गावखेड्यातील तरूणांची भयावह शोकांतिका- तुडवण.
○ गावखेड्यातील तरूणांची भयावह शोकांतिका- तुडवण.
• प्रा. डॉ. द. के. गंधारे
ग्रामीण साहित्यिक कैलास दौंड यांचा जन्म पाथर्डी तालुक्यातील सोनोशी या खेडेगावात झाला. ग्रामीण जीवनाचा त्यांनी जवळून आणि सजग अनुभव घेतल्यामुळे त्यांच्या एकूणच साहित्यातुन ग्रामानुभवाची सशक्त मांडणी येते. शेतीमाती आणि तिथल्या माणसाशी नाते जोडून त्यांनी शेती बरोबरच गावगाड्याचे गाऱ्हाणे वेशीवर टांगण्याचे काम केले . 'कापूसकाळ', 'पाणधुई' या त्यांच्या कादंबऱ्या ग्रामजीवनाचे वास्तवरूप मांडतात. 'अंधाराचा गाव माझा', 'उसाच्या कविता', 'वसाण', 'भोग सरू दे उन्हाचा' या कवितासंग्रहातून त्यांनी अनुभवलेले खेडे साकारत जाते. ' तुडवण ' ही त्यांची अलिकडेच प्रकाशित झालेली कादंबरी ग्रामजीवनातील अलक्षित पैलूंचे वास्तवदर्शी दर्शन घडवते.
बीड, पाथर्डी या भागावर निसर्ग जणू रूसलेलाच आहे. अशा दुष्काळी भागाच्या झळा लेखकाने स्वतः अनुभवलेल्या आहेत. त्यामुळेच त्यांची लेखणी या भागातील जगण्या भोगण्याचे प्रतिनिधित्व करते. त्यांची 'तुडवण' ही कादंबरी मॅजस्टिक पब्लिकेशनने सप्टेंबर २०१९ मध्ये प्रकाशित केली. ही कादंबरी ग्रामीण भागातील सुशिक्षित तरूणांची व्यथा नेमकेपणाने आणि प्रभावीपणे मांडते. जागतिकीकरणाच्या गराड्यात 'नारायण'च्या रूपाने खेड्यातील सुशिक्षित आपले सर्वस्व कसा गमावत आहे व त्याच्या जगण्याची कशी तुडवण होत आहे याचे चित्रण या कादंबरीत येते. 'नोकरी की शेती?' अशा दोलायमान परिस्थितीत नारायण या तरूणाचा चा बळी जातो. शिक्षण घेऊन नोकरीसाठी केलेली वणवण खडकावरील खोदलेल्या विहिरीगत फुकाची ठरते. शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार ठरलेला नारायण कुटुंबाच्या वाताहतीलाच जणू कारण ठरतो. नारायणचे वडील नवनाथ हे शेतीला आई मानणार्या मागच्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. स्वतःच्या नोकरीसाठी शेती विकावी अशी नारायणची इच्छा असते. पण वडील त्याला नकार देतात. अशातच नारायण वडिलांना शिविगाळ करतो. त्यामुळे हे नाते अधिकच दुरावत जाते. हा दोन पिढ्यातील संघर्ष तर आहेच तरीही त्याला आर्थिक परिमाणही आहे. त्यातुन आलेली अगतिकता याच्या मुळाशी असल्याचे दिसते. शेवटी नारायणचे वडील नवनाथ तात्या मुलगी यमुनीच्या लग्नानंतर जेव्हा मुलगा व त्याची आई शेती विकण्याचा निश्चय करून तडीस नेतात तेव्हा सर्वस्वाचा त्याग करतात. कायमचेच निघून जातात. 'तुडवण' कादंबरीत नारायण बरोबरच वडील नवनाथ यांची होणारी ससेहोलपट भयावह आहे. शेती हा कुटुंबाचा एकमेव आधार असल्याने ते तो जपत असतात. मुलगी युमनी लग्न होऊन सासरी जाते. नारायण व राधाक्का परस्पर जमिनीला गिर्हाईक पाहतात याने नवनाथ अस्वस्थ होतो. जगण्याचा पारंपरिक आधार गेल्याने त्याच्यात उपरेपणाची भावना प्रबळ होऊन ते वडील घर सोडून अज्ञात ठिकाणी निघून जातात. त्यांचे घर सोडून जाणे हे आत्महत्येचे पाऊल आहे की काय? असे वाचक म्हणून वाटत राहते. आर्थिक ओढाताण, शिक्षणाने निर्माण केलेली नोकरीची अशाश्वतता, संवादाचा अभाव अशा समाजव्यवस्थेचा पहिला बळी नारायणचा वडील नवनाथ ठरतो .
नारायणची आई 'राधाक्का' संसाराचा गाडा ओढत आयुष्य काढते. नारायण कडून असणाऱ्या अपेक्षा फोल ठरल्यानंतर ती हतबल होते. त्यातच घरात झालेल्या चोरीने तिचे आयुष्य उदध्वस्त होते. ती दुखरी जखम डोकेदुखीच्या रूपाने तिला जीवनभर छळत राहते. ती सोशीक आहे, समंजस आहे, कुटुंबाचा आधारही आहे पण तिच्या वाट्याला येणारे दुःख कमालीचे आहे. नवर्याचे कायमचे संसारातुन निघून जाणे. तरण्या मुलाचे विहीरीत काम करतांना मरणे, सुनेचे नातवाला सोडून जाणे, घरची जमीन विकूनही काहीच हाती न येणे आणि घेतलेली जमीन वादात सापडणे असे चहूबाजूंनी हरल्यावर नातू प्रकाश हाच एक आशेचा किरण जपण्याचा ती प्रयत्न करते. राधाक्का, यमुनी, रूपली या व्यक्तिरेखामधून खेड्यातील कष्टकरी स्रीजीवनाचे वास्तवरूप समोर येते.
नारायण हा या कादंबरीचा नायक ठरतो खरा पण त्याचा मोहित्याच्या विहिरीत झालेला मृत्यू वाचकांना अस्वस्थ करतो. कपाशीच्या कामानंतर चंदनचोरीचा दोन दिवस व्यवसाय करणारा नारायण परिस्थितीचा बळी ठरतो. शहरात शहाणपण येईल अशी आशा ठेवून उल्हासनगरला जातो. पण पुरातून फुरसण लोटावे तसा पुन्हा गावच्याच कडेला लागतो. पुढे नारायणचे लग्न त्याच्या शोकांतिकेला अधिकच गडद करते. राधाक्का व सुनेचे नाते विरत जाते. सुन मुलाला सोडून माहेरचा रस्ता धरते. राधाक्काचा नातू प्रकाश हा तिच्या जगण्याचा आशेचा किरण ठरतो. राधाक्का सर्वस्व गमावल्यानंतर पुण्याचा रस्ता पकडते. रूपली बरोबर राधाक्का पुण्याला जाते. प्रकाश शिक्षण घेऊन मोठा होईल हे स्वप्न पहाते. शेत, नवरा व मुलगा गमावलेली राधाक्का व प्रकाशचे पुढे काय होते याचे उत्तर अनुत्तरितच राहते.
नारायण समाजव्यवस्थेचा बळी तर ठरतोच पण विनाअनुदानित या शब्दानेही अनेकांचे बळी घेतले आहेत हे लेखकाला सांगावयाचे आहे असे दिसते. नोकरी नाही म्हणून वाईट मार्गाला लागलेले अनेक तरुण आजही खेड्यात पहावयास मिळतात. नारायणचा बळी शिक्षणाने की व्यवस्थेने ? यासारखे अनेक प्रश्न खेड्यात 'आ' वासून आहेत. सुदाम, सुभाष, कल्याण, इशिनाथ , विष्णू अशीही व्यक्तिरेखा या कादंबरीत आहेत.
'तुडवण' या कादंबरीत पैसाधिष्ठीत काळातील नातेसंबंध, खेड्यातील स्री जीवन, बेकारी, गावातील फसवे आणि मतलबी म्होरके, उपजीविकेच्या साधनांची आणि नव्या अनुभवाची कमतरता अशा अनेक गोष्टी विशेषत्वाने दिसतात. आजच्या ग्रामीण जीवनाचा आरसाच म्हणावा असे हे चित्रण आहे.
डॉ. कैलास दौंड यांची 'तुडवण' ही कादंबरी आजच्या गावखेड्यातील भयाण वास्तव तिथल्या खास बोलीभाषेत मांडते हे विशेष आहे. 'तुडवण' चे मुखपृष्ठ खूपच बोलके आहे. त्यांच्या हातून असेच लेखनकार्य घडो ही सदिच्छा.
• तुडवण : कादंबरी
•लेखक : कैलास दौंड
•प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई.
•मुखपृष्ठ : सतीष भावसार, मुंबई.
• प्रथमावृत्ती : सप्टेंबर २०१९
•पृष्ठे: २४५. •मूल्य : ३००₹
~~~~~~~~~
~~~~~~~~~
प्रा. डॉ. द. के. गंधारे
( मराठी विभाग प्रमुख)
ॲड
. एम. एन. देशमुख महाविद्यालय, राजूर जिल्हा. अहमदनगर.
भ्रमणध्वनी 9423045295
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा