फांगदरच्या ओयासिसचे शिल्पकार : खंडू मोरे

|| शिक्षणयात्री ||
फांगदरच्या ओयासिसचे शिल्पकार : खंडू मोरे 


नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील गिरणेच्या काठावरील खामखेडा हे गाव आणि या गावापासुन चार किमी अंतरावर फांगदर ही पंचवीस-तीस घरांची आदिवासी शेतमजुरांची वस्ती आज सर्वत्र माहिती झाली आहे ती तेथील प्राथमिक शाळेमूळे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या उद्देशाने २ जुलै २००१ रोजी पाचटाच्या झापात पंधरा विद्यार्थ्यांसह या वस्तीशाळेची सुरूवात झाली. शिक्षक म्हणून होते खंडू मोरे त्यांनी आठ वर्षे एकट्याने हजार रुपये मानधनावर शाळेची धुरा सांभाळली. भौतिक सुविधांचा अभाव असलेली ही शाळा २००८ मध्ये जिल्हा परिषदेकडे नियमित झाली.
खंडू मोरे यांनी त्यांच्या कल्पक आणि भरीव योगदानाने ही शाळा आज जिल्ह्याच्या नकाशावर आणली आहे. खंडू मोरे यांच्या प्रयत्नातून खडकाळ फागंदरच्या माळावर तिथली शाळा म्हणजे जणू ओयासिस बनली आहे. 
         शाळेला शेतकऱ्याच्या मदतीने जागा उपलब्ध होऊन सर्व शिक्षा अभियानात दोन खोल्या मिळाल्याने शाळेला रूप आले. आणखी एक नियमित शिक्षक सहकारी मिळाला. खंडू मोरे यांची धडपड सुरुच होती. त्यांनी बागाईतदार शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून शाळेसाठी त्यांचे सहकार्य मिळवले. आज फांगदर शाळेने पंधरा लाखाहून अधिक लोकसहभाग जमा करत शाळा विकासातील निधीचा अडसर दूर केला. शासकीय मदतीविना शाळेत ‘ई लर्निग’च्या माध्यमातून एका वर्गाची अध्ययन-अध्यापनाची सोय केली. सहा संगणक, प्रोजेक्टर, साउंड सिस्टीम, इंटर ॲक्टीव स्मार्ट बोर्ड,एम्प्लीफायर,चोवीस तास विजेसाठी सोलर सिस्टीम आदी सुविधा या आदिवासी वस्तीवरील शाळेत उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व सुविधांचा वापर मोरे व त्यांचे सहकारी करतात. साहित्याच्या मदतीने परीणामकारक अध्यापन आणि आनंदी स्विकारण होऊन विद्यार्थी गुणवत्ता वाढली आहे. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असणाऱ्या या शाळेची पटसंख्या आज रोजी पंचेचाळीस आहे.विद्यार्थ्यांना स्वतः डिजिटल साधने वापरायला मिळाल्याने उत्साहाने आणि आनंदाने अध्ययन प्रक्रियेत सहभागी होत आहेत. इयत्ता पहिली - दुसरीतील विद्यार्थी दोन अंकी संख्या वाचन लेखन, बेरीज वजाबाकी क्रिया सहजपणे करतात. मराठी व इंग्रजी या भाषाविषयाची तयारीही चांगली आहे.
       विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रिडांगण आणि एखादी बाग आकारास यावी म्हणून मोरे सरांनी वस्तीवरील लोक मजूरी करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर प्रस्ताव ठेवला. त्यांची प्रामाणिक धडपड आणि शाळेची प्रगती पाहून लोकांनी मदत करावयची ठरवली. लोकसहभागातून जेसीबीच्या सहाय्याने शाळेजवळ मैदान तयार झाले. मग औषधी बगीचा आकारास येऊ लागला. शिक्षकांनी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने शालेय आवारात तीनशेपेक्षा अधिक झाडे लावली आहेत , त्यात बेचाळीस औषधी वनस्पतींचा समावेश आहे. प्रत्येक झाडाला त्याच्या नावाची पाटी लावलेली आहे. शाळेने आयएसओ मानांकन देखील घेतले आहे. वीज गेल्यावरही डिजिटल साधनांचा वापर करता यावा यासाठी परीसरातील तरूणांच्या आर्थिक सहकार्याने सौरऊर्जा संयंत्र बसवण्यात आले आहे.शाळेच्या सुविधा, साधने वाढवतांना , शाळेला अद्यावत बनवतांना विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अध्यापनालाच ते अग्रक्रम देतात. सुविधा असाव्यातच आणि त्या सुविधांचे प्रयोजन विद्यार्थ्यांसाठीच असावे याची त्यांनी काळजी घेतली.    
       विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वाचन करण्यासाठी एक हजारहून अधिक पुस्तकाचे ग्रथालय देखील शाळेत आहे. महावाचन सारख्या उपक्रमात आणि थोर व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच अवांतर वाचनासाठी या ग्रंथालयाचा वापर होतो.
            वस्तीवरील शाळा असल्यामुळे खंडू मोरे व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शाळेत ना नफा ,ना तोटा अशी वस्तु भांडाराची निर्मिती केली. पेन,पेन्सिल,वह्या,रंग यांच्या विद्यार्थ्यांच्या गरजा शाळेतच पूर्ण होतात.याचा हिशोब शाळेतील विध्यार्थी ठेवत असल्याने विध्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते. 
            एकूणच फागंदरच्या ही शाळा अद्यावत सोई सुविधांनी परिपूर्ण झाली आहे. तिथले वातावरण आनंदी आणि उत्साही झाले आहे. क्षेत्रभेटी ,वाढदिवस ,आईची डायरी, माझा अभ्यास, माईंड मॅप,थोरांच्या जयंती, पूण्यतिथी साजऱ्या करण्यामूळे विचारांचे बिजारोपण विद्यार्थ्यांतही होते आहे. शैक्षणिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन विद्यार्थी पाठ्यघटकाचा सराव करतात. पुढीलवर्षी पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या मुलांना देखील पहिलीच्या वर्गात बसू देत असल्याने त्यांची शाळापूर्व तयारी आपोआपच होऊन त्यांना शालेय वातावरणाची सवय होते.
              नदी, घाट, लघु उद्योग, बायोगॅस प्रकल्प, आधुनिक शेती, प्राथमिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, बँक, वीटभट्टी, कुक्कुटपालन , साखर कारखाना, पोलीस ठाणे अशा अनेक ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेटी देऊन तिथल्या कामाची साधारण माहिती घेतली आहे. २०१९मध्ये त्यांनी पालकांच्या विद्यार्थ्यांची नाशिक ते मुंबई अशी विमान सहल काढली होती. विद्यार्थ्यांसाठी हा अविस्मरणीय आणि नाविण्यपूर्ण अनुभव होता. जिल्हा परिषदेकडे शाळा वर्ग झाल्याच्या कार्यकाळात त्यांना संजय गुंजाळ आणि आनंदा पवार या सेवाजेष्ठ शिक्षकांसोबत काम करता आले. त्यामुळे शाळेच्या प्रगतीत त्यांचाही मोठा सहभाग असल्याचे खंडू मोरे आवर्जून सांगतात हे विशेष.
~~~~
( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)


        
          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर