बालपण समुद्ध करणारा कवितासंग्रह - आई मी पुस्तक होईन
बालपण समुद्ध करणारा कवितासंग्रह - आई मी पुस्तक होईन
गुलाब बिसेन, सितेपार - तिरोडा, जि. गोंदिया
बालकविता आणि बालकथांच्या माध्यमातून बालसाहित्यामध्ये आपल्या वेगळी ओळख निर्माण केलेले साहित्यिक डॉ. कैलास दौंड हे मुलांसाठी सतत नाविण्यपूर्ण साहित्य निर्मिती करत आहेत. आतापर्यंत त्यांनी मुलांसाठी 'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले' अशी दोन पुस्तके लिहिलेली आहेत. नुकताच त्यांचा 'आई, मी पुस्तक होईन' हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला आहे. कवी डॉ. कैलास दौंड हे ग्रामीण साहित्यिक असल्यामुळे साहजिकच त्यांच्या बालसाहित्यातही ग्रामिण जीवनाचे, अनुभवांचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. हाच धागा पकडून त्यांनी आपल्या कवितांतून समृद्ध अशा ग्रामीण जीवनाशी बालकुमारांची नाळ जोडण्याचाही प्रयत्न केलेला दिसून येतो.
डॉ. दौड यांच्या या कवितासंग्रहाची सुरुवात 'आहे माझे रान'
कवितेने झालेली आहे.
'डोंगराच्या पुढे
आहे माझे रान
हिरव्या रंगांत
हरपते भान'
या कवितेच्या ओळी वाचकाला निसर्गाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. कवीचे मन गावात रमणारे आहे. गावाकडे निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा एक वेगळा आनंद असतो. तो कवीने आपल्या कवितांतून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच आशयाच्या 'गावकुशी सांजवेळ', 'गावाकडची मुले' इ. कविता या संग्रहात वाचायला मिळतात. बालमनाला सतत नवनवीन जाणून घेण्याची इच्छा असते. हे असेच का? ते तसेच का? असे प्रश्न त्यांच्या मनात सतत निर्माण होत असतात. अशीच 'खरचं सांगा, सांगा मजला' या कवितेत कवीने बालमनातील विविध प्रश्न काव्यस्वरुपात मांडले आहेत. मुलांच्या मनातील प्रश्न मांडताना कवी लिहितात,
'वारा येतो, झोके देतो.
साजरी फांदी लागते झुलू
खरच सांगा, सागा मजला
कसे हो फूल लागते फूलू?'
लहानथोरांना सदैव प्रेरणा देणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या आई राजमाता जिजाऊ, संपूर्ण जगाला सत्याग्रहाचे अस्त्र देऊन शांतीचा संदेश देणारे महात्मा गांधी, मुलांचे लाडके चाचा पंडित जवाहरलाल नेहरू, 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा' अशी घोषणा देत भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, शेण, चिखल, दगड गोटे झेलत स्वतः शिकून मुलींना शिकवणारी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले या थोर महामानवांची ओळख बालकांना कवीने या कविता संग्रहामधील कवितांतून करून दिलेली आहे.
'भारत माझा देश' या कवितेतून पवित्र भारतमातेविषयी मनामनात स्वाभिमान जागवला जातो. तर
निसर्गाच्या सोबतीशिवाय मानवी जीवनाला अर्थ नाही. आपल्या अवतीभवतीचा निसर्ग संवर्धन करण्याचा संस्कार 'वृक्षारोपण' या कवितेतून मिळतो. 'जेव्हा', 'तळ्याचं पाणी', 'तीर्थरूप ढगास', 'समजा', 'पोपट', 'सकाळचे हायकू', 'जंगलातले तळे', 'आवडता ऋतू', 'शांतसे दृश्य', 'रम्य संध्याकाळ' या कविता वाचकाच्या मनात निसर्ग प्रेमाचे अंकुर फुलवतात. या कविता बालमनात निसर्ग प्रेम फुलवून सहजच निसर्गाचा आदर करायला शिकवतात.
'आई, मी पुस्तक होईन' ही कविता संग्रहाची शीर्षक कविता बालमनावर पुस्तकाची उदात्त भावना बिंबवण्याचा प्रयास करते. पुस्तक माणसाला शहाणपण शिकवते. भित्र्याला हिम्मत देते. पुस्तक होऊन निरागसता निर्मळता जगात वाटत जाण्याचा उदात्त विचार मांडताना कवी म्हणतात,
'आई ,मी पुस्तक होईन
लहान मुलांना गाणी देईन
अभ्यास ज्यांना आवडत नाही
त्यांच्यासाठी मी सोपे होईल.'
कवी कैलास दौंड यांचा हा कवितासंग्रह विविधतेने नटलेला कवितासंग्रह आहे. या कवितासंग्रहामध्ये कवीने वाचकाला वैविध्यपूर्ण अनुभव देण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहे. आजचा बालक हा केवळ काऊ-चिऊच्या गाणी गोष्टीपुरता विचार करत नाही, तर तो चौफेर विचार करतो, चौरस अनुभव घेतो आहे. अशा एकविसाव्या शतकातील बालमनाला पोषक असे वाचनामृत देण्यात कवी यशस्वी झाले आहेत.
'जगण्यामध्ये आणूया' या कवितेत कवी म्हणतात,
'वर्गामध्ये गणित शिकतो
आकडेमोडही करतो फार
जीवनामध्ये वापर करता
शिल्लक राहतील पैसे चार !'
भारतीय संविधानाने दिलेला शिक्षणाचा अधिकार सर्वसामा- न्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य गावागावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा करत आहेत. या शाळांतून ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू आहे. या शाळेंविषयी 'माझी झेडपीची शाळा' कवितेत लिहिताना कवी लिहितात,
'विविध त्या स्पर्धा । जयंत्या उत्सव
जीवना देतात । सुंदर विचार ।।
गावातले सर । होतात काळजी
हवे नको तेही। पाहतात गडे ।।'
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आत्मिय नाते या ओळीतून दिसते.
'पक्ष्यांचा लॉलीपॉप' या कवितेत वडाची फळे खायला आलेले पोपट, चिमण्या, कावळे, कोकीळ इ. पक्षी वडाची लालचुटुक पिकलेली फळे खातात. त्याला कवीने लॉलीपॉपची दिलेली उपमा वाचकाला भन्नाट वाटावी अशीच आहे. 'निमंत्रीत कवी' ही कविता बाबुची कवी म्हणून मजेशीर ओळख करून देते तर 'नाव' या कवितेतून कवीने विविध नावांच्या गुणविशेषांची फारच मजेशीर ओळख करून दिली आहे.
'ढगांसारखा गर्जत होता
त्याचे नाव मेघराज
हत्तीसारखा डुलत चाले
नाव त्याचे गजराज'
डॉ. कैलास दौंड यांच्या लेखनीतून सिद्ध झालेला हा कवितासंग्रह कल्पनारम्य जगात गुंतवून न ठेवता वास्तवाचे भान देतो. विविधांगी कवितांतून अनुभवांची समृद्धी देतो. प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी या कवितासंग्रहाची पाठराखण केली आहे. सौरव प्रकाशनने या कवितासंग्रहाची अत्यंत दर्जेदार आणि बालसुलभ निर्मिती केली आहे. या सचित्र काव्य संग्रहाचे आकर्षक मुखपृष्ठ आणि अंतर्गत चित्रे रेखाटने बुधभूषण लोंढे यांनी कल्पकतेने केलेले आहे. हा कविता संग्रह बालपण समृद्ध करणारा ठरेल हे नक्की!
पुस्तकाचे नाव - आई, मी पुस्तक होईन
(बालकवितासंग्रह)
कवी - डाॅ. कैलास दौंड
प्रकाशक - सौरव प्रकाशन
किंमत - 120 रु.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा