जाणिवांची फुले
• मुलांच्या जाणिवा विकसित करणारी- 'जाणिवांची फुले'
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात आजोबा आजी, काका- काकी शिवाय एखादी आत्या अशी जाणती मंडळी असायची. ती अनुभवसमृद्ध मंडळी रोज संध्याकाळी दिवेलागणीला परवचे म्हणायची. म्हणवून घ्यायची. त्यावेळी गोष्टीही सांगायची ही मंडळी. कधी कधी झोपताना लहाग्यांना रोज गोष्टी ऐकायला आवडत. गोष्टी ऐकतच ती झोपी जात. परंतु एकविसावे शतक उजाडले तेच मुळे एकत्र कुटुंबाचे विभाजन करीतच. अर्थात विसाव्यात नव्वदीच्या दशकातच त्याची सुरुवात झाली होती. हे सर्व पुराण सांगण्याचे कारण म्हणजे ती उणीव कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले' या पुस्तकाने बऱ्याच अंशी दूर केली आहे. या पुस्तकात सोळा संस्कारक्षम गोष्टी आहेत.
या गोष्टींतून संस्कार, विज्ञान, वाचनसंस्कृती, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तसेच मुलांच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न लेखकाने हसत खेळत केला आहे.
पहिलीच गोष्ट ‘पशुपक्ष्यांची पाणपोई’ आहे. पशुपक्ष्यांनी अन्न आणि पाणी लागते त्यांना कोण पाणी देणार? अशी शंका मुलांच्या मनात निर्माण करते. या सर्व गोष्टी ग्रामीण परिसरातील मुलांच्या मनातील शंका दूर करतात. शेती, जंगल, नदी, विहीर आणि फळांची मोठी झाडे त्याचप्रमाणे त्या झाडावरील कोकिळ, पोपट, चिमणी अशा पक्ष्यांची भेट या गोष्टीतून होते. लहानग्या गणेशला तहान लागल्यावर त्याचे काका त्याला एका रांजणातील थंड पाणी देतात. या रांजणांना काय म्हणतात? , त्यात पाणी कोण व कशासाठी भरतं? या बालसुलभ शंका त्याच्या मनात येतात. उन्हाळ्यात पाखरे येईनाशी झाल्यावर रानातील पाखरांसाठी, हरणांसाठी पाणपोई बांधण्याची कल्पना त्यांच्या मनात येते. तो रानातल्या हौदात पाणपोई तयार करतो. पशुपक्ष्यांच्याही जीवनाचा विचार केला पाहिजे, हा बोध ही गोष्ट देते.
‘घाटेवाडीची शूर सोनाली’ ही एका धाडसी मुलीची गोष्ट. मुले धाडसी असतात. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेल्या घाटेवाडीच्या सोनालीच्या धाडसाची ही गोष्ट. गावातील नदीवर तिची आजी नेहमी पाणी भरण्यास जात असे. सोनालीला पोहायला आवडे. ती कला तिच्या अंगी होती. एके दिवशी तिची आजी पाण्याला गेली असता पाय घसरून पाण्यात पडून गटांगळ्या खाऊ लागते. मैत्रिणीसह तेथे आलेली सोनाली हे पाहून पाण्यात उडी घेऊन आजीला पाण्यातून बाहेर काढते व तिचे प्राण वाचवते. स्वतःचे प्राण धोक्यात घालून तिने आजीचे प्राण वाचवल्याबद्दल तिला जिल्हास्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील शौर्य पुरस्कार मिळतो. या गोष्टीतून मुलांनी आपल्याला झेपेल असे धाडस करायला हवे, हा संदेश मिळतो.
‘फुटकी पाटी’ या गोष्टीतून खेड्यातील गरीब मुलाच्या मनाची स्थिती पाहायला मिळते. वडील नसलेल्या मोहन या मुलाची ही गोष्ट. शाळेतील मुलांचे टारगटपण, गुरुजींची शिस्त आदी गोष्टी आपल्या परिचयाच्या आहेतच. पाटी न आणल्याने गुरुजी बाकावर उभे राहण्याची शिक्षा देतात. इतर मुले त्याला हसतात. त्याची आई आठवडी बाजारातून पाटी आणते. परंतु शाळा सुटल्यावर मुलांनी धक्काबुक्की केल्याने पाटी फुटते. त्यावेळी मुले हसतात. त्याला चिडवतात. मग आई त्याची समजूत काढते. मुलांच्या भावनांचे व आईच्या प्रेमाची ही गोष्ट रंजक आणि बोधक आहे.
‘दोन भुंगे आणि सूर्योदय’ ही गोष्ट तशी सर्वांना माहीत असलेली आहे तरी, दोन भुंगे कमळावर उडत राहतात आणि सूर्यास्त झाल्यावर कमळात अडकतात. एक भुंगा सूर्योदयानंतर कमळ उमलेल व आपण बाहेर निघू या आशेवर झोपून राहतो. तिथे एक मदांध हत्ती येतो व कमळाचे फूल सोंडेने तोडून दूर भिरकावतो. ते फूल खडकावर आपटल्याने तो भुंगा मरण पावतो. दुसरा भुंगा विचारी होता. कमळाच्या पाकळ्या वरील बाजूने तो पोखरत राहतो. थकला तरी त्याने प्रयत्न सोडला नाही अखेर त्याची सुटका होते. अशी ही गोष्ट. प्रयत्न करीत राहण्याचा संदेश देणारी.
वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारी ‘आंब्याचा वाढदिवस’ ही कथा वाढदिवसाला मुलांना परतभेट देताना फुलांची किंवा फळांची झाडेच द्यावीत, त्याद्वारे पर्यावरणाचे रक्षण करावे, असे सहजच सांगून जाते.
‘गाढवाचे शहाणपण’ ही कथा कोणालाही नावे ठेवू नये व कुणाच्याही व्यंगावर हसू नये नाहीतर गाढवे देखील लाथांचा प्रसाद देऊन आपल्याला शहाणपण शिकवतील, असा बोध देते. ‘नदीतलं निळं पेन,’ ‘अभ्यासाची पद्धत,’ काठी जिवंत झाली, ‘सात रंगांचं गुपित’ या कथा रंजनाबरोबरच शिकवणही देतात. ‘महाराष्ट्राची वाघीण’ ही एका मुलीच्या धाडसाची कथा आहे. या कथांतून बोध घेऊन मुले शूर होतील, दुसऱ्यांना मदत करतील, असा आशावाद लेखक व्यक्त करतो.
‘ एक्सपॉंडेबल मेमरी ' ही विज्ञानरंजन कथा मुलांना आवडेल अशीच आहे. मुलांना आपली स्मरणशक्ती वाढवावी असे वाटत असते परंतु ती प्रयत्नाने सिद्ध होते. कुठलीही चिप घालून ती वाढत नसते. हे मुलांनी लक्षात घ्यायला हवे. या कथेतील कल्पना मात्र भन्नाटच आहे.
किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी ब्लर्ब लिहिला आहे. तो उद्बोधक आहे. भास्कर शिंदे यांनी पुस्तकाच्या आशयाला साजेसे मुखपृष्ठ साकारले आहे. कैलास दौंड हे शिक्षकी पेशात असल्याने मुलांच्या मानसिकतेची त्यांना जाण आहे. शहरातील मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुले अधिक भावनाशील असतात. ते गुरुजनांचे ऐकतात. त्यांच्या शिकवणीचे पालन करतात. हे कैलास दोंड यांना चांगलेच अवगत आहे. एकंदरीत हा कथासंग्रह मुलांनी वाचून त्यातील कथांचा बोध घेऊन आपले जीवन संस्कारक्षम करावे, असाच आहे. बालकुमार साहित्याच्या क्षेत्रात ' जाणिवांची फुले' चे खूप स्वागत होईल.
•जाणिवांची फुले (बालकुमार कथासंग्रह)
• कथालेखक : डॉ. कैलास दौंड(9850608611)
• प्रकाशक – इसाप प्रकाशन, नांदेड.
• प्रथमावृत्ती :१४ नोव्हेंबर २०२१
•पृष्ठे ८०, • मूल्य १०० रुपये
~~~
परीक्षण :प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (गोवा)
(९०११०८२२९९)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा