चाक कवितासंग्रह

□ मांग जातीच्या स्थिती गतीच्या प्रत्ययकारी चित्रणाची उत्कट सामाजिक कविता : चाक
. डाॅ. कैलास रायभान दौंड 
 आधुनिक मराठी कविता प्राधान्याने सामाजिक आशयाची कविता आहे. कविता व्यक्तीगत भावना व्यक्त करत असली तरी तिचे व्यापक होत जाणे हेच तिचे यश असते. कवी मोहन लोढे यांचा 'चाक 'नावाचा कवितासंग्रह मे २०१० मध्ये प्रकाशित झाला.पिचल्या गेलेल्या एका समाज घटका बद्दलची कणव आणि त्याला आत्मभान देऊन जागे करण्याची धडपड या संग्रहातील कवितांच्या केंद्रस्थानी आहे. कमालीच्या अस्वस्थतेतूनच या कवितांची निर्मिती झालेली असल्याचे जाणवत राहते. 'चाक' मधील पहिल्याच कवितेत मोहन लोंढे यांच्या कविता लेखनाचे प्रयोजन आणि अपरिहार्यता अतिशय सहज सुंदर रितीने मांडली गेलेली आहे . त्यातून हा कवी स्वांत सुखाय वगैरे किंवा कलेसाठी कला या कॅटेगीरीतील कवी नसुन सामाजिक जाण आणि भान असणारा कार्यकर्ता कवी असल्याचे प्रखरपणे समोर येते . कवितेच्या शब्दाची ताकद त्याला माहिती आहे. त्यामुळेच तो मुद्दामहून रचनेला अलंकृत शब्दांचा साज न चढवता नैसर्गिक साधेपणाच्या बाजातुन कवितेला संवादी बनवतो. म्हणूनच माणसाचं जगणं कवितेतून मांडताना त्यांच भान विसरतं, तो माणसांच्या भावभावनांशी तादात्म्य पावतो आणि मग कविताच त्यांचे जगणे होऊन जाते. लोंढे यांची कविता येते ती अशी जगण्याला लपेटूनच!'चाक 'मधील कविता ज्या जाणीवेतून आणि प्रेरणेतून आविष्कृत झाली आहे ती प्रेरणा 'जिणं आमचं 'या अखेरच्या कवितेतही व्यक्त झाली आहे. -
 'असचं का जिणं आमचं
 प्रश्न कधीच पडला नाही
 आजही पडला नसता पण...!
 वायकरणं थोडसं सोडून दिलयं  
फुले -आंबेडकरांचं 
 वारं कानात शिरलयं
 प्रश्न आणि प्रश्न पडतायत 
 आम्ही असे का? 
 जगणं आमचं 
 एक प्रश्नच झालंय.'(पृष्ठ ६४)
 जगणं प्रश्न बणतं तेव्हा त्या प्रश्नाला अनेक कंगोरे असतात. त्याला सामोरे जातांना जगणं उलगडून, उसवून पहावे लागते आणि ते सामर्थ्य कवीच्या ठाई असल्याचे कवितांमधून प्रतिबिंबित होते. पृष्ठ २४ वर 'चाक! नावाचीच एक कविता आहे. वाखाला पीळ घालुन केकताडाच्या बटीला बटी जोडून कासरं वळायचं काम करतांना पोट भाकरीसाठी रडत असतयं , आतडी रिकामेपणानं पीळवटत असतात. चाक हे गतीचं प्रतिक पण हे चाक कष्टासाठी फिरवून देखील ते भूके जवळ येऊनच थांबत असल्याचे भेदक वास्तव कवी नोंदवतो. सांजच्या वेळेला विचारांच्या वावटळीत शिळ्या तुकड्यासाठी राबणारे दीनवाने , कष्टणारे चेहरे आठवत राहतात. उपाशीपोटी , बटीला बट जोडत कसेबसे जीवन जगणारे लोक आठवतात. तेव्हा कवी लिहीतो - 'त्यांना पाहिलं आहे अनेकदा दारिद्याचं ओझं वागवताना जगण्यातला अर्थ शोधतांना '(पृष्ठ २५) मोहन लोंढे यांची कविता अशा भुकेकंगाल आणि जगण्यातला अर्थ शोधणा-या माणसाच्या जगण्याला शब्दरूप देणारी संवादी कविता आहे. ती एका समाज घटकाला किती कष्टप्रद आणि हलाखीचे जीवन जगावे लागते याचे विदारक चित्रण करतांनाच समाज्याच्या बर्‍या वाईट प्रवृत्तीवरही भाष्य करते हे विशेष आहे. माणुसपणाची मागणी करणारी, आस धरणारी ही कविता आहे. कवीने म्हटल्याप्रमाणे अक्षरांची ओळख झाल्यानंतर महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांच्या शिदोरीवर कवीची जडणघडण झालेली असल्यामुळे 'चाक' मधील कवितांमधून एक परिवर्तनवादी भूमिका खास प्रत्ययास येते. चाक या शब्दांमधून गतिशीलता प्रतिबिंबित होते. माणसाच्या एकुणच विकासात चाकाच्या शोधाचा मोठाच वाटा आहे. वाखाला पीळ देऊन दोर वळण्याच्या कामात चाक महत्वाचे असते. मोहन लोंढे यांच्या कवितेच्या संदर्भात 'चाक' सामाजिक अभिसरणाचेही प्रतिक ठरते.'मन' कविता या दृष्टीने पाहण्याजोगी आहे. आकाश कोसळावे त्याप्रमाणे ओथंबलेल्या मनाला प्रश्न पडतात. या प्रश्नांच्या उत्तरात आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की ही अस्वस्थ करणारी प्रश्नांची मालिका अधिकच लांबत जाते.त्याच बरोबर ती अस्वस्थ देखील करत जाते. कोणतीही कविता त्या कवीच्या आत्मकथनाचाच अंश असते . त्यामुळे कवितेत आलेली भाषा ही खास त्या कवीचीच भाषा असते. अनेकदा ती रूढ भाषेहुन वेगळी आणि सांकेतिक असते आणि असे असले तरी त्याचवेळी तीने समाजभाषेचेही संस्कार पचवलेले असतात . या कवितासंग्रहा पुरते पाहिल्यास 'अंबुजवाय'ही जी बोली आहे ती मांग समाजामधील लोकांची गुप्त बोली आहे.'हेड्या' नावाच्या कवितेत या भाषेतील काही शब्द आलेले आहेत. दहाला आसर, विसाला सुती, शंभरला शिक-या, हजाराला ठोकण,रकमेला वादी असे प्रतिशब्द या भाषेत आहेत. जनावरांच्या बाजारात दलाली करणारे हेडे आपापसात ही भाषा वापरतात. बाजारात दोन पैसे मिळावेत म्हणून लबाड बोलावं लागतं, कधीकधी आपण बोलतो ते सत्य भागवण्यासाठी डोक्यावरील गोठोड्याची भाकरी म्हणून शपथ घेतली जाते; प्रत्यक्षात या गाठोड्यात भाकरी नसुन पायताणं असतात. ही लबाडी अनेकदा उघडी पडते.या दलालीच्या व्यवसायामुळे मांगाच्या पदरात असलं जगणं आल्याचे कवी सांगतो. या कवितासंग्रहातील कवितातून मातंग जातीच्या रूढी परंपरेचेही दर्शन घडते. बेंदर'कवितेत कृषी संस्कृती मधील बेंदर' या महत्त्वाच्या सणासंबंधाने काही चाली रिती परंपरा यांचा उल्लेख येतो. काही भागात या सणाला पोळा म्हणूनही ओळखतात. या सणाच्या दिवशी बैलांना बसवणारे 'बसवे' म्हणून गावातील 'मांग' समाजातील माणसांना मान असतो, घरोघरी तोच आंब्याचे तोरणही बांधतो, आदल्या दिवशी म्हणजे खांदेमळणीच्या दिवशी घरोघरी मोळ टाकण्याचा देखील त्यांचाच मान आहे. या कामाच्या बदल्यात निवदाचा खिचडा, सुप भरून दाणे, पुरण पोळी असं भरभरून मिळतं. पण ते त्या सणापुरतचं. इतर वेळी नाही. पूर्वजांची ठेव समजून डफडी, घुमकी, टिमकी अशी वाद्ये जत्रा आणि लग्नात-वरातीमध्ये वाजवण्याची कामे मांग समाजातील पुरूष मोठ्या ऐटीने ,फुगीरी गाजवत करतात.तल्लीन होऊन अंगातला ताल जागा करण्यासाठी दारू पितात. हे दारू पिणं कविला अस्वस्थ करतं, कारण व्यसनाचे दुष्परिणाम कवीला माहिती आहेत म्हणून कवी लिहीतो -
 ' पूर्वजाची ठेव आणखी किती सावरू ? '
 'धडपड 'ही अशीच आणखी एक कविता- त्यात 'वाख 'तयार करतांना होणाऱ्या दुखर्‍या त्रासाचे प्रत्ययकारी वर्णन कवीने केलेले आहे. हे काम करतांना डोहात पायांना जळवा चिटकून पाय रक्तबंबाळ होतात आणि वाखाला थोपटण्याने थोपटून हात हुळहुळे होतात. तेव्हा पांढरा शुभ्र वाख तयार होतो. त्याला पड जोडून कानी, कासरा तयार केला जातो, दिवसभर हिच धडपड चाललेली असते. तर 'तिढा ' या कवितेत शेतकर्‍यांच्या बैलासाठी कंडा, कासरा, मुस्की, सापती तयार करणारा , गाणं गाऊन बगाड ओवाळणारा , बळीचं राज्य यावं यासाठी सौंदर, नाडा अशा अनेक बाबी शेतकऱ्याला पुरवणारा बलुतेदार मांग आजच्या काळात देखील अन्नाला महाग आहे. बैल हा प्राणी मालकाच्या इमानाला जागतो, त्याला ज्या दाव्याने मालकाने बांधलेले असते ते दावे ज्याने तयार केलेले असते.त्या दाव्याने बैल शेतकऱ्याच्या दावणीला बांधुन राहतात पण त्याला मात्र शेतकर्‍यांच्या मेहरबानीवर जगावे लागते. या तिढ्यातून मांग सुटणार कधी? हा कवीचा प्रश्न म्हणजे मानवी हक्काची मागणीच ठरावा असा आहे. 'जोगतीण'नावाच्या कवितेत कवीने मांग जातीमध्ये ही प्रथा कशी आली ती लोककथा सांगीतली आहे. जोगतीण सोडणे, जट फुटणे, अंगावर नायटे आल्यास ते देवीनेच उठवले असे समजणे आणि त्यातून मुक्तता मिळविण्यासाठी जोगत्याच्या अंधश्रद्धेत गुंतणे असा सगळा अज्ञानाचा बाजार कवीने लीलया उलगडून दाखविला आहे.मांगांचे रहाणीमान देखील या कवितेतून समोर येते. 'कडक इस्त्री, कपड्याला डाग नाही. पांढर्‍या शुभ्र कपड्याला मुबलक नीळ देतो. मीशीला पीळ मारतो. असे हे ऐटबाज राहणे असते. लहान वयात होणारी लग्न, मुलगाच हवा या अट्टाहासापोटी वाढत जाणारी अपत्याची संख्या आणि त्यामुळे वाढणारे दारिद्र्य या व्युहातुन सुटका करून घेण्यासाठी पोरीलाच वंशाचा दिवा म्हणावं लागणार आहे. हे भानही कवी मोहन लोंढे कवितेतून देतात.
 ○ मातंग जातीचे शोषण : काही कवितांमधून या समाज घटकाचे कसे शोषण केले जाते याचे चित्रण प्रभावीपणाने येते. 'आम्ही वंचित ' या कवितेत आता माणुसकी हरवत चालली आहे; उसणं पासनं करण्याची पध्दत बंद झाल्यासारखीच आहे. मात्र मांग समाजाला अजूनही इतर समाज जिथे तिथे 'माग सरं 'असं म्हणतात. मग या काळात सगळे प्रगतीवर असतांना आपणच का बरे मागं? असा प्रश्न कवीला पडतो. 'मलिदा 'कवितेत 'राबतोय कोण मलिदा कोणाला? 'हा प्रश्न विचारून कष्टणाऱ्यांची चूल का पेटत नाही? हा विचारही कवी मांडतो. 'पवनचक्की' ही कविताही अशाच प्रकारच्या शोषणाची हकीकत मांडते. माणसानेच माणसाचा घात केला आणि त्यामुळेच अंधारलेल्या गावात सगळाच अंधार झाला आहे असे कवी नोंदवतो. 'पुढारीपण' या कवितेत कवी मातंगाचा पुढारी स्वार्थ साधण्यात मग्न आहे. आत्मसन्मान, हक्क यासाठी निषेध मोर्चा, मशाल मोर्चा काढण्या ऐवजी तो परंपरावादी पार्टीच्या नेत्यापूढे लवण्यात,झुकण्यात इतिकर्तव्यता मानत आहे? कसलेही आत्मतेज न उरल्याने आपल्या कार्याचा ठसा उमटावयाचे सोडून मंडळाचा तुकडा मिळवण्यासाठी गळ्याला कॅन्सर होऊस्तोवर गोडवे गात आहे. कवी उपरोधाने लिहितो - ' वा रे पुढारीपण धन्य आहे.' आता फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांचे गोडवे गात अन्यायाला प्रतिकार करायला हवा,प्रस्थापितांना शह देऊन दलितांचे ऐक्य वाढवायला हवे. शत्रुंनी सावध होत आमच्यात तेढ निर्माण केली आहे. हे सांगुन कवी 'बंड' कवितेत मांडतोय - 
'मांगवाड्यावर हल्ला बौद्ध थंड
 बौद्धावर हल्ला मांग थंड 
सत्ता भोगतोय प्रस्थापित
 प्रस्थापितांचा चालतोय दंड 
 कधी होणार समाजाचे बंड. (पृष्ठ ५०)
 दलित नेते देखील स्वार्थी निघाले, त्यांना समाजाचे देणे घेणे उरले नाही. त्याच्या लेखी पैसाच तेवढा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज दरिद्री माणसं आणि वंचित समाज यांच जगणं कठीण झालं आहे. हे वास्तव कवी 'आम्ही दलित 'या कवितेतून मांडतो. 'दिशाहीन' नावाच्या कवितेतूनही हाच विषय समोर आला आहे. नेतृत्वच दिशाहीन झाल्यामुळे समाजही दिशाहीन झाला आहे. प्रत्येकजणच नेतागिरीत धुंद झाला आहे. कुणीच कार्यकर्ता व्हायला तयार नाही. समाजाला जागवण्यासाठी पुन्हा एकदा पेटून उठायला हवं. 'बळ' जमवायला हवं. 'लाजिरवाणे जिनं जगायच नाय'. असा निश्चय करायलाच हवा. 'राबणं' वाटणीला आलयं हे खरं असलं तरी - 'बिंडा वागवण्यातच जीवन आता घालवायचं नाय '(पृष्ठ ६३) हा कवीचा आशावाद मोठा प्रेरक आहे. एकता असल्या शिवाय प्रगती होणार नाही.आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र जमण्यापुरतीच काय ती एकता दिसते ! प्रत्येक जातीचा वेगवेगळे झेंडे दिसतात. सगळीकडेच भेदाभेद असतो. सगळे रंग एकत्रित येतील का?आणि आमची उपेक्षा थांबेल का? असा मुलगामी प्रश्न कवीला पडला आहे
. ○ मातंगांची सामाजिक स्थिती : काही कवितामधुन या समाजाची सामाजिक स्थिती वास्तवतेने कविने मांडलेली आहे. व्यसनाधीनता कोणत्याही व्यक्तीच्या अधःपतनास कारण ठरते.हा कवी केवळ भूतकाळात रमत नाही तर समाजाच्या परिवर्तनाचा भागीदार देखील बणतो. दारुचं व्यसन, हा कलंक पुसण्यासाठी तो समाजाला खडसावतो तो असा -
 ' दारूच्या व्यसनानं घाणीत लोळतो 
 रस्त्यानं झोकाझोकी 
 गटारात वकावकी
 हे संपणार कधी?
 संसार तुडवून
 पिंडकेपणात गेलं सारं 
 जगण्याच्या उभारीत 
 समाजाला लागलेला 
 कलंक पुसणार कधी? '(पृष्ठ -२३)
 राबण्याचा पिढीजात धंदा असला तरी तो आनंदाने सांगता येत नाही कारण त्याने पोट भरत नाही. कितीही कष्ट केले तरी त्या कष्टाला मोबदला मिळत नाही. आम्ही पोटाला खायचं कसं? आणि जगायचं कसं? असे प्रश्न कवितेतून जेव्हा येतात तेव्हा ते अस्वस्थते बरोबरच भयचकित देखील करून जातात. 'माळावरचा जन्म 'या कवितेतून 'माणसाला देह झाकायला, फाटका तुकडा नाय 'अशा अभावग्रस्त दरिद्री जगण्याचं चित्र नेमकेपणाने उभे राहते. वढ्याला सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळेल याची खात्री नाही. सामाजिक भेदभावावर खूपच सुचक आणि संयत भाष्य कवीने या कवितेत केले आहे. 'फुरमान 'या कवितेत मांग समाजामध्ये एकी नाही .लोकांनी केलेल्या खोट्या स्तुतीत समाधान मानण्याची प्रवृत्ती; त्यात पुन्हा अंगात असलेला थोडाफार अभिमान यामुळे पिढ्यानपिढ्या या समाजात काहीही फरक पडलेला नाही. 'समाज करतोय सदा तंग म्हणून झालाय मातंग ' असे प्रत्ययकारी चित्रण येते. यथा तथा मिळणाऱ्या बलुत्यावर समाधान मानणे महागात पडणारे आहे. केरसुणी, दोरखंडावर चालणारी उपजीविका यांत्रिकीकरणाने धोक्यात आली आहे. यंत्रावरचं सूत बाजारात आल्यानं घायपात जणू घातपात ठरत आहे. असं चित्र 'घातपात 'कवितेतून समोर येते. 'स्वातंत्र्य ' मिळालं म्हणतात पण ते फक्त धनदांडग्यांच्या वाट्यालाच आहे. निवडणूकीत तेच आळीपाळीने निवडून येतात. गाड्या बदलतात, त्यांचे बंगले वाढतात आणि आमच्या वाट्याला झोपडीच असते. आहे त्या परिस्थितीत काहीही फरक पडत नाही. इथे कुणीच कुणाचं भलं करीत नाही. हे निरीक्षण कवी नोंदवतो. बामणा घरी लिवणं, कुणब्या घरी दाणं अन् मांगा घरी गाणं ही म्हण होती पण शहाण्या समाजाने गाणं, नाचणं सारं हिसकावून घेतलं, आतातरी शहाणा हो! असे कवी सामाजिक भान देतो. मांग तरूणाला कवी त्याच्या शौर्याच्या,त्यागाच्या परंपरेचे भान देतो. न्यूनगंड सोडून द्यायला सांगतो. बुद्ध, तुकाराम, शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाशभाऊ साठे यांचे चरित्र वाचुन वैचारीकता निर्माण करण्याचा सल्ला देतो. शिक्षण घेतले तरच प्रगती होणार हे सूत्र समजावतो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साऱ्यांसाठी केलं .शिक्षणाचं बाळकडू दिलं. राखीव जागांचा आधार देऊन शिक्षणाचा ध्यास घ्यायला सांगीतला. आणखी जगायला काय हवं? हाच आधार मोठा आहे. असे सांगून कवी या महापुरूषाप्रतीचे ऋण व्यक्त करतो. 'जयभीम' कवितेतील या ओळी पहा -
 'ज्ञानसूर्यानं पालटून टाकलं सारं  
आता तरी त्याचा
 टिकवून ठेवा बाणा
 जयभीम म्हणा 
आता जयभीम म्हणा! ' 
हे सांगतानाच आता ताठ मानेने जगायलाच पाहिजेच हे बिंबवतो . अज्ञान अंधकार पाचवीलाच पुजलेलाच होता पण ज्ञानसूर्यानं सारं पालटून टाकलय. आता तरी ताठ मानेने सारे मिळून बंड करूया!असे कवी सांगतो.'माणसातला माणूस ' म्हणून माणुसपणाच्या हक्कासाठी बंड करण्यास तो तयार झाला कारण डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा संदेश दिला आणि त्यामुळेच मांग देखील आज जागा झाला आहे. हे वास्तव कवी नेमक्या शब्दात नोंदवतो. 'बोललो होतो 'या कवितेत कवी जेव्हा पहिल्यांदा डाॅ. आंबेडकर जयंतीत बोलले होते तेव्हा गावकऱ्यांनी केलेले बोलावणे, त्याच्या घरावर दगड मारण्याची दिलेली धमकी त्याच्या स्मरणात आहे. शिक्षण घेतल्यामुळेच जयंतीत बोललो होतो. हे भान शिक्षणातूनच आले होते हे तो आवर्जून नोंदवतो. मतांच्या झोळ्या भरून घेऊन जाणारेच जातीपातीचे विष पेरतात. कवी लिहितो- 'आम्ही सारे एक म्हणणारेच करतात आपलाच घात मग सांगा का विसरलो नाही आपण अमानुष जात? '(पृष्ठ ४७) 'गेली नाही जात 'ही देखील अशीच एक अस्वस्थ करणारी कविता आहे. 'माणसाला माणूस म्हणून जगू दे , तथाकथित देवपण सोडून माणूस बनू दे.' हा कवीचा प्रागतिक विचार एकुणच समाजाला पुढे घेऊन जाणारा आहे. मांग अजूनही उपेक्षितच राहीला आहे. दलितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला दलितमित्र पुरस्काराने गौरविण्यात येते. प्रत्यक्षात हां जी हां जी करत वाकुन नमस्कार करणाऱ्याला दलितमित्र पुरस्कार मिळतो. त्यामुळे अशा पुरस्कृत व्यक्तीला त्याच्या दलित गणगोताचीही ओळख नसते. त्याला स्वतःला कधी कधी दलित जातीत जन्मलो याचाही तिरस्कार वाटतो; असे विषम वास्तव कवीने मोठ्या धाडसाने मांडले आहे.म्हणजेच कवी केवळ परिस्थितीचे चित्रण करून थांबत नाही तर त्यावरील परिणामकारक उपायही सांगतो. कवी आण्णा भाऊ साठे यांची महती 'सत्यशोधक 'या कवितेतून मांडतो.आण्णा भाऊ खऱ्या खोट्या चा निवाडा करणारे जागतिक कीर्तीचे सत्यशोधक होते हे सांगतो. त्यांचे विचार आणि आदर्श जपायलाच हवा हे आवर्जून सांगतो हे लक्षणीय आहे. 
 ○ कवितेचे वेगळेपण आणि बलस्थान: या कवितेचे सौंदर्य तिच्या साधेपणातच आहे. मातंग जातीच्या माणसांच्या पारंपरिक व्यवसायाचे, कामाचे, कष्टाचे, अभावाचे रूप या कवितेतून अभिव्यक्त होते. एकुणच 'चाक'मधील कविता मांग जातीच्या जगण्या भोगण्याचा मोठाच सामाजिक दस्ताऐवज बणली आहे. कवीचे सामाजिक भान या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. या कवितेतून राजकिय नेतृत्व, उच्चतम वारसा, पारंपरिक पद्धतीचे जगणे या सर्वांचा जगण्यावरच पडलेला भला-बुरा प्रभाव दिसतो. समाजोत्थानाची कवीची मनस्वी तळमळ दिसते. कवीने बोलीभाषेतील शब्दांचा केलेला वापर कवितांना अधिक जीवंत रूप प्राप्त करून देतात अशा भाषिक संचिताकडे पाहतांना :चिराण ,चिरपण, वाख,वाक, पड, पिंडका, निडाळी, तिनुन, बटी, बुरकूल,बेनवाड, केरसुणी, फुरमान, घातपात,बस्तरी, आसर, सुती, शिक-या, ठोकण,वादी, घुमकी, बगाड, ऐरा,तिडा, पयरा, वायकरणं असे जे शब्द मोहन लोढे कवितेत योजतात त्यातून मोठेच सांस्कृतिक आणि सामाजिक वर्तमान दृश्यमान होते.'कडक इस्त्री वागण्यात बस्तरी ' , अशा काही लोकोक्ति देखील कवितेचा परिवेश वाढवतात.नेमकेपणा ,छोटा आकार आणि मोठी परिणामकारकता ही या कवितांची वैशिष्ट्ये आहेत. ही कविता लोकसंवादी आहे. कविता म्हणून जितकं या संग्रहातील कवितांचं मोल आहे. तितकीच सामाजिक दृष्ट्याही ही कविता मौलिक आहे. चाक कवितासंग्रहातील कवितांमधून मांग समाजाच्या सद्यस्थिती सह त्यांच्या उत्थानाची तळमळ व्यक्त होते.सद्यस्थितीची समीक्षाही या कवितांमधून नेमकेपणाने व्यक्त होते. सामाजिक तळमळीतून साकारलेली ही सकस कविता साहित्य जगताचे लक्ष वेधून घेणारी आहे. जी. के. ऐनापूरे यांनी चितारलेले मुखपृष्ठ सुचक आणि वेधक आहे मोहन लोढें आणि निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांची 'चाक' ही एक मौलिक निर्मिती आहे. ===========================
 मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन ४१४१०२ मो. . ९८५०६०८६११ Email.Id: kailasdaund@gmail.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर