असं सपान पडलं,पंढरीला गेल्यावाणी
•असं सपान पडलं,पंढरीला गेल्यावाणी पंढरपूरचा विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या भेटीची ओढ सश्रद्ध मराठी मनाला लागून असते. या दैवताचा मानवी नात्याच्या पातळीवरही इथले लोकमन लोकगीतातून व्यक्त झालेले आहे. कितीतरी लोकगीते, स्रियांच्या ओव्या यातून लोभस रुपात पंढरपूरच्या कथा अनुभवायला मिळतात. आपल्या दररोजच्या जगण्यातील पती पत्नीच्या नात्यातील लुटूपुटूच्या भांडण्याचा अनुभव आपल्या आवडत्या देवाच्या जीवनात घडू शकतो अशी कल्पना लोकसाहित्यातील कथा आणि गीतांमधून आलेली आहे. रुक्मीणी विठ्ठलाला म्हणते की तुम्ही माझ्यापेक्षा तुमच्या भक्तांकडेच अधिक लक्ष देता,त्यांनाच अधिक वेळ देता त्यामुळे मी रागाने रुसून जाईन. मग तर तुम्ही मला शोधाल पण काही सापडणारे नाही त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पंढरपूरात माझा शोध घेत हिंडावे लागेल. विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या नात्यातील गोडवा मानवी पातळीवर आणून त्याला लोभस ओवीरूप लोकांनी दिले आहे. ते असे- ' रुक्मीण म्हणती देवा,मी गं रुसून जाईन अवघी पंढरी तुम्हा ,धुंडाया लावीन.' तर पंढरपूरात संत जनाबाईचा तवा चोरीस गेला असून त्याच्या शोधासाठी संत न...