रे आभाळा... :वेदनेची आर्त ललकारी.

परीक्षण :     'रे आभाळा… ' : वेदनेची आर्त ललकारी. 

• 'रे आभाळा... ': वेदनेची आर्त ललकारी.

                                                                                     डॉ. कैलास दौंड


              रामकली पावसकर या मराठीतील महत्त्वाच्या कवयत्री आहेत. त्यांचे हंबर(१९८५),  ओले अथांग श्वास(२००८), सांजसावल्या (२०१५) , पावळण (२०१९) हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. आता त्यांचा 'रे आभाळा... ' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. 'आभाळ' या घटकाशी संवाद साधणारी कविता या कवितासंग्रहात आहे. तरीही हा संवाद एकतर्फी नाही; तर आभाळ जरी बोलत नसले तरी कवयत्री त्याला पूर्णपणे समजून घेते. इथे आभाळ हे एक व्यक्तीरेखा बनुन साकार होते. आभाळ ही प्रतिमा समर्थपणे प्रतिकाचे रूप घेत असल्याचे येथे दिसते. कवितेतील आभाळ सहचर बनते. तरी हे सहचर्य स्मरणातील असते.त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष संवादात सहभाग नसतो. विरहार्ततेची  वेदनवेल वाचकांच्या मनःपटलावर कवितेच्या शब्दाशब्दातुन चढत जाते. 

 रे आभाळा...मधील कविता दोन भागात विभागलेली तरी एकाच अंतस्थ लयीची आहे. पहिल्या भागातील कविता तुलनेने  किंचितशी अधिक शब्दांची असुन भावविभोर आहे. इथे कवयत्री तिच्या आभाळाशी मनोमन संवाद साधते. हे आभाळ दूर गेलेले आहे. अगदी दिशाहीन होऊन गाभूळ जीव झाडावरती टांगणीला लागून रहावा , भवती सारा काळोखच व्यापून असावा अशावेळी डोळे ओलावले, पापण्या भिजल्या आणि हृदयीच्या निथळल्या कहाण्या कुणाला सांगाव्या? असा विषण्ण आणि विरही भावनेचा हळवा तरीही पारखा झालेल्या आभाळारूपाला प्रश्न विचारणारी, त्याच्याशी संवाद साधणारी, अंतरीची सल त्याच्या स्मरणाजवळ व्यक्त करणारी ही कविता आहे. 

' पदरांत माझ्या

नाहीच काही आज... 

तरी देऊ का काही... 

विचारते मला

रोज ढळणारी सांज...! '

पदरात तर काहीच शिल्लक नाही आणि सांजही ढळलेली आहे. ती प्रश्नही विचारते आहे. सारा चराचरच प्रश्न विचारतोय, आवाज देतोय पण तो आवाज आश्वासक नाही. 

           'झाडाचं गाणं

           झाडात दाटलं... 

           स्वरांनी त्याच्या

           आभाळ फाटलं... 

           आभाळ फाटलं...!! '

अशावेळी आपल्या गाठीच्या कहाण्या कुणाला सांगाव्या, त्यांची कुठे रुजवण करावी असा अवघड प्रश्न कवयत्रीच्या मनाला जातो. 

           'आता कुठे रूजवू

           नव्या कहाण्या...? '

अशा न संपणाऱ्या  असंख्य प्रश्नांनी छळले तरी बरेच दिवस सरले, पावसाळे गेले तरी जिच्यासाठी आपण चालणे सुरू केले होते ती हिरवळ सापडली का? असा प्रश्न कवयित्री विचारते तेव्हा तो प्रश्न तिच्या एकटीचा थोडाच असतो. माणूस म्हणून आपणा सर्वांना छळणारा तो प्रश्न असतो. या प्रश्नांच्या मुळाशी असणारी एकाकी वेदना अनामिक असते. कवयत्री आभाळाला विचारते:

          'तुला वाटत राहिलं

          वस्त्र किती मुलायम... 

          पण तुला काय माहीत

          तुझ्या उबदारपणासाठी

          मीच किती तरी

          रक्ताळत राहिले

          ठायी ठायी....'

पण आता ती विरह आणि अगतिक आहे. तिला वाटते की ती दिशाहीन आहे. तिला आभाळाचा आधार हवा आहे. 

          'दिशाहीन आता मी

           कुठं मागू आसरा...! '

'माझ्यासाठीच जगलास , माझ्यासाठीच परत ये रे...'  या ओळीतून प्रकट होणारी भावार्तता आणि त्याच जोडीने 'त्याला' समजून घेण्याची उदारता एकाचवेळी प्रकट होते. मनाच्या अनाम दिशाहिनतेची अवस्था काही कवितेतून प्रत्ययास येते. तर कधी सहजीवनाच्या यथार्थतेची परिसीमा अनुभवावयास येते.

 उदा:

' फुलं म्हणाली उमलू कां..? 

मी म्हणाले... 

नको रे... 

तो नाही... 

खुप दूर गेलाय

तुमच्या सुगंधाचं

मी काय करूं एकटी...? 

त्यापेक्षा मौनातच रहा... 

मौनातच रहा... 

माझ्यासारखं... 

माझ्यासाठी... !! '

अशी मनोज्ञ कविता पहिल्या भागात वाचायला मिळते. 

       दुसऱ्या भागातील कविता वाचतांना तिचे अल्पाक्षरत्व नजरेत भरते. या भागातील कवितेमधील आभाळ काही सांगितले तर गदगदून येऊ शकेल असे, व्याकूळ मनाचे हाकारे ऐकणारे आहे, कधी ते पापण्यातून झरणारे नि कधी साशंक होणारेही आहे. सहाजिकच भरून आलेले ढग बरसलेच नाहीत तरीही त्याच्या सच्चेपणावर कवयत्रीचा भरवसा आहे. 

          'ना घरटं ना कोटं

          समोर नुस्तं नुस्तं

          उद्ध्वस्त वाटायचं

          जंगल मोठ्ठं

          रे, आभाळा

          उद्ध्वस्त वाटायचं

          जंगल मोठ्ठं...'

आभाळाला वगळून जीवन केवळ अशक्य! श्वासांची घुसमट होते, ती लपवताही येणे अशक्य आहे. 

            'गेले सारे श्रावण

            नाही भिजू झालं मन

            किती ओंजळीत लपवू

            श्वासातील घुसळण

            रे, आभाळा...! '


 एकुणच 'रे आभाळा...' या संग्रहातील कवितेत वेदनेने  आतड्याला पीळ पाडणारी नि व्याकुळता वाढवणारी आर्त  पुनरुक्ती  अनुभवास येते. अशावेळी ही कविता केवळ कवयत्री पुरती मर्यादित उरत नाही तर वाचकाचीही होत जाते. ही आत्मपर अनुभूतीची असली तरीही वाचकांना आपली वाटणारी आहे. अल्पाक्षरी, संवादी, साध्या शब्दांची, भावनेला हात घालणारी, एक अगतिकता, व्याकूळ तगमग व्यक्त करणारी, विरहाचा दाह पेरणारी, हृदयाच्या वीणेला दुःखाचा झणत्कार देणारी ही कविता आजच्या जागतिकीकरणोत्तर काळातील स्रीयांच्या शब्दबंबाळ नि गद्यप्राय, परानुभवावर बेतलेल्या कवितेहून वेगळी नि सच्च्या अनुभूतिची भिडणारी कविता आहे. रामकली पावसकर यांची या संग्रहातील कविता शब्दाळलेली किंवा शब्दबंबाळ तर नाहीच, ती प्रचारकी किंवा नाटकी ही नाही. ती अल्पाक्षरी, भावव्याकूळ करणारी खोल कविता आहे. त्यामुळे आजच्या मराठी कवयत्रींच्या कवितेहून जराशी वेगळी, काळजाला भिडणारी कविता आहे हे आवर्जून नमुद केले पाहीजे. वाचकांच्या मनाला ही कविता स्पर्शून जाईल, हे नक्की! 


• रे आभाळा... : कवितासंग्रह

• कवयत्री : रामकली पावसकर

• प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई

• प्रथमावृत्ती : २६ जानेवारी २०२२

• पृष्ठे :८८ • मूल्य : १२०₹

• मुखपृष्ठ : सरदार जाधव. 

~~~~~~~

(लेखक कवी, कादंबरीकार व साहित्य अभ्यासक आहेत. ) 

डॉ. कैलास दौंड

मु. सोनोशी  पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर. 

Email id : kailasdaund@gmail.com

भ्रमणध्वनी : ९८५०६०८६११



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर