सुंदर, रंजक व उद्बोधक : 'आई मी पुस्तक होईन' बालकवितासंग्रह

सुंदर, रंजक व उद्बोधक : 'आई मी पुस्तक होईन' बालकवितासंग्रह


संपूर्ण महाराष्ट्राला बहुविध लेखन प्रकार हाताळणारे साहित्यिक म्हणून सुपरिचित झालेले नाव म्हणजे डॉ. कैलास दौंड. त्यांचा अलिकडेच प्रकाशित झालेला 'आई मी पुस्तक होईन' हा बालकवितासंग्रह वाचनात आला. या आधी त्यांचे अनेक कवितासंग्रह , कथासंग्रह, कादंबरी, ललित लेखसंग्रह, बालसाहित्यामध्ये सुध्दा बालकाव्यसंग्रह, बालकथासंग्रह असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांची सारी साहित्यसंपदा ही उद्बोधक, उत्तम, वाचनीय अशीच आहे. तसाच' आई,मी पुस्तक होईन 'हाही बालकवितासंग्रह हा मुलामुलींसाठी खरोखर संस्कारक्षम, रंजक व बोधप्रद असाच आहे.

   'आई,मी पुस्तक होईन' या बालकवितासंग्रहातील पहिल्याच 'आहे माझे रान' या  कवितेतील बालक रानात रमता रमता शेतशिवारातील पिके बघून आपले भान हरपतो आणि दुःख विसरतो. ग्रामीण भागातील मुले शेतीशी किती तल्लीन झालेली असतात हे या कवितेतून दिसते. अशाच प्रकारचे बालकाचे समरसतेचे विचार 'जेव्हा' या कवितेतही 

'पाहुनिया सृष्टी नवी, येते अंगी तरतरी ।।'

 असे व्यक्त झाले आहेत. 'आई मी पुस्तक होईन' या शीर्षकीय कवितेतून 

'आई मी पुस्तक होईन। हसत खेळत ज्ञान देईल ।

 धरतील जे मैत्री माझी । जगण्याचे मी भान देईल ।। ' 

असे बालकाचे उच्च विचार प्रगट झालेले आहेत. 'गावकुशी सांजवेळ' या कवितेतील  मुलाने 'पाण्या विना जीवनाला अर्थ तसा काही नाही।।' हे जीवनातील सत्य सांगितले आहे. तर ''खरंच सांगा, सांगा मजला' कवितेत बालमनाला कुतुहलात्मक पडलेले प्रश्न मांडले आहेत.

         वडाच्या झाडाची लाल फळे हा पक्ष्यांचा लॉलीपॉप' असतो ही एक आगळीवेगळी कल्पना कवीने मांडली आहे.. 'पूर' कवितेत पूर आल्यानंतर घाबरलेल्या मुलाच्या भावना रेखाटल्या आहेत. 'चला मुलांनो शाळेला' ही कविता करोनानंतर शिक्षक व मुले ह्या दोघांचीही शाळेविषयीची आतुरता सुरेखतेने प्रगट करते. 'तीर्थरूप ढगास' या पत्ररुपी कवितेतील बालअपेक्षांना शेवटी आधुनिक तंत्रज्ञानाची छान जोड‌ कवीने देतांना  'जगण्यामध्ये आणू या' या कवितेतून 'शाळेमध्ये शिकतो जे ते। जगण्यामध्ये आणू या । 

ज्ञानाचा वापर करुनी। जीवन सुंदर बनवू या ।। ' असा संदेश, खरेतर मूलमंत्र त्यांनी दिला आहे... 'समजा' या कवितेत शाळेतील मुलांचे व झाडांवरील फुलांचे सुरेख साधर्म्य साधले आहे.

       'माझी झेडपीची शाळा' कवितेत शाळेचे वर्णन व थोरवी छानपणे गायली आहे. 'होळी', 'गुढीपाडवा' या कविता मुलांच्या मनावर सणमहात्म्य रुजवणाऱ्या आहेत. तर 'आवडता ऋतू' कवितेद्वारा मुलांना साऱ्या ऋतूंची सहजपणे ओळख होते. 'टरबूज' कवितेत टरबुजाची उपयोगिता कल्पकतेने  सांगतांना उन्हाचे लहान होऊन आई जवळ बसणे आणि टरबूजाचे त्याला पाहून हसणे बालसुलभ वाटते. 'मजूर' कवितेत मजुराची महती सांगितलेली आहे आणि निसर्गाचे संगोपन करण्याचा संदेश 'वृक्षारोपण' कवितेत दिला आहे. 

'नाव' ही एक मजेशीर कविता आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या भावभावना रेखाटणारी 'गावाकडची मुले' ही कविता खूपच सुंदर झाली आहे. ती मुलांना उत्तम धडा देते. 'भारत माझा देश' कविता मुलांच्या मनावर देशभक्ती बिंबवते. 'फटका' ही अतिशय उत्कृष्ट अशी बोधप्रद कविता आहे. 'मुलांनो, पुस्तकाकडे वळा' ही कविता मुलांना अगदी सहजगत्या पुस्तकांचे महात्म्य समजाऊन सांगते.

       'बालदिन', 'बापूजी', 'राजमाता जिजाऊ', 'सुभाष बाबू', 'शिवबा', 'सावित्रीबाई फुले' ह्या थोर महापुरुषांच्या व्यक्तिरेखात्मक बालकविताही छान आहेत. 'पोपट', 'मोर', 'चिमणी' हे मुलांचे आवडते पक्षीही ह्या बालकविसंग्रहात मुलांना छानसे रमवितात. सुंदर निसर्गाचे वर्णनही 'आहे 'माझे रान', 'गावकुशी सांजवेळ', 'तळ्याचं पाणी', 'जंगलातले तळे', 'शांतसे दृश्य', 'पडला पाऊस', 'रम्य संध्याकाळ' अशा निसर्ग कवितांमधून सुंदरतेनेच वर्णिले आहे.

        कवीवर्य डॉ. कैलास दौंड हे एक हाडाचे शिक्षक आहेत. मुलांना शिकवता शिकवता, त्यांच्यासोबत रमता रमता, त्यांच्या बालभावनांशी एकरूप होत त्यांनी ह्या कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे मुलांसोबत मूल होऊनच या सा-या कविता साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारचा गोडवासुध्दा आला आहे. या बालकाव्यसंग्रहाद्वारे त्यांनी मुलामुलींचे भावविश्व अतिशय सुंदरतेने आणि उत्कटतेने रेखाटले आहे..

      हा बालकाव्यसंग्रह म्हणजे विविध रंगांच्या व बहुविध सुवासांच्या ४८ आकर्षक फुलांचा अर्थात बालकवितांचा गुच्छ आहे. या फुलांचे सौंदर्य कसे आहे हे बघण्यासाठी प्रत्येक बालकाने हे पुस्तक वाचावे असेच आहे. साधी, सोपी व सरळ भाषा असल्याने या कविता मुलांना अगदी सहजगत्या समजतील अशाच आहेत. या सर्व कवितांमध्ये एक विशिष्ट प्रकारची लय साधली आहे. त्यामुळे त्या मुलांना गुणगुणायला सोपी जातील अशा गेय आहेत.

       पुस्तकाचे मुखपृष्ठ तर छान आहेच परंतु आतील चित्रेही कवितांनुरुप व सुंदर अशीच आहेत. असा हा बालरंजक, उद्बोधक, संस्कारक्षम व सुंदरसा बालकवितासंग्रह सादर केल्याबद्दल कवींचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून अनेकानेक शुभेच्छा! छानछान चित्रे काढल्याबद्दल चित्रकार व पुस्तक उत्तमरित्या प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक या दोघांचेही अभिनंदन.

~~

•'आई मी पुस्तक होईन' : बालकवितासंग्रह

•कवी : डॉ. कैलास दौंड 

•प्रकाशक:- सौरव प्रकाशन, छ. संभाजीनगर 

•पृष्ठे :- ७२, •किंमत : १२०रु.

~~~~

-प्रा. देवबा शिवाजी पाटील,

गोविंदनगर, (नांदुरा रोड),

खामगाव जि. बुलडाणा. ४४४३०३

मो. ९४२०७९५३०७


1/1

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर