● मन जाणती जे मुलांचे, 'माझे गाणे आनंदाचे' ----- • विठ्ठल जाधव

 

● मन जाणती जे मुलांचे, 'माझे गाणे आनंदाचे'
-----
                                 • विठ्ठल जाधव


                   वर्तमान मराठी बालसाहित्य लेखनातील आघाडीचे नाव डॉ. कैलास दौंड यांचा 'माझे गाणे आनंदाचे ' हा बालकविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. बालसाहित्य लेखनाची धुरा सक्षमपणे पार पाडताना लेखकाला प्रौढ वाङ्मयनिर्मितीतून बालसाहित्य निर्मितीकडे का वळावे वाटले हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो.
      बालमनाचे विविध कांगोरे खोलत आणि खुलत बालसाहित्य निर्माण होते. व्हावे लहानाहूनी लहान या भूमिकेत जावे लागते. सुक्ष्मातिसुक्ष्म बाबींचे निरीक्षण करावे लागते. जे कि बालकाच्या नजरेने पहावे लागते. बालभाषा शैली, तिचा आविष्कार अवगत करावा लागतो. बालकांच्या मनाची मशागत करण्यासाठी बाल साहित्यिकास जास्त कष्ट घ्यावे लागतात. बालमनावर हळूवार फुंकर आणि रूंजी घालणारे बालसाहित्य प्रभावी ठरते. नेमकी तीच नस डॉ. कैलास दौंड यांना सापडली आहे. सहज सुंदर भाव प्रकटीकरण , लयबध्द म्हणता येतील, गुणगुणता येतील अशा 'माझे गाणे आनंदाचे' या बाल कवितासंग्रहात ३७ रचना आहेत. 'माझे गाणे आनंदाचे' मधील गाणी नाचत, बागडत प्रवेश करतात आणि लय ठेका धरायला भाग पाडतात .
    'माळरानी पानोपानी,
    रानीवनी गाऊ गाणी'
असे म्हणत पक्षी, झाडे, नदी, गाव, शिवार, उन्हाळा, पावसाळा, सकाळ, फूल आणि फूलपाखरे, आभाळ आणि धरती यासोबत खेळ, मौज, आनंद हा प्रसंगानुरूप मोजक्याच पण शेलक्या शब्दांत टिपला आहे.
    मुलांच्या सहवासातच ही गाणी सुचतात. कवीस तो सहवास लाभला आहे. मग शब्दसाज नादानुकारी बनत जातो.
   ओढ्याच पाणी
   आटतं कसं?
   हरीण पळतं
   रानात जसं!
   खरेतर बालसाहित्य हे प्रौढांनी बाल होऊन अगोदर वाचावे. येथे कवी बाल होतोय. मानवतेचे गीत गाऊया अशी अपेक्षा व्यक्त करतोय.
    देश, प्रांताच्या सीमा भेदूनी
    वारे होऊनी हिंडूया
    पक्षी होऊनी गीत नव्याने
    मानवतेचे गाऊया
    जर बालमने घडली, शाळा सुधारली तर तुरूंगाची संख्या कमी होईल ते बालसाहित्य वाचनातून होईल. इतके महत्व या गाण्यांना आहे. बालसंस्कार ही सामुहिक जबाबदारी आहे. एकनाथ आव्हाड म्हणतात की, या संग्रहामध्ये बालमनाचे गुणधर्म ठायी ठायी दिसून येतात.
       खेळ आणि गाणे हे मुलांच्या आवडीचे असतात. परिसरातील घटना, पात्र, स्थळे यांचे आकलन वयाबरोबर होत असते त्या आकलनाचे प्रतिबिंब 'माझे गाणे आनंदाचे' या संग्रहात पडते. बालकविता एकापेक्षा एक सरसपणे प्रवेशित होतात. मुलांना गुणगुणायला लावतील. सुबक चित्रे , तितकीच बालसुलभ शब्दरचना, मातृवत्सल भाषाशैली ही कैलास दौंड यांच्या 'माझे गाणे आनंदाचे' या बाल कवितासंग्रहाची मर्मस्थळे आहेत.

• माझे गाणे आनंदाचे (बाल कवितासंग्रह)
• डॉ. कैलास दौंड
• प्रकाशक: मिलिंद काटे, अनुराधा प्रकाशन, पैठण
पृष्ठे;४४
मूल्य;५०₹
------
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
-----

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर