शिक्षणयात्री ४||शिक्षणबागेच्या शिल्पकार : दिपाली सतीश सावंत.||
शिक्षण यात्री
शिक्षणबागेच्या शिल्पकार : दिपाली सतीश सावंत.
वर्धा जिल्ह्यातील शेकापूर (बाई) येथे कार्यरत असणाऱ्या दिपाली सतीश सावंत यांची हिंगणघाट तालुक्यातील शहरापासून जवळपास ४०कि.मी. अंतरावरील साडेतीनशे लोकवस्तीच्या ‘कोल्ही’ गावातून २००६ मध्ये शिक्षिका म्हणून सेवेला सुरूवात झाली. या गैरसोयीच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी त्यांना त्यांच्या पतीने साथ दिली. जवळच असणाऱ्या शेकापूर गावात त्या पतीसह राहायला आल्या. कोल्ही गावात फारसे शैक्षणिक वातावरण नव्हते. गावापासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर पारधीबेडा होता. दिपाली सावंत आणि त्यांचे सहकारी नाईक गुरुजींनी पारधीबेड्यावरील मुले शाळेत आणायला सुरुवात केली. ही मुले अस्वच्छ असल्यामुळे शाळेत नेऊन त्यांचे हातपाय धुणे व त्यांच्या केसांना तेल लावून विंचरून नीटनेटके करणे ही कामे करण्यासाठी दिपाली यांनी पुढाकार घेतला. नाईक सर देखील या कामात मदत करत. शाळेच्या अवस्था म्हणजे चार वर्ग आणि एक खोली तीही अगदी धोकादायक म्हणता येईल अशी. म्हणून मग जवळच्या एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली शाळा भरू लागली. या उघड्यावरील शाळेचा एक नकळत फायदा झाला तो असा की लोकांना शिक्षकांची तळमळ आणि विद्यार्थ्यांतील बदल दिसू लागला. पालक आणि शिक्षकांचा संपर्क वाढला. काही दिवसांनी नवीन इमारत झाली. शाळेच्या परिसरात बाग असावी असे मॅडमला वाटे. त्यामुळे त्यांनी ते काम हाती घेतले. दोन वेळा अयशस्वी प्रयत्नानंतर तिसऱ्यांदा मात्र गावकऱ्यांनी बागेच्या निर्मितीसाठी मनोमन साथ दिली.
२००७ मध्ये ज्ञानरचनावाद या संकल्पनेचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. ज्ञान निर्मितीसाठी दिपाली सावंत यांनी शाळेत पेंटिंग करायला सुरुवात केली. कृती आणि विचारप्रवर्तक शिक्षणामुळे विद्यार्थी इंग्रजी व गणित या विषयासह इतर विषयातही उत्तम प्रगती करू लागले.
पारधीबेड्यावरील मुलांच्या शाळेत येण्या-जाण्याचा प्रश्न सुटावा आणि त्यांना शैक्षणिक वातावरण लाभावे यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या मुलांना आश्रम शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी दिपाली सावंत मॅडम यांनी पुढाकार घेतला. याचा परिणाम म्हणून सहा ते चौदा या वयोगटातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहिला नाही. पारधी वस्तीवरील दोन अनाथ मुलांना त्यांनी मदत मिळवून दिली. पालकांच्या नियमितपणे भेटी घेणे हा त्यांच्या कामाचा भाग बनला. शाळेत विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांच्या क्षमतेनुसार उपक्रमांची निश्चिती करून ते प्रयत्नपूर्वक राबवले.उपक्रमामध्ये बागेत अध्यापन हा उपक्रम आनंददायी ठरला.
सर्वत्र डिजिटल शिक्षणाचे वारे वाहू लागल्यामुळे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ मिळाला पाहिजे असे वाटून दिपाली मॅडमच्या प्रयत्नाने बजाज फायनान्स वर्धा यांचेकडून लॅपटॉप व ई लर्निंग सॉफ्टवेअर शाळेसाठी मिळवले. त्याच्या माध्यमातून शैक्षणिक घटक, कविता, गाणी विद्यार्थ्यांना पाहता व ऐकता येऊ लागले. अभ्यासक्रमाचा सराव घेण्यासाठी ही याचा उपयोग झाला. या साधनांमुळे इंटरनेटचा देखील शैक्षणिक कामासाठी वापर करताना. आपल्याला अवगत असलेले हे डिजिटल शिक्षणाचे तंत्रज्ञान इतरही शिक्षकांना माहीत व्हावे या हेतूने पंचायत समिती सभागृहात शिक्षक बंधू भगिनींना त्यांनी तीन दिवस डिजिटल तंत्रज्ञान वापराचे पायाभूत प्रशिक्षण दिले.
पाठ्यपुस्तकातील शिक्षणबरोबरच विद्यार्थ्यांना नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेचा आनंद घेता यावा यासाठी त्यांनी दिवाळीनिमित्त आकाश दिवे तयार करणे हा उपक्रम देखील राबवला. त्याचा परिणाम म्हणून गावातील लोक दिवाळीला घरावर आकाश दिवे लावू लागले. विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश दिवे विकत घेऊ लागले.
दिपाली सावंत या शालेय अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्याची निर्मिती करतात. दैनंदिन अध्यापनात त्याचा वापर करतात. तरंग वाचनालय या त्यांच्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. बागेतील झाडांची खोडांवर विविध फलक त्यांनी रंगवलेले आहेत. शब्द चेंडू या नाविन्यपूर्ण उपक्रमा तून त्यांनी बागेचे सुशोभन केले आहे. विद्यार्थी आणि बाग यांचा अनुबंध त्यांनी खूप कल्पकतेने जोडलेला आहे. मिळून मिसळून काम करण्याचा स्वभाव असल्यामुळे या सर्व कामात परमेश्वर नरवटे व नाईक या सहकारी शिक्षकांचाही वाटा असल्याचे त्या सांगतात.
या उस्फुर्त आणि नाविन्यपूर्ण कार्यामुळे कोल्ही शाळेतील दोन विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशित झाले तर शिष्यवृत्ती परीक्षेतही काही मुलांनी चांगले यश मिळवले आहे. सावंत यांच्या शाळेला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डायटचे प्राचार्य यांनी भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनीही शाळेला डिजिटल साहित्य दिले.
२०२३ मध्ये ज्या शेकापूर गावात त्या नऊ वर्ष राहिल्या तिथल्या शाळेत त्यांची बदली झाली. या ठिकाणीही त्यांच्या कामाचा, विद्यार्थ्यात मिळून मिसळून शिकवण्याचा गरजा धिष्ठीत उपक्रम राबवण्याचा झपाटा तसूभरही कमी झालेला नाही. इथल्या विद्यार्थ्यांना coffee with CEO अशी संधी नुकतीच प्राप्त झाली. 13 विद्यार्थी BTS परीक्षेत गुणवत्तेत आले.दिपाली सावंत यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे.
~~~
( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
दिपाली सावंत - +91 94234 21603
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा