समर्पित भावनेचा वस्तूपाठ : शिवा कांबळे
शिक्षणयात्री
समर्पित भावनेचा वस्तूपाठ : शिवा कांबळे
शिवाजी खंडू कांबळे नावाचे अध्यापन कुशल शिक्षक १९८८ पासून शिक्षक म्हणून नांदेड जि. प. मध्ये सेवेत आहेत. आपल्या सेवेच्या सुरुवातीपासूनच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने काम करायचे ठरवले. त्यासाठी नोकरीच्या वेळेपेक्षा अधिक वेळ दिला. याचा परिपाक म्हणून शिवाजी कांबळे सर विद्यार्थ्यांसह सर्वांचे लाडके शिवा कांबळे ठरले आहेत.
सध्या ते नांदेड जि. प. हायस्कूल मालेगाव या अर्धापूर तालुक्यातील विद्यालयामध्ये कार्यरत आहेत. दररोज ते शाळेच्या वेळेपूर्वी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा नियोजनानुसार अभ्यास करून घेतात. २०१९ पासून त्यांच्या विद्यालयामध्ये फेब्रुवारी महिन्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ते रात्रीचा वर्ग चालवतात. त्यासाठी त्यांनी दिनक्रम ठरवून घेतला आहे. चार वाजता विद्यालय सुटल्यावर ते लगेच चार ते आठ असा अभ्यास वर्ग घेतात. या वर्गाला इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थी हजर असतात. आठ वाजता विद्यार्थीनी घरी जातात व विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे येतात. सरांनी सुद्धा त्यासाठी मालेगाव मेस लावली आहे. जेवणानंतर विद्यार्थ्यांचा नियोजित तासिकेप्रमाणे अभ्यास होतो. इथे विद्यार्थी 12:00 वाजेपर्यंत वाचन, अभ्यास करतात. सकाळी साडेतीन वाजता अलार्म असतो. चार वाजेपर्यंत प्रात:र्विधी आवरून विद्यार्थी पुन्हा सात वाजेपर्यंत अभ्यासाला बसतात. नंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे सरांनी त्यांना देखील या अभ्यासिकेत सामावून घेतले.
कोरोना काळातील एक वर्षाचा अपवाद सोडता कांबळे सरांनी सुरू केलेला हा उपक्रम अविरत आजही सुरू आहे. याचा परिणाम इयत्ता दहावीचा निकाल वाढण्यामध्ये झाला. विद्यार्थ्यांनाअभ्यासाची सवय लागली. मोबाईल पासून दूर राहण्यात मदत झाली. गरीब व सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना गोंगाट विरहित वातावरणात अभ्यास करण्याची संधी मिळाली.
रात्री अभ्यासिका चालवली म्हणून दुसऱ्या दिवशी उशिरा येतील तर ते शिवा कांबळे सर कसले! सकाळी सात वाजता विद्यार्थी व कांबळे आपापल्या घरी जातात. पुन्हा तिथून आठ वाजता निघून ते शाळेला नऊ पूर्वीच हजर असतात. प्रत्यक्षात शाळेची वेळ दहा वाजताची असते. या मधल्या एक तासांमध्ये शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना गोलाकार बसून त्यांच्याकडून ठरलेल्या विषयाचे वाचन करून घेतात.
समस्या समजून घेणे, तिच्या निराकरणासाठी नियोजन करणे, ते प्रत्यक्षात अमलात आणणे, त्यातील त्रुटी दूर करत सहजपणाने आणि अविरतपणे उपक्रम राबवणे हा सरांचा स्वभाव. शिवा कांबळे सरांनी त्यांच्या सेवेच्या प्रत्येक ठिकाणी तेथील समस्या हेरून तिचे निराकरण आपल्या उपक्रमाच्या साह्याने केलेले आहे. ते लोहा तालुक्यातील हर्सद येथे असताना त्यांना विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवली. यावर उपाय म्हणून त्यांनी ‘प्रभात दिंडी’ हा उपक्रम राबवला. त्यासाठी ते स्वतः हर्सदच्या ग्रामपंचायत समोर आठ वाजता येत असत. काही विद्यार्थी देखील येथे जमत. मग शिक्षण विषयक घोषणा देत गावातून प्रभात दिंडी निघे. या दिंडीचा फायदा होऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती शतप्रतिशत होण्याकडे वाटचाल झाली. तत्कालीन शिक्षणाधिकारी गोविंद नांदेडे यांनी या उपक्रमाची दखल घेत त्या वेळचे शिक्षण उपसंचालक कळमकर साहेबांच्या कानी ही गोष्ट घातली. एके दिवशी अनाहूतपणे येऊन स्वतः शिक्षण उपसंचालकांनी ही प्रभात दिंडी पाहिली. त्यावेळी शिक्षण मित्र या नियतकालिकामध्ये ‘हर्सद ची प्रभात दिंडी नव्या युगाची नांदी’ या लेखामुळे राज्यभर या उपक्रमाची दखल घेतली गेली.
शिक्षकांनी समर्पित भावनेने काम केल्याशिवाय, अतिरिक्त वेळ दिल्याशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवू शकत नाही हे त्यांचे अनुभवातून आलेले मत आहे. इतरही सर्व शिक्षकांना ते मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषद हायस्कूल बारड या ठिकाणी असताना त्यांनी अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी ‘दत्तक मैत्री’ प्रकल्प राबवला. यात हुशार विद्यार्थी दोन अप्रगत विद्यार्थ्यांना मित्र करून घेत. शिक्षक म्हणून कांबळे सर हुशार विद्यार्थ्यांना वेगळा व अप्रगत विद्यार्थ्यांना वेगळा असा अभ्यास देत. हुशार विद्यार्थी स्वतःचा अभ्यास आटोपून किंवा करता करता त्यांच्या कडे सोपवलेल्या इतर दोन विद्यार्थ्यांचा अभ्यासही खूप चांगल्या प्रकारे करून घेत. त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून देत. यामुळे हाही प्रकल्प लक्षणीय ठरला. त्यांनी काही काळ गट समन्वयक म्हणून सर्व शिक्षा अभियान मध्येही काम केले. यावेळी त्यांनी समावेशित शिक्षण अंतर्गत केलेले काम खूप मोठे आहे. रात्रंदिवस विद्यार्थी हिताचा विचार करणाऱ्या आणि त्यासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या या या शिक्षकाला त्यांच्या अर्धांगिनी देखील मनःपूर्वक सहकार्य करतात. 2009 या वर्षांमध्ये त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर देखील त्यांच्या कामात तसूभरही बदल झाला नाही उलट ते वाढतच गेले. महाराष्ट्र शासनाच्या अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समितीवरही ते सदस्य आहेत.
~~~~~ ( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
प्रेरणादायी कार्याचे तेवढेच सुंदर शब्दांकन👍👍
उत्तर द्याहटवा