नवी कादंबरी : तुडवण

तुडवण ही कादंबरी येणार असे भाकित मी २०१२ मध्येच केले होते. कादंबरी लेखनाला सुरूवात देखील केली होती. मात्र कथानक पाहिजे अशी गती घेत नव्हते. त्याच्या मागणीची पुरवापुरव करण्यात बराच वेळ जात होता. सुरूवातीचा काही भाग कथा रूपाने काही मासिकातून दिला होता. 
    तशातच NET परीक्षा दिली आणि त्या हेतुने मुद्दाम काही वाचन केलेले नसूनही पहिल्या प्रयत्नात पात्र झालो. Ph. D करावयाची सुप्त इच्छा मनात होतीच. PET दिली. डाॅ. डुंबरे सरांसारखे मार्गदर्शक लाभले. इ. स. २००० ते २०१० या कालखंडातील मराठी ग्रामीण कादंबरीचा चिकित्सक अभ्यास. या संदर्भात संशोधन करून २०१५ मध्ये विद्यावाचस्पती पदवी संपादन केली. 
     आणि पुन्हा कादंबरी कडे वळलो. या वर्षी कादंबरी लिहून झाली असे वाटले. गंधाली दिवाळी अंकांतून ती प्रकाशित झाली. २५०० रू. मानधन मिळाले. पण ही कादंबरी आपण मध्येच सोडली आहे. असे मनाला सतत वाटत राहिले. मग पुन्हा एकदा पुनर्लेखन सुरू केले. ग्रामीण तरूण, ग्रामीण स्रिया यांच्या जगण्याची लढाई, त्यातील अडथळे, सामाजिक वास्तव आणि तगधरू मानसिकता, जगण्याची उमेद, कठीण काळात बाळगलेली प्रचंड आशा या बाबांनी तुडवणला खूप पुढे नेले. 
      मॅजेस्टिक चे सन्मा. कोठावळे यांनी उत्सुकता दाखवली म्हणून त्यांना हस्तलिखित पाठवून दिले. ते मे २०१७ मध्ये. त्यांच्याकडील तज्ञांनी ते वाचण्यास अधिक वेळ घेतला. प्रादेशिक भाषेमुळे ते पुन्हा दुसर्‍या तज्ञाकडे देण्यात आले. काही दिवसांनी त्यांचा सकारात्मक अभिप्राय प्रकाशकांना प्राप्त झाला. 
        मग कादंबरी पुस्तक रूपाने येण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि १ सप्टेंबर २०१९ रोजी तीने पुस्तकरूप धारण केले. मला तुडवण ची प्रत  नऊ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दुसर्‍या दिवशी मिळाली. तत्पूर्वी ती  विक्रीसाठी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे, पुणे , मुंबई येथे व ONLINE उपलब्ध होती. 
कापूसकाळ या बहुचर्चित कादंबरीनंतर तब्बल दहा वर्षांनी तुडवण ही कादंबरी प्रकाशित झाली.
  
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर