तुडवण: ललित लक्षवेधी पुस्तक

ललित लक्षवेधी: फेब्रुवारी २०२०: प्रा. सुहासिनी किर्तीकर, मुंबई 

तुडवण : कैलास दौंड
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस : ३०८, फिनिक्स ४५७, एस.व्ही.पी.रोड, गिरगाव, मुबई-४००० पृष्ठे : २४५, मूल्य : तीनशे रुपये

शेती, जमीन, शेतकरी हा मराठी मनात रिघलेला विषय. स्वप्ने अधिक रंजकपणे पाहणाऱ्या साहित्यात.विशेषतः कवितेत वा गीतात; या विषयाभोवती कविकल्पना रुंजी घालत राहते. कोवळे, सुंदर, हृदय असे भावचित्र उभे करते. अशा भावगीतातून एखादा शेतकरी बायकोला म्हणतो, ये पिकवू अपुला शेतमळा, उगवू मोतीचुरा.
     ते हिरवे लोलक डुलती, भरला हरभरा'... किंवा 'काळ्या काळ्या शेतामधी घाम जिरव घाम जिरव, तेव्हा उगल उगल काळ्यामधून हिरव...' पण वास्तवात ते इतके प्रेममय, उत्साहजनक नसतेच.मोतीचूर उगवतोच असं नाही; उलट अनेक स्वप्नाचा चुरा होत जातो. कष्टांना सीमा नसते. दारिद्र्याला असीम जमीन असते. संसार गाठी मारमारून करावा लागतो, एकेक आयुष्य मातीमोल होत जाते. हे सगळे वास्तव 'तुडवण' या कादंबरीत जिवंत झालं आहे. मात्र या वास्तवाला स्वप्रयत्नाने तुडवत कादंबरीतील व्यक्ती आपापल्या ताकदीने सामोर्या जातात. 'तुडवणची वाट दाखवताना स्वतः कैलास दौंड यांनी सुरुवातीलाच म्हटले आहे की, देव किंवा दैवशरण न होता आल्या क्षणांना सामोरे जात आणि आशेचे कोवळे अंकुर जिवंत ठेवत प्राणांतिक आघात सोसत केलेले मार्गक्रमण अधिक चांगल्या जगण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरते. 'तुडवण चा धागा हाच आहे." (पृ. ७)
        अधिक चांगल्या जगण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल नेहमीच खात्रीशीर पाऊल ठरतेच असे नाही.या कादंबरीतील नारायण हा सुशिक्षित तरुण तशी पावले टाकण्याची धडपड करतो. 'डी.एड. ही शिक्षकासाठी लागणारी पात्रतापदवी त्याच्याकडे आहे.कुठल्याही शाळेत मास्तरकी करून दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराची त्याला शाश्वती हवी असते.आईवडील, बहीण 'सिंदाड्या'त, पाऊतका त राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे घटक.(सिंदाडा ही शिंदीची झाडे असलेली तर, पाऊतका ही एक कबर असलेली नवनाथची परंपरागत शेतजमीन. नारायण नवनाथचा आणि राधाक्काचा मुलगा.) कुटुंबाच्या भल्यासाठी नारायणला नोकरी हवी असते. पण शाळेत नोकरी हवी तर व्यवस्थापनाला नऊ लाख द्यायचे. त्यासाठी 'सिंदाडा' विकून टाकावा हा त्याचा पर्याय. पण कुटुंबाच्या एकीला इथेच तडे जातात. नवनाथला व्यवहारी शहाणपणाने आणि अर्थात जमीनप्रेमाने हा पर्याय मान्य नाही. मग नारायण हा शिक्षित तरुण शिक्षणाचा तुरा न मिरवता मेहनत करतो. टेंपोत सामान भरणे, चंदनासाठी झाडांची चोरी करणे (हे काही काळच.). मुंबईत येऊन ट्रक चालवणे... अशी कामे करता करता त्याला 'तुपलाप ( वडील) जमीन विकु देत नाहीत याचा राग आहेच.
त्यातूनही एरवी कुटंबाला हादरे बसतच असतात. राधाक्काची अब्रु लटली जाते. मुलीच्या लग्नासाठी 'हरणी' गाय विकली जाते. गावातील धेंडं इथून तिथून लूट करीतच असतात. मेहनतीचे पैसे हाती आले तर बहिणीला लग्नासाठी एखादी साडी, परकर घेण्याआधी नारायणला सहा हजारांचा मोबाईल घ्यावासा वाटतो.  टेऺपो वा ट्रक घेण्यासाठी अ

खेरीस नवनाथ सिंदाडा' पट्टा विकतो, तर त्यातल्याच पैशातून नारायण आधी 'टू व्हिलर' घेतो. या सगळ्या व्यवहारामागची आजची जगण्याची मानसिकताही दौंड यांनी प्रसंगाप्रसंगातून सहजपणे मांडली आहे.
      जमिनीशीच बांधलेले मनामनांचे धागे एकेका घटनेतून तटातट तुटत जातात. एक कुटुंब पूर्णपणे उध्वस्त होताना दिसत राहते. त्याभोवती सारा गावगाडा आहे. छक्केपंजे आहेत. जमीन विकल्यावर नवनाथ परागंदा होतो, म्हणून त्याच्या परतीसाठी नारायण दुसरी जमीन घेतो, फसतो,लुटला नागवला जातो.
मोटारबाईकही त्याची चोरीचा मामला निघतो. त्यात बहिणीचे, बायकोचे बाळंतपण, विमनस्क आईचा सांभाळ... मग विहिरीच्या कामासाठी खाली खोलवर उत्तरल्यानंतर या नारायणाचाच यंत्र बळी घेते. त्याने केलेली प्रत्येक घडपड अशी शून्यवत होत तो संपतो. ही त्याची अगतिकता लेखकाने अनेक प्रसंगांतून तपशीलवार साकारली आहे. हे सर्वच प्रसंग म्हणजे जिवंत नाट्य आहे. यातली प्रत्येक व्यक्तिरेखा खरेपणाने साकारते.
        याला कारण दौंड यांची त्या प्रदेशाशी इमान राखून आलेली शैली. सिदाड्याच्या शेतीचे वर्णन करताना ते म्हणतात, "(झाडे) वर शेड्याला मोघं लावायसाठी हाणलेल्या खाप्यामुळे मानमोडीचा रोग झाल्यासारखी खुडूक होऊन बसलेली. जणू जगण्याच्या सीईटीत नापास झालीत ती! त्यांना कोणी पासच होऊ दिलं नाही." (पृ. ९) नारायण सीईटीत नापास, म्हणून त्याच्या मनात ही निःसत्व झाडे अशी उभी राहतात.गावातल्या न्हाव्याच्या दुकानात येणाऱ्या वर्तमानपत्रावर अनेकजण तुटून पडायचे, कारण दुसरीकडे कुठे ती सोयच नाही. म्हणून लोक/माणसं 'लगेच टवकारायचे.'त्यांनी वर्तमानपत्र दुकानात टाकलं की लगेचच एखाद्या भदाड्या डुकरिनीला तिच्याच आठदहा पिल्लांनी एकदम लुचावं तशी झुंबड उडती त्याच्यावर, (पृ. १५) कधी माणसाची प्रवृत्ती दाखवताना ते 'आय गोड की खाय गोड' या गावरान म्हणीचा आधार घेतात किंवा 'चुल्ही झाल्या दोन आन तुम्ही आम्ही कोण?' अशीही म्हण नेमक्या जागी येते. मुलगी यमुनाचं लग्न ठरतं तर गाईला चारा टाकताना तिच्या मनात विचार 'दाटून' येतो की 'एकदा दावणीला बांधलेली गाय लई तर लई काय करीन? तर समोर मांडलेली पाण्याची बादली लवंडून देऊ शकेल! त्या पलीकडं काय? आणि पोरींचंबी काय? लग्न झाल की दुसरी दावण! दावण बदलल्याचाच काय तो हरीख.' (पृ. १२२) असं कितीतरी. माणसांच्या मनातले विचार, माणसांच्याबरोबर झालेले संवाद, प्रसंगांचं थेट वास्तव चित्रण, प्रत्येक माणसाची मानसिकता, कुटंब आणि गावगाडा यांचे परस्परसंबंध, गावातील विविध माणसांची वागणूक आणि मानसिकता, माणसांचे व्यवसाय- राजकारण-अर्थकारण, निसर्ग आणि घटनांमधील अपरिहार्यता... आदींमुळे नवनाथचे कुटुंबच नव्हे तर, संपूर्ण 'गोडजळगाव' आपल्यासमोर वावरते, वाचता वाचता आपण त्यात मिसळून जातो. 
       संपूर्ण 'गोडजळगाव' त्याच्याभोवतीची गावे म्हणजेच समाज. म्हणूनच कौटुंबिक ताणतणावा बरोबरीने सामाजिक ताणतणाव येत राहतात. मात्र या कादंबरीचा शेवट वाचकसन्मुख होऊन भविष्यकालीन आशाचित्र रेखाटतो. नवनाथ बेपत्ता, नारायणचा अपघाती मृत्यू, सुनेचे माहेरी जाणे... असे नशिबाचे उलटे फासे पडूनही राधाक्का छोट्या नातवाला घेऊन पुणे शहरात 'जगायला आणि नातवाला 'शिकवायला' जाते. हा शेवट म्हणजे लेखकाने सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 'राधाक्का कठिणात कठीण प्रसंगातही आपल्या मनोबलाने उजेडाचा किरण शोधत राहते.'रूपलीबरोबर नातवाला घेऊन पुण्याला जाताना ती कुलूप लावते. तेव्हा 'अनेक दुःखद प्रसंगांना जणू तिनं घरात अंधारात कुलूपबंद केलं.' असे चित्रण येते आणि 'आता चांगलीच सकाळ झाली होती.' हे शेवटचे वाक्य जणू 'चांगलीच सकाळ' शब्द अधोरेखित होत सूचक, उज्ज्वल जगण्याची वाट दाखवितात.
       योगायोग म्हणजे या पुस्तकाची पाठपृष्ठातून पाठराखण मीच केली आहे. तेव्हा तिथली काही वाक्ये इथे आली तर ते औचित्यपूर्णच ठरावे. तिथे असे म्हटले आहे की, 'नारायण या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तिरेखेची आयुष्यभराची तुडवण या कादंबरीमधून व्यक्त होत असली तरी ही एका व्यक्तीची कहाणी नाही. व्यक्ती-समाज, गावगाडा-शहरी जीवन यांची सांगड घालताना शिक्षण व्यवस्था, शेती व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, व्यापारबांधणी.. असे समग्र चित्रण या कथानकात आहे.
    प्रभावी बोलीभाषा, प्रसंगचित्रण समजावे म्हणून या कादंबरीच्या शेवटी शब्दांचे अर्थही दिले आहेत.त्यामुळे शहरी वाचकाला बोलीभाषेतील शब्द तुडवत तुडवत वाट काढावी लागत नाही. हे विशेषच. 'पाणधुई', 'कापूसकाळ' नंतरची कैलास दौंड यांची ही कादंबरी त्यांच्या पुढील लेखनाबद्दल आपल्या अपेक्षा वाढवणारी आहे.

सुहासिनी कीर्तिकर
मुंबई
___________


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर