सहशालेय उपक्रमाची पेरणी : निलम सुंबे
सहशालेय उपक्रमाची पेरणी : निलम सुंबे
सहशालेय उपक्रमाची पेरणी : निलम सुंबे
अहिल्यानगर जिल्हा परिषदेची भाळवणी येथील प्राथमिक शाळा जवळपास अडीचशे पट असणारी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा. या शाळेतील एकूण आठ शिक्षकांपैकी एक म्हणजे निलम सुंबे या होत. त्या भाळवणी शाळेत २०२२ मध्ये आंतर जिल्हा बदलीने रुजू झाल्या. आपले शालेय कामकाज करत असताना त्यात जाणवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या निराकारणासाठी काही उपक्रमांचे त्यांनी नियोजन करून कार्यवाही केली.
शाळा पूर्वतयारी म्हणून पट नोंदणीसाठी शंभर टक्के गृहभेटीचे नियोजन करण्यात आले. त्यात त्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन उद्दिष्ट पूर्ण केले. दैनंदिन परिपाठामध्ये रंजकता आणि परिणामकारकता आणण्यासाठी वर्ग , तुकडी निहाय विद्यार्थ्यांचा परीपाठात सहभाग वाढवला. त्यातून नाटिका, कविता, इंग्रजी संभाषण, कथाकथन यांचे सादरीकरण करण्यास विद्यार्थ्यांना संधी मिळाली. दररोज सामान्य ज्ञानावर आधारित पाच प्रश्न फलकावर लिहून महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यावर आधारित चाचणी घेण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढले. विद्यार्थ्यांना लेखन वाचनाची गोडी लागावी आणि आपल्या भावना देखील व्यक्त करता याव्यात यासाठी गुगल, झूम यांचा वापर करून पाठ्यपुस्तकातील लेखक कवी यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला.
देशभक्त आणि महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने वक्तृत्व, गायन अशा स्पर्धांचे आवर्जून आयोजन त्यांनी केले. आनंददायी उपक्रमांनी बालदिन साजरा केला. वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचण्याची संधी उपलब्ध करून दिली.
विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत त्यामध्ये विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. आपल्या विद्यार्थ्यांना बाजार व्यवस्थेचे ज्ञान मिळावे, कष्टाचे महत्त्व कळावे, खरेदी विक्री व्यवस्था कळावी यासाठी ‘आनंदनगरी’ या बाजार सदृश्य उपक्रमाच्या आयोजन केले.
‘दप्तर मुक्त शाळा’ या शनिवारच्या उपक्रमाला अधिक आनंददायी बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मातकाम , मुखवटे निर्मिती, कागदी पिशव्यांची निर्मिती अशा कृतींनी विद्यार्थ्यांना नवनिर्मितेकडे वळवले. उर्वरित वेळात इंटर ॲक्टिव्ह बोर्ड आणि आंतरजालाचा वापर करून मनोरंजक पद्धतीने शिकवले जाते.
शाळेतील इको क्लबच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेत वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन या कामात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले.
शाळेतील विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची मुक्त संधी देणारा फ्रीडमवॉल हा उपक्रम विद्यार्थ्यांच्याही खूप आवडीचा झालेला आहे. परिसरातील वृक्षांची शास्त्रीय माहिती व्हावी याकरिता परसबागेला देखील ‘क्यू आर कोड परसबाग’ असे स्वरूप देण्यात आले आहे.
स्वच्छतेच्या कामांमध्ये बाधा ठरणाऱ्या समाज घटकांना स्वच्छतेची माहिती देणारा विद्यार्थ्यांचा आवडता उपक्रम म्हणजे स्वच्छता मॉनिटर उपक्रम. यातही शाळेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला आहे.
या खेरीज इको फ्रेंडली राखी निर्मिती कार्यशाळा, पर्यावरण पूरक आकाश कंदील निर्मिती, साखर कारखाना, पोस्ट ऑफिस, लाकूडकाम कारखाना अशा ठिकाणांना विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटी घडून आणल्या आहेत .
पुस्तक फराळ एक सुंदर वाचनालय : भाषिक विकासातील श्रवण व भाषण नंतरचा वाचन हा एक महत्त्वाचा टप्पा. ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे देखील वाचन करायला हवे, यासाठी वाचनाचा एक तास वेळापत्रकामध्येच घेण्यात आला. २०२३ मध्ये वाचन फराळ उपक्रमाची कल्पना प्रत्यक्षात आणली. समाज माध्यमातून शालेय ग्रंथालयासाठी पुस्तक भेट देण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला अनेकांनी भरभरून सहकार्य केल्यामुळे ७५४ पुस्तकाचे वाचनालय उभे राहिले.
पत्रलेखन : वाचनाच्या पुढील टप्पा म्हणजे लेखन. पत्रलेखन हा अभिव्यक्तीचा सुंदर नमुना समजला जातो. आज माध्यमे जरी बदलली असली तरी सुद्धा पत्रलेखन आपले अस्तित्व टिकून आहे. शाळेतील निलम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी इस्रोच्या चांद्रयान मोहिमेनंतर तेथील शास्त्रज्ञांना अभिनंदनपर पत्रे पाठवली. या उपक्रमाची इस्रोने दखल घेऊन विद्यार्थ्यांना चंद्रयान ३ मोहिमेबद्दलची माहिती असणारी कार्ड्स, पेन , डायरी इत्यादी पाठवले. विद्यार्थ्यांनी पुन्हा इस्रोच्या अध्यक्षांना आभार पत्र पाठवली आहेत.पत्रलेखनाची एक सुंदर अनुभूती विद्यार्थ्यांना यातून मिळाली.
निपुण भारत अंतर्गत निलम सुंबे यांनी विद्यार्थ्यांना वाचन,लेखन , गणितीक्रिया आदींचा नियोजनपूर्वक सराव करून घेतला. त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आला. सातत्यपूर्ण उपक्रमशीलतेतून काम करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय सुद्धा वृद्धिंगत केलेली आहे.त्यांच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये क्रमांक प्राप्त केले. विविध स्पर्धा परीक्षांमध्येही त्यांच्या विद्यार्थ्यांची उच्चतम श्रेणीमध्ये निवड झाली. बालचित्रकला स्पर्धेत एका विद्यार्थिनींची तालुका व जिल्हास्तरावर निवड झाली. त्यांच्या वर्गातील दिव्यांग विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत धावणे व उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. जीवन शिक्षण, शिक्षणपत्रिका, शिक्षणगाथा त्रैमासिक या मध्ये निलम सुंबे यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी बनवलेला ‘महाराष्ट्र हातमाग: येवला पैठणी’ हा माहितीपट ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत एनसीईआरटी पोर्टलवर प्रसिद्ध झाला आहे.
या शिक्षिकेने राबविलेल्या ‘रविवार माझ्या आवडीचा’ व ‘पुस्तक फराळ’ या नवोपक्रमांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. तर शिक्षिका निलम सुंबे यांची नुकतीच शरद पवार इन्स्पायर फेलोशिप २०२५-२६ करिता राज्यातील प्राथमिक शिक्षकांमधून निवड झाली आहे. राज्यस्तरीय रंगोत्सव २०२५ साठी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
~~~~
( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
निलम सुंबे - 94031 9
0550
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा