आधुनिक ग्रामवास्तवाचा आलेख : तुडवण / विठ्ठल जाधव
पुस्तक परिक्षण
○ आधुनिक ग्रामवास्तवाचा आलेख - तुडवण
○ विठ्ठल जाधव
कास्तकाराच्या पिढ्या परंपरागत वेदनादायी जीवन जगत आल्या आहेत. 'खेड्याकडे चला' हा महात्मा गांधी यांचा संदेश आजपावेतो आणि यापुढे कैक पिढ्या अंमलात येईल याची शाश्वती नाही. द्रारिद्र्य आणि अज्ञान यांच्या खाईत खितपत पडलेल्या ग्रामसमाजास दिशा देण्याचे काम लोकशाही व्यवस्थेने करावे , हे अभिप्रेत असताना तसे मात्र घडत नाही. अंधःकाराच्या कडा अधिकच गडद होत जात आहेत. फक्त पांघरून बदलले आहे समस्या कायम आहेत. शेतीव्यवसायात बदलत्या जीवनशैलीमुळे जटीलता आलेली आहे. कायद्याचा अर्थ स्वार्थाच्या बाजूने लावला जात आहे. त्यामुळे नातेसंबंध, गावखेडी उध्वस्त होऊन नवीन समाजरचना निर्माण होते आहे. ही सल 'तुडवण' या कैलास दौंड यांच्या कादंबरीच्या निमित्ताने पुन्हा नव्याने केंद्रस्थानी येत आहे.
गावखेड्याचे आणि शेतीमातीचे बदलते तळकोपरे यानिमित्ताने उजागर होताना दिसतात. ग्रामीण भूमिवर आशयसुत्र गुंफत नात्याच्या बदलत्या रूपबंधाचेही विवेचन 'तुडवण' मध्ये आलेले आहे. जागतिकीकरणातील बदलते मानवी चेहरे आणि स्वभावविशेष टिपण्याचा लेखकाचा हेतू आहे. शोषक आणि शोषितांची नविन बांधणी समग्र ग्रामीण परिसरात अनुभवायला येतेय. आज प्रश्नाचे स्वरूप बदलले तरी नवे प्रश्न कायम आहेत. जिथे प्रश्न आहेत तिथे साहित्यनिर्मिती आहे. ती कथा, कविता, कादंबरी, नाट्य आदी वाङ्मयप्रकारांनी आविष्कृत होतो. कादंबरी हा दीर्घ आणि विस्तृतपणे विवेचन, मांडणी करता येणारा प्रकार आहे. साधारणपणे १९२० नंतर ग्रामीण साहित्य लेखन झाले. सदाशिव पेठेच्याबाहेरही काही समाज राहतो आणि कृषक संस्कृतीचे तो प्रतिनिधित्व करतो. उत्पादकतेशी संबंध असुनही तो दुर्लक्षित आणि शोषित आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उन्नतीकडे पुर्णतः दुर्लक्ष झालेला हा कृषक समाज. त्याचे जगण्याचे संदर्भ ग्रामीण साहित्याने टिपले सशक्तपणे आहेत.
आजही ऊस, कापूस या नगदी पिकांवर राजकारण आणि ग्राम अर्थव्यवस्था टिकून आहे. सिंचनाच्या योजना मध्येच पाझरल्याने पाऊस या नैसर्गिक स्त्रोतावरच अवलंबून राहणारा कास्तकार देशोधडीला लागला आहे. ' बळीराजा ' ही अवमूल्यन आणि मूल्यहीनता व्यक्त करणारी शब्दरचना आता सरकारी 'खाबू- बाबू'कडे आकर्षित झाली आहे. जमीन पिकत नाही म्हणून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जमीन विकणारी पिढी चंगळवादी बनते आणि आपले अस्तित्व हरवून बसते याचे ज्वलंत चित्रण कैलास दौंड यांनी 'तुडवण'मध्ये केले आहे. ऊस, कापूस, दूध यांसारख्या शेतमालाला भाव मिळत नाही. अण्णाभाऊ साठे, व्यंकटेश माडगूळकर, विभावरी शिरूरकर, मधु मंगेश कर्णिक, चिं.त्र्यं. खानोलकर, आनंद यादव, उद्धव शेळके,आनंद पाटील, रणजित देसाई, मोहन पाटील, बाबाराव मुसळे, उत्तम बंडू तुपे, रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे,भीमराव वाघचौरे, भास्कर चंदनशीव, द.ता.भोसले, सदानंद देशमुख, प्रतिमा इंगोले, राजन गवस, नवनाथ गोरे यांसम लेखकांनी ग्रामीण साहित्य चळवळ जोमाने चालविली. बदलत्या ग्रामवास्तवाचे प्रादेशिक चित्रण त्यांनी आपल्या लेखनातून मांडले.
आजमितीस सशक्त मांडणी करणारा लेखक म्हणून कैलास दौंड यांचेकडे साहित्य क्षेत्राचे लक्ष वेधले आहे. 'कापूसकाळ' या कादंबरी समवेतच 'तुडवण' कादंबरी प्रवास करते. कापूस वेचणी संपल्यावर तो ट्रक , टेम्पो या अशा वाहनात तो भरावा लागतो. व्यापारी कोरडा माल खरेदी करतात. त्याच्यावर पाणी शिंपडून ट्रक भरताना माणसं त्याला तुडतात. ती कापसाची तुडवण पण त्याप्रमाणेच भागातील प्रत्येक कास्तकाराची अशीच तुडवण सालोसाल सुरूच आहे. नव्या सुखसोयींनी गावखेडी बदलत आहेत. या बदलत्या जीवनशैलीमुळे जगण्याचे प्रश्नही बदलत आहेत. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी त्रिस्तरीय रचना उलट्या क्रमाने फिरते आहे. याचे जळजळीत चित्रण या लेखकाने 'तुडवण' मध्ये टिपले आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमारेषा म्हणजे अहमदनगर, बीड, औरंगाबाद या जिल्ह्याच्या सीमेवरचा भूभाग जीवंत करण्यात कैलास दौंड कैकपटीने यशस्वी झाले आहेत. कादंबरीमध्ये उल्लेखित ठिकाणे शिरूर, कोळगाव, गोडजळगाव, खडकवाडी, बोरसांगवी, कवडगाव ही याच परिसरात साधर्म्य विदीत करणारी आहेत. सकटे, गर्कळ, दराडे, बढे, राऊत, मोहिते, पवार, सावंत, तोडकर, क्षीरसागर अशी आडनावे याच परिसरातील. भाऊ, बाबा ही वंदनीय संत मंडळी. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, ही नगर जिल्ह्यातील शिरूर, आष्टी, पाटोदा, बीड, केज ही तालुके कायम दुष्काळी आणि अत्यल्प पाऊस पडणार्या पर्जन्यछायेत असलेली. जनावरासाठी छावणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर ही दरवर्षी हमखास सुरू असतात. मग पुढारखाना या गुळाला चिकटतो . त्यांना दुष्काळ पावतो. छावणी लॉबी, टँकर लाॅबी, वाळू माफिया आणि नव्याने प्रवेशित शिक्षण , आरोग्य माफिया या माफियाराज संस्कृतीचा काळा कृत्यकाळ 'तुडवण'मध्ये येतो.
नारायण हा कादंबरीचा नायक आहे. त्याभोवती नवनाथ, राधाक्का, यमुना, रूपली, सुदाम, सुभाष, कल्याण, गिन्यानदेव, इशिनाथ, विष्णू अशी पात्रे फिरतात. कथानक भरभर पुढे जाते. वाचकाला गुंतवून ठेवते. एकदा वाचायला हाती घेतलेली कादंबरी खाली ठेवावी वाटत नाही. मोझेकप्रमाणे सरसर पडदा सरकतो. घटनाक्रम वाचकमनाची गुंतवणूक करतो. कादंबरी रंजन न करता वास्तवाची जाणिव करून देते. जीवन व्यवहाराची बीजे ठायी ठायी अधोरेखित होतात.
ग्रामीण स्तरावरील देवता, त्यांच्यावरील माणसांचा विश्वास, भोळ्या श्रद्धेपोटी होणारी पिळवणूक, शासनाचे प्रतिनिधी रक्षणकर्ते हे भक्षक कसे होतात. चातुर्वण्य स्तरीय व्यवस्था नव्याने उभी राहतेय. शेतीव्यवस्थेच्या शोषणाचे नवे मार्ग उभे राहताहेत. ते सूक्ष्मपणे टिपण्यात 'तुडवण'चा प्रवास होतो. भैरवनाथाचे मंदिर हा ग्रामश्रध्देचे प्रतिनिधित्व करते.
नारायण हा शिक्षण, शेती , मजूर या व्यवस्थेचा बळी आहे. शरीरानं आणि मनान अशांत नायक. वर्तमान तरूण पिढीचं नेतृत्व करतोय. डी.एड्. होऊन सीईटीत न बसल्याने बेरोजगार युवकाचे जीणे वाट्याला येते आणि परिस्थितीशी चाललेली त्याची झुंज अपयशी ठरते. तो जमीन विकून टँम्पो घेण्याचे स्वप्न उराशी बाळगतो. क्लिन्नर आणि किन्नर यांच्या समस्यांचे मूळ शोधत ट्रक ड्रायव्हरचे प्रशिक्षणासाठी शहरात प्रवेशतो. तेथील नागरी जीवनही कादंबरीत येते. माणुसकी जपणारी आणि माणुसकी हरवलेली माणसं यांच्यातील द्वंद्व पदोपदी जाणवते. राधाक्कावर गुजरलेला अतिप्रसंग समाजव्यवस्थेची चिरफाड करणारा आहे. दुबळी प्रशासनव्यवस्था राधाक्कावरील अत्याचाराला न्याय देऊ शकत नाही. अशा राधाक्का समाजात अनेक आहेत. विद्रोहाचे लाखोंने निघालेले मोर्चेही ही व्यवस्था सोयीस्कर पचवते. मेणबत्त्या पेटवण्या पलिकडे समाज काहीच करत नाही. यमुनी आणि रूपली ही पात्रे आधुनिक स्त्रीचे प्रतिनिधी आहेत. परिस्थितीने हतबल झालेली असताना मातीत घट्ट पाय रोवून राहण्याचा त्यांचा नैसर्गिक गुण त्या दाखवतात. शेती हा माझा आत्मा आहे. 'ती विकणार नाही आणि विकू देणार नाही' या बाण्याने जगणारा बाप. बापाचे कष्ट, तडफड बाप झाल्याशिवाय कळत नाहीत. असे हतबल नवनाथ पदोपदी आहेत. गुराची छावणी की छळछावणी हाही विषय! छावणीसारख्या दुष्काळी उपाययोजना तोकड्या आहेत. मलमपट्टीचाच तो भाग. सिंचनाचा अनुशेष हा मूळ गाभाप्रश्न कैलास दौंड हे या निमित्ताने उभा करतात. फसवे व्यवहार आणि शेतकरी विरोधी कायदे तसेच नविन तंत्रज्ञानसाधनाने होरपळलेली ही पिढी जगण्याचा संघर्ष करते. ते कादंबरीत वाचायला मिळते. नोकर आणि शेतकरी यांच्यातील उच्चनिचता नव्याने तयार होते. नारायण हा बांधावर दोलायमान पद्धतीने उभा आहे. असे असंख्य नारायण आज समाजात पदोपदी आहेत. प्रसंग आणि पात्रं यांची सांगड, स्थळ, काळ, वेळ यांचे यथार्थ वर्णन अत्यूच्य आहे. झोंबी, नांगरणी, गोतावळा, घरभिंती, पाचोळा या कादंबऱ्यांची प्रचिती पुनः नव्याने यावी. इतपत ही गुंफण साधली आहे. त्यांनी माणदेशी माणसं चितारली कैलास दौंड यानी मराठवाडी माणसं उभी केली. प्रादेशिकतेच्या मर्यादा बोलीभाषेशी संबंधीत असल्या तरी संबंध मराठी मुलखातील आजचे शेतीचे प्रश्न वेगळे नाहीत. किंबहुना भारत या शेतीप्रधान देशाचेच ते प्रश्न आहेत. सूक्ष्म निरीक्षण, अचूक शब्दरचना, उचित प्रसंगनिवड जिवंतपणा येतो. लग्न, गोंधळ, सणवार, येतीजाती, बाळंतपण, आजार , बाजार अशा माध्यमातील अनाकलनीय व्यवहार ते मांडताहेत.
शेटजी, भटजी आणि लाटजी ( नोकरदार ), बाबा बुआ यांनी शेतीवर गुजरान करणाऱ्या शेतकरी वर्गाचे कसे शोषण केले त्याचाही आलेख इथे मांडला आहे. जातीय व्यवस्थेचा अभिनिवेश घेऊन जगणारी माणसं आणि कोमल स्वप्न पाहणाऱ्या नवकुमारीका अधुन मधुन प्रवेश करतात. ड्रायव्हरकीच्या नादात स्वतःच्या जमिन विकलेल्या रानात विहीरीवर क्रेन चालवायला गेलेला नारायण मृत होतो. त्याच्या रक्ताने विहीर रक्ताळते. तेही स्वतःची पण दुसऱ्याच्या मालकी झालेल्या विहीरीवर ! नवनाथ वेडा होऊन गायब तर राधाक्का अत्याचारीत म्हणून नातवासह जिणे जगते. तेव्हा वाचकही मनातून हळहळत असतो. तसा नारायण मोठे बंड , विद्रोह करताना आढळत नाही जणू तो आजच्या तरूणांचाच प्रतिनिधी. परिस्थिती त्याला गुलाम बनवते. तरल, सरल , सुलभ कथानक मनाला भावते. विचार करायला लावते.
• तुडवण (कादंबरी)
• लेखक :डॉ. कैलास दौंड
• प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई.
• प्रथमावृत्ती : सप्टेंबर २०१९
•पृष्ठे: २४५ ○मूल्य: ३००₹
~~~~~~~~~~~~~~~
---- विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
सं.९४२१४४२९९५
vitthalj5@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा