प्रयोगशील भाषा शिक्षिका : रुपाली पाटील



प्रयोगशील भाषा शिक्षिका : रुपाली पाटील 

छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन हायस्कूलच्या रुपाली पाटील यांची प्रयोगशील भाषा शिक्षिका अशी ओळख आहे. ती त्यांच्या वैविध्यपूर्ण उपक्रमामुळे व विद्यार्थ्यांप्रति बांधिलकीमूळे निर्माण झालेली आहे. त्या इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गाला मराठी विषय शिकवतात. नाविन्यपूर्ण व कल्पक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, अभ्यासाला पर्यायाने जडणघडणीला चालना मिळते अशी त्यांची धारणा आहे.

 प्रत्यक्षानुभवातून‌ कवितेचे अध्यापन : 
  रूपाली पाटील या त्यांच्या शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून मुलांसाठी 'गोधडी शिवणे' हा उपक्रम घेतात कारण इयत्ता आठवीला ‘गोधडी’ ही कविता आहे. डोळ्यात पाणी आणणारी, मुलांच्या मनाला स्पर्श करून जाणारी अशी ही कविता.ही कविता शिकवत असताना कवितेचे वाचन,स्पष्टीकरण,चर्चा सगळं काही भावनेभोवती फिरते. मुलांना प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगताना तो अनुभवता आला पाहिजे हा त्यांचा‌ हेतू.गोधडीचे आणि आपले नाते कसे असते हे ती शिवत असताना जाणवत जाते. आत भरण म्हणून वापरलेले कपडे एकेक आठवण जागी करतात. नकळतपणे त्या त्या व्यक्तीच्या मायेचा स्पर्श,प्रेम,काळजी ,आदी गोष्टींची जाणीव देतात
 हीच अनुभूती विद्यार्थ्यांना यावी म्हणून त्या प्रयत्न करतात. आता तर विद्यार्थीच अट्टहास धरतात. त्यांनी विचारलेला , मॅडम गोधडी कधी शिवायची?हा प्रश्न विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या कृतिशीलतेचा असतो. यावर्षी तर त्यांच्या वर्गातल्या उमर शेखने आग्रह धरला ,मॅडम शनिवारी आपण गोधडी शिवूया का? हे मुलाने विचारणे समानतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. साहजिकच इयत्ता दहावीची ‘आश्वासक चित्र’ ही कविता त्यांच्या डोळ्यासमोर आली. लगेच उपक्रमाच्या दृष्टीने लागणारी पूर्वतयारी आणि नियोजन करून काही दिवसापूर्वीच त्यांनी हा उपक्रम घेतला. या उपक्रमात विद्यार्थी कार्यप्रवण होतात, आणि ते खूप आनंदी, उत्साही दिसतात . भावनिक दृष्ट्या त्यांची नात्याप्रती आपुलकी निर्माण होते. वेदा नावाच्या विद्यार्थिनीने तिच्या पणजीचे लुगडे गोधडीसाठी आणले होते.ते सांगताना तिचा आवाज ,डोळे खूप भावुक झाले होते.अशी अनेक उदाहरणे त्यांच्याकडे आहेत.

विद्यार्थी शब्दकोश वापतात-
शब्द जोपर्यंत कोशातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत त्यांना अर्थाचे धुमारे फुटत नाहीत. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शब्दकोश वापरायला शिकवले. त्यामुळे आपल्याला हव्या त्या शब्दाचा अर्थ विद्यार्थी शोधतात. शाळेच्या ग्रंथालयामध्ये असणारी विश्वकोश ही विद्यार्थ्यांना पाहण्यास त्यांनी शिकवले आहे. जो पर्यंत एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष बघत नाही, हाताळत नाही तोपर्यंत ती नीट समजत नाही. त्यामुळेच त्या विद्यार्थ्यांना शब्दकोश आणि विश्वकोश हाताळण्याचे अनुभव देत आहेत. विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढावे यासाठी देखील त्या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना वाचन साहित्य उपलब्ध करून देतात.

श्रावणाच्या कविता : 
हा सर्जनशीलता वाढवणारा आणि विद्यार्थ्यांना हवाहवासा वाटणारा उपक्रम आहे. मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये श्रावण किंवा पाऊस या संबंधाने कविता असतात. विद्यार्थी त्या पाचवी पासूनच वाचतात,शिकतात व गातातही. विद्यार्थ्यांनाही त्या वातावरणाचा अनुभव देऊन लिहितं करावं या संकल्पनेतून रूपाली पाटील यांनी हा उपक्रम सुरू केला. त्या विद्यार्थ्यांना घेऊन छत्रपती संभाजीनगर मधील साई टेकडीच्या परिसरात गेल्या. तेथील निसर्ग, हिरवळ, वेगवेगळ्या रंगांची फुललेली रानफुले, पाण्याचे झरे,ओहोळ त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवले आणि याचा आनंद घेत काही लिहिता येते का? असे सांगत प्रोत्साहन दिले. याचा सकारात्मक परिणाम त्यांना पाहायला मिळाला.मुलांनी खूप सुंदर कविता लिहिल्या,काहींनी त्या निसर्गावर गद्यपर लिहिले. अनेक कवींच्या श्रावणातल्या कविता मुलांनी चाली लावून सादरही केल्या.

आत्मवृत्त लेखनाची संधी : 
इयत्ता नववीच्या वर्गासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मवृत्त लेखन लिहिण्याची गोडी लावली. त्यासाठी अगोदर सोपे विषय देऊन सुरुवात केली.आत्मवृत्त लेखन करतांना विद्यार्थी विविधांगी विचार करून लिहीतात हे विशेष.त्या सकारात्मक विचाराच्या भाषा शिक्षिका आहेत.

दिवाळी अंकांचे प्रदर्शन: 
वाचन संस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी असे खूप आता बोलले जाते. रूपाली पाटील यांनी त्यासाठी आकर्षक वाचन साहित्य विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यासाठी दिवाळी अंकाचे प्रदर्शन शाळेत भरवले. त्यासाठी त्यांना त्यांच्या सहकारी सौ. मुसळे मॅडम यांनीही सहकार्य केले. प्रदर्शनाकरिता त्यांनी स्वतःकडील, सहकाऱ्यांकडील आणि शाळेकडील दिवाळी अंक जमवले. शाळा स्तरावर होणारा हा आगळावेगळा उपक्रम म्हणावा लागेल. दिवाळी अंक, त्यातील चित्रे, कविता , कोडी, विज्ञान कोडी असे साहित्य पाहून मुले हरवून गेली. साहजिकच विद्यार्थ्यांना दिवाळी अंकांची ओळख झाली, वाचनाची गोडी सुद्धा वाढली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा भाषिक विकास साधण्याचे काम त्या सहजपणे कररतात.AI च्या काळात विद्यार्थ्यांची कल्पकता वाढावी,पाहिलेले आणि विचारमंथन केलेले त्यांना स्वतःच्या शब्दात बोलता व लिहीता यावे यासाठी त्या सतत परीश्रम घेतात. रूपाली पाटील या स्वतः कविता,कथा आणि लेखही लिहीतात. 


(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक,समुपदेशक आहेत.)
डॉ.कैलास दौंड 9850608611 

रुपाली पाटील : 9421007492

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर