला नैसर्गिक आकर्षण आहे. याचे कारण त्यांच्या पूर्वायुष्यात झालेल्या शेतीमातीच्या संस्कारात आहे.
कवीने 'पाय मातीला बांधले ' या कवितासंग्रहातील कवितेला निसर्गपर कवितांचा संग्रह म्हटले आहे. अर्थात त्यात माणूस अंतर्भूत आहेच. या संग्रहाच्या सुरूवातीलाच 'मी आणि माझी कविता ' नावाचे तेवीस पृष्ठाचे टीपण कवीने जोडलेले आहे. ते वाचनीय तर आहेच, त्याचबरोबर कवीचा जीवनप्रवास आणि कवितेची वाटचाल उलगडणारेही आहे. यात कवी लिहीतो की, ' आता आयुष्याच्या या टप्प्यावर मी पुन्हा एकदा माझ्या मूलाधाराकडे - निसर्गाकडे वळलो आहे. ते नाळेचे नाते तुटणे अगदीच अशक्य आहे.(पृ. २७) ' तसेही कवितेचे नाते निसर्गाशी अधिक जवळचे असतेच. फक्त कवी त्याच्या वैयक्तिक भावभावनांशी आणि भोवतालाशी प्रामाणिक राहून तिची निर्मिती करत असतो किंवा फार तर निर्मितीला सहाय्यभूत ठरत असतो. त्यामुळे त्याला कवितेच्या निसर्गनात्याचे वेगळेपण जाणवत नसते. त्याला जाणवत असते ते स्वतः च्या जीवनाला लगडून असलेले कवितेचे अनुबंध! मात्र आनंदगांवकर यांना त्यासह निसर्गनाते कवितेतून प्रत्ययास येते आहे हे विशेष.
' पाय मातीला बांधले' या कवितासंग्रहात एकुण एकशे सात कविता समाविष्ट आहेत. मानवी भावनांना लाभलेले निसर्ग सानिध्य प्रतिमांच्या रूपात या कविता मधुन अवरते. इथे प्राबल्य आहे ते आत्मसंवादाचे, भावकल्लोळाचे. इथे ऋतूंचे विभ्रम येतात ते भावार्ततेला बिलगूनच. कवीला निसर्ग हा जवळचा वाटतो. त्याच्याशी त्याचे बालपणापासून नाते आहे आणि म्हणूनच त्याला-
' पाने खुणावती
फुले खुणावती
पेशींतूनी साऱ्या
हाक देते माती (६७)'
बाकीच्या लौकिक गोष्टींपासून कवी अलिप्त होऊ पाहतो. त्याला लौकिकाची आस नाही की सोस ही नाही, तो लिहीतो -
'श्रेय घेण्यासारखे आता
राहिले काहीच नाही
संपलेल्या दिशांनाही
क्षितिजाची आस नाही! (१)
यामागे परीपूर्णतेची भावना आहे की अपूर्णतेची किंवा उदासीची? असा विचार करता ही अलिप्ततेची भावना अपूर्णतेतून, उदासीतून अवतरलेली जाणवते. त्याचा प्रत्यय अनेक कवितांमधून येतो. उदा:
पसरून येते जुनी उदासी
हिरव्या रानावर
लिंबोळ्यांचा सडा पडतो
जुनाट बांधावर (४)
ही उदासी जुनीच आहे पण ती हिरव्या, समृद्ध रानावर पसरत जाणारी आहे. लिंबोळ्याचे पिवळे पक्व होऊन बांधावर पडणे हे देखील कवीला उदासीत भर घालणारे वाटते कारण मनात ज्या भावनांचे प्राबल्य असते त्या भावनांनीच माणूस भोवतालाकडे पाहत असतो. अशाही स्थितीत काही आठवणी स्वप्नवत येतात आणि मनाला वेगळ्याच भावगर्तेत घेऊन जातात. तो क्षण कवीने टीपलाय-
ते तिचे जांभुळ डोळे
काल रात्री भेटले
पापण्यांच्या आड कोठे
रान सारे पेटले! (६)
कवी लिहीतो की, काळाला आरंभ नि अंत नसतो, मी ही काळासोबत चालणारा प्रवासी आहे, कुणी संत नाही. मलाही कुणाच्यातरी स्पर्शाची गरज असते.
राहू दे आता
हातामध्ये हात
स्पर्शाने विश्वास
दुणावतो (१२)
हा विश्वासाचा स्पर्श वाऱ्या पावसात, दुखण्या खुपण्यात खस्ता काढणाऱ्या मायमाऊलीचा असतो पण बघता बघता तिच्या मायेच्या छत्राची सावली विरुन जाते. अशा विश्वासाचा स्पर्श देणाऱ्यांना आपण काय देतो? तर -
काय दिले, मी तुला?
नाठवे आता मला,
साथ मौनाचीच होती
शेवटी सोबतीला (२६)
हे मौन अस्वस्थ करणारे आणि छळणारेही असते. साऱ्या भावभावना अशावेळी पणाला लागतात.
जे आहे आपल्यासोबत
ते सुद्धा आपले नाही,
मग देतो आपण कशाला
इतरांची उगाच ग्वाही? (५८)
अशा व्यामिश्र भावभावनांचा प्रत्यय देणारी जीवन आनंदगावकर यांची ही कविता प्रस्तुत संग्रहात भेटते. त्याखेरीज तरल, अल्लड, उत्साही प्रसन्नतेचा अनुभव देणाऱ्या-
कुमारी नदीचा
साजण दूर
नदीकाठच्या मुली
लाजून चूर! (४३)
किंवा
गंध बावरे फुलांत
स्पर्श होय सावळा,
झाडांवर पसरतो
ऊनरंग कोवळा! (७८)
अशा काव्यपंक्ती देखील येतात. अशा जागा मोजक्याच तरीही लक्षात राहणाऱ्या आहेत. अनेक लोभस ऋतूचित्रे या कवितांमधून समोर येतात उदा:
पिवळीधम्म फुले
तुरीला झोंबली,
मनाला भावली
स्पर्शमाया! (३०)
कवी आनंदगावकर यांच्या 'पाय मातीला बांधले ' मधील कवितांमधून अनेक उत्कट प्रतिमा आणि प्रतिकांची पखरण अनुभवायला मिळते. थंडीचा तडाखा, ज्वारीवर उमलून आलेले दव, सवसांजेला पसरणारी घनकाळोखी छायाछाया, नभाहून उत्कट असणारे झाडांचे झुरणे, सायंकाळी उदास होणारा झांजरलेला गाव या प्रतिमांनी दृश्यमानता वाढून कवितेतील वातावरण मनपटावर साक्षात होते. कवीचे हे कसब कमालीचे आहे.
त्याच प्रमाणे कृतक प्रेम, कोरड्या रानात भुंकणारे कुत्रे, निर्जीव नाती, स्वप्नांची दहशत, अपेक्षांची राख, सांत्वनांची तळघरे, फुत्कारणारी माणसे, मनावर पसरणारी विषण्णतेची धूळ, भर दुपारी बिथरलेले उन, पाण्याला सलणारी तहान. नांदत्या मुलीच्या दुःखासारखी नदीची सळसळ, भर उन्हातील नागांचा प्रणय, पावसाने सुखावलेली मातीची काया, जवसजांभळे रान अशा प्रतिकांनी ही कविता अंतरंगात उतरत जाते. अनुभवा़ची पुनरूक्ती क्वचित अपूर्णता देखील प्रत्ययास येत असली तरीही चांगल्या भावोत्कट कविता वाचनाचा आनंद मिळतो. यासाठी या कविता अवश्य वाचाव्यात अशाच आहेत.
• पाय मातीला बांधले (कवितासंग्रह)
•कवी : जीवन आनंदगावकर
•प्रथमावृत्ती : २६/१/२०२२
•प्रकाशक : गोयल प्रकाशन, अप्पा बळवंत चौक, पुणे ०२
•मूल्य :१२० पृष्ठे : ३३+१०८
~~~~~~
डॉ. कैलास रायभान दौंड
kailasdaund@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा