निर्मितीचा ध्यासपंथी : बाळाराम गायकर

        निर्मितीचा ध्यासपंथी : बाळाराम गायकर
         बाळाराम महादेव गायकर हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणाऱ्या हेदवली या दुर्गम भागातील शाळेत शिक्षक आहेत. या शाळेत ते १९९७ मध्ये रुजू झाले. त्यावेळी इयत्ता पहिली ते चौथी या चार वर्गाचा पट ६९ इतका होता पुढे २०१२ मध्ये त्यांनी पाचवीचा वर्गही सुरू केला. त्यानंतर २०१६ मध्ये शांताराम पवार आणि भरत ढाकणे हे शिक्षक सहकारी त्यांना मिळाले. आज शाळेची पटसंख्या १६९ असून ही शाळा राज्यातील एक उत्कृष्ट शाळा म्हणून नावारूपाला आली आहे. . साहजिकच शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण शून्य आहे. 
या शाळेचे वैशिष्ट्य असे आहे की, शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून अनेक वस्तू व शैक्षणिक साहित्य स्वतः तयार केलेले आहे. हे साहित्य पुठ्ठा , कार्डशिट यांच्या साह्याने न बनवता लोखंड, पत्रा, लाकूड यांच्या माध्यमातून टिकाऊ स्वरूपाचे बनवलेले आहे.
           भाषा विषय, गणित , परीसर अभ्यास या विषयांच्या शैक्षणिक साहित्याचा त्यांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्यात समावेश आहे. या खेरीज येथील मुख्याध्यापक बाळाराम महादेव गायकर यांना स्वतः नवनिर्मितीची आवड असल्यामुळे सुतारकाम,गवंडीकाम , इलेक्ट्रिशियन, माळीकाम, पेंटिंग, वेल्डिंग अशी कौशल्याची कामे त्यांनी शिकून घेतलीत. या कौशल्याच्या उपयोग त्यांनी शाळेसाठी विविध साहित्याची निर्मिती करण्यासाठी केला. सुट्टीच्या दिवशी विविध साधने बनवताना त्यांना विद्यार्थी देखील मदत करतात. अगदी आश्चर्य वाटावे असे काही विद्यार्थी तर स्वतः कटिंग मशीन आणि ड्रिल मशीनही चालवतात. अर्थात हे सगळे चाकोरीबद्ध अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असले तरीही जीवनात उपयोगी पडणारे शिक्षण आहे. बहुतेक साहित्य बनवताना निरुपयोगी किंवा इतर खराब झालेल्या अवजारांचे, उपकरणांचे भाग त्यांनी त्यासाठी वापरलेले आहेत.

        शाळेमध्ये बाळाराम गायकर यांनी विद्यार्थ्यांसस कल्पकतेने काही रोबोटिक मॉडेल्सची देखील निर्मिती केलेली आहे. हे आनंददायी अनुभव देणारे आणि उपयोगी पडणारे तंत्रज्ञान आहे. यामागे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची कल्पकता आहे. शाळेला कुंपण तयार करतांना त्याच्या सौंदर्याकडे लक्ष दिले आहे. त्या कुंपणावर ठराविक अंतरावर रंगवून जुने टायर लटकवलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे साहित्य बनवलेले आहे. त्यापैकी बहुतांश साहित्य शिक्षकांनी स्वतः बनवले आहे. त्यात अनेक हालचाल करणारी उपकरणे आहेत, पक्ष्यांच्या पंखासारखी हालचाल करणारी देखील उपकरणे आहेत, वातावरण ताजे करणारे बिनखर्चाचे कारंजे आहे, शाळेच्या छतावरील पाणी एकत्र करण्यासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी) पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचे पाईप स्वतः शिक्षकानी बनवले आहेत.
  विशेष म्हणजे शाळेला दोन गुंठे जागेची सुंदर अशी परसबाग आहे. या परसबागेमध्ये वांगी, टोमॅटो, मिरची, घेवडा ,शिराळी, दुधी भोपळा, मेथी, मुळा, कोथिंबीर असा भाजीपाला पिकवला जातो. शालेय पोषण आहारामध्ये तो वापरला जातो. या कामांमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकही रमून जातात. ही परसबाग म्हणजे सेंद्रिय शेतीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल अशी आहे.
        शालेय विद्यार्थ्यांचे लयबद्ध आणि सुंदर असे लेझीम पथक प्रत्येक कार्यक्रमात रंगत आणते. सर्जनशीलतेचे, नवनिर्मितीचे नवनवे अनुभव देणारी ही शाळा विद्यार्थ्यांना सतत हवीहवीशी वाटते. त्यामुळेच शालेय परिसरात सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थी काही ना काहीतरी करत असलेले आपणास दिसतात.
        आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, गणितीक्रिया करणे अशा अभ्यास विषयांचा सुद्धा उत्तम विकास झाला आहे. प्रत्येक अडचणीवर नवनिर्मितीने मात करता येते असा जण वस्तूपाठच बाळाराम गायकर यांनी घालून दिला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तयार केलेल्या शैक्षणिक साहित्यापैकी ॲक्युप्रेशर, विद्युत सायकल, चक्रीय बल, स्तंभालेख, चक्र फिरवावा वाक्य बनवा, कोनांची दुनिया, संख्यातुला, त्रिकोण फिरवा शब्द बनवा, अंक गिरणी, चक्र फिरवा वस्तू मोजा, संख्याचक्र, दिशाचक्र इत्यादी खेळता खेळता ज्ञानात वाढ करणारी शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुली करून दिली आहेत.
        या शाळेला काही पुरस्कारही मिळालेले आहेत. सिटी इंटरनॅशनल प्रोजेक्ट, मुंबईचा प्रथम क्रमांक २०१९ ते २२ असा सलग तीन वर्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवलीला प्राप्त झाला. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये या शाळेने सहभाग घेतला. त्याखेरीस विविध संस्थांच्या उपक्रमाही ही सहभाग शाळा घेत असते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांकाचे एकतीस लाख रूपयाचे बक्षीस शाळेस मिळाले आहे. शिक्षकांनी सेवा कार्यात स्वतःला जर वाहून घेतले तर तो मोठे कार्य करू शकतो व आंतरिक समाधान मिळवू शकतो असा बाळाराम गायकर यांचा अनुभव आहे. शाळेतील इतर शिक्षकांचेही त्यांना सहकार्य असते. सह्याद्रीच्या पोटाशी असणाऱ्या गावातील या शाळेने गावातील मुला मुलींच्या शिक्षणाचा मार्ग आनंददायी आणि सुकर बनवला आहे. या शाळेला कॉर्पोरेट लूक देण्यात अविरत काम करणाऱ्या मुख्याध्यापकांचा मोठा वाटा आहे. या शाळेला आजवर अनेक शिक्षकांनी व मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
~~
( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
बाळाराम गायकर - +91 77981 11859

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर