फादर्स डे चे निमित्त

आज फादर्स डे असल्याचे समजले. माझे वडील नाना(श्री. रायभान दौंड ). शिक्षक म्हणून डिसेंबर १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाले. १९५१ते १९९२या संपूर्ण सेवेमध्ये स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणे सेवा केली. राजकारणी आणि पुढारी यांच्या हातात बदल्या असत तरीही त्यांनी लाळघोटेपणा केला नाही उलट संधी मिळेल तेव्हा ते त्यांना फटकारत असत. पाथर्डी,नेवासे, श्रीरामपूर, शेवगाव या तालुक्यातील शाळेमध्ये व  अकोले, संगमनेर तालुक्यातील दुर्गम शाळात नोकरी केली. त्यांनी नोकरी केलेल्या गावातील लोक भेटले की ते आजही त्यांच्याबद्दल आदराने बोलतात. त्यांची मुले म्हणून आमचं कौतूक करतात. त्यांचे अनेक विद्यार्थी आता वृद्ध्त्वाकडे झुकलेले असुनही त्यांच्याशी खूप आदबीने आणि आदराने बोलतांना पाहून बरे वाटते.
सेवानिवृत्ती नंतरची पंचवीस वर्षे नानांनी कोरडवाहू शेतीशी दोस्ती केली.पैठणची वारीही ते करत होते. अलीकडील काळात ही वारी थोडी अनियमित झाली .एक प्रसंग आठवतो नाना मी हायस्कूलला शिकत असताना एकदा पिंपळगव्हाणला जातांना येळी ला (ती एकमेवच वेळ होती. )माझ्या शाळेत आले होते. नेमका त्या दिवशी मी दुपारून पळून जाऊन घरी पोहोचलो होतो.मात्र घरी आल्यावर ते रागावले नव्हते याचे मला तेव्हाही आणि आताही आश्चर्य वाटते.
       नाना समाज्यात जसे कडक तसेच ते घरातही  कडकच होते त्यामुळे घरात फक्त आईचेच प्रेम व वडिलांची शिस्त आम्हा भावंडांना मिळाली. नाना घराच्या बाहेर पडतांना  नेहमी त्यांच्या आईचे (आमच्या आजीचे )दर्शन घेऊनच बाहेर पडत.(त्या१९९१ मध्ये गेल्या)आर्थिक परिस्थिती जेमतेम असुनही जमेल त्याला त्यांनी मदत केली खास करून मुलींच्या लग्नात. विशेष म्हणजे त्यांना काही तरूण मित्र आहेत.
नानांचा स्वभाव उतारवयात बर्‍यापैकी मायाळू झाला आहे.
नानांना धार्मिक ग्रंथ वाचनाची खूप आवड आहे. त्यातून ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा.इतर संतांचे अनेक अभंग, हरिपाठ, अनेक भारूडे, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम मुखोद्गत आहे. ते प्रवचने देखील सांगत. श्रावणात गावातील ग्रंथ वाचन व निरूपण करण्यातही ते निपुण आहेत. पण आता ते थकलेत. तरी उत्साह कायम आहे. दररोज सकाळी थंड पाण्याने स्नान, नित्यपाठ आणि मिताहार, नियमीत शेतात जाणे, कार्यरत राहणे ही त्यांच्या जीवनाची गुरू किल्ली आहे.
नानांना फोटो काढल्याचे आवडत नाही. त्याच्या नकळत काढलेले दोन फोटो इथे ठेवलेत. [[ ति. नाना बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे पण आजच लिहिलेच पाहिजे असे नाही. पुन्हा कधीतरी ]]

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर