अहर्निश समर्पित शिक्षक : केशव चंदर गावित

शिक्षणयात्री 21 

अहर्निश समर्पित शिक्षक : केशव चंदर गावित

          जि.प.प्रा.शाळा हिवाळी ही नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते पाचवी वर्ग असलेली शाळा. त्र्यंबकेश्वर येथून पन्नास किलोमीटर आणि नाशिक मुख्यालयापासून पंच्याहत्तर किमी अंतरावर असलेल्या या शाळेची स्थापना १९९८ मध्ये झाली. हिवाळी गावाची लोकसंख्या २५० आणि कुटुंबे अवघी ४२ एवढीच. शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या गावातील शाळा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे, ती तेथील केशव चंदर गावित नावाच्या शिक्षकाच्या विशेष कार्यामूळे . शिक्षक केशव गावित या शाळेमध्ये २००९मध्ये नियुक्त झाले.सन २०१२ मध्ये ही शाळा द्विशिक्षकी झाली.२००९ ते २०१४ या कालावधीमध्ये गावित सरांनी विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकासावर भर दिला. सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या शाळेतील हजेरीपटावर असणाऱ्या मुलांपूरतीच मर्यादित शाळा कधीही ठेवली नाही. दाखल पात्र होण्यापूर्वी ही मुले यांच्या शाळेत येतात आणि पाचवी उत्तीर्ण होऊन गेलेली मुले देखील त्यांच्याकडे अभ्यासासाठी येतात.बालवाडीसह त्यांच्या शाळेतील विद्यार्थीसंख्या सत्तेचाळीस एवढी आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना ते शिकवतात. ही एक खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट गावित सरांनी जपून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. परिसरातील साहित्याचा वापर करून त्यांनी शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली, या कामांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले. 
    शाळेला स्थापनेच्या वेळी इमारत नव्हती. २००५-०६ मध्ये शाळेला खोली मिळाली. गावित सरांनी हजर झाल्यावर या खोलीची रंगरंगोटी आणि वर्ग सजावट केली. ज्ञानरचनावादी आरेखन व वर्गरचना केली. कृतीयुक्त शिक्षण आणि स्वयंअध्ययन यावर त्यांनी भर दिला. शालेय आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी कुठून मदत मिळू शकेल याचा शोध घेतला. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळला. त्यामुळे नेहमी पालकांसोबत स्थलांतरित होणारी मुले हिवाळी शाळेत रमायला लागली. शिक्षण विभागातील विविध अधिकाऱ्यांनी या शाळेला भेटी देऊन शाळेतील कामकाजास प्रसिद्धी दिल्यामुळे काही संस्थांनी मदतीचा हात दिला. कपाट, संगणक संच, बेंचेस, शालेय रंगरंगोटी अशी कामे त्यातून झाली. एवढेच नव्हे तर वर्षभर सर्व विद्यार्थ्यांना संध्याकाळचे जेवण मोफत मिळू लागले. अबॅकस, क्यूब सोल्विंग प्रशिक्षणासोबतच शैक्षणिक सहलींनाही मदत मिळाली. GIVE संस्थेने शाळेसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यात सुमारे पन्नास लक्ष किमतीचे सुसज्ज इमारत बांधकाम, शौचालय बांधकाम, कुपनलिका, संगणक, टीव्ही संच, २०१६ सालापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना एक हजार आठशे रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्याचा संच आणि परसबागेसाठी ५० हजार रुपये किमतीचे ठिबक सिंचन उपलब्ध करून दिले. या सर्वांच्या पाठीमागे केशव गावित सरांचे प्रयत्न होते. गिव्ह खेरीज अन्य संस्थांकडूनही त्यांनी शाळेला मदत मिळवली. त्यात नारायण चंद्र ट्रस्ट कडून दहा संगणक व प्रोजेक्टर मिळवला, शिवा चॅरिटेबल ट्रस्ट कडून गाय व स्वयंपाकाचे साहित्य मिळवले, सोशल नेटवर्किंग फॉर्म काढून पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळवली, दानशूर व्यक्तींकडून सोलर सुविधा आणि आठ संगणक संच मिळवले, महिंद्रा कंपनीने इंटरॲक्टीव बोर्ड दिला, श्री गुरुजी रुग्णालय विद्यार्थ्यांची नियमित तपासणी व मोफत उपचार करते. ही सगळी मदत मिळण्यामागे केशव गावित सरांचे हिवाळी गावातील शैक्षणिक कार्य आहे. शाळेच्या या विकासामध्ये ग्रामस्थ देखील अग्रेसर राहिले तुकाराम ढवळे पवार यांनी दोन शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी विनामूल्य जागा दान दिली. नवसु काशीराम भुसारे यांनी शाळेशेजारील स्वतःची जागा बगीच्यासाठी दान केली. हरिदास गोविंद भुसारे यांनी नवीन शाळा खोलीसाठी अर्धा एकर आणि परसबागेसाठी अर्धा एकर अशी जमीन दान केली. शाळेच्या गरजेनुसार वेळोवेळी ग्रामस्थांनी श्रमदान केले.
          केशव गावित सरांनी हिवाळी या गावाशी स्वतःला अगदी बेमालूमपणे जोडून घेतले, त्याच्याशी ते एकरूप झाले. गावाच्या सुशोभनासाठी ते पुढे झाले. गावातील सर्व घरांना एकसारखा रंग देणे, घराच्या दर्शनी भिंतीवर वारली चित्रशैलीतील चित्र काढणे, ते कुटुंबास ३० फळझाडे देऊन त्यांची लागवड करण्यास मदत करणे, गावाच्या परिसरात दोन हजार ताड वृक्षाची लागवड करणे अशी कामे त्यांनी केली. आपल्याबरोबर परिसरातील शाळांचा विकास व्हावा यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. परिसरातील ११० शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, स्वेटर, स्पोर्ट ड्रेस यांचे वाटप त्यांनी समाजसेवी संस्थांच्या मदतीने केले. चाळीस पेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालयांच्या निर्मितीसाठी योगदान दिले. सरांच्या प्रयत्नातून सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून गावाला पाणी पिण्यासाठी विहिर मिळाली. या शाळेला नुकतीच १४ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यासह शिक्षणमंत्री दादाजी भुसे,नरहरी झिरवाळ यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व गावित सरांचे जाहीर कौतुक केले आहे. आजवर शाळेला सत्यजित तांबे, न्युझीलंडचे खासदार महेंद्र बिंद्रा,नाशिक जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी, कैलास पगारे प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प.मुंबई यांच्यासह अनेक अधिकारी व आदर्श शाळांतील शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत.
हिवाळीची शाळा : एक ज्ञानतीर्थ

         या शाळेत गावित सरांनी अभ्यास पूरक कौशल्यवृद्धीचे उपक्रम राबवत व्यावसायिक कौशल्याचे ही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले आहे. त्यात वेल्डिंग, इलेक्ट्रिक फिटिंग, शेतीची कामे, पशुपालन, हेअर कटिंग, प्लंबिंग, गवंडी काम, स्वयंपाक बनवणे, गांडूळ खत निर्मिती अशा प्रशिक्षणाचा समावेश आहे.
समृद्ध परसबाग : अर्धा एकर क्षेत्रावरील ठिबक सिंचन असणारी शाळेची परसबाग १२ ते १५ प्रकारच्या वाणांच्या लागवडीने समृद्ध आहे. सेंद्रिय पद्धतीने मल्चिंग पेपरवर भाज्यांची लागवड केली जाते. वाल,कारले,भेंडी,डांगर,भोपळा ,काकडी ,टोमॅटो आदी भाज्यांचे पीक घेतले जाते.विद्यार्थ्यांसाठी वापरून उरलेला भाजीपाला जवळच्या बाजारात विकला जातो आणि त्यातून विद्यार्थ्यांचा खर्च भागवला जातो. विद्यार्थ्यांना दररोज दूध दिले जाते, गायीच्या शेणापासून गांडूळखत तयार केले जाते.
         या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आश्चर्यकारक अशी आहे.FLN संदर्भात विचार केला तर इयत्ता पहिली चे विद्यार्थी पाचवी पर्यंतच्या पुस्तकाचे वाचन करतात. हेच विद्यार्थी चार अंकी संख्यांचे वाचन लेखन देखील करतात, सहा अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी करतात, दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणतात करतात. इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी प्रति मिनिट साठ पेक्षा अधिक शब्द अर्थ समजून वाचतात, कोटी पर्यंतच्या संख्येचे लेखन, वाचन करतात, आठ अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी करतात, पाच अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणण्याची उदाहरणे सोडवतात. तर इयत्ता तिसरीतील विद्यार्थी अपरिचित असणारे प्रति मिनिट ८० शब्द अर्थ समजून वाचतात, दहा अंकी संख्यांचे लेखन, वाचन करतात, तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणण्याची व भागाकाराची क्रिया करतात, अपूर्णांक, मापन व धारकता यांची उदाहरणे ही सोडवतात. हे सगळेच अपेक्षित निकषांपेक्षा कितीतरी पुढे जाणारे यश आहे. ही शाळा वर्षातील ३६५ दिवस सुरू असते. एकही सुट्टी या शाळेला वर्षभरात नसते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांना मिळत नसणाऱ्या अनेक शैक्षणिक संधी मिळतात.
या शाळेतील भविष्यवेधी शिक्षण, दुरस्थ शिक्षण, ग्राम जागर व ग्रामविकास, कौशल्य विकास, इंग्रजी विषय दिनक्रमाचा गाभा, शिक्षणातून सामाजिक बांधिलकी इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यात अमुलाग्र बदल घडवण्यात साह्यभूत झालेले आहेत.
विद्यार्थ्यांना शिक्षणातून अवगत झालेले कौशल्य : 
सहअध्यायी शिक्षण : मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवतात.
गटकार्य : विद्यार्थी आवड व गतीनुसार गटातून शिकतात.
विषय मित्र : विषयात प्रवीण असलेले विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना समजावून सांगतात.
राज्यघटना : विद्यार्थ्यांना राज्यघटनेची कलमे पाठ आहेत.
पाढे पाठांतर : विद्यार्थ्यांना दोन ते २५० पर्यंतचे पाढे पाठ आहेत.
दोन्ही हातांनी लेखन : विद्यार्थी दोन्ही हाताने एकाच वेळी वेगवेगळ्या भाषेत लेखन करू शकतात तसेच दोन्ही हाताने एकाच वेळी वेगवेगळी उदाहरणे ही सोडू शकतात. हे अनन्यसाधारण कौशल्य गावित सरांनी विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिले आहे.
संगणक ज्ञान : विद्यार्थी स्वयंअध्ययनातून वयानुरूप संगणक प्रोग्राम तयार करतात.
इंग्रजी स्पेलिंग : तेरा तासाच्या दररोजच्या दिनक्रमातून दोन तासिका विद्यार्थ्यांच्या स्पेलिंग पाठांतरासाठी असतात. 
रुबिक क्यूब : सर्वच विद्यार्थी कमी वेळात रुबिक क्यूब सोडवतात. 
अंगणवाडी : गावित सर गावातील अंगणवाडीत जाण्याच्या वयोगटातील त्यांनाही शाळेत बसू देतात आणि शिकवतात. त्यांना वाचन ,लेखन ,मोजणे व गणिती क्रिया अवगत होतात.
शिष्यवृत्ती सराव : इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा व मंथन परीक्षा करिता नियमित सराव घेतला जातो.
कोरोना काळात शाळा बंद असतांनाही गावित सरांनी गावाबाहेरील छोट्या टेकडीवर, पाऊस असतांना वेगवेगळ्या घरामध्ये , उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत,झाडाला फळे बाधून विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण, इंग्रजी संभाषण, स्पर्धा परीक्षा गणित, ॲबकस, सामान्य ज्ञान, स्पेलिंग पाठांतर नियमितपणे शिकवून शनिवारी उजळणी आणि दर रविवारी परीक्षा घेऊन व पेपर तपासून मार्क सांगितले. यावेळी गावातील व शेजारच्या गावातील मिळून नव्वद विद्यार्थी वर्षभर उपस्थित राहीले.
        जि.प.प्रा.शाळा हिवाळी या शाळेमूळे गावात शिक्षणाविषयी जागरूकता व आवड निर्माण झाली आहे. गावातील पालक हंगामी स्थलांतरित होत असले तरी विद्यार्थी मात्र स्थलांतरित होत नाहीत. हिवाळी गाव शंभर टक्के निर्व्यसनी असलेले हे गाव आहे त्यामागे गावित सरांचेच प्रयत्न आहेत. गावामध्ये एकोपा आहे. गावातील सर्व घरांना एकसारखा रंग आहे. त्यामुळे समतेचा विचार रूजला आहे.
   असे अनोखे आणि अत्यंतिक तळमळीने कार्य करणाऱ्या केशव गावित सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे विविध पैलू इतरांना कार्यप्रेरणा देणारे आहेत. नोकरीला सेवेची संधी समजणे, इतरांच्या संवेदना जाणून घेणे, समसंस्कार आणि मूल्य संस्कार करतांना विजुगीषी प्रेरणा पुरवणे, दूरदृष्टी, समयसुचकता, आणखी काम करत राहण्याची प्रेरणा, निसर्ग पर्यावरणाविषयी प्रेम, जलदूत, तंत्रस्नेही, वेळेचा उत्तम व्यवस्थापक, अथक सामाजिक तयारी ही गुणवैशिष्ट्ये केशव गावित सरांना इतर शिक्षकांपेक्षा वेगळे बनवतात.
~~~
(लेखक नामांकित साहित्यिक आणि शिक्षक आहेत.)
केशव गावित - +91 94235 46752


~~~~~
(लेखक नामांकित साहित्यिक आणि शिक्षक आहेत.- 9850608611)
(केशव गावित - +91 94235 46752)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर