मुलांचे लेखक शिक्षक : एकनाथ आव्हाड
मुलांचे लेखक शिक्षक : एकनाथ आव्हाड
बालसाहित्यिक म्हणून सर्व महाराष्ट्रभर परिचित असलेले एकनाथ आव्हाड हे प्राथमिक शिक्षक म्हणून मुंबईतील चेंबूर येथील अयोध्यानगर म.न.पा. मराठी शाळा वाशीनाका येथे गेल्या बत्तीस वर्षांपासून सेवारत आहेत. इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गाला ते मराठी आणि हिंदी विषयाचे अध्यापन करतात. स्वतः मोठे साहित्यिक असणारे शिक्षक जेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांना भाषा विषय शिकवतात तेव्हा ते तेथील विद्यार्थ्यांसाठी सर्जनाच्या प्रेरणा वृद्धिंगत करणाऱ्या ठरू शकते, याचा प्रत्यय एकनाथ आव्हाड यांनी शाळेमध्ये राबवलेले वेगवेगळे उपक्रम पाहून येतो. एकनाथ आव्हाड यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतच झाले. मोठे झाल्यावर आपण महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवा करायची असे त्यांनी ठरवले आणि त्यांना तशी संधीही प्राप्त झाली. 
आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण भाषिक अनुभव मिळावेत, त्यांचा भाषिक विकास व्हावा, त्यांच्या नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेला बळ मिळावे यासाठी ते शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करतात. या उपक्रमांना शाळेतील मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक मोठ्या उत्साहाने साथ सहभागी होतात. शाळेत कवी संमेलन, कथाकथन, लेखक आपल्या भेटीला आणि बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे, विद्यार्थ्यांचे आकाशवाणीवर कार्यक्रम आयोजित करणे, त्यासाठी संहिता लिहिणे, विद्यार्थ्यांच्या बालकोत्सव कार्यक्रमाची तयारी करणे, मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या मराठी भाषा पुस्तकाचे दरवर्षी संपादन करणे अशा उपक्रमांचा त्यांच्या शाळेत वर्षभर राबता असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि साहित्य जाणीव वृद्धिंगत होतात. विद्यार्थी वक्तृत्व व लेखन स्पर्धा यामध्ये सहभागी होतात, त्यांना आत्मविश्वास येतो त्याचबरोबर आपली मते ते लिहून किंवा बोलून दाखवू शकतात. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागते.
एकनाथ आव्हाड यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक अनुभव पाठीशी असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळात कामाची संधी मिळाली. इयत्ता चौथी व आठवीच्या बालभारती स्वाध्याय पुस्तकांच्या लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. इयत्ता पहिली ते पाचवीच्या मराठी भाषा पाठ्यपुस्तकांच्या लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळावर सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळावर दोन वेळा सदस्य म्हणून काम पाहिले आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना भाषा विषयाचे अध्यापन करत असताना आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून भाषिक जडणघडण करीत असताना त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांसाठीही हे एक मोठे कार्य केले आहे.
एकनाथ आव्हाड हे संवेदनशील वृत्तीचे आणि सर्जनशील बाल साहित्यिक असल्याने त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. गोष्टीरूप कवितांचे ‘बोधाई’, पहिलीच्या मुलांसाठी जोडाक्षरयुक्त कविता ‘गंमत गाणी’, अक्षरांची फुले, मराठी भाषेची गोडी लावणाऱ्या कविता ‘शब्दांची नवलाई’, सादरीकरणासाठी नाट्यछटा ‘मला उंच उडू दे’ , ‘जिवाभावाचा मित्र’ या सह ‘छंद देई आनंद’, ‘पाऊस पाणी हिरवी गाणी’ हे बालकवितासंग्रह आणि ‘आनंदाची बाग’, ‘एकदा काय झालं!’, ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’, ‘प्रकाशाचा उत्सव’ हे बालकथासंग्रह तसेच ‘मजेदार कोडी’, ‘आलं का ध्यानात?’,’ खेळ आला रंगात’ हे काव्यकोडी संग्रह, मिसाईल मॅन हे चरित्र ही त्यांच्या बत्तीस पुस्तकांपैकी काही पुस्तकांची ठळक नावे.
महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात एकनाथ आव्हाड यांच्या साहित्याचा समावेशही झालेला आहे. त्यात इयत्ता दुसरी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'चांदोबाच्या देशात' ही कविता, इयत्ता सहावी सुलभभारती मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'बाबांचं पत्र' हा पाठ, इयत्ता पहिली उर्दू माध्यमाच्या मराठी बालभारतीच्या पुस्तकात ‘शेतकरीदादा’ ही कविता यांचा समावेश आहे तर 'छंद देई आनंद' या त्यांच्या बालकवितासंग्रहाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमात आणि ‘ आनंदाची बाग’ या बालकथासंग्रहाचा’ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.
कथाकथन, काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर करून मुलांचे मनोरंजनही ते करीत असतात. कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथानिवेदक साने गुरुजी पुरस्कार कथामालेच्या वर्धा येथे संपन्न झालेल्या वार्षिक अधिवेशनात सरांना प्रदान करण्यात आला आहे. आपल्याप्रमाणेच इतरही भाषा शिक्षकांनी कथाकथन काव्यवाचन यामध्ये नैपुण्य प्राप्त करून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनात चैतन्य आणावे असे त्यांना वाटते. त्यामुळेच एकनाथ आव्हाड सरांनी कथाकथनाचे पाचवेहून अधिक कार्यक्रम केले आहेत. 'कथाकथन : तंत्र आणि मंत्र' या कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्शनही केले आहे. सकाळ सह विविध वृत्तपत्रातून त्यांनी सदर लेखनही केलेले आहे.
एकनाथ आव्हाड यांना त्यांच्या शैक्षणिक योगदान बद्दल मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षक पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा शिक्षक पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. तर साहित्य लेखनाससाठी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार देखील ‘छंद देई आनंद’ या बालकविता संग्रहाला 2023 मध्ये प्राप्त झालेला आहे. गंमत गाणी, शब्दांची नवलाई या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
~~~
( लेखक नामांकित साहित्यिक असून शिक्षक आहेत.)
एकनाथ आव्हाड - 9821777968
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा