कृतिशील शिक्षिका : कुंदा बच्छाव

मी नव्हे आम्ही : कुंदा बच्छाव 

 नाशिक मनपाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर महानगरपालिका शाळा क्रमांक १८ आनंदवली ही त्या परिसरातील सर्वात मोठी शाळा, जिचा पट
जवळपास आठशे आहे. कष्टकरी व सर्वसामान्य आर्थिक स्तरातील पालकांची मुले या शाळेत येतात. विशेष म्हणजे या शाळेने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत विमान प्रवास असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहण्यासाठी मुंबई व बेंगलोर येथील इस्रोला भेट देण्यासाठी अशा दोन सहली पूर्णपणे लोकसहभागातून काढलेल्या आहेत. शालेय उपक्रमांच्या आखणी आणि अंमलबजावणी मध्ये येथील शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा नेहमीच पुढाकार असतो. शैक्षणिक गुणवत्तेतही शाळेतील विद्यार्थी पुढे असतात. आतापर्यंत १८ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत तर आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करणारी शाळा म्हणून आनंदवली शाळेची ओळख आहे.‌ या शाळेत ऍस्ट्रॉनॉमी क्लब, स्टेम क्लब असून त्यातून विद्यार्थ्यांना विविध अनुभव दिले जातात. शिक्षिका कुंदा बच्छाव यांच्या स्टेम क्लब उपक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंतर्गत एक लाख रुपयांची शरद पवार फेलोशिप ही प्राप्त झाली. तसेच या उपक्रमाची SCERTने दखल घेत नवोपक्रमासाठीचे बक्षीस ही प्राप्त झाले.
आनंदवली शाळेतील उपक्रम:
आमच्या आवडीचा कवितेचा तास : यातून विद्यार्थ्यांना लेखनासाठी प्रेरणा दिली पाठ्यपुस्तकातील लेखक कवींना विनंती करून ऑनलाइन , ऑफलाइन पद्धतीने शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणले . विद्यार्थ्यांच्या कविता वेगवेगळ्या मासिकांमध्ये छापून आल्यात. त्यांच्या १०० कवितांचे संपादन करून ‘कविता उमलत्या कळ्यांच्या’ नावाचे पुस्तकही कुंदा बच्छाव यांनी पुढाकार घेऊन प्रकाशित केले आहे.
आनंददायी स्टेम क्लास : च्या माध्यमातून कला, कौशल्याचा आणि गुणवत्ता विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना मुंबई येथील राष्ट्रीय क्यूब स्पर्धा, गायन स्पर्धा, अबॅकस स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील बक्षीसेही विद्यार्थ्यांना प्राप्त झालीत. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पोर्टफोलिओ तयार केलेले आहेत. YCMOU अंतर्गत फेलोशिप इन एज्युकेशन अंतर्गत एक लाखाची फेलोशिपही उपक्रमाला या लाभलेली आहे हे विशेष.
शाळेचे वाचनालयात जवळपास पाच हजार अवांतर वाचनाची पुस्तके असून त्यातील बरीचशी बच्छाव यांच्या प्रयत्नातून लोकसहभागातून प्राप्त झालेली आहेत.त्यातील दोन हजार पुस्तकांचे तरंग वाचनालय खुले केले आहे. 
 शाळेला सुमारे २५ लाखाचा लोकसहभाग प्राप्त असून त्यात स्मार्ट टीव्ही, मोबाईल, सायकली, शैक्षणिक साहित्य, स्पोर्ट्स ड्रेस, स्टेम क्लब साठी आवश्यक गिटार, कॅसिओ, माइक सिस्टीम, अवांतर वाचनाची पुस्तके, बूट व खाऊ अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. यासाठी बच्छाव मॅडमसह सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.
शैक्षणिक पालकत्व : समाजाच्या सहभागाने शाळेतील गरजू विद्यार्थिनींना आर्थिक सहकार्य करणे व उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, याकरिता ‘शैक्षणिक पालकत्व’ व ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम कुंदा बच्छाव मॅडम यांनी सुरू करून समाज सहभागातून आजवर त्याकरिता दहा लाख रुपये जमा केले. त्यातून नासिक व नाशिक बाहेरील १३० विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी दत्तक घेतले असून यातील काही विद्यार्थिनी सी.ए., इंजीनियरिंग, बी.कॉम., एमपीएससी, बी. ए. ITI यासारखे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण देखील कमी झाले. या कार्यामुळे बच्छाव त्यांना आनंदवलीची सावित्री म्हणून ओळखले जाते. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समस्यांची जाणीव व्हावी व त्यांच्या निराकारणासाठी त्यांनी पुढे यावे म्हणून बच्छाव यांनी शाळा व मनपा स्तरावर वसुधैव कुटुंबकम, साक्षरतेकडून समृद्धीकडे, प्लास्टिक हटाव-देश बचाव, मेरी बेटी- मेरा अभिमान, श्रेष्ठ दान-इंद्रिय दान, तंबाखूमुक्त, व्यसनमुक्त माझी शाळा माझे गाव यासारखे उपक्रम राबवत विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जागरूकता निर्माण केली.
श्रीमती कुंदा बच्छाव यांनी आपल्या शाळेत ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ आणि ‘अधिकारी आपल्या भेटीला’ हे उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी माहिती देण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यात आजवर पस्तीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येऊन मार्गदर्शन केले आहे.
          आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील माहिती व्हावी यासाठी त्यांनी e twining school हा उपक्रम राबवत अमेरिका खंडातील गाथेमाला देशाबरोबर वर्षभर जागतिक समस्यांवर चर्चा व उपाय, कल्चरल एक्सचेंज हे सत्र आयोजित केलेत. तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी श्रीमती बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना स्पॅनिश आणि जर्मन शिकविले. विद्यार्थ्यांनी तिथल्या शिक्षकांशी स्पॅनिश भाषेत संवाद साधला. आपल्या देशाची ओळख त्यांना करून दिली व त्यांच्याकडून नवीन माहिती मिळवली. बांगलादेशसोबत असा संवाद साधण्यासाठी असाच टेलीकॅल्युब्रेशन विथ बांगलादेश हा वर्षभराचा उपक्रमही श्रीमती बच्छाव यांनी राबविला.या उपक्रमासाठी मनपा आयुक्तद्वारे श्रीमती बच्छाव यांचे कौतुक व सत्कारही करण्यात आला आहे.
     शाळेतील परसबागेला नाशिक विभागाचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे तर ‘माझी शाळा सुंदर शाळा, स्पर्धेत विभागातून तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे.श्रीमती बच्छाव यांनी SCERT व NCERT या शैक्षणिक संस्थांमध्ये योगदान दिले आहे. त्यांना नाशिक महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांचे शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
NCERT, दिल्ली आयोजित ऑल इंडिया नॅशनल चिल्ड्रन्स कंटेंट कॉम्पिटिशन 2024/25 मध्ये श्रीम. बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एका विद्यार्थ्याने बनविलेल्या व्हिडिओची निवड झाली असून महाराष्ट्रातून तो एकमेव सरकारी व तोही मनपा शाळेतील विद्यार्थी निवडला गेला आहे.

~~~~~
( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
 कुंदा जयवंत बच्छाव -9420695065





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर