शिक्षणयात्री ३

शिक्षणयात्री ३

                         

                          मंतैय्या बेडके : जाजावंडीचा शिक्षण दीप!

             गडचिरोली पासून दोनशे दहा किलोमीटर अंतरावरील जाजावंडी हे एटापल्ली तालुक्यातील जेमतेम सहाशे लोकवस्तीचे गाव. अत्यंत दुर्गम भाग. पक्का रस्ता सुद्धा नाही. या गावातील शिक्षक मांत्तैय्या चिन्नी बेडके यांना २०२४ च्या शिक्षक दिनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नक्षलबहूल भागात शिक्षणाचा प्रवाह खळाळता करणाऱ्या या शिक्षकाचे कार्य मूलभूत स्वरूपाचे आणि विशेष असे आहे. जाजावंडी या गावाबद्दल सांगायचं म्हणजे अगदी मूलभूत सुविधांचाही अभाव असणारे हे गाव. सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पातागुडम हे मांतैय्या बेडके यांचे मुळगाव. २०१० या वर्षांमध्ये ते नोकरीस लागले. प्रथम नियुक्ती मिळाली ती जाजावंडीच्या शाळेतच. तेव्हापासून आजतागायत  त्यांनी जणू स्वतःला शाळेसाठी समर्पित केले आहे. शाळेतील पटसंख्या फक्त आठ होती. सभोवताली निरक्षरता, गरिबी, सुविधांच्या गैरसोयी, पालकांच्या प्रतिसादाचा अभाव अशा अनेक समस्या होत्या. या समस्यांना भिडून काहीतरी जिद्दीने करायचे त्यांनी ठरवले. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद सुरू ठेवला. त्या दुर्गम गावाशी स्वतःला जोडून घेतले. ते गावात झोपडी बांधून राहू लागले. शाळेतील मुलांना खेळ कला नृत्य आदींच्या साह्याने शिक्षण देऊ लागले. शाळा नियमित भरू लागली.

       शाळा सुशोभन करणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या निसर्गात वनभोजन घडवून आणणे, क्षेत्रभेटींचे आयोजन करणे, खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करणे, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणे अशी कामे त्यांनी मन लावून सुरू केली. हळूहळू शाळेचे वातावरण बदलू लागले. काही मुले शाळेत येत नसत ते पालकांबरोबर शेतात किंवा जंगलातील वस्तू गोळा करण्यास जात.  मुलांना त्यांच्या बोली भाषेत संवाद साधल्याशिवाय शिक्षक व शाळा आपली वाटणार नाही हे माहिती असल्यामुळे मांतैय्या बेडके यांनी तिथली बोलीभाषा ‘माडिया’ स्वतःआधी शिकून घेतली. विद्यार्थ्यांच्या बोली भाषेचा संवादासाठी वापर करून त्यांना प्रमाण भाषेपर्यंत घेऊन जाण्याचा मार्ग त्यांनी अवलंबविला आणि तो यशस्वी ठरला.


        लोकांशी सतत संवाद ठेवल्याचा परिणाम म्हणून त्यांनी लोक सहभागातून शालेय इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी केली. ही शाळा डिजिटल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. जाजावंडी येथे इंटरनेट नेटवर्कची अडचण होती. इच्छा तिथे मार्ग त्यांनी शोधला. जवळच्या एका उंच झाडावर त्यांनी ॲंटीना बांधून मार्ग काढला. विद्यार्थ्यांना ते इतर विषयाप्रमाणेच इंग्रजीचेही धडे देत. शिक्षकांची धडपड आणि त्यांचे शिकवणे बघून आजूबाजूंच्या छोट्या छोट्या गावातून विद्यार्थी या शाळेत यायला सुरुवात झाली. त्यात वटेली, ताडगुडा, गट्टा, गट्टागुडा, गट्टाटोला, जाजावंडी टोला, पुस्कोटी आदी चार किलोमीटर परिघातील गावातील विद्यार्थी जाजावंडीच्या शाळेत दाखल होऊ लागले. नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच  जीवनासाठी आवश्यक कौशल्याचे शिक्षण मिळू लागले. शालेय क्रीडा स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी दाखवली. या शाळेची प्रगती पाहून दहा पालकांनी एटापल्ली आणि आलापल्ली च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून स्वतःच्या मुलांना काढून मांतैय्या बेडके यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातून आणखी मुले शाळेत येऊ लागली. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन केले आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यामुळे पटसंख्या वाढली.काही मुले अशी होती की गरीबीमुळे त्यांच्या जेवणाचा प्रश्न होता. अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांची शाळा परिसरातच निवासाची व जेवणाची सोय केली. यासाठी गावातील काही पालकांनी सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळे तीसेक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली. सुरुवातीस  चौथीपर्यंत असणारी शाळा मांतैय्या यांच्या प्रयत्नामुळे सातवीपर्यंत झाली. आज या शाळेचा पट वाढून १३२ झाला आहे. व शिक्षक संख्या पाच आहे.   विद्यार्थी केंद्र पातळीवरील व तालुका पातळीवरील स्पर्धात यश मिळवत आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये दोनशे पुस्तकांचे वाचनालय ही उभारले आहे.

   मांत्तैया  बेडके यांनी गावातील साक्षरता वाढीसाठी दोन स्वयंसेवकांना मदतीस घेतले. पालक साक्षर झाल्याशिवाय त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटणार नाही हे मांतैय्या यांनी हेरले. प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्याचे प्रयत्न केले. त्यांना शिकवले. त्याचा परिणाम म्हणून जवळपास दीडशे प्रौढ साक्षर झाले आहेत. स्वतः घेतलेल्या  उच्च शिक्षणाचा बेडके गुरूजी  जाजावंडीची शाळा, विद्यार्थी आणि गाव त्यांच्यासाठी पुरेपूर वापर करत आहेत. एका ध्येयवादी शिक्षकाने समर्पित कर्तव्य भावनेने केलेले आणि करत असलेले हे काम प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवणारे आहे. 

     गावात राहून, गावाशी एकरूप होऊन, गैरसोई, अडचणी आणि समस्या यांना न जुमानता ध्येयवादाने व समर्पित भावनेने अविरत कार्य करणाऱ्या या शिक्षकाच्या कामाची उचित दखल घेत मांतैय्या बेडके यांना २०२४ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे; अर्थातच त्यामुळे जाजावंडीची शाळा राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.

~~~

( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर