भाऊबीजेची ओवाळणी

भाऊबीजेची ओवाळणी

दिवाळीच्या नंतर बलिप्रतिपदा आणि लगोलग भाऊबीज येते. या दिवशी बहीण तिच्या बंधूराजाला ओवाळते. कार्तिक महिन्यातील ही शुद्ध द्वितीया. चंद्र जसा कलेकलेने वाढत जातांना दिसतो तसे बहीण भावातील प्रेमानुबंध वर्धिष्णू होत जातात. भाऊबीजेच्या सणाला बहिणीला माहेराची ओढ निर्माण होते. ती आपल्याला माहेरातून बोलावणे येईल याची वाट पाहू लागते. मुलीला आणायला जाणाऱ्या व्यक्तीला 'मुराळी'(मुऱ्हाळी) म्हणतात. बऱ्याचदा भाऊकडेच ही जबाबदारी असे. अशा मुऱ्हाळ्याची वाट पाहणाऱ्या बहिणीची भावना स्रियांच्या ओवीतून व्यक्त झाली आहे. ती म्हणते -
  'साऱ्या सणामंदी सण दिवाळी गं आनंदाची ।
   नेणत्या बंधूची गं ,वाट पाहते गोईंदाची ॥'
त्याची वाट पाहता पाहता कधी तो फोन करून माहेरी बोलवील तर कधी स्वतः बहिणीच्या गावी जाऊन तिला घेऊन येईल. मात्र बहिणीच्या कल्पनेत तो तिला न्यायला आलेला असतो. तो भाऊ मायाळू असतो. तो आर्थिक स्थितीने कसाही असो तिच्यालेखी तो श्रीमंत असतो. अशावेळी बहिणीच्या मुखी लोकगीतातील पुढील ओवी सहजच येई.
''भाऊबीजाच्या गं दिसी भाऊ बहिणीच्या देशाला ।
माझ्या गं बंधवाच्या मोती पवळे खिशाला ॥'
मात्र तिच्या अपेक्षा माफक असतात. तिला आईवडीलांना,भाऊ भावजयीला,भाच्यांना भेटायचे असते. त्यांच्यांशी गुजगोष्टी करायच्या असतात.आपल्या संसारातील दबलेलं मन आई-भाऊ जवळ मोकळं करायचं असतं. तिच्या अनुभवातून तिला कळते की, प्रत्येक बहिणीला भाऊ असावाच. त्यामुळे माहेराची ओल टिकून राहते. ओढ लागून राहते. पूर्वीच्या स्रियांनी हे अनुभवाचे धन आपल्या ओव्यांमधून गायले आहे.ते असे -
   ' बहिणीला भाऊ , एकतरी गं असावा 
     चोळीचा गं बांगडीचा ,एका रातीचा इसावा '
हा एका रात्रीचा विसावा रोजच्या संसारगाड्यातील तणाव कमी करणारा, ऊर्जा वाढवणारा असतो. नाते आणि नात्यातील मोकळीक त्यासाठीच आवश्यक असते. दिवाळीचा खरा आनंद‌ पंचपक्वानात नसतो तर तो दिवाळीच्या निमित्ताने जमा झालेल्या आप्तेष्टांच्या निस्वार्थ स्नेहबंधात असतो.त्यामुळे ती बहीण तिच्या सासरी भेटणाऱ्या नि माहेरी जाणाऱ्या दुसऱ्या स्री सोबत आईला निरोप धाडते त्या अर्थाची ओवी विशेष आहे. आपला भाऊ स्वच्छ सुंदर व रूबाबदार रीतीने आपल्याला न्यायला यावा म्हणजे सासरचे लोकही त्याला पाहून आपल्याला माहेरी पाठवायला सकारात्मक राहतील असे तिला वाटते.
        'धोतरजोडी मा सजी -सुजी सन
        बहिन ना घर, भाऊ पाव्हना धाडीदेन'
प्रत्येक भावाला बहिण असावी. अन्यथा त्याच्याकडे असलेली साज शृंगाराने सजलेली घोडी त्याला कुठे जाण्यासाठी कामी येणार! तिच्यावर बसून मुराळी होऊन भाऊ न्यायला येणे हे तिच्या आनंदाचे कारण बनते. तिच्या ओठी ओवी येते -
 'नको घालू देवा जन्मा बहिणी वाचून भावाले ।
  शिनगारली घोडी जाईन कोणाच्या गावाले ॥
        माहेरी आलेली बहीण तिच्या भावाला स्नान घालण्यासाठी उटणं तयार करते.पण तो भाऊ सहजपणे कार्तिक स्नानासाठी नदीवर आघोंळीला निघून गेला आहे. त्यामुळे भाऊसाठी तयार केलेले उटणं वाया गेलं असे ती म्हणते.
         'दिवाळीच्या दिसी उटणं गेलं वाया ।
         पाठचा बंधू गेला कार्तीक न्हाया ॥'
एकूणच भाऊबीजेचा सण भावा बहिणींच्या नात्यांच्या ओढीचा सण. सणांचा मूळ हेतूच जीवनात आनंदक्षण निर्माण करणे, नात्यांचा ओलावा टिकवून ठेवणे,एकमेकांप्रती अकृत्रिम निस्वार्थ आत्मियता सांभाळणे हाच असतो. हे असते त्यामुळे सणांचा गोडवा असतो. आपल्या भावाला ओवाळणे,त्यासाठी दीर्घ आणि चैतन्यमयी आयुष्याची प्रार्थना बहीण करते. स्रीयांच्या ओव्यात हे अनुभवायास मिळते.
        'भाऊबीजेच्या दिवशी ओवाळते मी चंद्राला ।
        असं आयुक्ष्य मागते मह्या पाठच्या भावाला'
भाऊ न्यायला आला आणि सासरेबुवांनी शेतीकामाचा व्याप पाहून कांकू केले की मग सुनबाई त्यांना लाडीगोडी लावून भावनिक करते कारण तोही कुणाचा तरी भाऊ असतोच. अहिराणी बोली मधील पुढील ओवी हृदयाला स्पर्शून जाते.
     'दिवाईना सन ,नका परतवा सासराजी
     भाऊले ववायाले सन नही दुसरा जी'
भाऊबीजेला भावांना देखील बहिणींनी घरी यावे . तिने व तिच्या लेकरा बाळांनी चार दिवस आनंदात रहावे.त्यांना चार गोडघास खाऊ घालावेत,नवे कपडेलत्ते घ्यावेत असे वाटत असते. त्याप्रमाणे तो करत असतो. सहाजिकच हा भाऊबीजेचा सण द्वितीयेचा असला तरी पुढेही काही दिवस आपापल्या सवडीने साजरा केला जातो.एक बहीण तिच्या ओवीतून सांगून जाते -
         'माय तवर माहेर, बाप तवर मौजा
         बंधू करीन बोळवण याचा खुशीचा सौदा'
हे काही प्रमाणात खरे असले तरी बहिणी घरून त्यांच्या सासरी गेल्या म्हणजे माहेरात हुरहूर लागतेच. माझ्या एका कवीतेत मी लिहीलयं ते असं-
        'गेली दिवाळी सरुनी
        गेल्या बहीणी घरूनी
        घर लागे सुने सुने
        आज सकाळ धरूनी.'
~~
( लेखक ग्रामीण कवी व कादंबरीकार आहेत.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर