• 'काटेरी पायवाट ' : धडपडणाऱ्या तरूणांना भान देणारे आत्मकथन.

 


'काटेरी पायवाट ' : धडपडणाऱ्या तरूणांना भान देणारे आत्मकथन.

                            डाॅ. कैलास दौंड

           'काटेरी पायवाट' हे प्रा. डाॅ. अनंता सूर यांचे आत्मकथन. त्यांच्या या आत्मकथनातुन ग्रामीण भागातील मुलाची कठीण शैक्षणिक वाटचाल समोर येते. त्यासोबतच सहाजिकच कुटुंबातील माणसे, परीसर, वाट्याला आलेली अभावग्रस्तता, वेळोवेळी येणाऱ्या अडचणी, त्यावर कष्टाने आणि निर्धाराने केलेली मात आणि त्यानंतर प्राध्यापक होण्यापर्यंत मारलेली मजल 'काटेरी पायवाट' मधून कळत जाते. लेखकाची कौटुंबिक  पार्श्वभूमी, घरातील व इतर नातेवाईक यांचे प्रसंगपरत्वे येणारे चित्रण, लेखकाचे   बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तसेच या विविध टप्प्यावर त्याचे विकसित होत जाणारे आकलन आणि विचारविश्व, त्याने जपलेली कष्टावरील श्रद्धा आणि विश्वास , माणुसकी उलगडणारे हे आत्मकथन अलीकडील काळातील महत्त्वाचे आत्मकथन आहे. आपल्याकडील दलित आत्मकथने ही अत्यंत प्रत्ययकारी ठरली आहेत. त्यांची एक समृद्ध परंपराही मराठी साहित्यात काही काळ निर्माण झालेली पहावयास मिळते. मराठीच्या साहित्यविश्वाची कक्षा यामुळे विकसित झाली.  मात्र ग्रामीण साहित्यात अशी परंपरा निर्माण झाली नाही हे खरेच.  आनंद यादव यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबर्‍या, व. बा. बोधे यांचे रानपालखी हे आत्मकथन आणि आणखी एखादे दुसरे नाव या संबंधाने सांगता येईल. अनंता सूर यांच्या 'काटेरी पायवाट ' मधून ग्रामीण तरूणाची शैक्षणिक वाटचाल प्रभावीपणाने मांडली गेलेली असल्याने मोजक्या ग्रामीण आत्मकथनात त्याचा समावेश करावा लागेल. विविध वाङमय प्रवाहातील जीवंत अनुभवाचे प्रकटीकरण करणार्‍या आत्मकथनांनी मराठी वाङमयात मौलिक भर घातलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर 'काटेरी पायवाट' हे आत्मकथन निश्चितच लक्षवेधून घेणारे आहे.
             आत्मकथन लिहीणे ही तशी कठीण व त्रासदायक गोष्ट असते. आपला सगळा भूतकाळ लेखकाला पुन्हा उकरावा लागतो. बर्‍या वाईट घटना , प्रसंगांना आठवत पुन्हा एकदा सामोरे जावे लागते, त्याचे अन्वयार्थ शोधावे नि मांडावे लागतात. गतकाळातील सुखावह व हवेसे प्रसंग पुन्हा मांडणे त्रासदायक नसते पण दुःखद आणि नकोसे असणारे प्रसंग आत्मकथनात मांडणे लेखकाची कसोटी पहाणारे असते, त्या प्रसंगांना पुन्हा सामोरे जाणे त्रासदायक असते. अशा प्रसंगांना   'काटेरी पायवाट' मध्ये अनंता सूर सहजपणे सामोरे गेलेले आहेत. आपल्या पूर्वायुष्यातील महत्त्वाचे घटना नि प्रसंग त्यांनी प्रभावीपणाने वेधकतेने  व प्रवाही भाषेत मांडलेले आहे. ग्रामीण तरूणांना हरघडी करावा लागणारा अडचणीचा सामना, पालकांची आर्थिक ओढग्रस्तता त्यातुन पुढे जाण्याची धडपड  या आत्मकथनातुन दिसते. ती निश्चितच युवकांना  मार्गदर्शक ठरणारी आहे. अलीकडील काळात आलेले हे लक्षवेधी आत्मकथन आहे.
        'काटेरी पायवाट ' मधून लेखकाने कौटुंबिक नातेसंबंधाचे वेधक नि उत्कट चित्रण केलेले आहे. आई, वडील, भावंडे, वेळोवेळी झालेले मित्र, सहवासात आलेले लोक यांचे प्रसंगोपात चित्रण नेमके साधलेले आहे.  आई आणि मोठा भाऊ हे लेखकाला लाभलेले भक्कम आधार आहेत . शालेय जीवनात लाभलेले काही मित्र देखील प्रसंग परत्वे येत जातात. गरीबीचा तर शापच ग्रामीण भागातील बहुसंख्यांना लागलेला असतो. आपल्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने वडीलांना शेतजमीन विकावी लागते. त्यामुळे शेतकरी कुटूंब भूमिहीन होते. मात्र फार बिकट अशी आर्थिक अवस्था या कुटुंबाची होत नाही कारण लेखकाचा मोठा भाऊ नोकरीला असतो. लेखकही तोलुन मापुन खर्च करणारा आहे.  अशा स्थितीत लेखक जिद्दीने शिक्षण घेतो.  या वाटचालीत त्याच्या जाणिवा विकसित होतात. प्रारंभी लेखक दहावीला काही कारणाने नापास झाल्यावरही तो  आपला शैक्षणिक प्रवास पुढे जिद्दीने आणि जोमाने सुरू ठेवतो तो जबाबदारीच्या जाणीवा विकसित झाल्यामुळेच. दहावीला नापास होण्याचे कारण हे वयसुलभ असले तरी त्याकाळातील नेमक्या मार्गदर्शनाचा अभाव दाखवणारे आहे.
                'काटेरी पायवाट' मधील लेखकाच्या बालपण ते प्राध्यापक होण्यापर्यंतच्या प्रवासातील अनेक घटना प्रसंग हा प्रवास इतरांपेक्षा  कसा वेगळा आणि संघर्षाचा होता हे दाखवणारे आहेत. त्यात  बालपणाच्या काही आठवणी, शेती, बैलबारदाणा, गावातील ढिवरांच्या पोरांसोबत पोहायला जाणे. त्यांच्या सोबत वाघरी घेऊन ससे पकडायला जाणे. त्यामुळे वडीलांचे रागावणे व शिकारीचा वाटा मिळताच समाधानी होणे,  मित्र दिलीपला त्याच्या अडचणीत कामात मदत करणे, एकदा लेखकांचा परीक्षेत पहिला क्रमांक येणे , परीक्षा गांभिर्याने न घेतल्याने स्कॉलरशिप परीक्षेत सर्वांचे नापास होणे. घरातील भांडणात  सोनबा ढिवराचे संशयास्पद मरणे, त्यानंतर ढिवरांनी गाव सोडणे,  सरस्वती आत्याचा मुलगा डॉक्टर हास्यकुमार आणि त्यांची दुर्दैवी वाताहत,किरकोळ भांडणात  वडगावच्या माणसानी विनोद आणि वडिलांवर केस दाखल करणे,पाहुणचाराला आलेला मायचा भाच्यानेच बैलगाडी आणि बैलांची चोरी करणे व नात्यात वितुष्ट नको म्हणून वडीलांचे केस मागे घेणे अशा कितीतरी प्रत्ययकारी घटनांनी वाचक 'काटेरी पायवाट' मध्ये गुंतत जातो. अशा प्रकारचे वास्तव अनेकदा ग्रामीण भागातील मुलांच्या वाट्याला येत असतेच. त्या अर्थाने प्रातिनिधिक ठरेल असे हे आत्मकथन असुन ते सजग भान देणारेही आहे.
        लेखकाचे वडील आईला सतत रागावतात. त्यांचा स्वभाव रागीट म्हणता येईल असाच आहे. आपला मुलगा ढिवरांच्या पोरांसोबत शिकारीला गेल्याचे समजल्यावर ते मुलाला रागावण्याच्या पवित्र्यात असतात पण ढिवरांनी शिकारीचा वाटा पोहोच करताच त्यांचा राग मावळतो तो सामिष खायला मिळणार म्हणून. तर गरीबी असुनही आई आपल्या मुलांना सरस्वती आत्याच्या वटीत टाकत नाही,  दत्तक देत नाही. आपल्या मुलांना आपल्यापासून तोडण्याची कल्पनाही ती करू शकत नाही.
      लेखकाला शालेय जीवनात चित्रपट पाहण्याचा छंद लागायला लागला होता. त्यातच तो दहावीच्या वर्षात सीमा नावाच्या एका मुलीकडे एकतर्फी आकर्षित झाला.  व  त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित न झाल्याने तो दहावी नापासही झाला .  मात्र अशा अपमानाच्या आणि कठीण प्रसंगी  आई त्याला धीर देते आणि शिक्षणाचा गाडा पुढे चालु लागतो. एकदा तो आदिलाबादला वडिलांसोबत कापूस विकायला जातो तो  प्रसंग खूपच चित्रमय झाला आहे. दहाडे सरांनी शिकवणी घेणे व नंतर लेखकाचे दहावी उत्तीर्ण होणे आणि नंतर मोठ्या भाऊकडे राजुर्याला जाणे. अकरावीत लेखकाचा पहिला क्रमांक येणे. अशा प्रसंगातुन काळ पुढे सरकत जातो.  मायचे सगळ्यांना सोडून जाण्याचा अत्यंत दुःखमय प्रसंग हळवा करणारा आहे. याच दरम्यान लेखकाने 'आया' ही आईच्या आठवणीची कविता लिहीली. सुरेखाताईच्या लग्नासाठी घरची शेती विकावी लागते. लग्नातील हुंडा व इतर खर्चामुळे अनेकदा लोकांना असा निर्णय घ्यावा लागतो.
        लेखकाची अकरावी पासूनची शैक्षणिक वाटचाल जोरदार सुरू झाली . त्याचे शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेणे त्याच्यातील वाङमयीन व्यक्तीमत्वाला उभारी देणारे ठरले. इथे तो ग्रंथालयातील पुस्तके वाचतो, निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होतो, कविता लिहीतो.  त्याला वेळोवेळी काही मित्र  मिळालेले आहेत. अनिल नावाच्या मित्राच्या चंदाताई या बहिणीच्या स्वप्नांचा लग्नानंतर चुराडा होतो आणि ती सोशिकतेने सारे सोसत राहते व शेवटी माहेरी येते तेव्हा तिची झालेली वेड्यागत स्थिती लेखकासह वाचकांना हळवी करणारी आहे. 
             पदव्युत्तर परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर लेखक एमफिल करून नोकरी मिळवण्यासाठी  शोधाशोध करतो. याच काळात त्याच्या कवितासंग्रहास प्रकाशनार्थ अनुदानही मिळते. आचार्य पदवी प्रवेशासाठी सिनॉप्सिस सादर करतांना तो वेळेवर टाईप न झाल्याने त्याची खुप धावाधाव होते. अशावेळी एक टायपिस्ट कणव वाटुन तो तातडीने टाईप करून देते. त्यासाठी जास्तीचे पैसे ती घेत नाही. लेखक खुपच मेहनती आहे. एकाचवेळी चार चार महाविद्यालयात तासिका तत्वावर वेगवेगळ्या वर्गांना अध्यापन करण्याचे कठीण दिव्य तो सायकलच्या सहय्याने पार पाडतो. सायकलच्या अतिरिक्त प्रवासामुळे त्याच्या आरोग्यावरही परीणाम होतो.
      लेखकाने विंदा करंदीकर यांची घेतलेली भेट व मुलाखत , कविवर्य नारायण सुर्वे यांची मुंबईत घेतलेली प्रदीर्घ मुलाखतीचा प्रसंग मुळातूनच वाचने वाचकांना समृद्ध करणारे ठरेल. पुढे लग्नानंतर मामंजी ठरल्याप्रमाणे नोकरीला लागण्यासाठी आर्थिक सहकार्य करतात. काही भार मोठे भाऊ उचलतात. महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्याचे प्रगत महाराष्ट्रातील कटू वास्तव लेखक अनंता सूर मोठ्या धाडसाने आणि सहजतेने नोंदवतात हे विशेष. हुंडा प्रथा, नोकरीसाठी पैसे घेण्याची प्रथा, मुले वटीत घेण्याची प्रथा अशा समाजातील इष्ट अनिष्ट चालीरीतीची उजळणी काही प्रसंगातून सहजपणे होते एकुणच भोवतीच्या सामाज जीवनाचे प्रतिबिंब ' काटेरी पायवाट ' मध्ये पडल्याचे दिसते.
         प्रवाही आणि संवादी भाषा असलेले डाॅ. अनंता सूर यांचे ' काटेरी पायवाट ' हे आत्मकथन धडपडणाऱ्या ग्रामीण तरूणांचे प्रातिनिधिक आत्मकथन म्हणता येईल इतके समकालीन आणि महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण युवकांना ते आपले वाटेल. मराठी साहित्यविश्वात त्याचे जोरदार स्वागत होईल यात संदेह नाही.

• काटेरी पायवाट : आत्मकथन
• लेखक : अनंता सूर
• प्रकाशक : अथर्व पब्लिकेशन्स, धुळे
• प्रथमावृत्ती : १ जुलै २०२०
•पृष्ठे : १८०  मूल्ये : ३५० ₹
•मुखपृष्ठ : बळी खैरे.

~~
डाॅ. कैलास रायभान दौंड
kailasdaund@gmail.com
Mo 9850608611
( मु. सोनोशी पो. कोरडगाव
ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर
पिन 414102)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर