दिन दिन दिवाळी
दिन दिन दिवाळी
पूर्वी खेडेगावात अनेक लोकांच्या घरी गाईगुरे असत. सण आणि उत्सवात गाईगुरांची, वासरांची, बैलांची पूजा केली जाई. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाई. दिवाळी सणातील द्वादशीला 'वसुबारस' असे नाव आहे; वसुबारशीलाच काही भागात 'वाघबारस' म्हणूनही ओळखतात. तेथे वाघदेवाची पुजा केली जाते. पुजा केल्यावर तो आपल्या गुरावासरांचे रक्षण करतो असा श्रद्धाभाव असतो. जेथे पशुपालन अधिक प्रमाणात केले जाते अशा ठिकाणी वसुबारस साजरी केली जाते. वसुबारशीच्या आधीच तीन-चार दिवस गावातील मुले वसुबारसीच्या तयारीला लागत. म्हणजे गाईला आणि तिच्या वासराला आनंदाने आणि कृतज्ञतेने ओवाळण्यासाठी मुले काकडा तयार करण्याच्या कामाला लागत. काकडा कापसाचे पलिते तयार करून ते तेलात बुडवून देखील तयार केला जाई. परंतु एरंड किंवा बिलाईत यांच्या बियांचे वरील सालपट काढून आतील भाग एका तारेला गुंतून अनेक बियांचा काकडा तयार केला जाई. तो लवकर पेट घेई. आणि बराच वेळ जळत राही. शिवाय त्यासाठी घरातील कापूस व तेलही खर्च होत नसे. एका अर्थाने तो काकडा इकोफ्रेंडली होता म्हणा हवं तर! तो काकडा घेऊन काही मुले गायी व वासरांच्या तोंडाभोवती आरती ओवाळल्यागत गोलाकार फिरवत. तर इतर मुले यावेळी गाईला चोंभाळत असत. त्याचवेळी मुलांच्या गाण्याने सूर धरलेला असे :
'दिन दिन दिवाळी,गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या? लक्षुमनाच्या
लक्षीमन कोणाचा?आईबापाचा
आईबाप कोणाचे? लक्ष्मणाचे.'
गायी म्हशी आणि गुराखी त्यांच्यातील नात्याचे हे गाणे मराठी भाषिक प्रदेशात सर्वत्र गाईले जाते. वसुबारशीला प्रत्येकाच्या गोठ्यात गाईंना आवडीने ओवाळणे चाललेले असे. गाईसुद्धा शहाण्यागत मुलांच्या हातातील काकड्यांना मुळी सुद्धा न बुजता त्या मुलांकडून स्वतःला चोंभाळून घेतांना दिसत. कुणीतरी मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या गाण्याला सुरुवात करी, इतर मुले कोरस गात त्या गाण्याला साथ देत -
'मोरी गाय येली गेनुबा,
मोरीला झाला गोऱ्हा गेनुबा
गोऱ्ह्याच्या गळ्यात गेठा गेनुबा
गेठ्याला मोडला काटा गेनुबा
काट्याकुट्याचा येळू गेनुबा
गाई लागल्या खेळू गेनुबा.
(या गीतात प्रत्येक ओळ दोनदा म्हटली जाते.)
या बरोबरच
' माझी भवळण गाय बरी हो
दूध भरून देती चरी हो
दूध भरून देती चरी का वरच्या वरी || धृ||
माझ्या भवळण गायीचा खांदा
जणू मव्हाळाचा कांदा ||१||
या गाण्यात गायीच्या शिंगे,पाठ,पाय,कास आदी अवयवांना उपमा देत गाणे लांबवले जाते.
सह्याद्रीच्या डोंगर भागात आदिवासी वस्तीत वसुबारस ही वाघबारस या नावाने साजरी केली जाते. जंगलातील वाघाला आदिवासी बांधव देव मानतात. त्याच्यापासून आपल्या पाळीव जनावरांचे संरक्षण व्हावे म्हणून ते वाघाला काहीतरी नवस बोललेले असतात. तो नवस वाघबारशीच्या दिवशी पूर्ण केला जातो. सह्याद्रीच्या कुशीतील अनेक गावात आपल्याला वाघ देवाची मंदिरे पाहायला मिळतात. वाघोबाला बोललेले नवस वाघबारशीला फेडले नाहीत तर वाघ काहीतरी शिक्षा देतो किंवा रात्री दारात येऊन कोंबडे पळवतो किंवा गुरगुरतो असे मानले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिदुर्गम गावात वाघबारस साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळच्या वेळेला गावातील सर्व गुरेढोरे वाघदेवाच्या समोर नेतात. तेथील जागा अगोदरच सडा शिंपडून किंवा सारवन करून घेतलेली असते. येथे गुराखी मुले वाघ, अस्वल, गाय, बैल अशाप्रकारची सोंगे घेऊन खेळ खेळतात. ते वाघोबाला विचारतात , 'आमच्या शिवारात येशील का? यावर वाघोबा बनलेला मुलगा 'नाहीऽऽ नाही' म्हणत पळत असतो. म्हणजे आपल्या पशुधनास जपताना पशुधनाला धोका असलेल्या वाघाला सुद्धा जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक समजून त्याच्या प्रतीही कृतज्ञता वाघबारसीच्या दिवशी व्यक्त केली जाते. ज्या ठिकाणी वसुबारस केली जाते त्या ठिकाणी सुद्धा गाई गुरांच्या ओवाळण्या सोबतच वाघाचा उल्लेख असलेली गाणी सुद्धा येतात. उदा:
'दे माय खोबऱ्याची वाटी
लागन वाघाच्या पाठी
नाहीतर घालीन डुबरात काठी.'
अशा गीतावरून पूर्वीच्या काळी वाघाचा संचार सर्वत्र असावा याला पुष्टी मिळते . वरील गीतात मात्र वाघाला पळून लावण्याची भाषा येते. त्यासाठी आईकडून किंवा आजी कडून हट्ट धरून खोबरे मागितले जाते आणि ते खाऊन ताकद कमावून वाघाला पळवून लावण्याचा गुराखी मुले निश्चय करतात. हा कृषीसंस्कृती आणि आदिवासीसंस्कृती यामधील महत्त्वाचा फरक त्यानिमित्ताने दिसतो.
वसुबारशीला गाईवासरांना ओवाळतांना खुप लांबलचक गाणी म्हटली जातात. कधी कधी दोन गाण्यांचा शेवटही एकच असतो. काही गाणी गुराख्यांना उद्देशुनही असतात. उदा:
'गुरख्या गुरख्या झोपाटा उघड रे, गुरख्या गुरख्या झोपाटा उघड
गाई जावुदी खालच्या रानी रे, गाई जावुदी खालच्या रानी
खालच्या रानचा पवना धट रे ,खालच्या रानचा पवना धट
गाई निघाल्या पाण्यावर थेट, रे गाई निघाल्या पाण्यावर थेट रे...'
तर काही गाणी शेतीमातीचे वर्णन करणारी असतात. त्यामध्ये -
'नांगरून डोंगरून भुई केली काळी
त्याच्यात पेरली कपाशी
कपाशीवर बसलायस सोग्या मोर
सोग्या मोराचे लांब लांब पर
एक पर आखूड
त्याला बांधलं तीनशे लाकूड
तीनशे लाकडाचा गंभीर गाडा
गाडा चाले हळूहळू शिंगरू चाले पायी पायी
सीता रामाच्या चारी गायी
चारी डोंगर चरून येई (अपूर्ण)
आज चरावू रानांची कमतरता. डोंगरांमध्ये फॉरेस्ट खात्याकडून चराई बंदी, देशी गाईंची अनुपलब्धता त्यामुळे ही दिवाळीची गाणी फार थोडीच उरली आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा