असं सपान पडलं,पंढरीला गेल्यावाणी
•असं सपान पडलं,पंढरीला गेल्यावाणी
पंढरपूरचा विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या भेटीची ओढ सश्रद्ध मराठी मनाला लागून असते. या दैवताचा मानवी नात्याच्या पातळीवरही इथले लोकमन लोकगीतातून व्यक्त झालेले आहे. कितीतरी लोकगीते, स्रियांच्या ओव्या यातून लोभस रुपात पंढरपूरच्या कथा अनुभवायला मिळतात. आपल्या दररोजच्या जगण्यातील पती पत्नीच्या नात्यातील लुटूपुटूच्या भांडण्याचा अनुभव आपल्या आवडत्या देवाच्या जीवनात घडू शकतो अशी कल्पना लोकसाहित्यातील कथा आणि गीतांमधून आलेली आहे. रुक्मीणी विठ्ठलाला म्हणते की तुम्ही माझ्यापेक्षा तुमच्या भक्तांकडेच अधिक लक्ष देता,त्यांनाच अधिक वेळ देता त्यामुळे मी रागाने रुसून जाईन. मग तर तुम्ही मला शोधाल पण काही सापडणारे नाही त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पंढरपूरात माझा शोध घेत हिंडावे लागेल. विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या नात्यातील गोडवा मानवी पातळीवर आणून त्याला लोभस ओवीरूप लोकांनी दिले आहे. ते असे-
' रुक्मीण म्हणती देवा,मी गं रुसून जाईन
अवघी पंढरी तुम्हा ,धुंडाया लावीन.'
तर पंढरपूरात संत जनाबाईचा तवा चोरीस गेला असून त्याच्या शोधासाठी संत नामदेवांना दवंडी देण्यास सांगायला लोकमन सांगते. दवंडी देऊन लोकांना विचारणा करण्याची तत्कालीन पद्धती या ओवीतून दिसते.
'पंढरीला झाली चोरी,जनीचा गेला तवा
अवघ्या पंढरीत दवंडी द्यावा नामदेवा.'
आपले जगणे आणि देवाचे किंवा संतांचे जगणे एकाच पातळीवर आणून त्यांच्याशी लोकमानस संवाद साधते तर कधी कधी त्यांच्यातील आपसात होणाऱ्या संवादाला शब्दरूप देते. त्याचवेळी आपले दैवत हे साधे आणि प्रेमळ आहे. ते कुणालाही त्रास देत नाही. त्याला तुळशीमाळ आणि बुक्का याशिवाय कशाचीही अपेक्षा नसते. हे एका ओवीतून सुंदर रितीने येते-
' पंढरीचा देव नाही कोणाला लागत
देवा मह्या विठ्ठलाला,माळ बुक्याची आगत.'
इथे वारकरी संप्रदायाने श्री विठ्ठलाची लोकमनातील प्रतिमा निर्माण केल्याचे दिसते. अंधश्रद्धेला इथे काहीही थारा नसल्याचे दिसते. अशा आपल्या साध्या,प्रेमळ आणि कृपाळू विठ्ठलाकडे भेटीसाठी, दर्शनासाठी जाण्याची इच्छा जनलोकांना असते.त्यामुळे आषाढीवारी आणि कार्तिकीवारीला विविध भागातून दिंड्या पालख्या पंढरपुरच्या दिशेने निघतात. त्याच लाखो लोकांचा समावेश असतो. आत्मिक ओढीने आणि भक्तीभावाने लोक 'ग्यानबा तुकाराम ' जयघोष गात वाटचाल करीत असतात. त्याआधी लोकांची पंढरपूरला जाण्याविषयी चर्चा गावागावांतून आणि घराघरातून सुरु असते. काहींचे जाण्याचे नियोजन असते तर काही आगोदर गेलेले असल्याने वाटेतील आणि पंढरपुरातील आठवणी आठवून सांगत असतात. ऐकणारे लोकही चंद्रभागेत स्नान केले का? पुंडलिकांचे दर्शन घेतले का? नामदेव पायरी ला स्पर्श केला का? श्रीविठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन झाले का?गरूड खांबाला भेट दिली का?असे प्रश्न विचारत असतात.
एका सासुरवाशीन स्रीला असेच प्रश्न दुसरी स्री विचारते. मात्र मी माझ्या आईवडीलांसोबत बालपणीच पंढरीला गेले होते. पण गरुड खांबाविषयी काही आठवत नसल्याचे ती सांगते.या प्रसंगाची ही ओवी स्रिया जात्यावर किंवा कधी निवांतवेळ असेल अशावेळी एकत्र बसून म्हणत.
'पंढरी पंढरी म्या गं, बालपणीच पाह्यली
गरुड गं खांबयाची,सय कोणाला राहीली.'
असे गातांना सासरचे पंढरपूरला नेतील की नाही?असे वाटून मला माझ्या आईवडिलांनी मुद्दामहून पंढरपूर दाखवले.हे देखील त्या स्रीला सांगावयाचे असते.
अनेकांचे अनुभव ऐकून आपण देखील विठू माऊलीचे दर्शन घ्यावे. जीवनात एकदा का होईना पांडुरंगाच्या गावाला जावे असे मनोमनी येते. त्यामुळे लागलेला विठ्ठल विठ्ठल असा नाम छंद सतत पाठपुरावा करतो आणि जेव्हा जेव्हा पंढरपूरची किंवा विठ्ठलाची सय येते तेव्हा स्रीमन लोकगीतांतून पुढीलप्रमाणे व्यक्त होते.
'असा विठ्ठल विठ्ठल,छंद लागलाय जीवाला
मला एकदा जायाचं,पांडुरंगाच्या गावाला.'
एकूणच मराठी माणसांना आपल्या लोकदैवताला भेटण्याची ओढ लागलेली असते.इथे आषाढी कार्तिकी निमित्ताने वारकरी,भाविक आणि यात्रेकरुंचा मोठा मेळा जमतो. अलिकडील काळात वृत्तपत्रे, विविध दूरचित्रवाहिण्या,रेडीओ अशा माध्यमातून पंढरपूरची पर्वणी, महापूजा,दिंड्या, वारकऱ्यांची गर्दी पहायला मिळते, भक्तिभावाचे दर्शनही घडते. आता ते पाहून आणि पूर्वी ऐकून आपणही पंढरपूरला जायला हवे असे प्रकर्षाने वाटते. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे 'या म्हणी प्रमाणे एखाद्या माय माऊलीला खरोखर स्वप्न पडले असल्यास नवल ते काय! अशी स्री तिच्या ओवीतून व्यक्त झाली आहे.
' असं सपान पडलं,पंढरीला गेल्यावाणी
मोकळे माझे केस,चंद्रभागेत न्हाल्यावाणी.'
ही पंढरीची अत्यंतिक ओढ लोकसाहित्याने गीतांमधून जपली आहे. ती सदैव मनाला पंढरीच्या वाटेवर घेऊन जाणारी आहे. तिचे स्वरूप 'माझिये जीवाची आवडी| पंढरपुरा नेईन गुढी ' असे सुखद आहे.
( लेखक ग्रामीण कवी व कादंबरीकार आहेत)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा