नवी कविता
मोकळे होतसे गाणे
नात्यांची भरता जत्रा
खेळ कवडीचा चाले
व्यथेला वारस होता
भ्रमात पाळणा हाले .||१||
अंधुक स्मरते काही
नेत्राशी आतले खोल
जगण्याच्या ठेचांनीही
अंजना लाविले बोल ||२||
मेघांची किनार काळी
अस्ताला सूर्य जातांना
उजेड आतला पांगे
धुसर धुसर होतांना. ||३||
आटली नदी तरीही
प्रवाही होते जगणे
शेवाळ वाळते तेव्हा
दगडांचे होते गाणे. ||४||
स्तब्ध किनाऱ्यावरती
धाऊन येतसे लाट
विसावली पाऊलेआणि
जाण्यास निघाली वाट. ||५||
देहाचा फुलला चाफा
आशांची झडली पाने
शब्दांना सारून आता
मोकळे होतसे गाणे. ||६||
==================
डाॅ. कैलास रायभान दौंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा