१७ वे पाथर्डी साहित्य संमेलन २३ व २४ डिसेंबर
(अध्यक्षीय भाषण : १७वे पाथर्डी साहित्य संमेलन, पाथर्डी दिनांक २३व २४डिसेंबर २०१७)
नमस्कार सर्व साहित्य रसिक बंधू भगीनींनो,
१७ व्या पाथर्डी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पाथर्डी येथील साहित्य संमेलन स्थळी उपस्थित असणारे कृष्णा भोजनालय साहित्य मंडळाचे अध्यक्ष शाहिर भारत गाडेकर ,सचिव वसंतराव बोर्डे , कार्यकारिणी सदस्य, मंडळाचे प्रेरणास्थान असणारे व कायमच पाथर्डी शहर व परिसराला साहित्य आणि सांस्कृतिक मेजवानी पुरवणारे प्रा. अशोकराव व्यवहारे, साहित्य संमेलनाचे उद्घाटक व नामवंत कवी गणेशजी मरकड, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष वैभव शेवाळे,
पाथर्डी शहराचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष डाॅ. मृत्युंजय गर्जे, सर्वांचे लाडके व सतत लोकहितकारी कार्यात मग्न असणारे डाॅ. दीपक देशमुख, पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड साहेब,पत्रकार बंधूु तसेच मा. सुरेशराव मिसाळ आणि साहित्य संमेलनासाठी या ठिकाणी आलेल्या शब्दाची ताकद समजणार्या सर्व सुजाण रसिकांनो ..
मी पाथर्डी साहित्य संमेलनाचा सुरूवाती पासूनचा सहप्रवासी आहे . अपवादात्मक एखादे दुसरे संमेलन सोडले तर जवळपास सर्वच संमेलनात मला सहभागीही करून घेतले गेलेले आहे . त्यामुळे यापूर्वी सातत्याने भरलेल्या सोळा साहित्य संमेलनाचा कळत नकळत माझ्या जडणघडणीत थोड़ा-बहुत सहभाग असू शकेल . साहित्य निर्मितीसाठी भोवतालचे वातावरण देखील महत्त्वाचे असतेच आणि ते मिळावे यासाठी कृष्णा भोजनालय साहित्य मंडळाने सतत प्रयत्न केले आहेत. माझ्या 'कापूसकाळ' कादंबरीला मिळालेल्या विविध पुरस्कारानंतर आणि याच कादंबरीचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्यानंतर असा दोन वेळा माझ्या भव्य जाहीर सत्काराचे आयोजन देखील या मंडळाने केले होते. त्यामुळेच मला जेव्हा साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षपद स्विकारण्याची विनंती केली तेव्हा माझी स्थिती अवघडल्यागत झाली कारण या आधीच्या अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कोण असावे हे सुचवणा-यात मी अग्रेसर असे. साहित्य मंडळाच्या विनंतीचा नम्रपणे स्विकार केल्यानंतर काही प्रश्न माझ्या मनात ऊभे राहिले. एका बाजूला हजारेक लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीतून निवडतात. एकतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूका असू नयेत किंवा असल्याच तर किमान मतदारांची संख्या तरी पंचवीस तीस हजार तरी असावी असा मतप्रवाह जोर धरत असतांनाच गेल्या पंचवीस तीस वर्षापासून महाराष्ट्रात भरणारी छोटी छोटी साहित्य संमेलने मात्र आपापले अध्यक्ष आनंदाने बिनविरोधपणे आणि सन्मानाने निवडीत असून त्यांच्या साहित्याचा आणि विचाराचा आनंद घेत आहेत. त्यामुळे आता मोठ्यांनी छोट्यांकडे आशेने पाहण्याचे दिवस साहित्य संमेलनाला आणि साहित्यालाही आलेले पहावयास मिळतात. म्हणून ही सकारात्मक बाब मला फार महत्त्वाची वाटते . पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्य़ातील कवी प्रकाश घोडके यांची निवड केली होती आणि आता सतराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करून तूम्ही जो मला सन्मान दिलात ,माझ्यावर विश्वास दाखवलात आणखी सशक्त लिहिण्याची जबाबदारी टाकलीत यासाठी मी पाथर्डी साहित्य मंडळाला धन्यवाद देतो.
माझी नाळ शेतीशी, शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या जगण्या भोगण्याशी , सुख- दु:खाशी आहे. खेड्यातली जडणघडण आणि खेड्यातला रहिवास तसेच खेड्यातील शिक्षकाची नोकरी यामुळे ही नाळ अधिकाधिक पक्की होत गेली आहे. माझ्या सर्वच पुस्तकातून हे वाचकांना जाणवेल. आपली शेती पाऊसपाण्याच्या आणि हवामानाच्या भरवश्यावर असते.अनेक शेतकऱ्यांना शेतीत भागत नाही म्हणून मजुरीही करावी लागते.आता तर बियातच खोट होऊ लागली आहे. कपाशी, सोयाबीन, धान यांच्या बियाण्यातूनच किडीची पैदास होत असेल आणि किडीला मारण्यासाठी फवारणी केलेल्या औषधाने शेतकरी मरत असतील आणि किड जीवंतच राहत असेल तर हा शेती नावाचा चक्रव्यूह कसा भेदायचा? हा मोठाच प्रश्न आहे. शेताची राखण कशी करायची? हा प्रश्न अधिकाधिक सतावु लागतो आहे . आजही आपल्याकडील शेतकर्यांच्या प्रश्नांचे चित्रण साहित्यिक जेव्हा कथा, कादंबरी, कविता मधुन करतात तेव्हा ते दरवेळी अधिक भयावह आणि हादरवून सोडणारे असते. ते पचवता न येण्याजोगे असते. 'धग','पाचोळा', 'बारोमास','झाडाझडती', 'आलोक' ,'चाळेगत','ऐसे कुणबी भूपाळ', 'भुई भुई ठाव दे','कापूसकाळ','असं जगणं तोलाचं',' बुर्झ्वागमन ', 'आरंबळ',' बोलावे ते आम्ही',' अंधाराचा गाव माझा', 'भुईशास्र','मातीचे पाय' ,'काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान', 'धग असतेच आसपास' या व अशा काही साहित्यकृती मधुन हे वर्तमान अंगावर कोसळतांना दिसते . महात्मा फुल्यांचा 'शेतकऱ्यांचा आसूड' प्रत्येकाने वाचला पाहिजे. पूर्वीच्या शेतकऱ्यांपेक्षा आत्ताचा शेतकरी अधिक भयचकित आणि दबलेला, पिचलेला आहे. त्याच्या रोजच्या जगण्यातील घुसमट वाढलेली आहे.मी एका कवितेत लिहीलयं -
पाखरांची सुगी ।पेरावया आले
कनवाळू भले । शेतकरी.
गोलक्या दांड्याची । खुडूनी कणसे
राऊळाचे वासे । सजविती.
दाण्यातुनी विख । उगवुनी आले
माळातूनी गेले । शेष सत्व.
कडू घास गोड ।मानुनीया पक्षी ।
उडाले आकाशी ।भोवंडत.
सर्वसामान्यांच्या जगण्याची उमेद वाढवणाऱ्या साहित्य निर्मितीची नेहमीच गरज असते आणि ती गरज वेळोवेळी लेखक, कवी पूर्ण करीत असतात. आपल्याकडे आधुनिक काळात केशवसुत , बाळ सीताराम मर्ढेकर, नारायण सुर्वे यांच्या सह अनेक कवींनी ही गरज भागवली. त्या पूर्वी वारकरी संत व सुफी संतांनी हे काम केले. तर आजच्या काळात प्रवीण दशरथ बांदेकर, आसाराम लोमटे, केशव सखाराम देशमुख, संतोष पद्माकर पवार, सदानंद देशमुख, अजय कांडर, अशोक कौतिक कोळी, बाबाराव मुसळे,कृष्णात खोत, सीताराम सावंत, रमेश इंगळे उत्रादकर, शशिकांत शिंदे, लहू कानडे, गणेश मरकड, बालाजी मदन इंगळे, सुरेंद्र पाटील, विश्वास पाटील ,श्रीकांत देशमुख , दासू वैद्य व अशा अनेक लेखक कवींनी ही धुरा सांभाळली आहे.
सद्यकाळ हा मोठा कठीण आणि गुंतागुंतीचा आहे. घुसमट वाढवणाराही आहे. प्रगतीची कामे जोरात सुरू आहेत. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. देशात लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. पण त्याचवेळी एस. टी. चा पास काढून शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना कंडक्टर प्रवास नाकारतो . पुरेसे प्रवासी नाहीत म्हणून बस रद्द करून कमी संख्येने असणाऱ्यांची गैरसोय केली जाते . विद्यार्थी संख्या कमी आहे म्हणून शाळा बंद केल्या जातात. आपण महासत्ता होण्याची तयारी करत असतांनाच पावसाळ्यात काही गावांचा संपर्क हमखास तुटलेला असतो. इतकेच नाही तर सावित्रीबाई फुले यांच्या कर्मभूमीत व महान प्रशासक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मभूमीत अगदी छोट्या गावापासून तर पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि इतरही ठिकाणी लोकशाही व्यवस्थेत महिलांच्या अधिकाराच्या खुर्चीत तिचे कुटूंबिय बसलेले दिसतात. आपण अवकाश संशोधनांमध्येही अग्रेसर झालो आहोत. तरी दोन माणसांमधला अवकाश आपल्याला भरून काढता आलेला नाही.
समाजातील कमी होत चाललेला संवाद ही सद्यकाळातील मोठी समस्या आहे. घर ते समाज यासर्वच ठिकाणी संवाद वाढीस लागावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची ही वेळ आहे. कामाच्या व्यापात कितीही वेळेची कमतरता भासत असली तरी कमी होत जाणारा संवाद समाजासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. भाषेचा वापरच झाला नाही तर आपण आपली भाषा हरवून जातो की काय ? अशी स्थिती निर्माण होईल. एकलकोंडेपणाच्या रोजच्या जगण्याच्या धबाडग्यात आपण समाजसापेक्ष विचारांची समज (सेन्स) हरवून जातो की काय? अशी शंका वाटावी असे हे वास्तव आहे. 'संवादाचा सुआवो' साधण्यासाठी जाणीव पुर्वक प्रयत्न करावेच लागतील अन्यथा आत्मकेंद्रित, मनोविकारग्रस्त लोकांचा समाज निर्माण होईल आणि ते निश्चितच चांगले नसेल . केशवसुतांचा वैचारीक वारसा जपत 'प्राप्त कालालाच विशाल भूधर समजून त्यात सुंदर लेणे खोदण्याचा प्रयास करावा लागेल .' साहित्यातून जगण्याला भिडण्याचे मार्ग सापडत असतात. साहित्य देखील प्रश्नांच्या अस्वस्थतेतूनच निर्माण होते.
निकोप मानवी संबंधासाठी परस्परातील संवाद खूपच महत्त्वाचा आहे. आजची तरूणाई स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. त्यांच्याशी घर आणि समाज यांचा संवाद कमी होत आहे. तो तुटता कामा नये. त्यांना बोलु दिले पाहिजे, त्यांचे ऐकले पाहिजे, ती आपणा सर्वांची जबाबदारी आहे. त्यांना समजुन घ्यावे लागेल. तरूणाईतून सर्वच जण अभियंते , डाॅक्टर आणि प्रशासकीय अधिकारी होतील किंवा नाही परंतू प्रत्येक जणच माणूस होणे अत्यावश्यक आहे. याच काळात नव्या, प्रगतशील विचारांचे जागरण होणे आवश्यक आहे. या काळात निर्माण होत असलेले साहित्याचे वाचन करणे आणि ते समजून घेणे गरजेचे ठरते. त्यासाठी ग्रंथालयाशी आणि पुस्तकाशी मैत्री करणे हा आनंददायी मार्ग ठरतो . आज फेसबुक , व्हाॅटस्अॅप ,इन्स्टाग्राम, हाईक, गुगल प्लस, ब्लाॅग, संकेतस्थळे, ई- पुस्तके या सारख्या माध्यमातून अनेक विचारधारेचे लेखन गतिमान बणुन तरूणाईच्या हातात येते आहे. त्यातले योग्य काय अयोग्य काय? त्याची विश्वासार्हता किती? त्याची गरज किती? असे अनेक प्रश्न घोंघावत असतात.या नव्या माध्यमाचे अपरिहार्यपणे स्वागत करावेच लागेल. पण ही साधने हाताळतांना त्याला नेमकेपणाची जोड द्यावी लागणार आहे. वाचनाने समृद्ध झालेले लोकच नव्या माध्यमाची उपयुक्तता वाढवतील हा विश्वास अनाठायी ठरणारा नाही. ललित साहित्याचे वाचन जर घडले नाही तर संस्कार, संयम आणि संवेदनशीलतेचा अभाव निर्माण होईल.
आज फेसबुक, व्हाॅटस्अॅप सारख्या माध्यमाशी लोक तासनतास जखडले जात आहेत. या नव्या माध्यमांच्या देखील काही मर्यादा आहेत त्याच बरोबर काही बलस्थाने देखील आहेत . ते समजून घ्यावे लागेल.. नवे वाचन साहित्य या माध्यमातुन सहजपणे उपलब्ध होते. या साहित्याला फार जागा लागत नाही.वाचन साहित्याची सहजपणे देवाणघेवाण करता येते .वागवायला देखील सोपी साधने आहेत ही. फक्त विश्वासार्हता हवी . भरपूर काही समोर येऊन आदळते आहे. जे गरजेचे आहे तेच वाचायला मिळावे पण तसे घडत नाही. एवढीच मोठी मर्यादा या माध्यमाची आहे. ती जर विचारात घेतली नाही तर मग मात्र वेळेचा अपव्यय होईल आणि वापरकर्ते केवळ फारवर्ड करणारे आणि डिलिट करणारे यंत्र ठरतील.
पुस्तक किंवा इ पुस्तक वाचने अधिक आवश्यक आहे? माणसाचे ज्ञान दरपीढीला वाढत असते. पुढच्या पिढीला ते ज्ञान मागच्या पिढीकडून मिळत असते . आणि एकाच पिढीतील लोकांचींही ज्ञानानुभवाची देवाणघेवाण सुरूच असते. वाचनातून अनेकांनी घेतलेले आणि पचवलेले जीवनानुभव आपल्याला मिळत असतात. त्यातुन आपण वैचारीक दृष्ट्या अधिक प्रगत होत असतो. आपल्या संवेदना अधिक जाग्या होत असतात. वाचनाने अधिक माणुसपण अंगी येत असते. वाचन हे समाज्यासाठी वैचारीक खाद्य असते. त्याची सतत अभिलाषा धरली पाहिजे. ज्या ज्या लोकांनी आपल्या जीवनात वाचनाला महत्त्व दिले त्यांचे जीवन बदलले. ते अधिक विशाल झाले. वाचाल तर वाचाल असे जे म्हटले आहे ते खरेच आहे. काय वाचावे याचा मात्र जरूर विचार करावा. आजच्या जगण्याला समजुन घेऊन वाचावे लागेल.
आपले राज्य कल्याणकारी राज्य आहे. आणि कल्याणकारी असण्यामध्ये जनतेचे कल्याण अग्रभागी आहे. पण अनेकदा लोकसेवकांचेच कल्याण झालेले जेव्हा जनसामान्यांच्या नजरेस येते तेव्हा आपले काही कल्याण होणार का ? आणि होणार असेल तर ते कोण करणार? असे प्रश्न त्याला सतावु लागतात . अशा स्थितीत 'ठेविले अनंत तैसेची ' न राहता 'अत्त दीप भव. ' हा आत्मसन्मान जपण्याचा विचार आणि भान साहित्यातून येत असते. चांगले साहित्य हे माणसाला आत्मभान देणारे, ऊभारी देणारे, माणुसपणाचा उद्घोष करणारे असते. करमणूकीसाठी मनोरंजनात्मक लिहिणाऱ्या लेखकांचा दूसरा वर्ग असतो. तर लोकनिष्ठ भुमिका घेऊन लिहिणारा आमच्या भूमिकेचा लेखक केवळ सुचते म्हणून नाही तर काहीतरी बोचते म्हणून लिहीतो .त्याला काहीतरी विसंगती सलते म्हणून त्याचे लेखन फुलते . शब्दांशी खेळत कविता, कथा लिहीण्या ऐवजी जास्त लेखक कवी शब्दांसोबत जळत कविता, कथा, कादंबरी लिहित असतात. सभोवतालचे वातावरण पाहुन, विसंगती पाहुन संवेदनशील कवी,कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार त्या विसंगतीवर कला माध्यमातून शब्दरूपाने भाष्य करत असतो.ती विसंगती जगासमोर मांडत असतो. ती विसंगती कशी कमी होईल यासाठी तो काही उपाय आणि शक्यताही निर्देशित करत असतो, उपाय, शक्यता शोधण्यासाठी वाचकांना विचार करावयास भाग पाडत असतो. मग लेखक, कलावंतांना केवळ विसंगतीच दिसते का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. तो त्याला भावणाऱ्या , लुभावणा-या घटना प्रसंगाला कलारूपही देत असतो.
'अंधाराचा गाव माझा 'या कवितासंग्रहातील त्याच शीर्षकाची माझी एक कविता आहे -
माझ्या गावाच्या माथ्यावं
फिरतसे पवनचक्की
आणि गावातली वीज
मिळे शहराशी नक्की.
माझ्या गावाच्या झाडावं
बसे फुपाट्याचा थर
अख्ख्या गावाचे आभाळ
तेच घेते शिरावर.
भुकेपाटी माझा गाव
रोज खोदीतो बराशी
आणि भरल्या पोटाचे
स्वप्न बांधितो उराशी.
लुटण्याला टपलेला
जो तो खेड्याकडे येतो
आणि 'खेड्याकडे चला'
नारा मानभावी देतो.
अंधाराचा गाव माझा
त्याला काळोखाच्या कडा
कधी फुटतो कळेना
धोरणांचा बुडबुडा.
चांगल्यातील चांगले साहित्य वाचायला मिळावे अशी अभिलाषा वाचक धरत असतो. हे उत्तम वाङ्मय कोणते? तर जे आवाज हरवलेल्यांना आवाज देते. शोषणमुक्त समाजाची निर्मिती व्हावी यासाठी कलात्मकतेने विचार देते. सर्वांचे भले व्हावे अशी अपेक्षा बाळगते. संवेदना हरवू पाहणाऱ्यांच्या संवेदना जाग्या करते.
मी आणि माझे या पलिकडे जाऊन मी कुटुंबाचे आणि समाजाचे काय देणे लागतो याचा विचार केला तरच सामाजिक आणि कौटुंबिक उत्तरदायित्वाची भावना प्रबळ होणार आहे. आज आपण इतके संकुचित होत चाललेलो आहोत की 'समाज' या शब्दाचा अर्थ बहुतेक वेळा 'जात' असाच घेतला जातो. आपण सारे एकसंघ का होऊ शकत नाहीत? विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला गर्व आहे. आपल्या प्रतिज्ञेत असे एक वाक्य आहे. वेशभूषा, भाषा, चालीरीती, परंपरा, विचार आणि आचार, धर्म ,जाती यात असणारी भिन्नता हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे. प्रत्येकाला शांततेने आपली मते मांडायचा अधिकार आहे. पटलेली मते स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणीही आपली मते दुसऱ्यावर जबरदस्तीने लादू नये , समस्त देशवासियांना शांततापूर्णरीतीने सहजीवन व्यतीत करता यावे,आपली प्रगती करता यावी, आपण आपली प्रगती करीत असतांनाच इतरांच्या प्रगतीत अडसर ठरू नये यासाठी भारताचे संविधान आहे . सर्वच देशवासियांना प्रगत माणूस म्हणून बघणारा हा महाग्रंथ आहे म्हणून भारतीय संविधान हीच भारतातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती आहे. तर न्यायालये समीक्षेची केंद्रस्थाने ! इतर सर्व ग्रंथांचे स्थान त्यानंतरचे आहे कारण इतर साहित्यकृतीत इतकी व्यापकता दिसून येत नाही.
साहित्य म्हणजे काय?
समाज्याच्या जगण्याला स्पर्शून जे येते ते साहित्य .जगण्याला स्पर्शून येते म्हणून जगणे अधिक चांगले व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करते ते साहित्य. ते वेदनेच्या मुळाशी जाते आणि सुखाच्या फुलाजवळही संयमाने जाते. सौंदर्याचे वर्णन करणारे जसे साहित्य असते तसेच 'बुडते हे जन देखवेना डोळा ,म्हणून कळवळा वाटतसे.' म्हणणारे आणि 'नको देवराया, अंत आता पाहू | प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ||'अशी भावार्तता व्यक्त करणारे देखील साहित्य आहे.
साहित्याची ताकद काय आहे?
असं म्हटलं जात होतं की, तुमच्या जवळ दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकरी घ्या आणि दुसर्या नाण्याचं फुल घ्या. भाकरी तुम्हाला जगवील आणि फुल कसं जगायचं ते शिकवीत. आजच्या साहित्याने या विचाराला अधिक व्यापक परिमाण दिले आहे. आपल्या साहित्याने ज्यांच्याजवळ नाणीच नाहीत त्यांचे जगणे वाचकांसमोर आणले आहे. ज्यांना भाकरी मिळणे दुरापास्त आहे त्यांची भाकरी कोणी पळवली याची चिकित्सा देखील साहित्य करत आहे. अभावग्रस्ततेतही फुलाच्या फुलण्याचं कौतुक देखील साहित्याने जगण्याची प्रेरणा म्हणुन समोर ठेवलेले आहे. साहित्य लेखन मुळातच
धाडसी अभिव्यक्ती असते .ती परखड
लुभावणारी, वाचनानंतर विचार प्रक्रियेला चालना देणारी, विचारांची घुसळण करणारी प्रक्रिया असते.
साहित्य समाजाला बळ देत असते. श्रेष्ठ साहित्यकृती साहित्यिकांचीही घुसमट कायम ठेवत असतं. सामान्य माणूस बोलू शकणार नाही, अभिव्यक्त होऊ शकणार नाही असे धाडसी विचारधन साहित्यिक कलात्मकतेने शब्द रूपाने मांडत असतो. साहित्यिक हा अभिव्यक्ती चे धोके पत्करणारा व्यक्ती असतो. जनसामान्याने आपला आवाज , आपले स्वत:चे मत व्यक्त करणे अवघड असते. कारण अनेकदा त्या आवाजातून दबलेला, पिचलेला घटक त्याचं गाऱ्हाणे मांडत असतो. न्याय हक्काची मागणी करत असतो आणि अशा घटकांचे शोषण करणाऱ्या लोकांना आणि यंत्रणेला ते नको असते. लेखक, कलावंत समाज्याच्या भल्यासाठी ही कृती करत असतो त्यामुळे सुसंस्कृत समाजाचे लेखक कलावंतांना जपणे हे नैतिक कर्तव्य ठरते.
साहित्यसंमेलने ही विचार जागरणाची ठिकाणे असतात. ती महत्त्वाची असतात. पाथर्डी साहित्य संमेलनातूनही याचा अनुभव येईल असा आशावाद बाळगतो. भाषण संपवताना एक सुचिंतनाची एक कविता सादर करतो.
उभा सृष्टीमध्ये देव
ऊन -वारा त्याचे रूप
पावसाच्या धारापुढे
मान झुके आपोआप.
पिकभार तोलतांना
व्हावे शिवाराला ओझे
कुणब्याच्या लेकराला
रोज दुध मिळो ताजे.
घाम गाळल्या जीवाला
मोल कष्टाचे मिळू दे
माणसाला माणसाशी
जोडण्यास रे बळ दे.
ज्याचे त्यालाच मिळू दे
नको कोणाचे कोणास
सार्या विश्वाच्या पोटाला
मिळू दे रे चार घास.
दिवा दिवाळीचा जळो
घरा दारात सर्वांच्या
दे रे देवा एवढेच
माझी इवलीशी इच्छा.
आपल्या पाथर्डी परिसराची निसर्ग जरी अधूनमधून सत्व परिक्षा पहात असला तरी नव निर्माणचे ताजे सकस कोंभ अंकुरणे सुरू आहे. ही कोंभाची लवलव भूमीचे मार्दव सांगत आहे.कवी. गणेश मरकड, दिलीप सरसे , राजकुमार घुले, सुभाष शेकडे,संदीप काळे, अर्जून देशमुख, लक्ष्मण खेडकर, नारायण खेडकर, प्राचार्य जी. पी. ढाकणे , निलेश भागवत,संजय मरकड ,एकनाथ चन्ने, संतोष दौंडे, गणेश पोटफोडे यांच्या चांगल्या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. या सर्वांच्या लिखाणाचे स्वागत करून त्यांना शूभेच्छा देतो. महाराष्ट्राची वैचारीक धुरा सांभाळणारे साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, तेलंगणा राज्याचे पोलिस महासंचालक महेश भागवत, कायदेतज्ञ भास्करराव आव्हाड हे पाथर्डीचे सुपुत्र वाङमयाशी संबंधीत आहेत ही आणखी आनंददायी गोष्ट आहे.कवी शशिकांत शिंदे यांच्या काव्यप्रतिभेला पाथर्डीतच शब्दांचे धुमारे फुटले . या सगळ्याचा नामोल्लेख या साहित्य संमेलनात होणे आवश्यकच आहे.
अविरतपणाने सोळा साहित्य संमेलने भरवून अनेक नामांकित लेखक, कवी , विचारवंतांचे विचार ऐकण्याची संधी पाथर्डीकरांना देणाऱ्या या साहित्य संमेलनाला दीर्घायू लाभेल असा आशावाद व्यक्त करून थांबतो.
धन्यवाद! शूभेच्छा!
==========================
डाॅ. कैलास दौंड यांची ग्रंथ संपदा
१] उसाच्या कविता : कवितासंग्रह
२] वसाण :कवितासंग्रह
३] भोग सरू दे उन्हाचा :कवितासंग्रह
४] अंधाराचा गाव माझा
५] पाणधुई:कादंबरी
६]कापूसकाळ:कादंबरी
७]तर्होळीचं पाणी: ललितलेख संग्रह
८]एका सुगीची अखेर:कथा संग्रह
सुंदर सर
उत्तर द्याहटवासुंदर सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद विठ्ठलराव!
हटवा