परीक्षण
तरल सामाजिक भावनांचा कवितासंग्रह :' बंदिस्त रूढीच्या विळख्यातून'
डॉ. कैलास दौंड.
'बंदिस्त रूढीच्या विळख्यातून' हा ॲड विशाखा समाधान बोरकर साठहुन अधिक कविता समाविष्ट असलेला कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह असल्याने त्यात विविध भावनांचे लक्षवेधी रूपे अनुभवावयास मिळतात. तसेच जीवनप्रवासाची सजग उमज देखील अनुभवता येते.
'हा प्रवास प्रवास क्षणाक्षणांची ही आसर
चालता चालता कसा संपतो हा श्वास.'
अशा ओळी जीवनाची असोशी आणि काललय दाखवतात. त्या सहजच आवडून जातात. घर माणसाचे असो की त्यांना वात्सल्याची छाया आवश्यक असते. त्यातुन एक आपुलकीचा गंध दरवळत असतो तो सर्वांच्या हृदयाला स्पर्शून जात असतो. अशा वेळी पुढील ओळी सहजच समोर येतात.
'तो गंध रानमाळाचा
हृदयी कोरला जाई
वात्सल्याची छाया देते
पाखरास वनराई.'
अशाच मायाळू सावलीचा प्रत्यय 'आई तुझ्याच मुळे दिसले', 'माझी प्रेमळ आई ' , 'हे सागरा तुझ्यातही सामावणार नाही 'व 'न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या', ' आठवण', 'माझ्या हसण्याने तुम्ही हसायचे बाबा ' या कवितेतूनही येतो. कृतज्ञतेची भावना या सर्व ठिकाणी दिसते. 'हरवल्या दाही दिशा' या कवितेत अशी व्यामिश्र भावना अत्यंत उत्कटतेने व्यक्त झालेली आहे ती अशी-
'स्मित हरवले मी
त्या काळाच्या वादळात
पोरके आज मी बाबा
नयनी आसवाच्या धारा.'
अशी व्याकूळ भावना कवयत्री व्यक्त करते. या व्याकूळतेला पचवत ही कविता स्वप्नांना उभारी देऊ पाहते. त्यासाठी शेतकऱ्यांच्या कामात जीवन प्रेरणा शोधणे ओळखीचे वाटते कारण शेती आजही एकुणच भारतीय जीवनाला शेती व्यापून राहीलेली आहे. तिचे वर्तमान फारसे सुखावह नसले तरी नवनिर्माणाची आदीम सृष्टीप्रतिती फक्त तिथेच दिसते. संवेदनशील मनाला ही प्रतिती भुरळ घालत असते.
'रानीवनी बळीराजा
शेतशिवाराला पाही
त्या उगवलेल्या बियांसवे
त्याच्या सपनाला अंकुर येई.'
किंवा
'रान शिवार ते मोठं
वाहे झुळझुळ करून
रान पाखरे घरट्यात
बसती आनंदानं'
अर्थात या कवितेत वरवर शेती आणि शेतकरी यांच्या संबंधातील चित्रण दिसत असले तरी हे स्वप्न म्हणा किंवा आठवण म्हणा भरल्या घराची आहे हे जाणवत राहते. स्रीयांच्या घुसमटीला अभिव्यक्त करणाऱ्या 'घेतली तिने झेप आकाशी', 'येथे रोज घडते हाथरस' , 'पुन्हा मेणबत्या जाळल्या जातील', ' त्या बंदिस्त रूढीच्या विळख्यातून', मुक्या वेदना ' या कवितेतून शोषणा विरूद्धच्या आणि आत्मभान देणाऱ्या, सामाजिक न्यायाच्या, मानवतेच्या भावना प्रभावी रितीने कवयत्री विशाखा समाधान बोरकर यांनी प्रकट केलेल्या आहेत.
' ती घरभर फिरते भिंगरीसम
स्वत:ला जाळून पणती होते
अंधार असला तरी ती
तुटक्या घराला हळूच सावरते.'
हे वास्तव ती कमालीच्या ताकदीने शब्दबद्ध करते.
या कवयत्रीच्या भावजाणिवा, सामाजिक जाणिवा आणि काव्यात्म जाणिवा प्रगल्भ आहेत. त्यामुळेच त्यांनी कुठलीही पोज न घेता आणि विनाकारण कृतक साफसफाई न करता स्वाभाविक तेने अवतरलेल्या कविता या कवितासंग्रहातून रसिक वाचकांसमोर ठेवलेल्या आहेत.
महासत्ता नावाच्या कवितेत विशाखा समाधान बोरकर लिहीतात -
'मी शोधत असलेला भारत
मला भुकेलेलाच दिसत आहे
ते भुकेने निजलेलं लेकरू पाहून
मन खिन्न झाले आहे
ती न संपणारी भुकेची व्याकुळता
त्या भाकरीच्या तुकड्यात
मला देश दिसतो आहे .
भावव्याकुळतेला भिडणारी, अन्यायासाठी शब्द देणारी, वर्तमान वास्तवाची मांडणी करणारी आणि चांगल्याचा ध्यास धरणारी ही कविता वाचकांना नक्कीच भावेल अशीच आहे. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ नाशिक येथील कवी आणि चित्रकार बुद्धभुषण साळवे यांनी फार सुचक केले आहे. कवयत्रीचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
•बंदिस्त रूढीच्या विळख्यातून : कवितासंग्रह
•कवयत्री : ॲड. विशाखा समाधान बोरकर
•प्रकाशक : मिरा प्रकाशन, शिरूर जि. पुणे.
•प्रथमावृत्ती :३ ऑक्टोबर २०२१
•पृष्ठे :८२ मूल्य:१५०
~~~~~~~
डॉ. कैलास रायभान दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव
ता. पाथर्डी जि. अहमदनगर
पिन 414102
( 📱 9850608611)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा