भूमी आणि भूमिकानिष्ठ लेखकांचे आधारस्तंभ : डॉ नागनाथ कोत्तापल्ले.
• भूमिका निष्ठ लेखकांचे आधारस्तंभ डाॅ .नागनाथ कोत्तापल्ले.
डॉ. कैलास दौंड.
मराठी ग्रामीण साहित्य चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिलेदार म्हणून आदरणीय डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले सरांना महाराष्ट्र ओळखतो. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख, विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद चे कुलगुरू ही जशी सरांची ओळख आहे तशीच कवी, कादंबरीकार, लेखक आणि समीक्षक व भाष्यकार ही देखील सरांची ओळख आहे. या सर्वांसोबत असते ते सरांचे कमालीचे माणूसपण ! इथली भूमी आणि भूमिपुत्र माणसे हा सरांच्या जिव्हाळ्याचा आणि आस्थेचा विषय. सन. १९८९-९१ या दोन शैक्षणिक वर्षात डि. एड. साठी मी मुखेड येथे होतो. त्यावेळी डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले सर मुखेडचे आहेत असे समजले. त्यावेळी ते पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख होते. दोन वर्षापूर्वी एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला सरांचा मुखेडचे खूप सुंदर चित्रण असलेला लेख वाचला. मुखेड मधील नदी, मंदिरे, उत्सव, लोकजीवन यांच्या माहितीमुळे लेख खूप आवडला. अनेक दिवसापूर्वी पाहिलेले अनुभवलेले ते गाव नजरेसमोर साक्षात झाले. सरांची भेट व्हावी त्यांच्याशी काही बोलता यावे असे अनेकदा मनात येई. एकदा दोनदा फोनवर बोललो देखील. पुढे भेटीचा छान योग आला. सरांना नव्या लेखकांच्या कडून खुप अपेक्षा आणि आशा देखील होत्या. त्यामुळे ते जुन्यांसोबत नव्या लेखकांचे लेखन वाचत असत.
पाथर्डीतील डाॅ. सचिन गांधी यांनी त्याच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले होते. निवडसमितीने माझ्या 'अंधाराचा गाव माझा ' या कवितासंग्रहाची व कवयत्री संजीवनी तडेगावकर यांच्या 'फुटवे' या कवितासंग्रहाची निवड ॲड. रमेशलाल गांधी साहित्य पुरस्कारासाठी केली होती. वितरणासाठी प्राख्यात विचारवंत व साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले सरांच्या हस्ते वितरण होणार होते. संयोजक समितीने व परीक्षण समितीने प्रा. डाॅ. धोंडीराम वाडकर सरांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला होता.
सर योगायोगाने सपत्नीक उपस्थित होते, वाडकर सरही उपस्थित होते. पुरस्कार वितरण झाले. सरांचे भाषणही छान झाले. या कार्यक्रमात का कुणास ठाऊक पण व्यवसायाने डॉक्टर असलेल्या स्थानिक सूत्रसंचालकाने मला मनोगत व्यक्त करायला संधीच दिली नाही. मला व सरांनाही ते खटकले. असो. याच दिवशी चिपळूण येथील साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यांची निवड जाहीर होणार होती. सायंकाळी ती झाली आणि तमाम ग्रामीण साहित्यिकांचे आशास्थान असणारे कोत्तापल्ले सरांची ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
या साहित्य संमेलनात कधी नव्हे ते मलाही कवी म्हणून कविसंमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे सरांचे भाषण प्रत्यक्ष ऐकता आले. संमेलनाध्यक्षाच्या भाषणात नव्या परंतु चांगले लिहीणाऱ्या लेखक, कवींच्या नावाचा उल्लेख करण्याची एक चांगली प्रथा होती. या नावात सरांनी कैलास दौंड हे नाव समाविष्ट केले त्यामुळे लेखनाची जबाबदारी वाढत असल्याची जाणीव मला झाली. दुसऱ्या दिवशीच्या कविसंमेलनात माझ्या कवितेला खूप दाद मिळाली आणि ती कविता LOKMAT IBN ने दुसर्या दिवसभर बातम्यात दाखवली. अशी ही आठवण.
त्यानंतर सरांची भेट नगर व औरंगाबाद येथील कार्यक्रमात झाली. सरांची भेट झाली की कुणीतरी जवळचे आप्त भेटल्याचा आनंद होतो. या जाणीवेतुनच तुडवण कादंबरी मी राजन गवस व नागनाथ कोत्तापल्ले यांना अर्पण केली आहे. त्यांनीही माझ्या या साहित्यकृतीचे यथार्थ कौतुक केले आहे.
ग्रामीण भागातील नव्या लेखकांना उर्जा पुरवणारे आणि त्यातील बलस्थाने अधोरेखित करणारे सरांसारखे व्यक्तीमत्व सर्वांना हवेहवेसे वाटणारे आहे. माझ्या आगामी 'आगंतुकाची स्वगते ' या कवितासंग्रहास सरांनी माझ्या विनंती नुसार पाठराखण दिली आहे.
सरांची साहित्य संपदा अशी :
१]कविता संग्रह:कृष्णमेघ ,मूड्स, दारोबस्त लिंपुन घ्यावा मेंदू .
२]कादंबरी व कथासंग्रह:कर्फ्यू आणि इतर कथा , कवीची गोष्ट , गांधारीचे डोळे , देवाचे डोळे, पराभव ,मध्यरात्र ,रक्त आणि पाऊस ,राजधानी ,संदर्भ, सावित्रीचा निर्णय ,उद्याच्या सुंदर दिवसांसाठी.
३]समीक्षण, वैचारिक:अपार्थिवाचे गाणे,अस्तित्वाची शुभ्र शिडे,आधुनिक मराठी कविता: एक दृष्टिक्षेप, ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध, ज्योतिपर्व,दहा समीक्षक,नवकथाकार शंकर पाटील,निवडक बी. रघुनाथ,पाचोळा,पापुद्रे,साहित्याचा अन्वयार्थ,साहित्याचा अवकाश .स्त्री-पुरुष तुलना(संपा.)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम. ए. अभ्यासक्रमात एका लेखकाचा अभ्यास या विषयांतर्गत सरांच्या साहित्याचा अभ्यास केला जात आहे. आज सरांना भावपूर्ण श्रद्धांजली लिहीतांना हात थरथरत आणि डोळ्यात अश्रू आहेत. नव्या लेखकांचा पाठीराखा गेला.
__________
डॉ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
Mo- 9850608611
मातीतील साहित्याचे पितृछत्र हारवले आहे.🙏😥
उत्तर द्याहटवाखरोखरच.
हटवा