● बहुजन संस्कृतीचे जनक : महात्मा जोतीराव फुले

 

   ●  बहुजन संस्कृतीचे जनक : महात्मा जोतीराव फुले .

                                                        डाॅ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com /9850608611

                    फुले आंबेडकरी प्रागतिक विचारधारेचे विचारवंत प्रा.  डाॅ. प्रल्हाद जी लुलेकर यांचा 'बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा जोतीराव फुले' नावाचा महत्त्वाचा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामुळे महात्मा फुले यांच्या कार्याचे आणि विचारधारेचे पैलू उलगडून दाखवणार्‍या साहित्य साधनात मौलिक भर पडली आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या बहुआयामी कार्याचा आणि शेतकरी तसेच शोषित यांच्या विषयीच्या विचारांचा मागोवा या ग्रंथात लेखकाने व्यापकतेने घेतलेला आहे. 

   या पुस्तकात महात्मा फुले यांच्या एकुणच विचार आणि कार्याचा आढावा घेतांनाच आजच्या काळात देखील या विचारांची उपयुक्तता अधिक असल्याचे  ठळकपणे दिसते . त्यामुळे विचारांची दिशा सुस्पष्ट नसलेल्या आजच्या बहुजनांना वैचारीक दिशा देण्याचा प्रयत्न देखील 'बहुजन संस्कृतीचे जनक: महात्मा जोतीराव फुले' या पुस्तकातून सहजच होतो.  स्वतः लेखक प्रा.  प्रल्हाद लुलेकर यांनी प्रागतिक विचारधारेच्या अनुषंगाने केलेले भाष्य वाचकांना सजग भान द्यायला मदत करणारे आहे. या ग्रंथाची मांडणी 'महात्मा फुले यांचे पहिले चरित्र', 'बहुजन संस्कृतीचे जनक', 'एवढे अनर्थ एका अविद्येने..', 'सत्य आणि नीती हाच धर्म', 'फुले - आंबेडकरी दृष्टीने वाङमयेतिहास लेखन' या पाच प्रकरणात केलेली असुन संदर्भग्रंथ सूची, महात्मा जोतीराव फुले यांचा जीवनपट, प्रल्हाद लुलेकर यांचा परिचय अशी तीन परिशिष्टे देखील ग्रंथाच्या अखेरीस समाविष्ट केल्याने ग्रंथाचे संदर्भ व संशोधन मूल्य वृद्धिंगत झाले आहे. त्याच बरोबर प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी ग्रंथकर्त्याने दिलेले संदर्भ ,टीका यामुळे अभ्यासक आणि वाचक यांना संशोधनाचे स्रोत समजतात तसेच अभ्यासग्रंथांची देखील माहीती होते. अनेक संदर्भ ग्रंथ,जुनी वृत्तपत्रे, विविध लेख यांच्या आधाराने लेखकाने हा बहुमोल वैचारीक ऐवज या पुस्तक रूपाने महाराष्ट्राच्या हातात ठेवण्याचे मोठे कार्य केले आहे. 

       'जोतीराव फुले यांचे पहिले चरित्र' या पहिल्या प्रकरणात लेखकाने सत्यशोधक चळवळीतील नेते  पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेल्या  महात्मा फुले यांच्या पहिल्या विस्तृत चरित्राचा त्याच्या मौलिकतेसह परिचय करून दिला आहे. हे करतांना त्यांनी म.  फुलेंच्या पहिल्या चरित्राचे लेखक असलेल्या व  सत्यशोधक चळवळीला वाहुन घेतलेल्या पंढरीनाथ पाटील यांच्या कार्याचीही विस्तृत माहिती  प्रथम  दिली आहे. याचे कारण म्हणजे ' परिवर्तनाच्या चळवळीचा इतिहास प्रस्थापित सांगत नसतात. तो इतिहास प्रस्थापित व्यवस्थेने विस्थापित केलेल्यांनी लिहायचा असतो आणि सांगायचा असतो '(पृष्ठ १६). असे लेखकाच्याच शब्दात सांगता येते. महात्मा फुले यांच्या पहिल्या चरित्राचा सम्यक आढावाच या प्रकरणात लुलेकर घेतात.  प्रयत्नपूर्वक लिहिलेले हे फुलेंचे पहिलेच चरित्र होते असे सांगतांनाच या लेखनातील भाषेकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे.'साहित्यातील लालित्य आणि इतिहासातील सत्य यांचा सुरेख मेळ त्यांनी घातला' असे पंढरीनाथ पाटील यांच्या लेखनाबद्दल गौरवोद्गार ग्रंथ लेखकाने काढले आहेत. पंढरीनाथ पाटील यांनी फुलेंचे चरित्र लेखन करतांना त्या काळच्या प्रसारमाध्यमातील सामग्रीचा सूक्ष्मपणे अभ्यास केला. त्यासाठी विविध परीषदांचे २३ अहवाल वाचून काढले ,विविध चरित्र ग्रंथासह १२४ संदर्भ ग्रंथांचे वाचन केले. असे लेखकाने पृष्ठ क्रमांक २४ वर नोंदवलेले आहे. या चरित्राच्या निमित्ताने देशाला पहिल्यांदा महात्मा फुले यांचे विस्तृत आणि सर्वंकष चरीत्र मिळाले. परिपूर्ण परिवर्तनाची दिशा देणारा पंढरीनाथ पाटलांचा सदर ग्रंथ सत्यशोधक चळवळीचा अनमोल दस्ताऐवज असल्याचा निर्वाळा प्रा. डाॅ. प्रल्हाद लुलेकर यांनी इथे दिला आहे.
       'बहुजन संस्कृतीचे जनक' हा भाग म्हणजे ग्रंथाचा मूळ गाभाच आहे. या प्रकरणात 'बहुजन' या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करतांना -' सामंत व्यवस्थेत आणि भांडवली व्यवस्थेत सर्वदृष्टीने शोषण झालेले 'सर्वहारा' लोक म्हणजे बहुजन. अशी व्याख्या ते करतात. सामाजिक आणि सांस्कृतिक, धार्मिक आणि जातीय, राजकिय आणि शैक्षणिक विषमतेमुळे आर्थिक शोषण झालेले लोक म्हणजे बहुजन.' अशी मांडणीही लुलेकर करतात.(पृष्ठ ४३). तर पुढील पृष्ठावर बहुजन वर्गाची चौदा लक्षणे ते विस्ताराने मांडतात. 'शिक्षणाने मनुष्यत्व' येते या म. फुले यांच्या मुलभूत विचारांचा मागोवा देखील या प्रकरणात घेण्यात आला आहे. इतिहास मीमांसा, शेती आणि शेतकरी यासंबंधीचे फुले यांचे चिंतन येथे वाचायला मिळते. 'पाणी या विषयाचा गंभीर विचार महात्मा फुले यांनी देशाला दिला. 'शेतकऱ्याचा असूड','इशारा' ,'अखंड' ,' गुलामगिरी' या पुस्तकातून व्यक्त झालेले पाणी विषयावरील विचार व चिंतनाचा आढावा घेताना ८ मुद्दे ठळकपणे मांडलेले आहेत.
स्री- पुरूष विचार करतांना फुले यांनी  स्त्री  पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असल्याची सप्रमाण मांडणी केली होती . कुटूंब व्यवस्थेसंबंधी फुले यांची मते व्यापक समाजहिताचीच आहेत. 'विवाहपद्धतीतून परिवर्तन' ,'कामगार चळवळीचा प्रारंभ' ,'बलुतेदार - अलुतेदार सारे' , ' भटके आदिवासी' , 'सार्वजनिक सत्यधर्म' , 'साहित्यसंस्कृती संबंधीची भूमिका','कृषी -औद्योगिक संस्कृती' , 'बहुजन संस्कृतीचे जनक' ,  'सामाजिक लोकशाहीचे उद्गाते '  अशी महात्मा फुले यांच्या कार्यक्षेत्राची विविध दालने आणि त्यांच्या वैचारिकतेची प्रागतिक झेप या प्रकरणात लेखकाने खूप ताकदीने समोर आणली आहे.
       'एवढे अनर्थ एका अविद्येने केले' या प्रकरणात 'शेतकर्‍याचा असूड' ग्रंथाबद्दल विस्ताराने विश्लेषण येते. अखेरीस लेखक प्रल्हाद जी लुलेकर लिहितात , 'शेतकर्‍याचा असूड' मौलिक ग्रंथ आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर या असुडाचा फटका आपल्या बधिर कातडीवर काही परिणाम करून गेलाय का? हे तपासण्याची वेळ आली आहे.' हे विधान आजच्या शेतकरी पुत्रांना आत्मपरीक्षण करायला लावणारे म्हणूनच महत्त्वाचे आहे.
       'सत्य आणि नीती हाच धर्म' या प्रकरणातुन म. फुले यांनी केलेल्या सामाजिक संरचनेसाठी प्रबोधनात्मक स्वरूपातील लेखनाचा आणि कार्याचा आढावा घेत असतांनाच अत्यंंत साक्षेपी विवेचन केलेले आहे.
        तर 'फुले -आंबेडकरी दृष्टीने वाङमयेतिहास लेखन' हे अखेरचे प्रकरण इतिहास लेखनाच्या नव्या बहुजन सापेक्ष पद्धतीचा विचार मांडते. हा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आहे. 'शोषितांच्या समुहमनाचा, समुह निष्ठेचा, समष्ठीचा आविष्कार घडवून दलित साहित्याने मराठी साहित्याला निराळे परिमाण दिल्याचे सांगत असतांनाच या साहित्याच्या काही मर्यादाही असल्याकडे ते लक्ष वेधतात. या साहित्याचे योग्य मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने मराठी वाङमयाचे पुनर्लेखन आवश्यक असल्याचे मत नोंदविताना डाॅ.  लुलेकर लिहीतात, ' सध्याचे साहित्यविश्व बहुसांस्कृतिक आविष्काराने समर्थ होते आहे. म्हणून फुले आंबेडकरी दृष्टीने समग्रतेचे भान आलेले आहे. त्यादृष्टीने वाङमयेतिहास लेखन व्हावे. मराठी वाङमयेतिहास लेखनाला त्यातून संपन्नता मिळेल.'  या लेखातून वाङमयेतिहासाचे लेखन व्हावे ही अपेक्षा नक्कीच धरता येेते. 
        एकुणच 'बहुजन संस्कृतीचे जनक: महात्मा जोतीराव फुले' या पुस्तकामुळे महात्मा फुले यांच्या कार्यावर व्यापक मुलभूत विवेचन करणारा, त्यांच्या विचारांची उपयुक्तता अधोरेखित करणारा, चिंतन आणि समाजहिताचा विचार अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ उपलब्ध झाला आहे. या ग्रंथाच्या मौलिकतेबद्दल विचारवंत आ. ह.  साळुंके लिहीतात , ' आधुनिक भारतातील पहिले महान समाजक्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांच्या विषयी आजवर विपूल लेखन झालेले असले, तरी त्यांच्या चरीत्रातील आणि कार्यातील अनेक पैलूंविषयी द्रष्ट्या संशोधकाला अजूनही नाविन्यपूर्ण गोष्टी मांडणे शक्य आहे, हे प्रल्हाद लुलेकर यांच्या बहुजन संस्कृतीचे जनक: महात्मा जोतीराव फुले या ग्रंथाच्या आशयातून स्पष्ट होते. ' (मलपृष्ठ) . लेखकांची विचारधारा प्रागतिक आणि सुधारणावादी आणि कार्यकारण भाव मांडणारी विश्लेषक असल्याने या ग्रंथाची मांडणी वैशिष्टय़पूर्ण झाली आहे. आजच्या शिक्षित समाजाने वाचावे व समजून घ्यावे असे हे पुस्तक आहे.

 

       
पुस्तक : बहुजन संस्कृतीचे जनक: महात्मा जोतीराव फुले.
लेखक : प्रल्हाद जी लुलेकर. 
प्रकाशक : बाळासाहेब घोंगडे
अक्षरवाङमय प्रकाशन : बेनकरनगर, धायरी, पुणे ४११०४१
प्रथमावृत्ती : ३० नोव्हेंबर २०१९
पृष्ठे २४८ मूल्य : ४०० ₹

~~~~~~
~~~~~~
डॉ. कैलास रायभान दौंड
kailasdaund@gmail.com
Mo. 9850608611


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर