संस्काराची पेरणी : माझे गाणे आनंदाचे : डाॅ. भाऊसाहेब मिस्तरी

॥ आगंतुकाची स्वगते॥

बालकविता संग्रह 

 संस्कारांची पेरणी - माझे गाणे आनंदाचे


                 ● डॉ.भाऊसाहेब मिस्तरी

               


      बालसाहित्य लिहितांना पालकाला बालक होता यायला हवं असं मला मनापासून वाटतं. ज्या कोणाला हे खऱ्या अर्थाने जमलं तो खरा बालसाहित्यिक ! त्यांच्या लेखणीतून उत्तमोत्तम असं बालसाहित्य निर्मिती होत असते ही माझी समज आहे.  साने गुरूजी वयाने मोठे होते तरी ते मुलांमध्ये मुल होऊन "श्यामची आई " सारखी  'संस्कार गाथा ' सांगून गेलेत. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ती महत्त्वाची आहे. 

 समकालीन मराठी साहित्यात काही बालसाहित्यिक यांची नावे पटकन आठवतात. आबा महाजन,उत्तम कोळगावकर, एकनाथ आव्हाड, दासू वैद्य, पृथ्वीराज तौर आधी नावं सहजपणे ओठांवर येतात. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून मा. किरण केंद्रे सर यांच्या हातून ' किशोर ' मासिकाच्या माध्यमातून मोठे काम होत आहे. बालसाहित्यिक म्हणून आता डॉ. कैलास दौंड यांचे नाव लक्षात राहतं. त्यांचा " माझी गाणे आनंदाचे " हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला आहे, यात सदोतीस कविता आहेत. डॉ. दौंड यांचे या आधी प्रकाशित झालेलं साहित्य : ' उसाच्या कविता,' ' वसाण,' ' भोग सरू दे उन्हाचा,' ' अंधाराचा गाव माझा,'  हे चार कविता संग्रह.

ताणधुई,कापूसकाळ,तुडवण तीन कादंबऱ्या तसेच 'एका सुगीची अखेर,' कथासंग्रह आणि ' जाणिवांची फुले,' बालकुमार कथासंग्रह आहे.  आत्ताच प्रकाशित झालेला   'माझे गाणे आनंदाचे' हा बालकविता संग्रह माझ्या वाचण्यात आला. यातल्या अनेक कविता या मुलांच्या कायम लक्षात राहतील अशा आहेत. यातली' इवले इवले फूल' ही कविता आपण बघू या.


 इवले इवले फूल

बाई, इवले इवले फूल

 या वेलींच्या मांडीवरती 

जसे खेळते मूल.


ओठ लालेलाल 

त्याचे गाल लालेलाल 

पिवळ्या- पिवळ्या परागाची

शेंडी झुबकेदार

 जीवा पाडते भूल


वाऱ्यासंगे उनाड बेटे

खुशाल झोके घेते

लाल-पिवळ्या रेशमाची

अंगावरती झूल.


 फुलपाखरे सवंगडीही

 खेळावयास येती संगे

 देऊन रंग तयार आपुले 

हळूच दाविते हूल!

इवले इवले फूल


किती सूंदर,सहज कल्पना या कवितेत कवीने मांडली आहे. आईच्या मांडीवर जसं मूल तसं वेलीच्या मांडीवर खेळते फूल. वाह! अजून काही वानगीदाखल कविता सांगता येतील जसं "वाढ बाई वाढ " ही कविता आपण बघू या


वाट बाई वाढ 

पाणी वाढ 

उंच होईल 

दारातलं झाडं !


वाट बाई वाढ 

त्याला खत काला 

येईन खूप 

झाडाला पाला.

 

पाला बाई पाला 

थांबेल उन्हं

हसतील तेव्हा 

पानांत फुलं !


ही कविता नुसती कविता राहत नाही तर निसर्गाविषयी प्रेम सांगून जाते. बालमनात या कवितेच्या माध्यमातून संस्काराची पेरणी केली गेली आहे. अजून अनेक कविता या संग्रहात मुलांच्या आणि आपल्या लक्षात राहतील अशा आहेत. आपल्या घरातील मुलांच्या हाती हा संग्रह नक्की  द्यायला हवा असा संग्रह  आहे.  या पुस्तकाची पाठराखण  एकनाथ आव्हाड  प्रसिद्ध बालसाहित्यिक यांची आहे. सुंदरसे मुखपृष्ट धर्मराज आव्हाड  यांचे आहे. डॉ. कैलास दौंड यांना भावी लेखनासाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.


● डॉ. भाऊसाहेब मिस्तरी

      बाजार सावंगी, औरंगाबाद

     मो.9960294001


● लेखक: डॉ. कैलास दौंड

   'माझे गाणे आनंदाचे'  ( बालकविता संग्रह )

   प्रकाशक: अनुराधा प्रकाशन,औरंगाबाद

  मूल्य: ५०₹/- ■ मो.9423455272


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर