पावसाळा आणि पावसाळी कविता

पावसाळा हा सृष्टीत आनंद भरणारा ऋतू. चराचर पावसाच्या थेंबांनी  चैतन्याची गाणी गाऊ लागतं.पावसाचं असणं नसणं सजीवांच्या असण्या नसण्यासी संबंधीत आहे. म्हणूनच पाण्यासाठी टाहो फोडणारा माणूस पावसाच्या थेंबांनी आनंदून नाचला नाही तरच नवल.
   अनेक कवींनी पावसाच्या अभावाच्या आणि आगमनाच्या कविता लिहिल्यात. पावसाच्या चाहूलीने चातक आनंदतो, मोर नाचतो आणि माणूस देखील! पडणार्य
पावसाच्या दिवसात मी काही कविता लिहिल्या आहेत. त्यातील अनेक कवितांमधून शेती आणि शेतकर्‍यांचा अनुबंध आलेला आहे. एक कविता अशी आहे की त्यात निखळ पावसाचा आनंद आहे. ही कविता वसाण या कवितासंग्रहात आहे.

         //थेंब पावसाळी //

धरेवरी उन्हाचे साम्राज्य चाललेले
रानात माथे तरूंचे सुकून झुकलेले.
तशात पावसाळा बाप होऊन आला
माळावरी तयाचा फडकतो मुक्त शेला.

घनगर्द सावल्यांनी अचलास घेरलेले
अरण्य अन् उभेच, उसासे सोडलेले
जळात तटाकाच्या मुक्त विहरतो पक्षी
गोंदुन तशीच जातो, गुढ अनामिक नक्षी.

कणा ताठूनी उभी, अंबराई वृद्ध ओली
डोहात कातळाच्या झरा ओततो पखाली
द-यातूनी गहिरी शीळ कानात येते
मंतरूनी मनाला दूर रानात नेते 

डोंगरात राऊळाच्या हिर्वळ भोवताली
अलवार फुलांची पखरण घातलेली
जाळीत हेकळीच्या कुजबूज साद कानी
थेंब पावसाळी वेडा रानात गाई गाणी.

*********************************

      कैलास दौंड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर