जाणिवा लोकसंचिताच्या
कष्टाच्या सहनशीलतेची गाथा : जनी
गंगाखेडची जनाबाई दामाशेटी यांच्याकडे राहीली.तिथे तिने दळणकांडण करणे, गोवऱ्या वेचणे अशी कष्टाची कामे केली.दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील. जनाबाई स्वतःला 'नामयाची दासी जनी' असे म्हणून घेते. कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल तिची कधीही ,काहीही तक्रार नव्हती. तिचे मन आणि चित्त विठ्ठल भक्तीत रममाण झालेले होते. प्रत्येक कामात माझा विठ्ठल मला मदत करतो अशी तिची भावना होती.
'झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी '
अशी तिची श्रद्धा अभंगातूनही व्यक्त झालेली आहे. महाराष्ट्रातील स्रियांची संत जनाबाई आजही लाडकी आहे. तिची सोशिकता, श्रद्धा आणि भक्तीभाव सर्वांना चकित करून जातो. संत जनाबाई या नावाभोवती अनेक आख्यायिकांचे वलय आहे. त्याचे कारण तिची विठ्ठलभक्ती आहे. मराठी लोकसाहित्यामध्ये संत जनाबाईचे अढळ स्थान आहे. संत जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीने लोकमानसाने साक्षात विठ्ठलालाही माणूस पातळीवर आणले आणि ओव्यांमधून गाईले. एका ओवीत श्रीविठ्ठल त्यांच्या राहीला समजावतांना दिसतात -
'विठ्ठल बोलं जनी माझं ग लेकरू
येडे राहीबाई मनी किंतू नकू धरू'
जनलोकांच्या मनातील देव आणि जनसामान्यातील भक्त यांच्याबद्दल लोकांना नेहमीच कुतूहल असते. देव भक्तांना कामे करु लागतो आणि त्यांची काळजीही घेतो असा लोकांचा विश्वास असतो. 'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण अशाच काहीशा श्रद्धेतून निर्माण झालेली आहे. जनाबाईंना गोपाळपुरा येथे जायला रात्र होऊन अंधार पडे. मात्र तिच्या मायेने पांडुरंग उजेडासाठी चंद्राची योजना करतो अशी कल्पना लोकगीतातील स्रिया करतात आणि ओवीतून व्यक्त होतात.
'गोपाळपुऱ्या जाया जनीला झाली रात
पिरतीचा पांडुरंग नित लावी चंद्रज्योत.'
वास्तविक आकाशात दिसणारा चंद्र,त्याचा पृथ्वीवर पडणारा प्रकाश हा कुणा एकासाठी नसतोच. तसेच चंद्राच्या पूर्ण प्रकाशाची जशी पौर्णिमा असते तशीच पूर्ण काळोखाची अमावस्या देखील असतेच.मात्र सश्रद्ध लोकमानस उजेडाची आणि आशेची गाणी गाते. त्यातुन मनोबल मिळवते. संत जनाबाईंची विठ्ठल भक्ती तर मराठी जनलोकांच्या कुतूहलाचा विषय! सकाळ, संध्याकाळ पूजा आणि सतत चिंतन हा तिचा स्थायीभाव. तिच्या पूजा प्रसंगांचे एक क्षणचित्र स्रियांच्या ओवीतून उमटले आहे.
'तिन्हीसांज वेळेला जनी रावळाशी गेली
हाती तुळशीची माळ तिनं पुजीला वनमाळी.'
सर्व सामान्य माणसाचे जीवन जगत आणि मनी श्रद्धाभाव जपत जनाबाई संत पदाला पोहचल्या, साहित्यशलाका ठरल्या. त्यांनी साडेतीनशे अभंगाची निर्मिती केली. आपल्या अविरत कष्टाचे, मेहनतीचे श्रेय देखील तिने विठ्ठलाला दिले आणि भोवतीच्या माणसांनीही जनीची कामे विठ्ठलच करतो असा बोभाटा केला.मात्र जनीला राबणे,कष्टणे कधीच चुकले नाही. तिच्या भक्तीभावाने तिचे कष्ट सुसह्य केले इतकेच.
आजच्या ग्रामीण स्रियांनाही कष्ट चुकत नाहीत. गुरे राखणे, गोवऱ्या वेचणे,दळण दळणे अशी कामे काळाच्या ओघात आता करावी लागत नसली तरीही शेतीभातीची अनेक कामे,घरातील कामे त्यांची पाठ सोडत नाहीत. अशावेळी मनोबल टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आपसातील संवाद कामाला येतो. भजन, कीर्तन,यात्रा,उत्सव, लग्नकार्य यासारख्या कार्यक्रमातून त्यांना आपसात संवादासाठी संधी मिळते. यावेळी जोडीला जर लोकसाहित्याचा धागा असेल तर संवादात अकृत्रिमपणा येतो , सहजता येते. जनी ही सतत कष्टाला जुंपलेल्या स्रियांची प्रतिनिधी आहे. पण तिची प्रसन्नता,सहजता सर्वच स्रियांच्या वाट्याला येईलच असे नाही. कारण जनीचा श्रद्धाभाव, विठ्ठलभक्ती हा तिचा खास विशेष म्हणावा लागतो.
'जनी घरी दारी,राबतेच आहे
विठ्ठलाशी जाब ,मागतेच आहे.'
असे एका कवितेत मी लिहून बसलोय. जगण्याला ऊर्जा देणारा भक्तीभाव आणि श्रध्दाभाव संपला की मग माणसाचा आत्मविश्वास फार काळ तग धरणे अवघड आहे. मनोबलही टिकणे टिकणे अवघडच. फक्त अमुक एका ठिकाणीच श्रद्धा असावी,अमुक एकाच्याच ठिकाणी भक्तीभाव असावा अशी मात्र सक्ती नाही.अगदी आपण आपल्याला करावयाच्या कामावरच श्रद्धा आणि प्रयत्नांवर भक्तीभाव ठेऊ शकतो. पण हे आदर्शवादासारखे झाले.ते सर्वांनाच सर्वकाळ जमेल असे नाही.
यांत्रिकीकरण आणि जागतिकीकरण यामुळे माणसांच्या मदतीला यंत्रे आली,कामे करण्यात सुलभता येऊ लागली.यंत्रे माणसांच्या हुकूमाप्रमाणे वागू लागली. घरोघरी पिठाच्या गिरण्या, मिक्सर, धुण्यासाठी यंत्र आले. कळतनकळत माणसे एकलकोंडी आणि पैसाधिष्ठीत झाली. पण मनाच्या विकासाचे,त्याच्या आरोग्याचे काय? 'भोग सरू दे उन्हाचा' मधील एका कवितेत मीच लिहीलय ते असं-
'उठा गावमाळ घेऊ
भक्ती प्रितीने पेरुन
नव्या तजेल्याने मग
जनी येईल फिरुन.'
घरोघरींच्या कष्टावणाऱ्या जनाबाईंसाठी धरलेली ही साधी अपेक्षा.
~~~~~~~~
[लेखक ग्रामीण कवी व कादंबरीकार आहेत. ]
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा