● उद्ध्वस्त गाव शिवारात जगणाऱ्या प्रत्येकाच्या अंतर्मनातील 'आगंतुकाची स्वगते
● उद्ध्वस्त गाव शिवारात जगणाऱ्या प्रत्येकाच्या अंतर्मनातील 'आगंतुकाची स्वगते'
प्रा. डाॅ. एकनाथ श्रीपती पाटील
आगंतुकाची स्वगते हा कैलास दौंड यांचा पाचवा कवितासंग्रह. हा कवितासंग्रह म्हणजे अस्सल आणि परिपक्व वेदनेचा प्रसवाविष्कार आहे . ही 'आगंतूकाची स्वगते' कवीने तीन विभागात विभागली आहेत. पहिल्या विभागात मनाची 'सल आणि ओल' पानापानातून व्यक्त होताना दिसते तर दुसऱ्या 'नदीकाठ' या विभागात कवी महामानवांच्या वैचारिक सत्याच्या शोधात असताना दिसतोय. तर तिसऱ्या विभागात याच विचारांच्या काठाकाठाने आपल्याच स्वगतांमधून निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल 'दिसा-मासांच्या' कालीय अवकाशात करता येईल का? याचा शोध घेताना दिसतो.
दौंड यांची ही कविता खरंच स्वतःशी बोलतेय . उध्वस्त जगणं आणि आगतिक वागणं यांच्यातल्या द्वंद्वाचा हा जागतिक अंतरसंवाद आहे .गेल्या अनेक वर्षात बदललेल्या सामाजिक, राजकीय आणि जागतिक घडामोडींच्यामुळे समाजजीवन मुळापासून उध्वस्त होऊ पाहत आहे. तंत्रज्ञानाच्या या जगात माणसाचे हजारो-लाखो मित्र मुठीतल्या मुठीत बंदिस्त आहेत तरीही माणूस स्वतःशीच बोलण्यामध्ये व्यस्त आहे. ही शोकांतिका कैलास दौंड यांनी आपल्या कवितेमध्ये व्यक्त केली आहे. या बदललेल्या जगात प्रत्येक माणूस आगंतूकासारखा आपल्याच आसपास वावरतो आहे, स्वतःच स्वतःला हजार प्रश्न विचारून भंडावून सोडत आहे आणि स्वतःच त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. याच अंतर्मनाशी झालेल्या स्वगताची ही कविता आहे.
कैलास दौंड यांच्या या सार्या कविता वेगवेगळ्या असल्या तरी त्या कवितेचे एक अखंड आणि प्रवाही असे काव्यात्मक आत्ममंथन आहे. त्यांनी आपली या कविते मागची भूमिका पहिल्याच कवितेतून व्यक्त केली आहे ती म्हणजे आपली कृषी संस्कृतीशी जोडली गेलेली नाळ वाचवणं महत्त्वाचं आहे. आज आपल्या भोवतालचं ग्रामीण जीवन शहरीकरणाच्या डोझर खाली चिरडले जात आहे. ग्रामीण संस्कृती उध्वस्त होत आहे. बळावत चाललेलं घाणेरडं राजकारण ग्रामीण जीवनाच्या मुळावर येऊन बसले आहे. ग्रामीण युवक बेरोजगारीच्या विळख्यात अडकला आहे. वारंवार येणारे दुष्काळ आणि प्रस्थापितांच्या धगधगत्या विखारामुळे शेतकरी स्वतःला आत्मवेदनेच्या दोरखंडाला लटकवून घेत आहे. अस्वस्थ समाज जीवन जाती-जातीत, धर्मा-कर्मात, उच्च-नीचतेत, थरा-थरात, गटा-तटात, घरा-घरात आणि पर्यायाने उरा-उरात, अंतरात, नात्या- गोत्यात विभागले गेले आहे. आंतरिक जिव्हाळ्यांची 'खातेफोड' होत आहे. माणसांच्याच आतमध्ये माणसांचीच 'बेटं' निर्माण झाली आहेत. माणुसकीच्या किनाऱ्यापासून ही बेटं कित्येक मैल दूर आहेत. चिरेबंदी संस्कृतीच्या नुसत्या पाऊलखुणाच उरल्या आहेत. याची आंतरिक सल प्रत्येक कवितेमधून कवीच्या मनाला टोचून टोचून रक्तबंबाळ करताना दिसते. कवीला गरजेची वाटते ती ही सल सुसह्य व्हावी अशी माणसा- माणसाच्या मनात निर्माण व्हावी अशी ओल. हा शोध घेताना कवी आपल्या 'ओल' कवितेमध्ये म्हणतो
' गवताचा जन्म उभा
शोधतो गायीस
निळाईच्या खाली पुरे
तुझा- माझा सोस...'
या उद्विग्न अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी कवी पिकांमध्ये वाढलेल्या तणरुपी गवताला पिकासह काडी लावण्याचाही सल्ला देतो आहे. कवी उध्वस्त जीवनाच्या कारणमिमांसेचा शोध घेण्यामध्येही यशस्वी झाला आहे. गावाच्या अस्सलतेला शहरीकरणाची संसर्गजन्य लागण होताना कवीचे मन अस्वस्थ होताना दिसते. आज ही अस्वस्थता अखंड विश्वातल्या ग्रामीण मना-मनाला व्यापून राहिली आहे.
'गाव कुठे जाईल याचा अंदाज कुणाच्याच मनाला येत नाही.'
ही गोंधळलेली अवस्था प्रत्येक माणसाची आहे. आणि ती नेमकी व्यक्त करण्याचं काम कवीची स्वगते करतात. ग्रामीण मनाला आशेच्या मृगजळाने पूर्णतः व्यापून टाकले आहे. या साऱ्या व्यवस्थेला कारण ठरलेली माणसाची न शमणारी हव्यासाची तहान आणि न भागणारी स्वार्थाची बकाल भूक या साऱ्या व्यवस्थेच्या ऱ्हासाला कुठंपर्यंत घेऊन जाणार आहे? याला काही अंत आहे की नाही? या गोंधळाच्या गर्तेत कवीचे स्वगत वारंवार अडकताना दिसते.
कवितेच्या मध्यगर्भात शिरताना मात्र कवी उजाड ओसाड आणि कोरड्या पडलेल्या नदीपात्राच्या काठाने मानवतेचा ओलावा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःतल्या स्व:चा आणि अंतरात्म्याशी सुसंवाद साधणार्या भाषेचा अभिमान बाळगत कवी युद्धाचे नव्हे तर बुद्धाचे समर्थन करताना दिसतो. महामानव गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा यांच्या मानवतावादी विचारांचा वारसा या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी आणि हे उद्ध्वस्त वर्तमान वाचवण्यासाठी उपयोगात येईल हेही सांगण्यास विसरत नाही.
पुढे तिसऱ्या आवर्तनात कविला दिसा-मासाने जाणवणाऱ्या गटा-तटाच्या, जाती-पातींच्या, धर्माच्या, अधर्माच्या, पिढ्यां-पिढ्या मधील अंतराच्या संघर्षाचा उद्वेग छळताना दिसतो. हरवत चाललेल्या गावाच्या गावपणाचे शेताच्या हिरवेपणाचे, रानातल्या जिवित्वाचे आणि माणसातल्या माणूसपणाचे पुनर्प्रस्थापन करण्याची धडपड कवीच्या शब्दा- शब्दांमधून व्यक्त होते. हरवलेल्या गावपणाचं हे दुखणं कवीला वारंवार टोचताना दिसते.
तरीही या सर्वातून बाहेर पडण्यासाठी कविचा सर्वात मोठा विश्वास आहे तो मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यावर. कारण त्या शेतकऱ्याने कुणाच्याही आशीर्वादावर भरवसा न ठेवता फक्त मातीचा श्लोक मनात जपला आहे आणि या एकाच श्लोकाच्या जीवावर तो निश्चितच मानव जातीला या भयानक गर्तेतून बाहेर काढेल असा आशावाद कवी व्यक्त करतो.
कविता व्यक्त होताना आलेल्या प्रतिमा आणि प्रतीके ही गावातल्या विझत, धुमसत चाललेल्या चुलीच्या आतून, व्याकूळ मनाच्या अंतरातून, मातीच्या प्राक्तनातून, शोषितांच्या अंतर्मनातून आणि उध्वस्त होत चाललेल्या शेतकऱ्याच्या वेदनेच्या गर्भातून प्रसवतात. त्या वाचकाच्या काळजाला गवसणी घालतात, म्हणूनच ही 'आगंतुकाची स्वगते' वाचकाला अस्वस्थ करून सोडतात. खऱ्या साहित्यकृतीचे हेच खरे यश आहे या अर्थाने कवी कैलास दौंड यांची ही स्वगते समर्थपणे व्यक्त होण्यात यशस्वी ठरली आहेत.
ही स्वगते वाचताना
'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग |
अंतर्बाह्य जग आणि मन ॥'
या मनाच्या अवस्थेत घेऊन जातात हे मात्र नक्की.
• आगंतुकाची स्वगते : कवितासंग्रह
• कवी : डॉ. कैलास दौंड
• प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
•प्रथमावृत्ती - १२जानेवारी२०२१
• पृष्ठे ९६ • मूल्य ११० ₹
• मुखपृष्ठ : प्रमोदकुमार अणेराव.
~~~
प्रा. डाॅ. एकनाथ श्रीपती पाटील
हिंदी विभाग प्रमुख
राधानगरी महाविद्यालय, राधानगरी
भ्रमणध्वनी:९४२११११५१७
संनेदनक्षम,चिंतनशील मनाचे काव्यात्म स्वगत आणि मार्मिक ह्रदगत!💐💐अभिनंदन!!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवा