दिनकर फसाळी : शाळेशी एकरूप शिक्षक
शिक्षणयात्री १४
दिनकर फसाळी : शाळेशी एकरूप शिक्षक
पालघर जिल्ह्यातील मोखाडा हा आदिवासी बहुल तालुका या तालुक्यातील ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा यांच्या सीमेलगत असणारी किनिस्ते केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचाळे ही शाळा आपल्या गुणवत्तेने समाजाचे लक्ष वेधून घेत आहे. पूर्णपणे आदीवासी लोकवस्ती असणाऱ्या गावातील या शाळेत २०१९ पासून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करणारे दिनकर पांडूरंग फसाळी हे शिक्षक शाळेशी एकरूप होऊन तळमळीने आणि उत्साहाने सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांचे इतर सहकारीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून शाळेच्या प्रगतीस सहाय्यभूत होत आहेत.
कोचाळे गावातील शाळा इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत असून एकूण पट संख्या १३०इतकी आहे.या शाळेत विद्यार्थी विकासासाठी राबवले जाणारे उपक्रम म्हणजे घंट्याविना शाळा , अजेंड्यावीना शाळा व्यवस्थापन समिती सभा , गावाचा एक दिवस शाळेसाठी , ग्रीन स्कूल , लोकसहभागातून शाळा विकास
गावाचा एक दिवस शाळेसाठी- या उपक्रमात प्रत्येक महिन्याला गावातील पालक आणि ग्रामस्थ एक दिवस शाळेत येऊन परीसर सफाई, गवत वगैरे साफ करणे ,परसबागेसाठी जागा तयार करणे, रंगरंगोटी ,झाडांची देखभाल, आवश्यक असलेली थोडीफार दुरूस्ती अशी कामे स्वयंस्फूर्तीने करतात.या उपक्रमामुळे आज पर्यंत शाळेची कोणत्याच कामासाठी मजुरी खर्च झालेली नाही. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेलाही सरासरी नव्वद टक्के सदस्य उपस्थित असतात.
कोचाळे शाळेत येण्यापूर्वी दिनकर फसाळी हे सावरपाडा येथील शाळेत कार्यरत होते. येथेही त्यांनी लोकवर्गणी आणि स्वतःच्या वेतनातील काही पैसे मिळून प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब उपलब्ध करून पालघर जिल्ह्यातील पहिली टॅब स्कूल निर्माण केली होती. या शाळेतील विद्यार्थ्यांना सुटाबुटातील विद्यार्थ्यांची शाळा असा लौकिकही त्यांनी मिळवून दिला.
विद्यार्थीनींसाठी रेस्ट रूम : प्राथमिक शाळेमधील ही एक नाविण्यपूर्ण सुविधा निर्माण केल्यामुळे विद्यार्थिनीं आणि पालक समाधानी आहेत , मुंलीचे गैरहजेरीचे प्रमाण त्यामुळे कमी झाले . मुलींना मोफत सॅनेटरी पॅड व्हेंडींग मशिनमधून मिळत असल्याने पालकांचा ताण कमी झाले आहे.
पाढे आणि स्पेलिंग पाठांतर : अलीकडे काळात अध्ययन प्रक्रियेतील पाठांतरावरील भार कमी करण्यात आलेला आहे. तरीही पाढे पाठ असतील तर गुणाकार आणि भागाकारदी क्रिया कमी वेळात करता येतात हे वास्तव स्वीकारून, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार करून पाढे पाठ करून घेतले जातात. ऐकणे आणि म्हणूनही या कृतीमुळे या उपक्रमाला सामुदायिक रूप प्राप्त होते. आज येथील जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांचे साठ पर्यंत पाढे पाठांतर झालेआहे तर उर्वरित जास्त विद्यार्थ्यांचे तीस पर्यंत पाढे पाठांतर आहेत. याशिवाय इंग्रजी लेखनामध्ये अचूकता येण्यासाठी दररोज इंग्रजी स्पेलिंग पाठांतर उपक्रम घेतला जातो. सर्वात मोठी स्पेलिंग पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षिस म्हणून दररोज एक पेन दिला जातो. त्यामुळे अधिकाधिक अक्षराची स्पेलिंग पाठ करण्याकडे विद्यार्थी लक्ष देतात व सहभागी होतात.
फिरती प्रयोगशाळा : विज्ञानातील तथ्ये प्रयोगाने प्रमाणित होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना छोटे छोटे प्रयोग दाखवता यावेत आणि त्यांना प्रत्यक्ष असे प्रयोग करून पाहता यावेत यासाठी शाळेचा प्रयत्न असतो. या उपक्रमात एका संस्थेमार्फत फिरती विज्ञान प्रयोग शाळा दर बुधवारी शाळेत येते. त्यामुळे विद्यार्थी स्वतः देखील प्रयोग करून पाहतात. याचा परिणाम म्हणून या वर्षी शाळेने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यापर्यंत पर्यंत मजल मारली आहे.
विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन, गणितीक्रिया, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र या विषयाच्या अधिक तयारीसाठी शाळेय परिपाठात प्रश्नोत्तरे घेतले जातात. त्याचप्रमाणे अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत शालेय वेळे व्यतिरिक्त स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने जादा तासिका घेतल्या जातात .
कोचाळे शाळा मोखाड्यापासून पस्तीस कि.मी. अंतरावर आहे. गावातील लोकांचा व्यवसाय हा शेती आणि मजुरी आहे . दरवर्षी दीपावली नंतर पंधरा ते वीस विद्यार्थी शहापूर ,भिवंडी,पनवेल अशा ठिकाणी स्थलांतरित होतात. त्या ठिकाणी शिक्षक स्वतः जाऊन त्यांना ‘शिक्षणहमी कार्ड’ देवून नजीकच्या शाळेत दाखल करतात . गरीब परिस्थितीमुळे लेखनसाहित्याचा प्रश्न उद्भवतो त्यावर मात करून २०१९ पासून पालकांचा शैक्षणिक खर्च शुन्यावर आणला आहे . विविध संस्थांशी संपर्क करून दप्तर ,छत्रीसह वर्षभर पुरेल एवढे लेखन साहित्य मिळविले.
जिल्हा परिषद शाळा कोचाळे ता.मोखाडा ही ISO मानांकन घेतलेली शाळा आहे.त्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधा व गुणवत्तेत ही बदल घडला आहे , शाळेकडे बघण्याचा ग्रामस्थांचा दृष्टिकोन बदलला आहे ,शाळेला तालुक्यातील बारा शाळा व्यवस्थापन समित्यांनी भेटी दिल्या आहेत आणि त्यापैकी चार शाळांनी आयएसओ प्राप्त केले आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात मोखाडा तालुक्यातून शाळेला प्रथम क्रमांकांचे बक्षीस मिळाले आहे. शाळेच्या लेझीम पथकाला नुकताच इस्राईलच्या राजदूताचे स्वागत करण्याचा मान मिळाला. पालघर जिल्हा परिषदेच्या एम्प्लॉय ऑफ द विक अंतर्गत दिनकर फसाळी यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सन्मान केला आहे. पालघर जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार दिनकर फसाळी यांना २०१८ मध्ये मिळाला.
~~~
(लेखक नामवंत साहित्यिक व शिक्षक आहेत.)
दिनकर फसाळी - 8080392366.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा