'रिंगण': सजग भावांदोलनाची कविता. डाॅ. कैलास दौंड

 



'रिंगण': सजग भावांदोलनाची कविता.
                                    डाॅ. कैलास दौंड

    मराठीमध्ये कविता मोठ्या प्रमाणात लिहीली जाते मात्र स्रियांची कविता तशी कमीच आहे. 'रिंगण' नावाचा कवयत्री माधुरी मरकड यांचा  पहिलावहिला कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कवितासंग्रहात सत्याहत्तर कविता आहेत. फारशी पूर्व प्रकाशित नसलेली कविता 'रिंगण ' च्या रूपाने मराठी काव्यरसिकांच्या समोर आली आहे. या कवितासंग्रहातील कवितांचे दोन भागात वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे स्त्रीवादी कविता आणि दुसरा भाग निखळ भावकविता .
          स्रीवादी कवितांमधून कवयत्रीच्या स्रीवादी जाणिवेची क्षितिजे विस्तारत असल्याची ओळख पटवणार्‍या काही कविता येतात. तर निखळ भावकवितेत अन्य विविध भावानुभूतीच्या कविता येतात. यात बापाचा मृत्यू,  प्रिय आई, प्रिय मुली, प्रिय आजी अशा नातेसंन्मुख कविताही येतात. कवयत्रीच्या हा पहिलाच कवितासंग्रह असल्याने विविध अनुभूतीच्या कविता रिंगण मध्ये येणे स्वाभाविकच आहे आणि त्या तशा येतातही.
           या कवितासंग्रहातील काही कवितातून स्रीच्या दुय्यमत्त्व, घुसमट, आत्मसन्मावर होणार्‍या आघात अधोरेखित होतो. अर्थातच ही आत्मभानाच्या दिशेने वाटचाल आहे. उदा:


'अनादी काळापासून
पुरूष
उतरवतो वस्र तिच्या आत्मसन्मानाचे
विचारतो जाब न
केलेल्या अनैतिकतेचा
हैराण ती स्वतःच्याच नजरेत
उत्तरं देऊन कंटाळलेली '( सन्मानित/२६)


स्रीने कुठवर उत्तरे द्यावीत? किती परिक्षेत उतरावे? याला काही शेवट नाही. तिचे जगणे घरातही मोलकरणीहून अधिक नसते. तिची मते तर नेहमी गृहीतच धरली जातात. तिचे व्यक्त होणे पुरूषी वर्चस्वाला शक्यतो नको असते. 'रांधा, वाढा, उष्टी काढा' हे कधी संपतच नाही. मग कधीकधी तिलाही वाटते की :


'खालमानेने उचलते ती
चहाचे रिकामे कप
विचार करते
आपल्यालाही हवी होती
एक बायको
चहा आणून देणारी
नि फक्त
कप उचलणारी '( मैफिल/३१).


आपल्याकडे स्रीच्या हक्काचा स्वर उजागर करणार्‍या ताराबाई शिंदे, मल्लिका अमर शेख अशा काही प्रतिभावंतांनी  वैचारीक वाट निर्माण केलेली आहे. 'रिंगण' मधून माधुरी मरकड या सुद्धा स्रीच्या माणूसपणाच्या शोधात असल्याचे दिसते. उदाहरणादाखल   पुढील ओळी:


'मी माणूस?
नाही
मी एक स्री असणं वेगळं नि
माणूस असणं वेगळं '( ओझं/७७ ) 


या माणूसपणाचा शोध 'अत्त दीप भव' खेरीज संपणार नाही हे खरेच. ही कविता त्या दिशेने मार्गक्रमण करते. 
              'रिंगण' मधील कवितांचे दुसरे रूप हे भावकवितांचे आहे. इथे आतुरता, हुरहुर, नात्यांची असोशी आणि तृप्तताही अनुभवावयास मिळते. स्रीवादी  कवितांपेक्षा या कविता अधिक आत्मपर वाटतात. उदा: 


'तुझ्या मिठीत विरावी
ही रात्र चांदण्यांची
देहावरी नक्षी माझ्या
तुझ्या बिलोरी ओठांची '( आठव/५१)

किंवा
अशी आसुसली काया
तुझ्या मिठीत यावया
भेट ओठांची ओठांशी

नशा नशिल्या डोळ्यांची. ( ओढ/९४)

ही भावकविता 'माझी कविता', 'कविता' , 'बहर',  'शब्द', 'कवी', 'साथ', 'शब्दपाखरू',  'स्वप्न', 'चंद्र', 'पुस्तक सखा' अशा आणि इतर कवितांमधून अभिव्यक्त होते. कवयत्रीचे निर्मिती संबंधीचे अनुभवही कवितेमधून येतात ते असे -


'नेटकेपणाच्या मोहापायी
विरून जाते कधी कविता
शब्दछलांच्या घुसमटीतून
हटून बसते चंचल कविता '(कविता /५२)


आंतरिक स्री सुलभ ओढ देखील रिंगण मधील कवितेतून दिसते. पाण्यात उठणार्‍या तरंगासारखे मन तरंगत जीवलगाकडे तरंगत जाते ( तरंग/६३) तर कधी स्वच्छंदी, मनमौजी होत तृप्ततेचा अनुभव घेते. 


'मी स्वच्छंदी
मी मनमौजी
कधी होरपळणारा क्षण मी
तृप्ततेच्या काठावरील
कधी ओतप्रोत कण मी '( मी /६७) 


स्रीवादी कवितेतून दिसणारी अस्वस्थता आणि भावकवितेतून अनुभावयास येणारी तृप्तता ही माधुरी मरकड यांच्या काव्यांदोलनाची दोन धृवे म्हणावी लागतील. आत्मसन्मानाची ओढ आणि ममत्व असा दुहेरी प्रत्यय या संग्रहातील कवितांमधून येतो. बहुतांश कविता मुक्त छंदातील असून क्वचित अनूष्टूभ देखील दिसतो.  'सलाम ' सारख्या एकमेव अपवादात्मक  कवितेवर पाडगावकरांचा प्रभाव दिसतो. हा कवितासंग्रह मुळातूनच वाचावा असा आहे. महेंद्र कदम यांची विश्लेषक आणि विवेचक प्रस्तावना या कवितासंग्रहाची आणखी जमेची बाजू आहे. 


•रिंगण : कवितासंग्रह
•कवयत्री : माधुरी मरकड
•प्रथमावृत्ती : २६ नोव्हेंबर २०२०
•प्रकाशक: अक्षरवाङमय, पुणे ४१
•पृष्ठे :१२० •मूल्य :१५० ₹
•मुखपृष्ठ : सरदार जाधव.
~~~
~~~
डाॅ. कैलास रायभान दौंड
kailasdaund@gmail.com
Mo 9850608611

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर